शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग २

पहिल्या भागाचा दुवा: भाग १

भाग २ आपल्याला कोठे जायचे आहे?

यामध्ये एकूण चार उद्दिष्ट मांडावीशी वाटतात.

१. मानवी भूभार कमी करणे - आधी आपण बघितले तसं माणसाने बरीच जमीन हडप केली आहे. ती जमीन निसर्गाला परत करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे नक्की काय करायचे तर सध्या जी औद्योगिक शेती केली जाते ती बहुतांशी रासायनिक असते. या औद्योगिक शेतीच्या प्रारूपाकडून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकडे वळणे. यात एका पिकाऐवजी अनेक पिके एकाच वेळी घेणे रासायनिक खते न वापरणे, आणि मांसाहार कमी करणे अथवा बंद करणे या गोष्टी येतात. समजा, आपण शंभर एकर जमीनीवर फक्त मका पिकवत असू तर त्या ऐवजी पाच ते दहा एकर जमीनीवर किमान 4 ते 5 विविध प्रकारच्या धान्य अथवा भाज्या लावणे. फिरती शेती, असे करता येईल. उरलेल्या जमिनीवर तिथल्या मूळ वनस्पती उगवतील असे पोषक वातावरण निर्माण करता येईल. मात्र केवळ झाडे लावून जंगल तयार करणे म्हणजे निसर्ग नव्हे. निसर्गाच्या अनेक परिसंस्था असतात - गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, रेतीचे मैदान, वाळवंट ह्या सगळ्या नैसर्गिक परिसंस्था आहेत. आपल्या भौगोलिक प्रदेशानुसार तिथली जी नैसर्गिक परिसंस्था आहे तिच्या परीघात राहून तेथील स्थानिक बियाणे वापरून शेती करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. या प्रकारे केलेली शेती ही भरपूर उत्पन्न देणारी, शेतकऱ्याला जगवणारी आहे हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. यातून मांसाहार व दुग्धजन्य पदार्थ यासाठी खर्च होणारे पाणी व उर्जा यांची बचत झाल्याने पृथ्वीवरील भार कमी होईल.

२. संसाधनांचे विकेन्द्रिकरण - सध्याची आपली अर्थव्यवस्था केंद्रिकरणावर भर देणारी आहे. चीनमध्ये माल उत्पादन करणे हे आर्थिकदृष्टय़ा स्वस्त पडते म्हणून तिथे सर्व जगातील वस्तूंचे उत्पादन केले जाते. अन्नधान्य, दूध, कपडे, पाणी, उर्जा या आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तू देखील कधी कधी सातासमुद्रापार तयार झालेल्या असतात. मग त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विपणनाची एक मोठी साखळी तयार करावी लागते. या साऱ्याची नैसर्गिक किंमत आपण मोजत नसल्याने आर्थिकदृष्टय़ा आपल्याला ते परवडते. मात्र या साखळीतील एखाद्या गोष्टीवर बंदी आली तर काय भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याची अगदी छोटी चुणूक आपल्याला कोरोना मुळे दिसली आहे. किमान अन्न आणि उर्जा या दोन बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या छोट्या छोट्या मानवी वसाहती निर्माण करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. आज भारतातल्या कुठल्याही शहरात पाणी दूरच्या धरणातून येते, धान्य भाजीपाला दूध आसपासच्या खेड्यातून येते, वीज दूरच्या कोणत्या तरी वीज केंद्रात तयार होते. या साऱ्या गोष्टी शहरात येतात पण शहरात काय तयार होते तर प्रदुषण, सांडपाणी आणि कचरा. पुन्हा या सर्व गोष्टी शहराबाहेर नेऊन प्रक्रिया करून सोडण्याची व्यवस्था निर्माण करावी लागते. या उलट शाश्वत प्रारूपात शहरातील प्रत्येक प्रभागात दैनंदिन गरजेचा भाजीपाला फळे पिकवता येईल, कदाचित एखादा गोठा असेल. सर्व प्रभागातील सांडपाण्यावर आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून बायोगॅस तयार करता येईल. त्यातून तिथल्या लोकांची उर्जेची गरज भागू शकेल. गावाकडे हेच मॉडेल राबवले तर शहराकडे येणारे माणसांचे लोंढे कमी होतील. गावातील लोकांना गावातच अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल. शेतीच्या जोडीला छोटे कुटीर उद्योग चालवता येतील. ही एक शोषण न करणारी शाश्वत अर्थव्यवस्था असेल.

