साहबजादे

'I suppose in the end the whole of life becomes an act of letting go, but what always hurts the most is not taking a moment to say goodbye.'

त्याच्या शेवट्च्या क्षणाला हे किती खरं ठरलं..

तो जाणार हे काही काळ आधीच कळलं होतं खरं तर.. पण तरी त्याचं जाणं चटका लावून गेलंच. कमालीचं उदास करुन गेलं..

पण मागे वळुन पाहताना दिसतो तो सगळ्यांच्या प्रेमानं तृप्त झालेला इरफान... नॅशनल अवॉर्ड घेऊनही पाय जमिनीवर असलेला साधा सोपा इरफान.. अनेक हॉलीवुड पटात काम करुनही कधीही हिरो न होता ‘शेवटपर्यंत कलाकारच राहिलेला’ इरफान..

अवलियाच होता. ना टिपीकल हिरोसारखं रुप किंवा बॉडी, ना स्टारडम, ना डान्स, ना खानदानाचं, घराण्याचं पाठबळ.
साहबजादे इरफ़ान अली खान उर्फ़ इरफ़ान रुढार्थानं तो अजिबात साहबजादा नव्हता..

एका छोट्याशा गावात, सर्वसाधारण कुटुंबात तो जन्माला आला होता.. पण त्याची स्वप्न सर्वसाधारण नव्हती.. आणि ती पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करण्याचीही तयारी होती.. सी के नायडू ट्रॉफ़ीसाठी फ़र्स्ट क्लास क्रिकेट खेळला आणि खेळतच होता.. पण एवढ्यातच एका नातेवाईकामुळे अभिनयाकडे ओढला गेला.. प्रत्येक गोष्ट इतकी समरसून करायचा की नुसतं अभिनयाची आवड आहे म्हणुन तो गप्प बसला नाही, तर सरळ एन.एस.डी पर्यंत धडक मारली.

अर्थात एन.एस.डी पर्यंत पोचण्याचा प्रवास सोपा नव्हताच.. त्या काळात अगदी घरोघरी जाऊन एअर कंडीशनर दुरुस्तीचं कामही केलं.. कष्ट केले... त्रास सोसला.

पण हा स्ट्रगल काहीच नव्हता. खरा स्ट्रगल आता सुरु होणार होता. कारण एन.एस.डी सारख्या नामवंत संस्थेतुन पासआऊट झाल्यावर सुद्धा त्याच्यासाठी केक वॉक नव्हता.. त्याचा पहिला ब्रेक होता तो मिरा नायरचा सलाम बॉम्बे.. त्यात त्याला मेन रोल ऑफर केला गेला.. पण काहीतरी बिनसलं आणि तो रोल हातातून गेला. जो छोटा रोल त्यानं मनापासून निभावला, तो ही फ़ायनल कट पर्यंत पोहचू शकला नाही.. मग ९० च्या दशकात त्यानं दूरदर्शन वर काम सुरु केलं.. चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांता अशा मालिकेतुन कामं केली.

यानंतर मात्र २००१ साली आलेल्या द वॉरीअर या चित्रपटानं इंड्स्ट्रीला त्याची दखल घेण्यास भाग पाडलं.. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजल्यावर त्याचा चेहरा लोक ओळखू लागले. शेक्सपिअरच्या मॅकबेथ वर आधारीत मकबूलने त्याला ख-या अर्थानं प्रकाशझोतात आणलं.. तब्बू, पंकज कपूर, ओम पुरी, नसीरुद्दीन शहा अशा दिग्गजांबरोबर पठ्ठ्या तितक्याच ताकदीने उभा राहिला. त्यानंतर आलेल्या रोग या चित्रपटाने तर समीक्षकांची वाहवा मिळवू दिली..

इरफान म्हणजे इन्स्टीट्यूट आहे.. त्याचा फक्त अभिनयच पाहण्यासारखा नसतो. त्याचा आवाज, त्याची देहबोली, त्याचं रोलमधे घुसणं, त्याचं बोलणं.. सगळंच लाजवाब. आणि संवादाचं म्हणाल तर शब्दांपेक्षा इरफानचे डोळे बोलतात.. तो स्क्रीनवर आला की फक्त तोच पडदा व्यापून उरतो अशा शब्दात त्याचं कौतुक केलं गेलं.. आता पॉझीटीव्ह लीड रोल करत असतानाच हासील चित्रपटामध्ये खलनायकाची भुमिका करुन चक्क फ़िल्म फ़ेअरचं बेस्ट विलनचं अवॉर्डही पटकावलं..

द नेमसेक आणि लाईफ़ इन अ मेट्रोने बॉक्स ऑफ़ीसच्या यशाची नशा चाखायला मिळाली.. लाईफ़ इन अ मेट्रॊ मधली त्याची कोंकणा बरोबरची केमिस्ट्री निव्वळ अफ़लातून.. सुपरहिट फिल्म्स तो करत होता तरी त्याच वेळेला त्यानं टेलिविजनही सोडलं नाही.

"कोणत्याही पात्राच्या नैतिकतेमध्ये सहजतेने शिरण्याचा त्याचा स्वत:चा असा एक मार्ग आहे" असं इरफ़ानबद्दल म्हणणारे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक डॅनॊ बोयल यांच्या स्लमडॉग मिलेनियरने तर थेट ऑस्करपर्य़ंत बाजी मारली. यानंतर त्याचे तब्बल ९ हॉलीवूडपट आले. द अमेज़िंग स्पायडर मॅन, जुरासिक वर्ल्ड या अगदीच कायम लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या चित्रपटांच्या मालिकेत त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या आणि खरं तर मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं त्यानं केलं..
लाइफ़ ऑफ़ पाय सारखा थेट ऑस्करला धडकलेल्या चित्रपटात मोठेपणाच्या पाय भुमिका त्यानं बखुबी निभावली..

इंडस्ट्रीमध्ये छान स्थिरावल्यावर पिकूसारखा विनोदी अंगानं जाणारा हलकाफुलका चित्रपट असू दे किंवा तलवार सारखा अतिशय गंभीर विषय.. अशा सगळ्याच चित्रपटामध्ये त्याचा अभिनय आणि वावर अतिशय सहज दिसतो..

हैदर मध्ये थोडासा लंगडणारा, डोळ्यावर गॉगल, काश्मिरी टोपी, अंगावर ओढलेली शाल तो रुहदारच.. इरफ़ान नाहीच.. आणि तितक्याच ताकदीने उतरलेला लंच बॉक्स मधला हळवा साजन.. दोन्हीकडचा इरफान आपल्या अभिनयाची ताकद दाखवून देतो.. सैन्यामधला एक सैनिक, अनेक ऍवार्ड मिळवलेला उत्कृष्ट धावपटू इथुन ते एक आपण ज्या समाजात वाढलो त्याच समाजाच्या विरोधात जाऊन बंड करणारा बंडखोर आणि पुढे जाऊन खंडणी मागणारा, अपहरण करणारा डाकू हा पान सिंग तोमर चा प्रवास दाखवायला केवळ इरफ़ानच हवा.. त्याला ह्या रोलसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं ह्यात काही नवल नाही... करीब करीब सिंगल मध्ये तर त्याने कमाल केली आहे.. त्याचं सरळ साधं आणि मॅच्युअर प्रेम आपल्याला फार भावतं.. भरभरून जगणं, आयुष्य सेलिब्रेट करणं सगळंच कमाल..

जजबा, मदारी, कारवा, हिन्दी मिडीयम यासारख्या चित्रपटातले त्याचे रोलही असेच अगदी संस्मरणीय.. आजारामुळे तो काही काळ उपचारासाठी गायब होता.. जेव्हा गॅपनंतर अंगेजी मिडिअम हा त्याचा सिनेमा आला तेव्हा तो आता बरा झालाय असं वाटून थोडं हायसं वाटलं पण मुलीच्या शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करणारा बाप सादर करणारा अंगेजी मिडिअम हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला..

कुठल्याही चौकटीत न अडकता आणि तरीही कोणतही दड्पण न घेता नॅचरल अभिनय, दमदार आवाज, नितळ डोळे आणि मिस्कील हसू हे त्याचं वैशिष्ठ्य.. कधी रोखठोक स्पष्ट बोलला तरी ते बोचरं नसायचं.. थोडं विनोदी ढंगानं जाणारं आणि तरी परिणामकारक..

त्याच्या इतका निरागस मुलगा मी बघितला नाही असं सुतपा सिकंदर, त्याची बायको म्हणायची आणि इतक्या उत्तुंग यशानंतर तो फक्त छान ग्रो झाला होता त्याचा निरागसपणा कायम होता.. सुतपा आणि तो फार छान मित्र होते.. खरं तर एन एस डी च्या काळात ती जास्त यशस्वी होती पण इरफ़ान मधली ताकद ओळखून तिने कायम त्याच्यातल्या कलाकाराला प्रोत्साहन दिलं.. त्याच वेळेला ती त्याची क्रिटीक्सही होती.. अर्थात इरफ़ानसारखा अभ्यासू, कष्ट घेणारा कलाकार तिच्या म्हणण्याचाही विचार करून त्यात बदल करायचा.. त्याला मिळालेली अनेक ऍवॉर्डस किंवा त्याच्या चित्रपटांना मिळालेलं यश कधीच त्याच्या डोक्यात गेलं नाही.. अगदी पद्मश्री मिळूनही तो कायम डाऊन टू अर्थच राहिला..

जाता जाता.. इन्फ़ेर्नो या हॉलीवूड चित्रपटामध्ये त्याने टॉम हँक्स बरोबर काम केलंय.. इरफ़ान या एका महान कलाकाराबद्दल बोलताना हा दुसरा महान कलाकार म्हणतो..
'Irrfan Khan, I'm going to steal from you everything I possibly can. I'm going to start speaking very quietly in films. I'm going to wear very nice suits. And I will draw out the last sound of every sentence that I say.' And by doing that, I will be doing a very pale imitation of the coolest guy in the room."

आजीच्या अंगणातली चमेली खूप आवडायची म्हणे त्याला.. तो गेल्यावर त्याला ‘चमेलीची चद्दर’ घालण्यात यावी अशी त्याची इच्छा होती.. आपल्यासारख्या प्रेक्षकांना त्याने जो भरभरून आनंद दिला त्यासाठी जन्नतमध्ये या साहबजाद्याचं चमेलीच्या पायघड्यांनी स्वागत झालं असेल हे नक्की..

सायली कोठावळे मठाधिकारी
sayli.kothavale@gmail.com

(द टिळ्क क्रोनिकल्स मध्ये पूर्वप्रकाशित)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle