महालक्षुम्या

९ वर्षांपूर्वी हा लेख मायबोलीवर लिहिला होता. ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यातल्या टिपिकल ब्राह्मणी घरातलं वातावरण असं या लेखात लिहिल्यासारखं असायचं. आज वाचताना नॉस्टॅल्जिक होताना वाटतं की तो भाबडेपणा तेवढा तसाच रहायला हवा होता !
आज घरोघरी गौरी आल्या असतील त्या निमित्ताने इथे शेअर करतेय :)

आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात. माझ्या लहानपणच्या आमच्या घरातल्या लक्षुम्यांच्या या आठवणी. मी आठनऊ वर्षांची असेन तेव्हाच्या.

अण्णांच्या नोकरीमुळे आम्ही लातूरला रहायचो. पण मुख्य देवघर मंजरथलाच. त्याला अण्णा हेडक्वार्टर म्हणायचे. गोदावरीच्या काठावर असलेल्या या छोट्याश्या क्षेत्रावरचे आमचे भटांचे घराणे. आजोबा म्हणजे जोशीबुवांचा गावात चांगलाच वचक. काका पण याज्ञिकी शिकलेले. पण शेती करायचे. अजूनही करतात. अण्णा आणि काका असे दोनच भाऊ. त्यामुळे आटोपशीर कुटुंब. शेती, गाईगोर्‍हे भरपूर...आजोबांचे पौरोहित्य उत्तम. त्यामुळे गावात आमचे कुटुंब सधन समजले जायचे. क्षेत्राचे गाव असल्याने बहुसंख्य कुटुंब ब्राह्मण. बाकी मराठा, भोई, कोळी अशी कुटुंबेही गावात सलोख्याने राहात असायची.

लक्षुम्यांसाठी मंजरथला जायचं म्हणलं की मला उड्या मारण्याएवढा आनंद व्हायचा. तर आम्ही लातूरहून बसने माजलगावपर्यंत यायचो. तिथे काका बैलगाडी घेऊन आलेले असायचे. रत्न्या-मोत्या ही देखणी खिल्लार बैलजोडी. बैलगाडीत खाली खूप आदळे बसू नयेत म्हणून कडबा पसरलेला. त्यावर जाड सतरंजी आणि त्यावर एक गादी. मी, आई, अण्णा नि विवेक सामान ठेवून आरामात पाय पसरून बैलगाडीत बसायचो. काका गाडी हाकायचे. पक्के रस्ते नव्हतेच. धडेल्धुम धडाम्धुम अशी गाडी चालायची. रस्त्यावरच्या खड्ड्यांनी आम्ही जागेवरच उडायचो. मला नि विवेकला फार मजा वाटायची. पुढे जेव्हा कच्चा रस्ता तयार झाला तेव्हा आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून मंजरथला जायचो. काही दिवसांनी बस सुरू झाली. ती तास दोन तास तरी लेट असायची. मग आम्ही वाट बघायचा कंटाळा आल्याने चालत १० किमी जायला किती वेळ लागेल असे हिशेब करत बसायचो.

आमच्या वाड्याला मोठ्ठे फाटक आहे. अगदी हत्ती जाण्याएवढे ! तिथेच दारात आम्हा चौघांना थांबवले जायचे. अम्मा म्हण्जे माझी आजी भाकरतुकडा ओवाळून टाकायची. फाटक ओलांडून आत आले की पहिल्यांदा गाईगुरांचे हंबरणे, गळ्यातल्या घुंगरांचा आवाज नि शेणामातीचा मन शांत शांत करणारा गंध यायचा. मी आधी वासरं किती आहेत ते मोजून घ्यायची. आजपर्यंत ६-७ वासरांपेक्षा कमी वासरे मी गोठ्यात बघितली नाहीत. गायी पण १२-१५ असतातच. गोठ्यानंतर ७-८ पायर्‍या चढून मुख्य वाडा. घरात कायम एक पाळलेला कुत्रा आणि ५-६ मांजरं ! आमचं गाव मार्जारक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने मांजर अशूभ मानत नाहीत. मोत्या नि ही मांजरं लगेच जवळ येऊन हुंगायला लागायची. असं मस्त वाटायचं. त्यांनी मला ओळखलं हे समजायचं. मग हात पाय धुवून देवाच्या पाया पडायचं. आजी,पणजी, आजोबा, काका नि काकू यांना नमस्कार करायचा. आणि मग जेवायला बसायचं. दूधातुपाचं जेवण जेवल्यावर मस्त झोप काढायची. नाहीतर चुलतभावंडांशी खेळत बसायचं.

आमच्या अंगणात मोठ्ठे कडुनिंबाचे झाड आहे. मी जाणार कळल्यावर आजोबा त्याला झोका बांधून घ्यायचे. उंच फांदीला सोल बांधून आणि एका बुटक्या फांदीला साखळदंड असलेला झोपाळा. मी कंटाळा येईपर्यंत झोके खेळत बसायची. मग थोडावेळ लहानग्या भावंडांना खेळव, मांजरींना जवळ घेऊन लाड कर, आजी, पणजीशी गप्पा मार असे उद्योग चालायचे. जेवणाची झाकपाक झाली की आई नि काकू लक्षुम्यांच्या फराळाचे पदार्थ बनवायच्या तयारीला लागायच्या. हे पदार्थ नैवेद्य म्हणून एका लोखंडी मंडपीला अडकवून लक्षुम्यांच्या डो़क्यावर टांगायचे असत. म्हणून त्याला फुलोरा म्हणायचे. या फुलोर्‍यात चकली, शेव, अनरसे, लाडू, पापडी आणि मैद्याची वळून तळलेली एक वेणीपण असायची. दोन दिवस मग खोल्यांमधून, अंगणात मस्त खमंग वास दरवळत रहायचा.

पावसाळी दिवस असल्याने गंगेला भरपूर पाणी असायचे. ( गोदावरीला गंगाच म्हणतात आमच्याकडे) एका ठिकाणी सिंधुफेणा नदी पण गंगेला येऊन भेटते तो संगम पण आमच्या गावात आहे. पाऊस नसेल तर या संगमावर आम्ही सगळी भावंड पोहायला जायचो. गंगेच्या पात्रापेक्षा खूप कमी पाणी असायचं इथे. त्यामुळे त्या खळखळ वाहाणार्‍या वाळू दिसेल इतक्या स्वच्छ पाण्यात डुंबायला खूप मजा यायची.

दुसरा एक कार्यक्रम असायचा देवळात जाण्याचा. घरापासून हाकेच्या अंतरावर गंगा नि अगदी समोर मुख्य ग्रामदेवता त्रिविक्रम मंदीर. त्रिविक्रमाला जाताना वाटीभर गहू सोबत घेऊन जायचे. तिथे देवापुढे ठेवायला. खूप प्रसन्न वाटायचे त्या आवारात. जुने हेमाडपंती देऊळ. गाभार्‍यात घुमणारा मंत्रघोष, लक्ष्मी-त्रिविक्रमाची शांत समईच्या प्रकाशात गंभीर आश्वस्त वाटणारी मूर्ती, सभामंडपातले कासव नि घंटा, प्रदक्षिणा मार्गावरचे तुळशी वृंदावन, मंदिराच्या चारी दिशांना असणार्‍या संरक्षक देवतांच्या मूर्ती.......सगळे सगळे खूप आपले वाटायचे. बडव्यांच्या घरातल्या पोरी, बोर्‍यांच्या घरातल्या पोरी अशा माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आत्ताच भेटणार्‍या मैत्रिणी जमायच्या. मग आम्ही खेळनपाणी खेळत बसायचो. दिवेलागणीला आजोबांची दणदणीत हाक ऐकू आली की या पोरी धुम पळून जायच्या. मी पण घरी परतायची. मग देवापुढे शुभंकरोति म्हणायचे. काकांकडून गीता, विष्णुसहस्त्रनाम, महिम्न असे काहीतरी शिकायचे... घोकत बसायचे. यातून बाकी सर्वांना सूट मिळायची. मी एकटीच हे सगळे करत असे. त्यामुळेच की काय मी घरात सगळ्यांची खूप लाडकी होते. नातवंडात सगळ्यात पहिली नि तीन पिढ्यांनंतर जन्मलेली मुलगी म्हणून मला सगळे जपायचे. तीन पिढ्या घरात मुलगीच नसल्याने मला कधीही घरात 'मुलींची' वागणूक मिळाली नाही. तू मुलगी आहेस म्हणून हे कर ते नको असे कधीच झाले नाही. कर्मठ भटांच्या घराण्यात हे एक नवलच !

हे सगळे होईपर्यंत धारा काढून व्हायच्या. माझ्या खास तपेलीत मला धारोष्ण दूध मिळायचं. अम्मा कालच्या दुधाचं विरजण लावताना लाल तापलेल्या दुधावरची थोडी साय आणि शिंपल्याने काढलेली खरवड माझ्या हातावर ठेवायच्या... ! पक्की मांजर होते मी ! दूध, साय, लोणी, तूप सगळे पोटभर खायची. रात्रीची जेवणं व्हायची. नि पाऊस नसेल तर लिंबाखाली बाजेवर अंथरूण टाकून दिवसभराच्या सुखाने थकून गाढ झोप लागून जायची.

सकाळी जाग यायची ती रप्पक रप्पक अशा सडा घातल्याच्या आवाजाने. अजून उजाडलेही नसायचे. पण सगळे घर, गोठा जागा झालेला असायचा. शेणाच्या गवर्‍या लावायला मला भारी आवडायचं. पणजी ते काम करायची तेव्हा मी मधे मधे करत बसे. मग घरी बनवलेले मंजन हातात घेऊन वतलासमोर( पाणी तापवण्याचा हंडा त्या चुलीतच रोवलेला असतो.चुलीचे तोंड नहाणीबाहेर नि हंडा मात्र नहाणीत अशा रचनेला वतल म्हणतात ) मस्त शेकत दात घासत बसायचे. राखुंडी,तुरटी, मीठ असं काय काय मिसळून ते स्वादिष्ट मंजन तयार केलेलं असायचं. दात घासून झाले की शेणानं शिंपलेल्या अंगणात रांगोळी काढायची. मन लावून तासभर रांगोळी काढत बसायचे मी. नंतर अंगणातल्या पारिजातकाची फुलं गोळा करायची. दूर्वा तोडायच्या. आघार्डा तोडायच्या. आणि काकू जवळ नेऊन द्यायच्या की काम झाले. मग पुन्हा दूध आणि न्याहारी. गंगेत डुंबणे नि देवळात खेळणे.

संध्याकाळी महालक्षुम्या येणार म्हणून पुन्हा झाडझूड व्हायची. सडा रांगोळी अधिक निगुतीनं केली जायची. नवे कपडे घालून लक्षुम्यांच्या स्वागताला तयार. दिवेलागणीला आई किंवा काकू एका ताम्हणात हळदी कुंकू पाण्यात कालवायच्या. या पाण्याचे मुख्य दारापासून देवघरापर्यंत हातवे द्यायचे. दोन हातव्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळीने लक्ष्मीची पावलं असलेले शिक्के द्यायचे. हे करताना दर पावलाला एक प्रश्न विचारण्याचं काम माझ्याकडे असायचं. ' काय करतेस ? ' यावर उत्तर मिळायचं " सोन्याच्या पावलानं लक्ष्मी येते तिला हातवे देते". एक दोन वेळा असं झालं की तिसर्‍यांदा पुन्हा तोच प्रश्न विचारायचा मला भारी कंटाळा यायचा. पण आई ओरडायची, " अगं विचार की... " !

मग हंड्यावर हंडे ठेवून त्यावर साडी पोलकं नेसवून लक्षुम्यांचे दोन आणि त्यांच्या पिलवंडांचे दोन मुखवटे ठेवले जायचे. सगळ्या प्रकारचे खोटे दागिने, गजरे, हार यांनी या जेष्ठा कनिष्ठा सजायच्या. समोर धान्याच्या राशी ओतल्या जायच्या. खेळणी, फुलं यांनी सुंदर आरास केली जायची. लख्ख झालेल्या समया तेवायच्या.त्या प्रकाशात त्या मुखवट्यांचे डोळे सजीव भासायचे. घरादारात धूप नि उदबत्त्यांचा वास घमघमायचा. रात्री आरती व्हायची नि लक्षुम्या झोपायच्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी मुगाची खिचडी नि येसर आमटीचा नैवेद्य. तोच सर्वांचा फराळ. बाकी पदार्थांचा फुलोरा तयार व्हायचा पण अजून ते खाण्यासाठी वेळ असायचा. काका सोवळे नेसून देवपूजेला बसायचे.काकू लक्षुम्यांच्या पूजेच्या तयारीला लागायची. आई नि आजी सैपाकाला लागायच्या. सवाष्ण ब्राह्मण यांना जेवणाचे आमंत्रण जायचे. सैपाकाचा एकदम थाट असायचा. सोळा भाज्या, सोळा चटण्या कोशिंबिरी, वडे, पापड, कुर्डया, पुरणपोळ्या, कढी, साखरभात, साधा भात, मसाले भात आणि खीर कानवला ! या सर्वांच्या वासांनी आम्ही पोरं सैपाकघराजवळच रेंगाळत रहायचो. पण सैपाक कडक सोवळ्यात चालेल याची आजोबा काळजी घ्यायचे. चुकून इकडे तिकडे हात लागला तर आई आजीला बोलणी खावी लागायची.

मुख्य पूजा सुरू व्हायची. ती बराच वेळ चालयची. मग आरत्या सुरू व्हायच्या. शेवटी नैवेद्य दाखवला की महलक्ष्म्या अशा खूष दिसायच्या !!! सवाष्ण ब्राह्मण आलेले असायचे.पाट मांडले जायचे. रांगोळी काढली जायची. उदबत्त्यांच्या घमघमाटात पंगत वाढली जायची. काकू नि काका वाढपाचे काम करायचे. ताटं वाढून झाली की काका सगळ्यांना गंध लावून नमस्कार करायचे. आम्हा पोरांची रांग पण नमस्कारासाठी गर्दी करायची. शेवटी हातात पाणी घेऊन संकल्प सोडला जायचा. भोजनमंत्र खणखणीत आवाजात व्हायचा नि जेवणं सुरू व्हायची. मन भरेपर्यंत जेवत रहायचो आम्ही. ताटात काही टाकायचे नाही हा दंडक होता. कोणी टाकलेच तर तो आलेला ब्राह्मण जरी असला तरी आजोबा त्याची व्यवस्थित कानउघाडणी करायचे. वर दक्षिणा देऊन नमस्कारही करायचे ! नंतर सगळे विड्याची पानं घेऊन गप्पा मारत थोडावेळ बसायचे. आम्हा पोरांनाही विडे खायला मिळायचे. मग आम्ही कोणाचे पान जास्त रंगते याची शर्यत लावायचो. मधूनच काका गोठ्यातल्या वासरांना चारा पाणी वाढून यायचे. शेतावर राबणारे गडी परतले की त्यांना ताजे वाढण दिले जायचे.

बायकांची पंगत व्हायची.झाकपाक केली जायची. कुत्र्या मांजरांना खायला मिळायचे नि दिवसभराचे थकले भागले घर विडे खात गप्पा मारत जागायचे. आम्ही पोरं तुडुंब जेवल्याने झोपून जायचो. तिसर्‍या दिवशी सकाळी सकाळी चटचट आवरून हजर असायचो. आज फुलोर्‍याचा फराळ ! मोठ्या ताटलीत शेव चिवडा, लाडू, अनरसे, करंजी, चकली असे पदार्थ यायचे. आम्ही तुटून पडायचो. दुपारी साधे जेवण नि संध्याकाळी हळदीकु़ंकू. गावातल्या झाडून सगळ्या बायका नटून थटून एकमेकींकडे हळदीकु़ंकवाला जायच्या. कोणाची आरास कशी, नवे दागिने, साड्या यांचे प्रदर्शन व्हायचे. उखाणे घेताना चेष्टामस्करी व्हायची, गावातल्या पणज्या, आज्या, सगळ्या यात सामील व्हायच्या. सगळ्या गावात जणू या गौराया हसतखेळत असायच्या. इथे कोणत्याही भेदभिंती नसायच्या.

रात्री पुन्हा निरोपाची आरती व्हायची. खीर कानवल्याचा नैवेद्य व्हायचा. लक्षुम्यांच्या पूजेचे धागे सोळा गाठी मारून घरातल्या लक्ष्म्यांच्या गळ्यात घातले जायचे. आम्हा पोरासोरांच्या हातात आठ गाठींचे धागे बांधले जायचे.

जड मनाने मुखवटे उतरवले जायचे. पेटीत सुरक्षित ठेवले जायचे. दागिने, सजावटीचे सामान काळजीपूर्वक कापडात बांधून ठेवले जायचे. समोरच्या धान्याच्या राशी घरातल्यांनीच खायच्या म्हणून लगोलग दळायला पाठवल्या जायच्या. आमची लातूरला परत निघायची वेळ जवळ यायची. फराळाच्या गाठोड्या बांधल्या जायच्या. सामान कपडे यांच्या पिशव्या भरल्या जायच्या. असा हा लक्षुम्यांचा सोहळा आठवत आम्ही पुन्हा बैलगाडीत बसायचो.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle