परवा, म्हणजे १३ फेब्रुवारीला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आधीच पुस्तक म्हटलं की माझ्या आवडीचा विषय, त्यात ‘पुस्तकाचा विषय’ तर अति आवडीचा. बरोब्बर, मिलिंद सोमण!
या पुस्तकाची सहलेखिका रूपा पै हिने निमंत्रण पाठवलं होतं नवऱ्याकडे. नवऱ्याने त्याचं बुकिंग केलं, मला व्ही डे गिफ्ट म्हणून! मला ते बुकिंग आणि रूपाचे बाकीचे मेसेज फॉरवर्ड केले. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, तोही तिकीट लावून? अजबच म्हणायचं हे, असा विचार करेपर्यंत पुढचा मेसेज वाचला- ही कल्पना मिसोची. जेवढे पैसे तिकिटांतून जमतील तेवढेच तो स्वतःच्या खिशातून भर घालेल आणि रूपा निवडेल त्या दोन समाजसेवी संस्थाना ते दिले जातील (त्या दोन संस्थांबद्दलचे छोटे व्हिडिओ आणि त्यांना निधी देणं हेही याचं कार्यक्रमात झालं.) मिसोबद्दलचा प्रेम आणि आदर वाढला हे वेगळं सांगायला नकोच!
आधीच धडधडत्या मनाने हॉलवर पोचले, तो धडधड दुप्पट झाली! काय करणार, मिसोचे एकसे एक हॉट फोटो हे भल्या मोठ्या पडद्यावर येत होते.
हे फोटो आपले उदाहरणार्थ :winking:
बाहेर सगळ्यांचा अल्पोपहार चालू असताना आतल्या खोलीत मिसोसाठी खास टेबल लावलं होतं. रूपा माझी ओळख करून देण्यासाठी मला आत घेउन गेली. साक्षात मिसोशी ओळख आणि हस्तांदोलन? मी मराठी आहे म्हटल्यावर त्याने मराठीत काहीतरी म्हटलं. (आता काय ते विचारू नका, मला काहीही आठवत नाही)
त्याचा साधेपणा आणि सहजपणामुळे मी भारावून गेले.
कार्यक्रम अगदी अनौपचारिक होता. पुस्तकावर एकत्र काम करताना रूपा आणि मिसोची जी सहजसुंदर मैत्री झाली आहे त्याचा प्रत्यय वारंवार येत होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्क्रीनवर, म्हणजे त्याच त्या मोठ्या पडद्यावर मिसोचं सुप्रसिद्ध ‘मेड इन इंडिया’ गाणं लावलं आणि आम्हाला सगळ्या जणींना (सगळ्या ‘जणीच’ हं! सत्तर विविध वयाच्या मुली आणि फारतर सहा-सात पुरुष मंडळी. त्यातला एक मुलाखतकार आणि दुसरा खुद्द मिसो!) गाणं सम्पल्यावर दस्तुरखुद्द प्रवेश करते झाले. तेव्हा जो काय टाळ्यांचा कडकडाट झालाय!
मुलाखतकाराने फार सुरेख संचालन केलं कार्यक्रमाचं. अगदी नेमके प्रश्न आणि बाकी फक्त कार्यक्रम योग्य रुळावर आणणं. आणि त्या प्रश्नांचा आधार घेउन मिसो आणि रूपा भरपूर बोलले. त्याच्याबद्दल बाकी सगळं पुस्तकात असेलच, पण हा एक किस्सा त्याची ‘पारखी नजर’ दाखवणारा. मिसोला गेली काही वर्षं त्याने स्वत:बद्दल काही लिहावं म्हणून लोकं मागे लागली होती आणि तो फारसा उत्सुक नव्हता. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी रूपा फेसबुकवर खेळ आणि खेळाडूंबद्दल फार सुरेख पोस्ट लिहीत होती (खरंच सुरेख होत्या त्या पोस्ट). त्या एकदा मिसोच्या नजरेस पडल्या आणि त्याला वाटलं की आपल्याबद्दल लिहायचं असेल तर हिच्याबरोबर काम करायला पाहिजे. मग त्याने योग्य लोकांमार्फत तिला गाठलं आणि पुस्तक लिहायला राजी केलं.
लागोपाठ ३-४ प्रश्नांना असं झालं की त्याच्या लहानपणीच्या गोष्टी वगैरे रुपालाच नीट आठवत होत्या. शेवटी मुलाखतकार म्हणाला, “मी मुलाखत रूपाचीच घेतो, तू आपलं ‘सेल्फी सेशन’ सुरू कर तुझ्या चाहत्यांबरोबर.”
कौतुक याचं की नॅशनल स्वीमिंग चॅम्पिअन, सुपर मॉडेल, लोकप्रिय अभिनेता असल्याचा कुठलाही खास अभिनिवेश मिसोच्या वागण्यात-बोलण्यात नव्हता. अगदी सहज-साधेपणाने बोलला तो. उलट रूपा त्याने केलेले गोंधळ-गडबड सांगत होती तेव्हा त्याने हसत हसत आठवण करून दिली की आज त्याच्याबद्दल चांगलं बोलणं अपेक्षित आहे.
त्याने सांगितलेली मला भावलेली गोष्ट म्हणजे, ग्लॅमर ही आपल्या आतून-गाभ्यातून येणारी गोष्ट आहे. दिसणं, मेकअप या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. तुमच्या आतला तो ‘एक्स फॅक्टर’ तुम्हाला ग्लॅमरस बनवतो.
आता पुस्तकात काय काय आहे ते आपण वाचूच. पण हा प्रत्यक्ष अनुभव फार सुंदर आणि संस्मरणीय होता. तुमच्याशी शेअर केल्यावाचून रहावेना.
हा एक महत्त्वाचा फोटो राहिला होता.