त्याने हातातला लोणी माखलेला, कुरकुरीत पावाचा शेवटचा तुकडा हळूच प्लेटमध्ये ठेवला आणि समोर खाली मान घालून, शांतपणे हळूहळू जेवणाऱ्या तिच्याकडे पाहिलं. गळून पातळ झालेले पण हनुवटीएवढ्या बॉबमध्येही छान दिसणारे तिचे काळेपांढरे केस, त्याला कायम प्रेमात पाडणारे तिचे निरागस करवंदी डोळे, हल्ली त्या डोळ्यांखाली कायमचा काळसर रंग चिकटलाय, घराबाहेर न पडल्याने क्रेप पेपरसारखी चुरमटलेली पातळ गोरी त्वचा, तिच्या बारीकश्या लाल टिकलीखालची याआधी फक्त चिडल्यावर चमकून जाणारी हिरवट शीर आता कायमची उठून दिसायला लागली होती. कमी हिमोग्लोबीनमुळे ओठ फिकुटले होते. आज घरून निघताना गार वारा वाटला म्हणून त्यानेच घाईघाईत तिच्या खांद्यावर बारीक फुलाफुलांच्या एम्ब्रॉयडरीची पांढरी शाल पांघरली होती. आणि अचानक त्याचे लक्ष तिच्या कुर्त्याकडे गेले.
तिने तिचा आवडता शेवाळी रंगाचा कुर्ता चक्क उलटा घातला होता. अरे देवा, माझीच चूक झाली! तरी नशीब शालीमुळे कुणाला फारसं कळणार नाही विचार करत त्याने कपाळाला हात लावला. दहा वर्षांपूर्वी तिला अल्झायमर्स असल्याचं निदान झाल्यापासून रोज तोच तिचे कपडे पलंगावर मांडून ठेवत असे. पण ती ते त्याच क्रमाने घालेल याचा काही भरवसा नव्हता. आता बाहेर पडताना तिच्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे ह्याची त्याने मनोमन नोंद केली.
हल्ली तिचे काही शहाणे, काही वेडे दिवस असत. कधी आधीच्यासारखं सगळं पटापट आवरेल तर कधी काहीच न आठवल्याने दिवसभर बसून राहील. आज ती कशी वागेल काही भरवसा नाही. सकाळपासून ती काहीच बोललेली नाही, नजर कुठेतरी हरवलेली आहे. आताही ती त्याच्याकडे न पहाता टेबलावरचा एक काळा डाग नखाने खरवडत होती. तिच्या लक्षातच येत नव्हते की तो लाकडावर खूप पूर्वीच काहीतरी जळल्याचा कदाचित एखादी सिगारेट विझवल्याचा डाग आहे, असा निघणार नाही.
त्याने इकडेतिकडे पाहिले, त्याच्याशी नजरानजर होताच त्यांचा नेहमीचा वेटर घाईघाईने टेबलापाशी आला. पुढे काही बोलायच्या आत वेटरने पटकन मेन्यूकार्ड टेबलवर ठेवले.
"सॉरी सर, पण आज चिक्कू मिल्कशेक अव्हेलेबल नाही. मार्केटमध्ये चिक्कू एकदम कमी आहेत." वेटर पडल्या तोंडाने म्हणाला. "आज कोल्ड कॉफी देऊ का?"
"काय सांगतोस! आमच्या भाजीवाल्याने तर पाठवलेत एक डझन!" तो वेटरकडे हसून बघत म्हणाला.
वेटरला त्यांची दर आठवड्याची ऑर्डर पाठ होती. टोमॅटो सूप वन बाय टू, कमी तिखट पण भरपूर बटर घातलेली चमचमीत पावभाजी आणि शेवटी चिकू मिल्कशेक. आठवडाभर कमलाबाईंच्या हातचं पथ्याचं सपक, मिळमिळीत जेवल्यावर एक दिवस तो तिला तिच्या आवडीची पावभाजी खायला घेऊन येत असे. खाताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारा लहान पोरासारखा आनंद आणि एरवी हरवलेल्या डोळ्यांत आलेली चमक एवढंच कारण त्याच्यासाठी पुरेसं होतं.
त्याने मेन्यूकार्ड तिच्या बाजूला सरकवले.
"वारीजा?" त्याने हळुवार आवाजात हाक मारली.
तिने खरवडणे थांबवून, मान उचलून रिकाम्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले.
"मेन्यूकार्ड बघून सांगतेस तुला दुसरं काय आवडेल? इथे बघ... की कोल्ड कॉफी सांगायची??" विचारत त्याने मेन्यूवरचा ठराविक भाग हाताने दाखवला.
तिने पुढ्यातले मेन्यूकार्ड हातात घेतले. एकेका नावावरून थरथरते बोट फिरवत तिने मनात वाचायला सुरुवात केली पण त्या प्रत्येक नावासमोर डोक्यात फक्त कोऱ्या कागदावर टपकन शाईचा थेंब पडल्यावर फुलून येतो ना तशी काळ्या ठिपक्यांची फुले उमलत होती. ना लिहिलेलं कळत होतं, ना तो पदार्थ डोळ्यासमोर येत होता. तिचा घसा दाटून आला आणि हुंदके देऊन ती रडायला लागली.
"नको, घरी जायचं. आपण घरी जाऊ.." हे एकच वाक्य तिच्या तोंडून पुन:पुन्हा निघत होते.
आजूबाजूचे लोक एव्हाना त्यांच्याकडे बघायला लागले होते पण तिकडे लक्ष न देता त्याने तिच्या हातावर हात ठेवले. "घाबरू नको, आपण निघूया हं. लगेच निघू." म्हणत तिला थोपटून जरा शांत करत त्याने वेटरला बिल आणायला सांगितले. त्यानेही समजून पटकन बिल आणून दिले. बिल पे झाल्यावर उठून तिचा हात धरून त्याने तिला हळूहळू रेस्टॉरंटबाहेर आणले. सुदैवाने एक रिक्षा पटकन थांबली. त्याच्या खांद्यावर मान टाकून ती बसली होती तरीही डोळ्यातलं पाणी अजून थांबलं नव्हतं. तो हळुवारपणे तिला थोपटून शांत करत होता. तिला सकाळपासून काहीतरी त्रास होत होता, काहीतरी आठवायचं होतं पण अजिबात आठवत नव्हता. अचानक ती त्याला आजचा दिवस विचारायला लागली.
"सोमवार" तो बाहेर बघत म्हणाला. त्याला तिला तारीख सांगून आठवण करून द्यायची नव्हती की आज त्यांच्या लग्नाचा चाळिसावा वाढदिवस आहे. तिचा आजचा मूड बघता लक्षात नसल्यामुळे नक्की जास्त वाईट वाटेल म्हणून तो इतका वेळ सांगणे टाळत होता.
ती आता कपाळाला आठ्या पाडून आठवायचा प्रयत्न करत होती.
"सोमवार, वीस जानेवारी. आपली ऍनिव्हर्सरी आहे आज" तिने पुन्हा पाचव्यांदा तोच प्रश्न विचारल्यावर शेवटी न राहवून त्याने सांगून टाकले.
"ओss म्हणजे आपल्या लग्नाची तारीख ना!" म्हणून पुन्हा ती तिच्या विचारात गढून गेली.
घरी आल्यावर तिला सोफ्यावर बसवून त्याने टीव्हीवर कुठलीशी सिरीयल लावून दिली आणि आज तरी तिला आवडीची वस्तू मिळूदे म्हणून स्वतः स्वयंपाकघरात शिरला. प्रत्येक कॅबिनेटवर पर्मनंट मार्करने ताटे, वाट्या, सुऱ्या चमचे असे त्यानेच लिहून ठेवलेले होते. इतके दिवस आवडीने स्वयंपाक करणाऱ्या तिला आता काहीच शक्य नव्हते पण तरीही अचानक आठवण झाली तर.. म्हणून त्याने आधीच काळजी घेतली होती.
चिकूची साल काढता काढता त्याला त्यांचे लग्न आठवले. कॉलेज संपल्यावर एक दोन वर्षात तिनेच त्याला विचारून साधेपणाने त्याच्या कोकणातल्या गावच्या घराच्या अंगणात पार पडलेले त्यांचे लग्न. तिच्यासारख्या सुंदर, कलावंत, श्रीमंत घरच्या मुलीला त्याच्यासारख्या साध्या दिसणाऱ्या, बँकेत कारकुनी करणाऱ्या, हातात फार पैसा नसणाऱ्या मुलात असं काय आवडलं हा तिच्या घरच्यांना पडलेला प्रश्न. कदाचित कॉलेजची सगळी वर्ष त्याच्या डोळ्यात दिसणारं तिच्यावरचं अबोल प्रेम आणि तिच्यासाठी असलेला आदर!
घरचे लोक नाराज असले तरी लग्नात ती उत्साहाने सळसळत होती. हिरव्यागार सारवलेल्या अंगणाच्या कोपऱ्यात फुलांची सजावट केल्यासारखा लालभडक गुच्छानी लदबदलेला इक्झोरा उभा होता. समोर ढेरपोट्या भटजींनी हवनात तूप घालून, "हूंss हाताला हात लावाss" अशी निळसर धुराच्या वलयांमागून दिलेली सानुनासिक हाळी आणि घरच्यांना न जुमानता, तिथे शोभेलशी साध्या सिल्कची, वांग्याच्या रंगाची साडी नेसलेल्या आणि घट्ट अंबाड्यावर घरच्या मोगऱ्याचे चार जाडजूड सर माळलेल्या तिने हळूच त्याच्या हाताला हात लावून काढलेला चिमटा आणि तिची मिश्किल नजर! बस्स त्यांना अजून काहीच नको होते. आयुष्यभर वेगवेगळ्या मैफिलींमध्ये, शिष्यांना शिकवण्यामध्ये तिच्या बोटांमधून सितार फुलत राहिली आणि तो त्याचे काम करता करता तिची साथ देत राहिला. पण अचानक पन्नाशीच्या उंबरठ्यावर तिचे निदान झाल्यापासून तिच्या आठवणींसारख्या बोटातल्या ताराही कुठेतरी हरवून गेल्या होत्या.
त्याच्या मिक्सरचा आवाज थांबतानाच बाहेर पसरलेल्या त्याच्या आवडत्या बागेश्रीच्या सुरांची त्याला जाणीव झाली. हसून दोन मोठ्या ग्लासात चिकू शेक ओतून तो बाहेर घेऊन आला. उघड्या खिडकीतून वाऱ्यावर रातराणीचा मंद, उडता सुगंध येत होता आणि खिडकीखाली तिच्या आसनावर नेहमीच्या पोझमध्ये, उलटा कुर्ता घातलेली ती थरथरत्या बोटांनी सितार छेडत होती.
तो तिच्या समोर बसून गालावर हात ठेवून लक्ष देऊन ऐकू लागला.
"कौन करत तोरी बिनती पियरवा...
मानो न मानो हमरी बतिया..."
हळूहळू तिच्या तोंडून आठवून आठवून बंदिशीचे सूरही निघत होते. जुने दिवस आठवून हळूहळू त्याच्या डोळ्यात पाणी जमा होत होते.
वाजवून थकून शेवटी तिने सितार बाजूला ठेवली.
"माझी आवडती बंदिश! अजून आठवतेय तुला रिजू?" त्याने चमकत्या नजरेने विचारले.
"म्हणून तर वाजवली!" ती कपाळावरचा घाम टिपत हसत म्हणाली.
त्याने पुढे होऊन तिच्या हातात मिल्कशेकचा ग्लास दिला, "घ्या सरकार, नेहमीप्रमाणे चिकू मिल्कशेक पिऊन आपला थकवा घालवा आता." तो आनंदाच्या भरात म्हणाला.
"चिकू? आपण कोल्ड कॉफी पितो ना?" तिने हरवलेल्या चेहऱ्याने विचारले.
डावीकडून उजवीकडे मान हलवत तो हसला आणि तिच्यापाशी जाऊन हलकेच तिच्या गालावर त्याने ओठ टेकले.
समाप्त.