मार्च महिना संपत आला की लागते वसंत ऋतूची चाहूल. फुललेली सावर , जॅकरंडा, बहावा ,पांढरा चाफा वैगेरे इंद्रधनुचे रंग घेऊन मनात फेर धरू लागतात. ह्याच दिवसात मी शाळकरी मुलगी होऊन दरवर्षी न चुकता नेमाने मनाने साता समुद्रा पलीकडे पोचते. थांबा ! तुम्हाला वाटेल मी शाळेत असताना परदेशात वैगेरे होते की काय ! पण तसं काही नाहीये . मी काही लहानपणी परदेशात वैगेरे नव्हते. ही जादू असते वर्ड्सवर्थच्या डॅफोडिल्सची. मनात पळस पांगाऱ्या बरोबरच ती तळ्याकाठी फुललेली, वाऱ्यावर डोलणारी पिवळी धम्मक डॅफोडिल्स नाच करू लागतात.. शाळेत असताना आम्हाला ही कविता अभ्यासाला होती. खर तर शाळेत अभ्यासाला असणाऱ्या गोष्टीकडे प्रश्नोत्तरं ,परीक्षा ह्या दृष्टिकोनातूच पाहिलं जातं बरेच वेळा. पण ह्या कवितेतलं सौंदर्य उलगडून दाखवण्याचं सगळं श्रेय आमच्या इंग्लिश शिकवणाऱ्या बाईंकडे जातं. त्यानी अगदी प्रभावी पणे ह्या कवितेची सौन्दर्यस्थळं आम्हाला समजावून सांगितली होती आणि म्हणूनच त्या कवितेचा आनंद आम्ही त्या वयात ही घेऊ शकलो होतो. आज ही स्प्रिंग आला की ही कविता आणि ही फ़ुलं आठवतातच. आता आंतरजालाच्या सुविधेमुळे दरवर्षी स्प्रिंग मध्ये हीच पारायण करणं आणि पिवळ्या जर्द डॅफोडिल्स चे ताटवे फोटोत बघणं हा नेमच होऊन गेला आहे माझा.
ज्या वर्षी डॅफोडिल्स अभ्यासाला होती त्याच्याच आगे मागे एक दोन वर्षे नारसिसस चा धडा ही होता इंग्लिश च्या पाठयपुस्तकात. नारसिसस नावाचा एक ग्रीक तरुण असतो. तो अतिशय सुंदर असतो. जणू मदनाचा पुतळा च ! एकदा तळ्याकाठी फिरताना त्याला तळ्याच्या पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसतं. त्या प्रतिबिंबाच्या तो प्रेमातच पडतो. इतका की जगणंच मुश्किल होऊन जातं त्याच आणि शेवटी वैफल्य ग्रस्त होऊन तो आत्महत्या करतो. अशी ती थोडक्यात गोष्ट आहे. म्हणून स्वतःवर अतोनात प्रेम करण्याच्या वृत्तीला नारसिझम म्हटलं जातं. . असो. तो सुंदर युवक जिथे आत्महत्या करतो त्या तळ्याकाठी काही दिवसांनी फ़ुलं येतात , तीच ही डॅफोडिल्स. नारसिससची गोष्ट वाचल्यावर डॅफोडिल्स च एक मोठंच गुपित कळल्या सारखं वाटलं होतं मला. ही फ़ुलं सुद्धा नेहमी मान खाली झुकवून स्वतःच प्रतिबिंबच पहात असतात जणु. डॅफोडील्सला दुसरं नाव नारसिसस ही आहे आणि हिंदीत ह्या फुलाला नर्गिस अस नाव आहे.
ही थंड हवेतच येणारी फ़ुलं आहेत त्यामुळे आपल्याकडे मात्र ती पहायला मिळत नाहीत. युरोप, उत्तर अमेरिकेत वैगेरे ही चांगली रुजतात. ह्याचे कंद असतात. सिझन सम्पला की ते सुप्तावस्थेत जातात आणि पुढच्या सीझनला पुन्हा जमिनीतून वर येतात. ह्याची पानं पात्यासारखी लांब असतात. आपल्याकडच्या लिली सारखी. फक्त लिली हुन थोडी अधिक रुंद आणि लाम्ब असतात. मोठ्या दांड्याच्या टोकावर खाली झुकलेलं फ़ुलं उमलत. पाच / सहा रुंद पसरट पाकळ्या आणि त्याच्या मध्यात आणखी एक पाकळ्या न उमललेलं पेल्यासारखं फ़ुलं अशी रचना असते . रंग एकदम सुंदर असा पिवळा असतो किंवा बाहेरचं फ़ुलं पांढरं आणि आतील पिवळं अशी ही असतात. परंतु डॅफोडिल्स म्हटलं की पिवळं हे मनात इतकं पक्क रुजलं आहे की पांढरी पिवळी अशी दुरंगी फ़ुलं मला एवढी आवडत नाहीत. रादर मला ती डॅफोडिल्स वाटतच नाहीत म्हणा ना.
आपल्याकडे जशी वसंत ऋतूची सुरवात सावर फुलून होते तशी तिकडे स्प्रिंग ची वर्दी डॅफोडिल्स देत. युरोप अमेरीकेत हे अतिशय लाडकं असणार फ़ुल आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तसेच घराच्या पुढच्या बागेत वैगेरे ही अतिशय हौशीने लावली जातात. आपल्या प्रियजनांना ही फ़ुलं प्रेमाने भेट ही दिली जातात. पण एक आहे, भेट देताना ह्यांचा गुच्छच देतात . एक फ़ुलं देणं म्हणे अपशकुनी समजलं जात तिकडे. आहे की नाही गम्मत !
काही वर्षांपूर्वी लंडनला गेले होते. विमानतळावरचे सोपस्कार आटपून घरी यायला निघालो. दुपारची वेळ असून ही मळभ आल्याने सूर्यप्रकाश नव्हता. हीथ्रोच्या बाहेरच एका उतारावर मला फ़ुलं दिसली. ती बघताच माझ्या तोंडातून 'डॅफोडिल्स 'असा एक चित्कार माझ्या ही नकळत बाहेर पडला. इतके दिवसाचं ड्रीम अश्या तऱ्हेने ध्यानी मनी नसताना अचानकपणे पूर्ण झालं होत. ही माझी डॅफोडिल्सशी झालेली प्रथम प्रत्यक्ष भेट. बाकी वर्ड्स्वर्थच्या कवितेमुळे ती मनात एक स्वर्गीय फुलं म्हणून कायमच रुजलेली होती. लंडनचं ते करडं आकाश, जमीनीवर हिरवळ आणि त्यात आपल्या माना खाली घालुन हळूच जगाकडे बघणाऱ्या ह्या फुलांचे पिवळेजर्द ताटवे समोर. ही प्रथम भेट मनात कोरली गेलीय कायमसाठी.
मग नंतर आठ पंधरा दिवस सतत रस्त्याच्या कडेला, ट्रॅफिक आयलंडमध्ये ( ह्याला तिकडे राऊंड अबाउट म्हणतात )घरासमोरच्या बागेत, सार्वजनिक उद्यानात, रेल्वे स्टेशनवर फुलांच्या दुकानात वगैरे वैगेरे ही भेटतच होती आणि मी प्रत्येक वेळी तेवढीच हरखून जात होते.
त्याच ट्रिप मध्ये आम्ही कुठेतरी कंट्री साईड ला फिरायला जात होतो. ट्रेनचा प्रवास होता. ट्रेनच्या मोठ्या मोठया खिडकीतून स्प्रिंग मधलं कंट्री साईडच इंग्लंड फार सुंदर दिसत होतं. हलका सूर्यप्रकाश आधीच सुंदर असलेल्या निसर्गाला एक प्रकारची सोनेरी झळाळी देत होता.
अशातच एका कोणत्या तरी छोट्या स्टेशनवर गाडी थांबली होती. आणि समोरच दृश्य बघून मी आवक झाले. त्या स्टेशनच्या बाजूलाच एक छोटंसं तळं होत निळ्या पाण्याचं. निरभ्र आकाशच प्रतिबिंब त्या तळ्यात पडल्याने त्याच पाणी अधिकच निळं भासत होतं. आणि त्या तळ्याच्या काठाने पिवळी जर्द डॅफोडिल्स हारीने फुलली होती. आणि हलक्या वाऱ्यावर झोके ही घेत होती. फिक्या सूर्यप्रकाशामुळे त्यांचा आधीच पिवळा असणारा रंग चमकून उठत होता. अगदी वर्ड्सवर्थ च्या कवितेत वर्णन केल्यासारखं दृश्य होत ते. काही तरी अद्भुत , सुंदर पाहिल्याच्या भावनेने माझा ऊर भरून आला. मंत्रमुग्ध होऊन ते मी डोळ्यात साठवून घेत होते. गाडी दोनच मिनीटात सुरू झाली आणि ते दृश्य मागे पडलं पण माझ्या मनात मात्र आज इतकी वर्षे झाली तरी ते जसच्या तसच राहिलं आहे. त्याची नुसती आठवण ही माझ्या मनाला हुरूप ,उत्साह देते ह्यात शंका नाही.