३. चक्राकार अर्थव्यवस्था - या शाश्वत विकासाच्या स्वप्नांमध्ये उद्योग धंदे कसे चालतील? तर त्यासाठी circular economy चे प्रारूप मांडले आहे. यामध्ये कोणत्याही उत्पादनात कचरा निर्माण होणार नाही. कारण एका उत्पादनात तयार झालेला कचरा हा दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असेल. हे उद्योग अर्थात जास्तीत जास्त विकेन्द्रीत आणि उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतील. उदाहरणार्थ, आज आपण बिस्किटाचा पुडा घेऊन येतो. त्याच्या वेष्टनाची जबाबदारी कोणाची असते? शाश्वत उद्योग end to end responsibility घेणारा असेल. यालाच cradle to cradle approach अशी संज्ञा आहे. मग अशा परिस्थितीत कदाचित single use plastic चे वेष्टण बिस्किट कंपनीला परवडणार नाही! याच धर्तीवर जर आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला परत घेण्याचा कायदा आला तर कदाचित मोबाईल कंपन्या इतक्या वेगाने नवीन मॉडेल्स आणणार नाहीत. कारण कंपनीला केवळ एका नवीन चीप साठी अख्खा फोन परत घेणे परवडणार नाही मग कदाचित ती एक चीप बदलून तोच फोन अधिक काळ वापरता येईल.

४. अपारंपरिक ऊर्जा स्रोत - मूळ उर्जेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जा आणि जलविद्युत हे दोन सर्वात चांगले पर्याय आहेत. मात्र त्यासाठी मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोट्या छोट्या प्रमाणात विकेंद्रीत उर्जा निर्माण करणे आणि गरज पडल्यास ती ग्रिडने जोडणे अधिक शाश्वत आहे. सौर ऊर्जा सोलार पॅनेलच्या माध्यमातून वापरणे जरी सोयीचे असले तरी तो सर्वात चांगला पर्याय नाही. जशी मिळते त्या स्वरूपात सौर ऊर्जा वापरणे सर्वात सोपे आणि चांगले. यात गवत आणि शेतात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणारा बायोगॅस हा एक शाश्वत पर्याय असू शकतो. मूलतः उर्जेची गरज कमी भासेल असे जीवनशैलीत बदल करणे हा एक मोठा बदल आध्यारूत आहे. उदाहरणार्थ, चालत, सायकलने, किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास, भरपूर सूर्यप्रकाश आणि उत्तम वायुवीजन व insulation असलेली शाश्वत पद्धतीने बांधलेली घरे इत्यादी मुळे उर्जेची गरज कमी होऊ शकते.

हे सगळं कसं शक्य आहे? हे अति आदर्श जवळपास युटोपिअन स्वप्नरंजन आहे असं वाटू शकतं. पण विचार केला तर या सर्व गोष्टी शक्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी कोणी तुम्हाला असं सांगितलं असतं की एका महिन्याहून अधिक काळ अख्खा भारत घरी बसून राहणार आहे तर आपल्याला कदाचित पटलं नसतं पण असं प्रत्यक्ष घडलं आहे! कोणतीही गोष्ट सत्यात आणायची असेल तर इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या दोनच गोष्टी लागतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! आता या युटोपियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण तिसऱ्या भागात पाहू.

अधिक विस्ताराने माहितीसाठी उपयुक्त लिंक्स

१. Permaculture/polyculture
https://youtu.be/oCZ-t30aCeQ

२. शेतीचे कारखाने आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम
https://youtu.be/7TRI7yeeYQQ

३. चक्राकार अर्थव्यवस्था म्हणजे काय?

https://youtu.be/zCRKvDyyHmI

https://youtu.be/7b9R82vrA40

Keywords: 

चर्चाविषय: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle