(आयुष्यात अचानक आलेल्या वळणामुळे मैत्रीण वर यायला वेळच मिळत नाहिये. एका ग्रुपवर मैत्रिणींनी तू नक्की काय करतेस ते लिहून काढायला सांगितले. थोडक्यात लिहू म्हणत मोठाच लेख झाला. इथे प्रकाशित करतेय, म्हणजे इथल्या मैत्रिणींनाही कळेल.)
फूड स्टायलिंग प्रकाराशी ओळख भूषण (लेकाच्या मित्राचा बाबा) ने करून दिली. भूषण इनामदार हा पुण्यात बोटावर मोजण्याइतक्या फूड स्टायलिस्ट मधला एक होता. त्याची वेबसाईट http://www.bhushanfoodstyling.com/ जी आता आम्ही पुढे चालवतोय ती बघितली तर तो त्याच्या कामात किती अव्वल स्थानावर होता याची कल्पना येईल.
एकदा उत्सुकतेपोटी भूषणला तू नक्की काय करतोस विचारलं, तेंव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून आपण पण असं काहीतरी भारी करावं अशी प्रबळ इच्छा झाली खरी पण आयटी मधुन फूड इंडस्ट्री मधे जाणे, नोकरी सोडून व्यवसायात उतरणे, बैठ्या कामाची सवय असताना तासनतास उभ्याने काम करणे हा यू टर्न सोपा नव्हता. आणि तेंव्हा तरी शक्य नव्हता. तरी ही भूषणाने पदार्थ चिरताना, शिजवताना आणि सर्व्ह करताना प्रत्येक स्टेप मधे सौंदर्य शोधण्याबद्दल सांगितलं ते नकळत कुठेतरी गोंदवले गेलं असावं. कोणती भाजी कशी चिरली की छान दिसते, कोणत्या दोन भाज्या एकत्र ठेवल्या की रंग उठून दिसतो हे बघायची सवय लागली. भूषण अचानक गेल्यानंतर प्राचीने ते काम सुरू ठेवले याचा मनोमन आनंद झाला होता आणि आता ७-८ वर्षानंतर मला जॉईन होण्याबद्दल विचारलं हा तर क्लायमॅक्स होता.
नोकरीतून व्यवसायात पडल्यावर सगळ्यात मोठा बदल घडतो जो तुम्हाला पण माहितच असेल तो म्हणजे अनियमित वेळा. क्वचित कधी ६-७ तासात शूट संपतो तर कधी १६-१७ ते २० तास पण काम करावं लागतं. घराला आधी असं एक माणूस कुठल्याही वेळी घरी येतंय हे पचवायला जरा कठीणच गेलं पण आता जरा सावरताय. प्राचीबरोबर काम करायचं म्हणजे नक्की काय काय करायचं आहे हे मलाही माहीत नव्हतं. पण आता ४-५ महिन्यात जितकं समजलंय तितकं सांगायचा प्रयत्न करते.
स्टायलिंग कशासाठी करायचं तर वेगवेगळी कारणं आहेत. स्टायलींग करून काढलेले फोटो रेस्टॉरंट मधे, मेन्यू कार्ड मधे लावण्यासाठी, पॅकेजिंग साठी आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सोशल मिडिया साठी! सोशल मिडिया मधे फेसबुक, इंस्टा तर आहेच पण झोमाटो आणि अॅमेझॉन वर फोटो टाकण्यासाठी सुद्धा आम्ही स्टायलिंग केलं आहे.
स्टायलिंग म्हणजे काय ह्याचं सोप्पं उत्तर म्हणजे फोटोसाठी पदार्थ सजवणं ज्यामुळे बघणाऱ्याला तोंपासू होईल. उदाहरण द्यायचं तर फक्त पांढऱ्या इडलीचा फोटो काढला तर तितका अपील होणार नाही जितका त्याबरोबर लाल सांबार आणि हिरवी चटणी ठेवल्यावर होईल. प्लेन पिवळा ढोकळा बघण्या ऐवजी त्यावर चार काळे मोहरीचे दाणे, एक हिरवेगार कोथिंबीरीची पान आणि हिरवी मिरची किंवा चिंचेची चटणी ठेवली तर पटकन ढोकळा उचलून खावासा वाटेल. ही सौंदर्यदृष्टी तर असायला हवीच पण तसंच कुठल्या पदार्थाबरोबर काय ठेवायचं किंवा काय ठेवून त्याला सजवायच ते माहित हवं. अस्सल महाराष्ट्रीयन चिकन रश्श्यावर छान दिसते म्हणून पार्सली ठेवली तर नाही चालणार. उपासाच्या पदार्थाबरोबर कितीही छान दिसल्या तरी कांद्याच्या चकत्यांना बिग नो.
क्लायंट एनक्वायरी आली की क्लायंट/ अॅड एजन्सीचा प्रतिनिधी, फोटोग्राफर आणि आपल्या सोयीने दिवस ठरवायचा. शूट किती क्लिष्ट आहे त्यावर आधी वेळ किती लागेल ते ठरवायचं, पण १ पूर्ण दिवस तरी हवाच. पहिली स्टेप म्हणजे याद्या. भाज्या, ग्रोसरी, मसाले इत्यादी. मग त्यांची अजुन चिरफाड करून यातल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी आधी आणता येतील आणि कुठल्या आयत्या वेळीच आणाव्या लागतील त्याची यादी बनते. आपल्या स्टुडिओ मधून कुठल्या गोष्टी घ्यायच्या, बॅकग्राऊंड, नॅपकिन्स, प्रॉप्स गॅस, सुऱ्या, कात्र्या या सगळ्याचा विचार होतो. व्हिडिओ असेल तर कुकिंग ची भांडी पण कॅमेरा फेस करतात.. मग तीही काही वेळा नवीन घ्यावी लागतात. क्लायंटशी बोलून, त्याच्या आणि फोटोग्राफरच्या आवडीची क्रोकेरी पॅक करून ठेवायची. प्रत्येक पदार्थाला, त्याच्या साईड डिश ला ६-८ ऑप्शन्स घ्यायचे. आदल्या दिवशी ९०% पॅकिंग करून ठेवायचे. शूट नंतर दुसऱ्या दिवशी सगळं परत जागेवर लावणे हा पण मोठा टास्क असतो त्यामुळे पुढचा शूट घेताना हा विचार पण करावा लागतो.
शूट च्या दिवशी सकाळी फोटोग्राफर कॅमेरा सेट करतात तो पर्यंत पहिल्या क्लिक साठी क्रोकरि पुसून स्वच्छ करायची, शिजवण्याचा पदार्थ असेल तर शिजवायचा, फॉकस कुठे येणार, डिश कुठे फेस करणार, बॅक ग्राउंड कुठली ते ठरवायचं. रेस्टॉरंट साठी शूट असेल तर त्यांचा तयार पदार्थ घेऊन तो अरेंज करायचा असतो. पण जरा वेगळ्या पद्धतीने.. म्हणजे पनीर टिक्का मसाला असेल तर त्यातलं पनीर आणि इतर भाज्या वेगळ्या घ्यायच्या आणि ग्रेव्ही वेगळी घ्यायची. पनीर कमी फ्राय करायला सांगायचं. ज्या डिश मधे अरेंज करणार त्यात आधी कणिक भरायची.. त्यात पनीर/ भाज्यांचे तुकडे नॅचरल दिसतील असे खोचायचे, नंतर ग्रेव्ही ची कन्सिस्टन्सी सेट करून ती वरून भरायची. हे फायनल झालं की बोलला आजूबाजूला कुठे ग्रेव्ही किंवा तेलाचा डाग राहिला असेल तर पुसून घ्यायचा. फोटोत हे खूप वाईट दिसतं. मग त्याच्या जागेवर त्याला ठेवायचा. फोटोग्राफर , क्लायंट सगळे ओके असतील तर लास्ट टच. म्हणजे वरून कोथिंबीर किंवा पुदिना पान ठेवायचे किंवा गोलाकार क्रीम घालायचे किंवा कधी बटरचा क्यूब ठेवायचा. क्लिक करण्याच्या जस्ट आधी हे काम करावं लागंं नाहीतर हेवी लाईट मधे त्याची वाट लागते.
हे झालं तयार पदार्थांसाठी. मसाले, वगैरे च्या शूट साठी पदार्थ तयार करावा (कुकींग) लागतो. तेंव्हा क्लायंट ला विचारून पदार्थाचा रंग कसा हवा तसा पदार्थ आम्ही तयार करतो. काहींना छोल्यांचा रंग लाल हवा असतो तर काहींना काळा. इथे पदार्थाच्या चवीला नाही तर रंगाला आणि दिसण्याचा महत्त्व असते. प्रत्यक्षात दिसणारा रंग आणि फोटोत दिसणारा रंग वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे त्याचा ही विचार करावा लागतो. पुऱ्या, डोसे यासारखे डेलिकेट पदार्थ बनवताना स्किल लागतं. पुऱ्या लाईट मधे बसतात. एकावेळी ६-८ फुगलेल्या पुऱ्या तयार ठेऊन त्यातल्या ज्या रंगरूपाने उजव्या असतील अशा ३-४ घेऊन अरेंज करून त्या बसण्याच्या आधी फोटो काढावा लागतो. छान कुरकुरीत झालेला डोसा लाईट्स मधे अरेंज करेपर्यंत मऊ पडलेला असतो. अशा वेळी एका प्रॉडक्टला चार पाच तास घालवायची पण तयारी ठेवावी लागते. एका व्हिडिओ शूटला एक चांगला डोसा घातला आणि फोल्ड केला हे शूट करण्यासाठी आम्ही पाच तास आणि २०-२५ डोसे खर्ची घातले होते.
स्टायलिंग चे काम एकट्याने करणे थोडे अवघड असते. कूकिंग, स्टायलिंग आणि अरेंजमेंट सगळं एक माणूस एका वेळी करू शकत नाही. त्यामुळेच इथे टीम वर्क ला खूप महत्त्व आहे. आम्ही दोघे किंवा तिघे काम करत असू तर एक जण एका डिश चे स्टायलींग करत असेल तोवर दुसरी/ रा त्यानंतर च्या डिश ची क्रॉकेरी पुसून ठेवणे, कोरडे पदार्थ भरून ठेवणे, कणिक भरायची असेल तर ती भरून ठेवणे अशी तयारी करतात. शॉट झाला की एक जण डिश ला फायनल टच देत असेल तर दुसरी/रा झालेल्या शॉट ची क्रॉकेरी क्लिअर करणे, पुढची बॅक ग्राउंड सेट करणे हे सगळं करते. मधे वेळ मिळेल तसे वापरलेली भांडी घासण्या चे ३-४ हफ्ते करावे लागतात. साधारण लास्ट शॉट चालू झाला की एक जण पॅकिंग, आवराआवरी चालू करतो. मग यात कुणाची स्किल्स काय आहेत ते बघून कोण काय काम करणार ते साधारण ठरवतो. अर्थात सर्व प्रकारच्या कामाची सवय हवीच.
मी यात का शिरले तर याचं उत्तर निव्वळ आनंद! रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा कधीतरी येतोच पण नवनवीन पदार्थ कधी युक्तीने, कधी कौशल्याने आणि त्याच बरोबर सफाईने तयार करायचे, मांडायचे हे सगळं मला समाधान देतंय. जे कधी करायला मिळालं नाही ते करायला मिळंतय. आपले पदार्थ लाइमलाइट मधे येतायत हे सुख आहेच!
किती तरी शूट्स करून महिने झाले तरी कुठे वापरलेली, सोशल मिडिया वर अपलोड केलेली दिसली नाहीत की थोडी रुखरुख लागते पण उपयोग नसतो. इतकं सगळं करून काही वेळा गोंधळ होतो. कधी क्लायंट ला आवडत नाही हे सगळं होतंच पण प्रत्येक शूट संपवून घरी गेलो की आपण आपले १००% दिल्याचं समाधान वाटतंच.