चांदणचुरा - २७

पहाटे पाच वाजताच उठून तो आंघोळीला गेला. आरशात बघून डोके पुसता पुसता त्याला लहानपण आठवत होते. बाबा गेल्यापासून तो पहाटे उठणे आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान विसरूनच गेला होता, तेच कशाला, दिवाळीच विसरून गेला होता. एरवी फटाके नसायचे पण तो आंघोळीला गेल्यावर बाबा एक सुतळी बॉंब नक्की फोडायचा. माझा आळशी मुलगा शेवटी आंघोळीला गेssला हे जगाला कळण्यासाठी! हे त्याचं नेहमीचं कारण असायचं आणि तो आंघोळ करून आल्यावर बाबा हे हमखास बोलून दाखवायचा. आई असेपर्यंत त्याला केसांना तेल आणि अंगाला सायीत कालवलेलं सुवासिक उटणं पाठ दुखेपर्यंत रगडून हिमाचलच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत गरमागरम पाण्याने आंघोळ घालायची आणि मग मोठया, मऊमऊ, उबदार टॉवेलमध्ये गुंडाळून घरात न्यायची ते एकदम डोक्यात चमकून गेलं. अचानक एकटं करून टाकणारे ते विचार त्याने डोकं हलवून बाजूला केले.

मुंबईच्या दमट गारव्यातून, हो त्याला थंडी म्हणूच शकत नाही, चालत तो हॉलमध्ये जाऊन बसला. अगदी पुढे नको म्हणून स्टेज व्यवस्थित दिसणारी तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यातील खुर्ची त्याने पकडली. बरोबर सहाच्या ठोक्याला कार्यक्रम सुरू झाला. सगळीकडे काळोख करून स्टेजवर स्पॉटलाईट होता. एक साधारण पन्नाशीच्या काकू उत्साहाने सूत्रसंचालन करत होत्या. स्टेजवर बाकी लोक मागे अंधारात बसलेले दिसत होते. सुरुवातीला भक्तिगीते, काही दिवाळीची गाणी काही शास्त्रीय संगीत गाऊन झाल्यावर शेवटी मराठी - हिंदी भावगीते आणि फिल्मी गाणी सुरू झाली. कार्यक्रम छानच होता पण त्याचे डोळे आणि कान उर्वीसाठी आसुसले होते. मध्येच एखाद दोन गाण्यांच्या कोरसमध्ये त्याने तिचा आवाज ओळखला होता पण कोरस गाणारे अंधारात असल्यामुळे कोणीच ओळखू येत नव्हते.

कार्यक्रम संपत आला तरी त्याला उर्वी दिसलीच नव्हती. आता शेवटचा परफॉर्मन्स होईल म्हणून काकूंनी घोषणा केली आणि उर्वीचे नाव पुकारले.

मिनिटभर सगळीकडे अंधार झाला, स्टेजवर मधोमध स्पॉटलाईट पडला. उर्वी हातात बासरी धरून एका उंचश्या स्टुलावर माईकसमोर बसली होती. फोकसमुळे मोकळे सोडलेले तिचे ओलसर मऊ कुरळे केस चमकत होते. कपाळाच्या दोन्ही बाजूनी दोनच बटा मागे घेऊन तिने क्लिप लावली होती. थोडासा मेकअप केलाच होता पण आनंदाने तिचा चेहरा दुप्पट चमकत होता. तिने फिक्या आकाशी रंगाचा, गळ्याजवळ बारीक सोनेरी वेलबुट्टी, बारीक सोनेरी काठ नि खूप चुण्या असलेला टिशूसारखा नाजूक स्लीव्हलेस अनारकली घातला होता. कानातली मोत्याची चांदबाली सोडून बाकी काही दागिने वगैरे घातले नव्हते. मागच्या तबला आणि कॅसिओवाल्याशी काहीतरी बोलली आणि नंतर बासरी तोंडाजवळ धरत तिने डोळे मिटले. तल्लीन होऊन तिने बासरीत फुंकर मारली आणि तिच्या बासरीच्या सुरांनी त्या बंद खोलीचे सगळे अवकाश व्यापून टाकले.

तुम मिले, दिल खिले

और जीनेको क्या चाहीए..

त्याच्या चेहराभर एक मोठं हसू पसरलं. तिचा आनंद तिच्या वाजवण्यात झळकत होता. समोर उमटणारे इतके सुंदर बासरीचे सूर तो पहिल्यांदा अनुभवत होता. हे गाणं त्याच्यासाठीच आहे हे माहिती असल्यामुळे सकाळपासून एकटेपणाने थंड पडलेल्या त्याच्या हृदयात खोल कुठेतरी ऊब जाणवायला लागली आणि ती वाढतच होती. त्याचे डोळे बासरीवरच्या तिच्या लांब निमुळत्या बोटांवर आणि गुलाबी ओठांवर खिळून राहिले होते.

गाणे संपल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात ती उठून उभी  राहिली आणि आभार, नमस्कार करून मागे सगळ्या टीमबरोबर जाऊन उभी राहिली. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर लोकांच्या गराड्यातून वाट काढत ती त्याच्यापर्यंत पोहोचली. तिने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच स्टेजच्या पडद्याआडून त्याला येऊन बसलेले पाहिले होते. तो शेजारच्या माणसाशी हसून काहीतरी बोलत होता. कालच तिच्या पसंतीने घेतलेला चायनीज कॉलरचा, बाह्या फोल्ड केलेला पांढराशुभ्र शर्ट आणि ग्रे चिनोजमध्ये तो नेहमीपेक्षा वेगळाच भासत होता. केस नीट विंचरलेले होते आणि तिच्याकडे असलेल्या गालावरची खोल खळी दिसत होती. ती डोळे भरून त्याला बघत असतानाच त्याची नजर इकडेतिकडे तिला शोधताना बघून तिला फारच मजा आली होती.

"तुझा परफॉर्मन्स द बेस्ट होता. इतकी सुंदर लाईव्ह बासरी मी अजूनपर्यंत कधी ऐकली नव्हती." तिचे हात हातात घेऊन प्रेमाने तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.

'लव्ह यू' ती फक्त ओठ हलवून म्हणाली. "इथे अजून काही करता येणार नाही ना" म्हणत ती हसली. "तू वर जाऊन बसशील का? इथे सगळ्यांना विश करून येतेच मी पटकन." त्याच्या हातात किल्ली देत ती म्हणाली.

"लवकर ये." म्हणून तो वर निघून गेला. वर जाऊन तिने सजवलेलं घर तो नीट न्याहाळत होता. प्रत्येक गोष्टीत तिचा काही ना काही क्रिएटिव्ह हात फिरलेला होताच. अगदी तलम पांढऱ्या पडदयांना खाली लावलेल्या रंगीबेरंगी पॉमपॉम बॉर्डरपासून ते पुस्तकांच्या पानांमधून बोट वर केलेल्या कार्टूनच्या बुकमार्क्सपर्यंत. टेरेसमध्ये तिने पांढऱ्यावर चंदेरी नक्षी असलेली फोल्डिंगची चांदणी बांधली होती.

त्याने किचनमध्ये जाऊन गॅसवर चहासाठी किटली ठेवली. चहा उकळेपर्यंत डोअरबेल वाजलीच. त्याने जाऊन दार उघडताच तिने हातातली पिशवी आणि गळ्यातली ओढणी सोफ्यावर ठेऊन त्याच्या गळ्यात हात टाकत मिठी मारली. "आज तू इथे माझ्या बरोबर आहेस म्हणून मला खूप खूप बरं वाटतंय." ती त्याच्या कानात कुजबुजली. "हेच खाली करता येत नव्हतं ना!" म्हणत तिने पिशवीतून तिला मिळालेले काचेचे स्मरणचिन्ह काढून त्याला दाखवले. "हा उपमा आणि दिवाळी फराळ सोसायटीकडून" म्हणत खाण्याचे बॉक्सेस काढले. तिने किचनमध्ये जाऊन दोन ताटल्यांमध्ये उपमा आणि फराळातले चिवडा, चकली आणि करंजी ठेवली. "उर्वी, तू आत्ता कंदील नाही केलास का?" त्याने पाण्याचा जग उचलत विचारले.

"अरे, ऑफिस, तू, बासरीची प्रॅक्टिस ह्यातून वेळच नाही झाला. खूपच गडबड होती म्हणून शेवटी ही चांदणी काल ऑफिसमधून येता येता घेतली." म्हणत तिने त्याची डिश त्याच्या हातात दिली.

"ओह असा मराठी फराळ मी लहानपणीच खाल्लाय, आईने केलेला." चुकून आईचा उल्लेख होताच तो गप्प झाला. "ही ओल्या नारळाची आहे?" त्याने करंजी उचलत विचारले.

"अम्म नाही बहुतेक." ती करंजीचा तुकडा मोडत म्हणाली.

"मग नको मला" म्हणून त्याने करंजी काढून ठेवली आणि मोतीचूराचा लाडू उचलला.

"तुला काय माहिती रे ओल्या नारळाची करंजी?" तिने आ करून त्याच्याकडे बघत हसून विचारले.

"अरे, मला खूप आवडतात. हिमाचलमध्ये नारळ खूप मुश्किलीने मिळतात. बाबा खास माझ्यासाठी दिवाळीआधी कुठूनतरी नारळ पैदा करायचा. त्याने बडी माँना रुचिरा की कुठल्यातरी पुस्तकातून करंजी करायला शिकवली होती. बाबा नारळ फोडून, खवून द्यायचा आणि पुढे सगळं बडी माँ करायची."

"आणि तू काय करायचास?" तिने हसत विचारले.

"मी? मी खायचो!" त्याने लाडू भरलेल्या तोंडाने हसत हसत उत्तर दिले.

खाऊन झाल्यावर तिने आत जाऊन चहा गरम केला. त्याच्यासमोर चहाचा कप ठेवताना तिला अचानक आठवलं.

"आदी, तू मला या किटलीची स्टोरी अजून नाही सांगितलीस हं.."

"हो ते राहूनच गेलं. स्टोरी विशेष काही नाही. ती किटली माझ्या जन्माच्या आधीपासून होतीच घरी. पण गोष्ट अशी आहे. लहानपणी बाबा फक्त नाश्त्यापुरता घरी असायचा मग दिवसभर फॉरेस्टमध्ये आणि रात्री बहुतेकदा मी झोपल्यावरच यायचा त्यामुळे फक्त नाश्ता करताना आम्ही एकत्र असायचो. बाबा रोज त्या किटलीत आमच्या दोघांचा चहा करायचा. त्याला फार मिठ्याबिठ्या मारून प्रेम दाखवता यायचं नाही पण ही त्याची पद्धत होती. माझ्यासाठी रोज तो प्रेमाने चहा आणि काहीतरी ऑम्लेट वगैरे नाश्ता बनवत असे. त्यामुळे मी त्या किटलीशी फार अटॅच्ड होतो."

"पण बाबा गेल्यानंतर त्याची खूप आठवण येते म्हणून मी ती किटली वापरणे बंद करून बाजूला ठेऊन दिली होती. पण तू येऊन स्वतःहून केलेली पहिली गोष्ट म्हणजे त्या किटलीत चहा! तोही बाहेरच्या बर्फाचा. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की तू बाकी शहरी मुलींसारखी नाहीस. किती पटकन अडॅप्ट केलंस तू स्वतःला, कुठलाही ड्रामा न करता, इतक्या साधेपणी. केबिनमध्ये आल्या आल्या तू माझ्या हातात चहाचा कप दिलास. बाबा गेल्यापासून मला त्या किटलीत कुणीही चहा करून दिला नव्हता. तेव्हापासून मला आतून तुझ्याबद्दल काहीतरी ओढ वाटायला लागली. तू परत गेल्यावर वाटलं मी तर ही किटली वापरणार नाही, पण ती तुला देऊन मला बरं वाटेल. म्हणून पॅक करून तुला पाठवून दिली. तेव्हा तर आपण प्रेमातही नव्हतो पडलो तरीही मला ती किटली फक्त तुलाच द्यावीशी वाटली." जवळ सरकून तिच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला.

ती त्याच्या छातीवर डोके टेकून वर त्याच्या डोळ्यात बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

क्रमशः

तुम मिले, दिल खिले बासरीवर इथे ऐकता येईल. मला हे फार आवडलं होतं.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle