'कागद? कुठले कागद रे? मला नाही माहित'
सुमाच्या चेहर्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहिल्याबरोबर तीरासारखा उठला अनु. जवळ जवळ उडी मारून तो काॅटखाली आणि आजुबाजूला शोधू लागला. कोनाड्यात, दप्तरात, काॅटच्या वर, चादरीखाली शोध शोध शोधलं. सर्वांनी त्याला थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अनु इरेला पेटून काॅटखाली शिरला शोधायला. परत काही सापडलं नाही म्हणून तो दातओठ खात बाहेर यायच्या प्रयत्नात कुठल्याश्या टोकाला अडकून त्याचा खिसा फाटला. त्यातून भाजलेले शेंगदाणे बाहेर पडायला आणि जयंत आत यायला एकच गाठ पडली! सगळे जण ते पाहून हसायला लागले.
'बाबा.. ते मी नाही पोलीसताई..', असं म्हणत तो पाऊल मागे टाकत भिंतीशी सरकला. आत्ता भिंतीने सामावून घेतले तर बरे होईल असंच वाटलं त्याला.
एरवी तर जयंताने चांगलेच सुनावले असते अनुला, आता मात्र गच्च डोळे मिटलेल्या अनुला उचलून त्यांनी काॅटवर बसवलं. एक एक दाणा गोळा करून त्यांनी ती वाटी अनुच्या हातात दिली.
'दाण्यांबरोबर गुळाचा खडा मस्त लागतो बरं शेठ', असं म्हणत त्याने हसून अनुकडे पाहीलं. अनुने आ वासला होता.
'बरं कसली धडपड सुरू होती खाली?'
'अं.. काही नाही..ते कागद म्हणजे चिठ्ठी म्हणजे कागद..', अनु म्हणाला.
'हेच का?'
जयंताने खिश्यातून कागदांचं भेंडोळं काढून दाखवले.
'तुझ्या हातात होते. तुला उचलून आणताना मी खिशात ठेवले होते.'
अनुचे डोळे लकाकले.
'हो हो! हेच. द्या ना प्लिज. तुम्ही उघडून नाही पाहिलं ना?'
अनुने असं म्हणताच त्याला देऊ केलेलं कागदांचं भेंडोळं अलगद उचकवत पहायला सुरुवात केली जयंताने.
'नाही! नको. बघा ना काकुआज्जी!'
अनुने शोभाताईंकडे मदतीसाठी धावला.
'राहू दे रे जयंता', अनुला उचलून घेतले शोभाताईंनी.
'हे बाण वगैरे काय आहे हे सगळं? ', असं जयंताने विचारल्याबरोबर अनुने शोभाताईंच्या कुशीत तोंड लपवलं!
(क्रमशः)
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle