चिठ्ठी भाग 5

चिठ्ठी भाग 4 -
https://www.maitrin.com/node/3952

"अनु, बाळा, जा बरं पोलीसताई कडे हा गजरा नेऊन दे बरं. विसरली वाटतं नीलू. तसंच पेरू काढून ठेवलेत. ते त्या पलिकडच्या गल्लीत राहतात ना वकीलीणबाई, त्यांना दे. पाहुणे येणारेत त्यांच्या कडे. नेशील ना व्यवस्थित? ", सुमाने विचारलं.
"होssss"
असे ओरडून पिशवी सावरत रस्त्याला लागला अनु. नेहमी प्रमाणे घराबाहेर पडताच एखादा दगड हुडकून तो ठोकारत ठोकारत चालला होता तो.
"मावशी! एक कच्ची पपई काढून द्याल का? काकुआज्जींना हवी होती". मध्येच एका घराकडे थांबून मागणी केली अनुने. त्यांनी दिलेल्या पपई पिशवीत नीट ठेवून घेतल्या त्याने. ह्या सर्व प्रकारात त्याने ठोकारत आणलेला दगड हरवला. नवीन दगड हुडकायचा कंटाळा आला त्याला. हातातली पिशवी जड झाली होती. तो आजुबाजूचा परिसर न्याहाळत भरभर चालु लागला.
त्या सुटबूट काकांच्या घराने त्याचं लक्ष वेधून घेतलं. फाटक तसं लागलं असलं तरी म्हणावं तसं पक्कं कंपाऊंड झालं नव्हतं. त्यामुळे त्याला घरासमोरची बाग दिसत होती. तो एका भिंतीवर चढला. हातातली पिशवी भिंतीवर ठेवून तो केळीच्या मोठ्या पानामागून डोकावून पहायला लागला.
आधी असलेल्या पडक्या घराचा अनुला फार फायदा होता. माझं ऐकलं नाही तर पडक्या घरातून एक माणूस येईल आणि पकडून घेऊन जाईल असे म्हणताच चिंगी तिच्याकडचा खाऊ त्याला पटकन देऊन टाकत असे. शिवाय त्याला हवे तोच खेळ खेळत असे. याला हनी आणि बनी अपवाद होत्या म्हणा. त्याने असलं काही सांगितलं की लगेच भोकाड पसरून घरी पळून जायच्या. चिंगी मात्र ऐकायची त्याचं. इतकंच काय तर त्याच्या खोड्याही तिच्या वडीलांना सांगत नसे.
आता या नव्या घरामुळे पंचाईत झाली ना! चिंगी तर अजिबात घाबरेनाशी झाली. त्या दिवशी पण विटीदांडू किंवा क्रिकेट खेळू म्हटलं तर म्हणे- 'विटी लागते जोरात आणि नेहमी बॅटींग तूच करतोस. बाॅल गटारीत टाकून मी खेळत नाही जा म्हणतोस आणि बाॅल शोधून धुऊन आणला की परत बॅट हिसकावून खेळायला लागतोस'.
उलट बाबांची भीती दाखवल्यामुळे अनुला तिच्या बरोबर लंगडीची घरं आणि विषामृत खेळावं लागलं होतं. 'हे काय खेळ आहेत का? कमीत कमी रंगात रंग तरी खेळायचं!'. आताही ते सर्व आठवून अनु चरफडला. नव्या घरातून कुणी तरी बाहेर आले.
अनुला सर्व स्पष्ट दिसत होते. घरासमोर मधोमध असलेल्या हिरवळीवर एक टेबल होता. आजुबाजूला काही खुर्च्या. एका खुर्चीवर ते सुटबूट काका बसून काहीतरी वाचत होते. त्यांच्या समोर एक किटली होती आणि काही कपबश्या. एका मोठ्या नक्षीदार बशीमध्ये बिस्कीट सारखं काही तरी होते. एका बाजूला पाण्याचा जग आणि एक दोन ग्लास. आत जाऊन त्या बशीमध्ये काय आहे ते बघायचा फार मोह होत होता अनुला. तो खाली उडी मारणार तेवढ्यात आतून एक मुलगी बाहेर आली. लहान लहान केस, त्यांना समोर पिन अडकवली होती. हातातला सुंदर फुलांचा तिने टेबलावर असलेल्या फुलदाणीत ठेवला आणि काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसली ती. 'चिंगीएवढीच आहे ही', अनु पुटपुटला. मोठ्या उत्सुकतेने तो समोर बघू लागला.
"परी, आप ने दुध पिया बेटा?"
"नहीं पापा. मुझे hot chocolate चाहिये. मैने काका को बोला है, वे लातेही होंगे. आपको और चाय चाहिये? "
"हाॅ. लेकीन कुछ देर से"
संवाद संपला तसं परीने एक पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. छान रंगीत चित्रे होती त्यात. ती पहायला पुढे वाकायला गेला अनु आणि धपकन पडलाच. काय झाले ते पहायला परी बाहेर धावत आली आणि अनु पळल्याच्या दिशेने पहात उभी राहिली.
*****
"पोलीसताई, हा घे तुझा गजरा. हा घट्ट झाकणाच्या डब्यात ठेव आणि उद्या लाऊन जा काॅलेजला"
अनुने पिशवी रिकामी केली. येता येता पेरूंची डिलीव्हरी करून आला होता तो.
"चिंगी नाही का आली? एकटाच आलास?", नीलूने रांगोळी काढत विचारलं.
"नाही ना आली अजून. शाळा बुडतेय एवढी. त्याचं काही नाहीये पडलेली तिला"
अनुच्या बोलण्याचं हसू आलं नीलुला. "जसा काही तू नियमित जातोस शाळेत! बरं सांग ना कशीये रांगोळी? उगाच छान छान म्हणू नकोस. खरं खरं सांग".
"छान काढलीस पण रंग भर ना, म्हणजे अजून छान दिसेल. थांब मीही मदत करतो तुला", असं म्हणत त्याने रंग चिमटीत धरला.
"बरं. फुलात भरून घेशील का रंग? मी तुला पटकन खायला आणते. जातांना तुरीच्या शेंगा ने बरं का. थांब तुझ्या पिशवीत ठेवते आताच". अनु रंग भरू लागला रांगोळीमध्ये.
"मला जरा वाण्याकडून पेन आणून दे ना. एक मोठी वहीपण. उद्यासाठी लागेल आणि मी नेमकी विसरले बघ", अनुच्या हातात शिर्याची वाटी ठेवत म्हणाली नीलू.
होकारार्थी मान डोलावत शिर्यावर ताव मारू लागला तो.

चिठ्ठी भाग 6 : https://www.maitrin.com/node/3959

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle