लॉकडाऊन

Disclaimer: कथा बरीच त्रासदायक आणि नकारात्मक आहे. नाजूक मनाच्या लोकांनी कृपया वाचू नये आणि वाचलीच तर मन डालगोना कॉफीइतके घट्ट करून :P वाचावी.

------------

दिवस १

फिरतीच्या नोकरीमुळे मी घरी तसा कमीच असतो. तो मनात स्वतःशीच बोलत होता. नशीब चांगलं की कालच घरी आलो आणि आजपासून सगळा देश एकवीस दिवसांसाठी लॉक डाऊन झाला. च्यायला हा वायरस! साला एक वायरस आदमीको औकात दिखा देता है! सुरुवातीला बातम्या आल्या तेव्हा वाटलं नव्हतं इतक्या पटकन आपल्या देशापर्यंत येईल. निदान घरात पोटापुरतं खायला प्यायला आहे. म्हणजे नूडल्स, पास्ता, वेगवेगळे चिवडे, फरसाण चखणा म्हणून खायला जमवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण कपाटात जेडीच्या दोन पूर्ण रिकाम्या बाटल्या आहेत!  थोडा किराणा आहे. कांदे, बटाटे, डाळ, तांदूळ, ब्रेड आहे. ठीक आहे, बाहेर जेवण नाही तर निदान कुकर लावून आमटी भात जेवू शकतो.

तसाही सेल्स फिल्डमध्ये वर्क फ्रॉम होमचा काही विषयच नाही त्यामुळे फुल्ल टू आराम होईल एवढे दिवस. कानात इअरफोन खुपसून, हातातले  क्रीम अँड अन्यन चिप्सचे मोठे पॅकेट उघडून तो बाल्कनीतल्या झुल्यात जाऊन बसला. रात्रीचे नऊ वाजले तरी समोरच्या फ्लॅटच्या टेरेसवर दोन कावळे जोरजोरात कीssर्र, कीssर्रर्र बोंबलतायत. काय कटकट आहे साली...

रात्री चार साडेचारपर्यंत काळोखात बसून अमेरिकन हॉरर स्टोरीचा आठवा सिझन संपवताना त्याचा कधी डोळा लागला त्यालाच समजले नाही.

दिवस २

सकाळी अकरा वाजता तोंडावर चमकणाऱ्या उन्हाने त्याला जाग आली. बिल्डिंगमधले मुलांचे, टीव्हीचे सगळे आवाज बंद झालेत. डोळे चोळत हॉलमध्ये येऊन त्याने बाल्कनीचा दरवाजा उघडला. भसकन गरम हवा आत आली. त्याची रखरखीत बाल्कनी झुला सोडता बाकी रिकामीच होती. झाडांना वगैरे पाणी कोण घालणार म्हणून त्याने घरात एकही जिवंत झाड ठेवले नव्हते, ना काही कुत्रा, मांजर पाळले होते. तरी बिल्डिंगसमोर पसरलेल्या भल्या मोठ्या रेन ट्री मुळे बेडरूमच्या भिंतीकडे जरा तरी थंडावा होता.

गॅसवर चहा ठेऊन त्याने मोबाईलवर बातम्या वाचायला सुरुवात केली. सगळ्या बातम्या वायरस, नवीन केसेस, नवीन मृत्यू यांनीच भरून वहात होत्या. काही वेळाने युट्युबवर बघून त्याने अंडा घोटाला बनवला आणि ब्रेडबरोबर खाऊन ढेकर देत परत बेडवर पडला. काय कटकट आहे म्हणत पुन्हा उठून सगळे पडदे बंद केले आणि काळोखात मोबाईल बघत पडून राहिला. सोसायटी ग्रुपवर मेसेज होता, मेन गेट सकाळी फक्त आठ ते दहा या वेळात उघडले जाईल आणि तेवढ्याच वेळात बाहेरची महत्वाची कामे करून यावीत. तेही फक्त मास्क घालूनच. त्याने पुन्हा एकदा वायरसला जोरात शिवी हाणली.

त्याने डोळे उघडले तेव्हा सगळीकडे अंधारच अंधार होता. समोर भिंतीवर घड्याळात हिरव्या रेडियमचे काटे सव्वा नऊ दाखवत होते. शिट! एवढी कशी काय झोप लागली विचारातच त्याने जाऊन ब्रश केले आणि कालची उरलेली स्टार बंक कॅफेच्या शेवटच्या पार्सलमधली दाल खिचडी गरम करायला ठेवली. (हा स्टार बंक म्हणजे एक मज्जाच आहे. दोन कॉलेज फेल स्टुडंट्सने मिळून टपरी स्टाईल कॅफे सुरू केला, त्यांच्या सवयीप्रमाणे कधीतरीच सुरू असतो पण उघडा असेल तर चव नक्की भन्नाट असते.) त्याने सहज बाल्कनीचे दार उघडले तर समोर सोसायटीच्या काविळ झालेल्या पिवळ्या दिव्याखाली बारीक पाखरांचा एक प्रचंड ढग गुंगुं करत हिंदकळत होता.

दिवस ३

आज केर खाली नेऊन टाकायचा असल्यामुळे तो अलार्म लावून आठ वाजता उठला होता. कचरा टाकायला आलेले बिल्डिंगमधले सगळे मास्कधारी परत कधी बोलायला मिळेल न मिळेल असे एकमेकांशी बोलून घेत होते. त्याचे तसेही बिल्डिंगमध्ये कुणाशी फार बोलणे चालणे नव्हतेच. तो आपले काम संपवून लगेच वर निघून गेला.

स्वयंपाक, खाणे, भांडी घासणे आणि नंतर ती भांडी आवरणे या पथेटिक रुटीनला आता तो वैतागला होता. झोपून झोपून झोपणार किती आणि पॉर्न बघून बघून बघणार किती! सगळ्याचाच आता कंटाळा आलाय. हम्म.. पॉर्नवरून त्याला त्याची एक्स आठवली. तिची 'व्यवस्थित' आठवण काढून झाल्यावर पोटातली भूक जागी झालीच. दोन वर्षांपूर्वी ती ग्रीक - टर्किश फूडच्या प्रेमात असताना तिने बुकमार्क करून ठेवलेल्या रेसिपी तो स्क्रोल करायला लागला. आ हां! कुंपीर नावाचे बटर, चीज, मसाले भरून बेक केलेले बटाटे! हे सोपं आहे म्हणत त्याने तयारी केली आणि दहा मिनिटात भरलेले बटाटे अवनमध्ये टाकून हातात तिसऱ्या चहाचा कप घेऊन तो बाल्कनीत येऊन बसला.

अचानक त्याला समोरच्या टेरेसमध्ये हालचाल जाणवली. त्याने रोखून बघितलं पण तिथे नुसतीच दोन चुकार कबुतरे गुटरगुं करण्यात बिझी होती. "ह्या साल्यांना वायरस का धरत नाही? एकदाची संपून तरी जाऊदेत" तो जरा मोठ्यानेच म्हणाला.

जोरात पिंग ऐकू येताच तो उठून आत गेला. गरमागरम बटाटे चिमट्याने धरून ताटात ठेवताना खिडकीतून समोर त्याला पुन्हा कोणीतरी पटकन टेरेसच्या या टोकापासून त्या टोकाकडे गेल्याचा भास झाला. पण उन्हात लांबचे नीट दिसत नव्हते. दुर्लक्ष करत त्याने भरलेल्या बटाट्यांवर भरपूर मेयोनीज घालून, पिझ्झा सिझनिंगची इकडे तिकडे पडलेली जुनी दोन तीन पाकिटं रिकामी केली, शेजारी बॉटल उलटी ठोकून टोमॅटो केचपचा एक लालभडक मोठा ठिपका पाडला आणि ताट सोफ्यावर नेत पॉझ केलेली अमेरिकन हॉरर स्टोरी पुन्हा प्ले केली.

दिवस ४

आज सकाळ पासूनच पनौती सुरू झालीय. लाईट गेल्यामुळे घामाघूम होऊन जाग आली, त्यात उठल्या उठल्या फोनवर घराचा इएमआय कट झाल्याचा मेसेज. पगार फार थोडा शिल्लक होता पण ठीक आहे, घरात बसून जास्त खर्च होणार नव्हता. आई असती तर तिला माझा कमी झालेला खर्च बघून नक्कीच बरे वाटले असते. त्याच्या चेहऱ्यावर जरासे हसू उमटले. बातम्या पहिल्या तर बाहेर परिस्थिती अजून वाईट वाईट होत चालली होती. काही देशांमध्ये हजारो लोक मेले होते त्यांचे अंत्यसंस्कार करायलाही पुरेसे लोक जिवंत नव्हते.

सवयीने उठून त्याने रोजचे लॉकडाऊन रुटीन संपवायला सुरुवात केली. चहाचा मग हातात घेऊन तो बाल्कनीच्या काठाला टेकून उभा राहिला. समोरच्या टेरेसमध्ये अचानक त्याला कोणीतरी खुर्चीत बसलेले दिसले. उन्हात चमकणारे तपकिरी, सोनेरी केस तिने डोक्यावर गुंडाळून उंच क्लिपमध्ये अडकवले होते, तरी काही चुकार बटा तिच्या खांद्यावर ओघळल्या होत्या. उंच, नाजूक मान खाली घालून ती काहीतरी करत होती. तिने अंगात फक्त आडव्या बारीक निळ्या रेषा असलेला पांढरा बोट नेक टी घातला होता. बोट नेक एका खांद्यावरून ओघळल्यामुळे तिचा गोलसर खांदा  त्याच्यावर उठून दिसणाऱ्या बॉटलग्रीन स्पगेटी स्ट्रॅपसकट उन्हात चमकत होता. तिला त्याची पर्वा नव्हती. ती सरळ तिचे सुडौल उघडे पाय समोरच्या कॉफी टेबलवर पसरून आरामात ऊन खात होती.

माय गॉड! तो धडधडत्या हृदयाने तिचं निरीक्षण करत होता पण डोळ्यावर ऊन चमकत असल्यामुळे एचडी क्वालिटी मिळत नव्हती. "साला ही कोण अप्सरा आली इथे? गेल्या महिन्यात तर रिकामा होता फ्लॅट. मरो, आपल्याला काय, काहीतरी नेत्रसुखाची तरी सोय झाली ह्या वाळवंटात." म्हणत तो नजर न हलवता जास्त उत्साहाने चहाचे घोट घेऊ लागला.

तो आत जाऊन, कप ठेऊन पुन्हा बाहेर येईतो पोरगी गायब. आता काय तेच पहिले पंचावन्न पाढे!

दिवस ५ दिवस ६ दिवस ७ दिवस ८

आले तसे गेले.

दिवस ९

इतके दिवस आले, गेले पण तिची पुन्हा हालचाल दिसली नाही. आजही मॅगीचं पातेलं बाल्कनीतल्या टेबलवर ठेऊन तो झुल्यात बसला. हायला! ती समोरच तिच्या टेरेसमध्ये त्याला पाठमोरी उभी होती. टेरेसभर सगळीकडे कावळे आणि कबुतरं कल्ला करत होती. त्यांच्या उडण्यातून ती नीट दिसतच नव्हती. ही पण अगदी चंदू दुकानवाल्याची बहीण दिसतेय कबुतरांना दाणे टाकण्यात! त्याने मनातच कबुतरांना परत एक शिवी दिली.

त्याने आत जाऊन कॅमेरा आणला, झूम करून जरा मजा करू म्हणून, पण काय फुटकं नशीब! ती तिथून परत गायब होती. तो रोज तिला ट्रेस करायचा प्रयत्न करत होता पण दरवेळी अपयशच येत होते. एव्हाना तो पूर्णपणे तिच्या विचारात गुंगला होता. झोपता, उठता, बसता त्याच्या नजरेसमोर फक्त तिची आऊटलाईन दिसत होती आणि तिचा चेहरा किती हॉट असेल हा विचार मनात घोळत होता. तशीही एकटीच दिसतेय, आजूबाजूला कोणी दिसत नाही,जर हा वायरस बाहेर नाचत नसता ना तर कधीच जाऊन पटवली असती आणि एव्हाना ही माझ्या घरात असती.

दिवस १२

गेले दोन दिवस तो गुंगीत असल्यासारखा फक्त तिला पहात होता, त्याच्या किचनमध्ये, बाथरूममध्ये, बेडवरसुद्धा त्याला फक्त तीच असायला हवी होती. पण बराचसा वेळ ती तिच्या टेरेसमध्येच दिसत होती. कावळे आणि कबुतरांची झुंबडही तिथे कायमची होती. एवढा सगळा थवा जमून काय मेजवानी झोडत होता तेच कळत नव्हते. कायम मान खाली घालून काहीतरी करत असायची त्यामुळे काय करू म्हणजे तिच्याशी कॉन्टॅक्ट होईल हेच त्याला समजत नव्हते.

आजही तो मोबाईल घेऊन टाईमपास करत झुल्यात बसला होता. समोर कावळ्यांचा थवा घिरट्या घालत कलकलाट करत होताच. अचानक सोसायटी ग्रुपवर मेसेज पिंग झाला.  'आपल्या C बिल्डिंगच्या फ्लॅट नं. 1304 मध्ये एक आकस्मिक मृत्यू झाला आहे.  गेल्याच महिन्यात तेथे रहायला आलेल्या देशपांडे कुटुंबापैकी सौ. देशपांडे यांचा त्यांच्या टेरेसमध्ये मृत्यू झाल्याचे समजण्यात येते. त्यांचे पती लॉकडाऊनमुळे बाहेर असल्यामुळे कोणालाही ही गोष्ट समजली नव्हती. पोलिसांनी खुनाचीही शक्यता वर्तवली आहे. सगळ्यांनी कृपया आपापल्या घरातच थांबावे, बाहेर आल्यास कठोर कारवाई केली जाईल. पोलीस आणि सोसायटी कमिटी पूर्ण काळजी घेत आहेत.'

त्याने खाडकन मान उचलून समोर पाहिले, तिनेही अचानक चेहरा वळवून त्याच्याकडे रोखून पाहिले. पहिल्यांदाच त्यांची नजरानजर झाली आणि.. तिच्या काळ्यानिळ्या झालेल्या, ओरबाडलेल्या चेहऱ्यावरचे डोळे पूर्णपणे रिकामे होते, त्याजागी होत्या फक्त दोन अंधाऱ्या खाचा!

तो उठून झपाट्याने बेडरूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे खिडक्या, पडदे बंद होते, सगळीकडे त्याला हवा तसा काळोख होता. अचानक त्याला थंडी वाजू लागली होती. जोरजोरात श्वास घेत अंगावर ब्लॅंकेट गुंडाळत बेडवर तो कसाबसा पडला. त्याचे डोळे घट्ट मिटलेले असले तरी समोरच्या खिडकीच्या काचेवर कावळ्याचा क्राव आवाज आणि चोचीची टकटक ऐकू आलीच, आणि त्याच वेळी बेडरूमच्या उघड्या दारातून आलेला थंड हवेचा झोत आणि सिल्कची सळसळ!

समाप्त.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle