चैत्र लागलाय, पालव्या फुटल्या आहेत, कैऱ्या लगडल्या आहेत, कोकीळ रंगात येऊन गातोय, गुलाब फुलले आहेत, भवताल घमघमतोय,
पण हे सारं सहन होइना,
ती वाट पाहतीये...
फक्त एका पत्राची!
पतीया न भेजे हो रामा..... कानात earplugs आहेत कलापिनी ताई चैती गतायेत. चैती- चैत्राचं गाणं.
घरातच अडकून पडायचा चैत्र यंदाचा. मैत्रीण अवघडलीये आठवा सरेल. तिला फोनवरच कविता ऐकवली मर्ढेकरांची:
बाळगुनी हा पोटी इवला गोळा, हसशी प्रसन्नतेने;
साकारुनी दे निराकृतीला विरूपता तव तन्मयतेने
मग लक्षात आलं हिला hot-chocolate करून पाजायचं राहूनच जाईल कि काय. आमचं पिल्लू उद्या लाळ गाळत सांगेल काय यार मावशी किती हाका मारल्या Hot -chocolate हवंय म्हणत, तू तर आलीच नाहीस.
मग मन पुन्हा खेळ मांडेल जर-तर च्या सारीपाटावर Timeline twist करत रहायचा. अरे दोनदा भेटले कि मी पिल्लूला तेंव्हा का नाही आठवणीने नेलं hot chocolate , का गृहीत धरला पुढचा काळ? कशात गुंतले होते इतकी? हल्ली जीव कवितेने जडावलाय. आरती प्रभू लागतात सतत भोवती
तू तेंव्हा तशी
तू तेंव्हा अशी
तू बहरांच्या बाहुंची!
बहराच्या बाहुंची कोण असेल नेमकी? मायेने मिठीत घेणारी?
सरत्या वर्षात वळून पाहताना मग अजून असेच काही if-else-then- if not चे loops फिरत राहतील सगळ्या टोकाच्या सुख दुःखाच्या क्षणांवर.
नोलनचा interstellar पहिला असशीलच ना! तो कूपर आठवतोय भविष्यातल्या कुठल्याश्या warp मध्ये अडकून स्वतःच्या भूतकाळातल्या स्वतःला सतत "STAY" सांगत असतो. मी काय सांगेन स्वतःला? नेमकी कोणती भेट टाळू? कुठला निर्णय बदलू? लहानपणी मी-भाऊ हाच खेळ खेळायचो मागे जात जात आई बाबा भेटलेच नसते तर आपण पण नसतोच या पॉईंट ला आलो कि हसत सुटायचो. पण आम्ही आहोत, आपण आहोत, सगळेच आहोत. म्हणजे किती पण ट्विस्ट केले जर तर चे लूप तरी या वळणाला हा कोंडमारा असणारच. Once you're a parent, you're the ghost of your children's future. पुन्हा तो कूपर हे ऐकवतोच.
'मैत्रेयी' वाचायची शिल्लकच आहे अजून. पण तिच्या पावलाने किती पुस्तकं आली माग काढत, किती कविता आल्या, किती हिरवं रान तरारलं शरीरभर मनभर. राधा-राधा भरून भारून राहिली. नेमका इथेच झाला का हा नवा प्रवास नव्या जाणिवांचा? तुझा-माझा? हे असं हपापल्या सारखं सगळं जाणून घ्यायचंय , सगळं ऐकायचं, सगळं बोलायचं, जेवढं रसरशीत सुख लाभतंय तेवढंच कंच हिरवं-निळं दुःखही. दुःख अव्हेरलं तर सुखही पोरकं होणार. राधेला दार बंद केलं तर कृष्ण, कविता, गाणी, पुस्तकं, सिनेमा सगळेच पुन्हा रुसणार. मला ना हे राधा-कृष्ण प्रकरण फार बोर करतं कित्येकदा. सतत काय तेच तेच. राधा कृष्ण हे चातक- परीस सारख्या कल्पनेतल्या गोष्टी असतील ना. असं काही नसतं राधा बिधा वाद घातला तर कोणी तरी म्हटलं अमृता प्रीतम आहे ना contemporary राधा. हो? खरच? त्या गोष्टीचाच संबन्ध जोडायचा तर मला ती कृष्णच वाटते. साहिरची सोळा सहस्त्र दुःख, लग्नाचा नवरा, इमरोजच्या रूपातली राधा आणि मग तिचं लिखाण तिच्या कविता पण होत्याच कि भोवती . हे इतकं सगळं तोलणारी कृष्णच असणार.' ए मेरे दोस्त - मेरे अजनबी' अशी घटक्यात जवळ घटक्यात अलिप्त व्हायची कला कृष्णातच! अमृता प्रीतम आवडतेच मला. नन्तर मग राधा कृष्ण घोळाचा फार विचार न करताही राधेचं स्वगत रुजलंच कि माझ्यात. अरुणा ताईंचा कृष्णकिनारा आकार घेत होता मनात,
मिळालास मज स्पर्श निळा तू
तुला सावळी बाधा
दिल्या तुला तळव्याच्या रेषा
शब्द मला दे साधा
हा साधा शब्दच किती हेकट-त्रासदायक असू शकतो तिला बिचारीला काय माहित!
पतिया न भेजे हो रामा, कलापिनी ताईची चैती सुरूच आहे लूप वर. या सारख्या मला ओढून चैत्राच्या lockdown वर्तमानात आणतायेत आणि मी आपली पुन्हा मागे फिरून शोधतेय नेमके कधी लाभले बहराचे बाहू? नेमके कधी? आषाढाच्या पाणकळेत कि श्रावणाच्या हिरव्या पिवळ्या सरीत? कि काय माहीत शके वगैरे सुरु व्हायच्या आधीच्या कोणत्याश्या दिवसांत!
आरशाने जेंव्हा कबुली दिली की, सापडलीय आता बहराची वाट मला माझ्यातच, तेंव्हा पौष लागला होता.
तेंव्हाच तर ती कविता भेटली मंगेश काळेंची
तो पहिला व्रण साकळून शतकं झालीत
कितीदा नव्याने जन्मलो. भेटलो. सुटले हात पुनःपुन्हा
तरी उडाला नाहीये पारा आरशाचा. दिसतेय लख्ख अजूनही
तुझी लिपी आईन्यात नि वाचताही येतेय इतके खर्डे होऊनही
खरंतर एकट्यानेच कोरलेली अक्षरंयेत ती मुबारक. खालीस
तुझ्याही नकळत तू असताना, नसतानासुद्धा उमलून आलेली
No-wonderland मधली Alice time warp मधून येत जात राहणारे आता तिच्या कवितांच्या solace मधे. या येरझाऱ्यात हरवल्याची पहिली अशाश्वताची भीती पण पौषातलीच. मग माघाच्या थंडीने किती तरी तासांच्या गप्पा दिल्या स्वतःशीच नव्याने ओळख झाल्या सारख्या. भांडणंही मांडली कितीदा. तोवर फाल्गुन आलाच रंगांची ओळख पटवत. कवितेने तरी किती गोष्टी सांगायच्या, राखायच्या आणि पुन्हा जन्माला घालायच्या? फाल्गुन पंचमी साजरी करायचीय, काय ऐकू? काय ऐकवू? कुमारांचा मधमाद, रंगदे रंगरेजवा... रंगरेजवा म्हणजे कृष्णच का पुन्हा? तसा शब्दाचा अर्थ साडीला रंग देणारा असाही होतोच . रंगरेजा -रंगरेजवा काय गोड शब्द ना!
किंवा पु. शि. रेगे वाचूया का ?
अन् फिकट गुलाबी ढगा आडच्या
खुणा मांडीवर तिच्या नभाच्या.
खरतर हि तुझी माझी गोष्ट, माझ्यातल्या तुला हुडकल्याची गोष्ट. का सांगावी कोणालाच?
गीत चतुर्वेदी सांगतोय ना इतका :
प्रेम इस तरह किया जाए
कि दुनिया का कारोबार चलता रहे
किसी को ख़बर तक न हो कि प्रेम हो गया
ख़ुद तुम्हें भी पता न चले
किसी को सुनाना अपने प्रेम की कहानी
तो कोई यक़ीन तक न करे
बचना प्रेम कथाओं का किरदार बनने से
वरना सब तुम्हारे प्रेम पर तरस खाएंगे.
पण काय करू शिशीराच्या गारठ्याने जी उब दिली आहे स्वभानाची, ती जपून ठेवायलाच हवीये. विंदांना माहित्ये ती गोष्ट
होतो तिथेच गेलो जन्मांतरी कितीदा
ते सर्व सांगणारी होती नदी इमानी.
आकाश सर्व त्याच्या केसात पिंजलेले,
डोळ्यात डोह काळा, रक्तात गीत मानी.
डोळे मिटून त्याचा निःश्वास हुंगताना
मातीत मी मिळाले, माती किती शहाणी!
पुढचे नको विचारू---इतकेच सांगते मी---
मी चांद झेलला ग पदरात त्या ठिकाणी.
आत्ता हा वसंत ऋतू सुरू आहे. हा इतका जादूचा का माहीत्ये? याला वर्षा अखेरचा फाल्गुन आणि नव्या वर्षातला चैत्र दोघांना धरून ठेवायचय. हिशोब मांडायला बसले गेल्या वर्षाचा आणि येत्या वर्षाचा तर घोळ होतायेत नुसते. Timelineशी चाळा करायच्या नादात किती खुपऱ्या बोचऱ्या जखमा उकलतात, किती शहाणे व्रण दिसतात, काही शूर घाव हुळहुळे होतात, काही नव्या सुरकुत्या, काही जुनीच चांदी केसात नव्याने लकाकते आणि पुन्हा नवा पोरकटपणा लुकलुकत्या डोळ्यांनी वाट पाहताना दिसतो.
ओह् चैती पण संपली , पत्र-निरोप-सांगावा मिळाला असेल का तिला एव्हाना? तो वर मी त्या time warp मधून जुन्या मला सांगून आले, पुढे जे काही घडेल ते दुखलं- खुपलं- सोसेना झालं तरी सहन कर. दुःख रुजलं तसं नवं उमटेलच काही तरी. डकटेल्स च्या ह्युई - ड्युई आणि ल्युई चे किस्से ऐकायलाच हवेत, तो क्षण ट्विस्ट करून नाही चालणार.
Mom arms- ही phrase माहीत्ये? पोरांना सतत उचलून घेणाऱ्या बाईचे semi toned हात/ दंड. Moms arms- लेकुरवाळे बाहू. झाडांचा बहर, blossom म्हणजे नवी पानं फुलं - चैत्र पालवी आणि त्यातनं सृजनाचं चक्र सुरू राहणं- लेकुरवाळं असणं. मजाय ना, तू बहराच्या बाहुंची! चैत्र आला आहे, घरात अडकलो आहोत, पण बहरांचे बाहू शाबुत आहेत.