ऐल पैल 12 - फ्रॉम 305 विथ....

सकाळी पावणे सात वाजता त्रिशाची अंघोळ उरकली. ऑफिससाठी कपाटातुन कुर्ता बाहेर काढत असताना तिला खालच्या कप्प्यात ठेवलेली कापडी पिशवी दिसली. सुमंत काकूंनी गिफ्ट दिलेलं पर्पल क्रोशे जॅकेट! आज याचं उदघाटन करावंच असं ठरवून तिने तिचा प्लेन ब्लॅक कॉटन कुर्ता बाहेर काढला. जॅकेट पिशवीतून काढून हातात घेऊन दोन्ही हात लांब करत उलटं सुलटं बघून घेतलं. ग्रेट जॉब काकू, मशीन ने विणल्यासारखं फाईन विणलंय हे! गळ्यापासून पोटापर्यंत आलेले लोकरीचे दोन धागे आणि त्यांना लावलेले पॉम पॉम तिला विशेष आवडले होते. ऑफिसातल्या मुली पाहून वेड्याच होतील आणि याची रिप्लिका दुकानात कुठेच मिळणार नाही म्हणुन अजून वेड्या होतील! आज संध्याकाळी घरी आलोत की मीनीला तिचं जॅकेट घालायला लावून एक सेल्फी काढू असं तिने मनाशी नोट केलं. तिने आवरलं, जॅकेट चढवलं. आरशात तिच्या बाऊन्सी स्टेप कट ला हातानेच शेवटचं सेट केलं. गळ्यात लाल आयडी अडकवून, मीनक्षीला दार लावून घ्यायला उठवण्यासाठी शेवटचं गदागदा हलवून तिने दार उघडलं.
"ओह, हाय" नकुलला त्याच्या दारात उभा पाहून काही सेकंद डोक्यात आलेल्या सगळ्या विचारांना घालवत ती म्हणाली. हे आता रोजचं दृश्य असणार आहे त्रिशा, गॅदर योरसेल्फ!
त्याने काहीच न बोलता फक्त हेल हिटलर सारखा हाय करून नेहमीची डॅझलिंग स्माईल दिली.
"सकाळी सकाळी असा भालदारा सारखा काय उभा आहेस दारात" त्रिशा मागे वळून दार ओढून घेत म्हणाली.
"दहा मिनिटे झाली उभा आहे, तुला कळायला पाहीजे ते"
सिरियसली, हा असं काही बोलल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच सुचत नाही. खरंच..हे तळ्यात मळ्यात कधी संपणार देव जाणे!
त्रिशा काहीच न बोलता त्याच्याकडे पाहतेय ते पाहून तोच म्हणाला.
"एवढ्या लांब दोऱ्या? काहीही काय फॅशन करता तुम्ही मुली?"
"काय? त्रिशा जागेवर येत तिच्या जॅकेट कडे पहात म्हणाली. "किती गोड आहे हे! उलट हेच जास्त आवडलंय मला" त्रिशा एक गोंडा हातात घेत म्हणाली.
"गोड? बस मध्ये जाताना अडकल्या ना त्या दोऱ्या कुठे तरी कळायचं नाही, धडपडशील! हे म्हणजे ओपन शू-लेस सारखं आहे! कम हिअर.." तिने काही प्रतिक्रिया देण्याच्या आत तो पुढे आला. लोंबणारे धागे हलक्या हाताने धरून ओढले. त्याबरोबर तीही अडखळत पुढे आली. दोघांच्या मध्ये फक्त त्याचे हात बसतील एवढंच अंतर राहीलं. पुन्हा आफ्टरशेव्ह! तिने डोळे मिटून घेतले. तो दोन्ही धागे हातात घेऊन शू-लेस बांधतात तशी बटरफ्लाय नॉट बांधायला लागला.
"प्च!" लांब धागे आणि गोंडयांच्या वजनामुळे त्याला बटरफ्लाय करताना अडचण येत होती. एकदा दोऱ्यांकडे एकदा त्रिशाच्या चेहऱ्याकडे बघत अखेर त्याने पॉम पॉम चे पाय असलेलं बटरफ्लाय बनवलं. तिच्या खांद्यावर आधीच नीट बसलेलं जॅकेट पुन्हा नीट करत तिच्या चेहऱ्याकडे बघत त्याच्या बेस असलेल्या आवाजात पुटपुटला.
"नाऊ, यु आर गुड टू गो"
त्रिशाच्या मागे घराच्या दाराच्या मागून कडीचा आवाज आला तशी ती मागे झाली.
तिने मान खाली करून त्या बटरफ्लाय कडे पाहीले.
"काये हे नकुल .." ती हसत म्हणाली.
"आता ते नीट झालंय, युसलेस फॅशन" नकुल मागे जात म्हणाला.
"ए, खास व्यक्तीने दिलेलं खास गिफ्ट आहे ते, काही म्हणायचं नाही त्याला" त्रिशा त्याच्याकडे बोट करत म्हणाली.
"कोण व्यक्ती? " भुवया गोळा करत त्याने विचारताच त्रिशाचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन बाहेर काढला.
"आईचा फोन! ओके नकुल, बाय आणि नो थँक्स फॉर धिस" त्रिशा बटरफ्लाय चे पाय हातात घेत म्हणाली. फोन रिसिव्ह करून जिना उतरू लागली.
आईशी बोलून झाल्यावर स्टॉप वर बस ची वाट पाहात असताना तिने सहज जवळ उभा असलेल्या कार च्या खिडकीच्या काचेत डोकावून पाहीलं. बटरफ्लाय ची गाठ सोडण्यासाठी त्याचा एक पाय धरला, हसून परत तसाच राहू दिला.
संध्याकाळी ऑफिसवरून येताना बस मध्ये बसल्या बसल्या तिच्या मनात तिच्या आणि नकुलच्या सध्याच्या फेज बद्दल विचार घोळत होते. नक्की आम्ही वेळ देतोय म्हणजे काय करतोयत? नकुल च्या मनात आपल्याबद्दल फिलिंग्ज आहेत हे तर स्पष्ट होतंय. उद्या तो अचानक आपण डेट वर जाऊ असं म्हणाला तर मीही तयार होईल. किसनंतर आम्ही दोघे ऑकवर्ड फेज मध्ये जायला हवे होतो पण तसंही नाही झालं, उलट आम्ही एकमेकांबाबत जास्त कम्फर्टेबल झालो आहोत. मग आता अजून थांबून असं काय साध्य होणार आहे? अजून किती दिवस असं काहीच नाव नसणारं नातं वागवत पुढे जायचं?
ट्राफिक नसल्यामुळे बस ने स्टेडी स्पीड पकडलेला होता. पाऊस ढगात दाटून राहिलेला होता पण पडण्याचं नाव घेत नव्हता, कानात बेथ हार्ट कोणा स्ट्रेंजर ला "योर हार्ट इज ऍज ब्लॅक ऍज नाईट" म्हणत होती. ते त्रिशाला अजून अस्वस्थ करत होतं, तरीही ती ऐकत राहीली.
त्रिशाचा साल्सा क्लास उरकल्यानंतर चालत ती बिल्डिंगजवळ पोहोचली. सहा जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर तिला तिथे बरेच नवीन आवाज आले. ती त्या आवाजांची चाहूल घेत पुढे आली तोच आशिषच्या घरातून एक पांढरे कपडे, सोनेरी चष्मा घातलेला घातलेला पुरुष आणि मोठमोठी फुलं असलेल्या शिफॉन च्या साडीचा उलटा पदर डोक्यावरून घेतलेली बाई असं जोडपं बाहेर पडलं. पाठोपाठ आशिष ही बाहेर आला.
"हाय त्रिशा"
"हाय" त्रिशा त्या सगळ्यांकडे पहात म्हणाली. एव्हाना नकुलही बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ एक मुलगी पायातल्यांचा आवाज करत बाहेर पडली. त्रिशाला एकदम आशिष च्या बहिणीचा, पायल चा नकुल ने केलेला उल्लेख आठवला. तिने नकुलकडे परत पाहीलं, तो रागात होता की वैतागला होता तिलाच कळलं नाही. त्रिशाकडे पाहील्यावर त्याने चेहरा सरळ ठेवत डोळ्यांनी ओळख दिली.
"हे माझे मम्मी, पप्पा. ही त्रिशा, समोरच्या फ्लॅट मध्ये राहते" आशिष म्हणाला. गौतम आणि साधना समदरिया. त्रिशाला नावं आठवली. तिने मान खाली वर हलवून स्माईल करत त्यांच्याकडे पाहीलं.
"आणि ही माझी बहीण पायल"
"हाय त्रिशा.." पायल हात वर करत हाय करत म्हणाली.
"हाय.."आशिष आणि तिचे डोळे सारखेच घारे आहेत, त्रिशाने नोटीस केलं. पायलला भेटण्याआधीच तिने काल मीनाक्षीकडे तिचं वर्णन केलं होतं. नकुल ला शोभणारी मुलगी!
त्रिशाची थोडीफार चौकशी केल्यानंतर ते लिफ्टकडे निघाले.
"नकुल, ये तू पण" गौतम समदरिया लिफ्ट च्या दारावर हात ठेवत म्हणाले.
"तुम्ही चला काका, मी येतो पायऱ्यांनी" म्हणून नकुल खाली उतरायला लागला.
त्रिशा मुद्दाम सावकाश तिचे सँडल्स काढत हे सगळं बघत होती.

त्रिशा घरात आल्यानंतर मीनाक्षीने तिचे जॅकेट पाहीले.
"ए तू आज उदघाटन केलंस?"
"येस, तू पण घाल,आपल्याला सेल्फी काढायचाय"
"ओके, आलेच, तू तोवर फ्रेश हो"
"येस" म्हणत त्रिशा आत निघून गेली.
त्रिशा फ्रेश होऊन आली, दोघी एका मागे एक उभा राहील्यावर मीनाक्षीने सेल्फी काढला. 'काकूंना दाखव' असं कॅप्शन टाकत मी दि त्रि ग्रुपवर टाकला.
त्रिशा पुन्हा कपडे बदलून, केस वर घेऊन क्लचर मध्ये अडकवून हुश्श करत खुर्चीत पसरून बसली. तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. काल संध्याकाळी शांत असलेला नकुल, आज सकाळचा फ्लर्टी नकुल आणि आताचा कपाळाला आठ्या पाडून उभा असलेला नकुल! काय चाललंय याच्या आयुष्यात? हा दरवेळी मनात बऱ्याच गोष्टी लपवुन ठेवल्यासारखा का वाटतो?
त्रिशा, कदाचित तुलाच त्याचं अति निरीक्षण करायची सवय लागल्येय. त्याच्या आयुष्यातली प्रत्येक मिनिटांची प्रत्येक गोष्ट तुला कळलीच पाहीजे हे तुझं ऑब्सेशन निव्वळ रिडीक्युलस आहे. सध्या फक्त त्याच्या तुझ्याशी संबंधित गोष्टींवर फोकस कर, बाकी हळुहळु कळेलच. गिव्हन ऑल धिस, संध्याकाळी बस मध्ये ती त्यांच्या रिलेशन ने स्पीड धरला पाहीजे असा विचार करत होती, त्याला आता बाद ठरवून तिने तो बाजूला टाकला. मोबाईलचं नेट ऑन केल्या केल्या तिला तिच्या स्वे ग्रुपवर संध्याकाळी त्यांच्या ट्रेनर ने साल्सा मुव्ह्ज रेफर करण्यासाठी काही व्हिडीओज च्या लिंक्स पाठवल्या होत्या, त्यातली एक उघडून एक हात हनुवटीखाली ठेवत लक्षपूर्वक तो व्हिडीओ बघण्यात गुंग झाली.
मीनाक्षी आतून येऊन टीव्ही समोर जाऊन बसली. सेट मॅक्स वर बाहुबली एकचा शेवटचा काही भाग शिल्लक होता ते बघत बसली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. तो आवाज येता क्षणी त्रिशा व्हिडीओतुन बाहेर आली आणि ताडकन खुर्चीवरून उठून "मी बघते" म्हणत दाराकडे जाऊ लागली. मुव्हीत एकाग्र झालेली मीनाक्षी जोरात दचकली. आपल्या दारावर नॉक कोण करतं हे एव्हाना दोघींना चांगलं माहीत झालं होतं.
"प्रकाशाचा वेग, लोकहो, प्रकाशाचा वेग स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलाय मी आत्ता" मीनाक्षी मान हलवत त्रिशाकडे बघत म्हणाली.
दाराकडे चाललेल्या त्रिशाने पुन्हा मागे येऊन जोरात मीनाक्षीचे गाल ओढले. मीनाक्षी ओरडली तेव्हाच सोडले आणि पुन्हा दाराकडे गेली. दार उघडल्या उघडल्या,
" काय म्हणत होतीस तू सकाळी, स्पेशल गिफ्ट, खास व्यक्ती? कोण नक्की?" नकुलने एक हात दाराजवळच्या भिंतीवर ठेवत विचारलं.
त्रिशा काही सेकंद ब्लॅंक होऊन त्याच्याकडे बघत राहीली.
"थांब, कसलं गिफ्ट?" मग तिची ट्यूब पेटली. "ओह, ते जॅकेट, ते काकूंनी, सुमंत काकूंनी दिलंय, ते निघून जात होते त्या दिवशी."
"काकूंनी दिलं होतं... त्याचवेळेस सांगितलं असतं तर! दिवसभर त्या अनोळखी व्यक्तीला मनातल्या मनात शिव्या घातल्या मी"
"काय..?" म्हणत त्रिशा संपूर्ण तिसऱ्या मजल्याला ऐकू जाईल असं हसायला लागली. नकुल ला अजूनच राग आला.
"व्हॉट डिड आय मिस, व्हॉट डिड आय मिस.."म्हणत मीनाक्षी आतून पळत बाहेर आली.
" सांगते.. सांगते मी तुला मीने थोड्या वेळात" त्रिशा हसू आवरत म्हणाली. नकुल रागातच दोघींकडे आलटून पालटून पहात होता.
मीनाक्षी आत निघून गेली तशी त्रिशा म्हणाली.
" एवढं करण्यापेक्षा मला एक कॉल करायचा होता.., ओहह..., आपल्याकडे एकमेकांचे नंबर नाहीयेत नाही का अजून! "
नकुल अजूनही रागातच बघत होता.
"नकुल तू इन डिरेक्टली आमच्या काकूंना शिव्या दिल्यास?"
"तू अर्धवट बोलणं टाकून निघून गेलीस.."
त्रिशा त्याला बघून परत हसायला लागली. आता नकुल ने पुढे होऊन, तिचे खांदे धरून तिला वळवलं आणि हलकेच घरात लोटून दिलं, मागून त्यांचं दार ओढून घेतलं. आतून नकुलला त्रिशाचा हसण्याचा आवाज येतच होता. आणखीन काही मिनिटांनी दोघींचे हसण्याचे आवाज त्याला त्याच्या हॉल मध्ये ऐकू आले.
दहा मिनिटांनी त्याने पाहीलं तर त्याच्या दाराच्या फटीतून आत एक कागद आलेला होता. तो रिमोट खाली ठेऊन सोफ्यावरून उठून दारापाशी गेला. कागद उचलून पाहीला,त्यावर एक नंबर लिहिलेला होता. त्याने स्वतःशीच स्माईल केलं. मागे शाईच्या खुणा दिसल्या म्हणून कागद त्याने उलटून पाहीला.
"फ्रॉम 305 विथ ????" लिहिलेलं होतं.
परत एक स्माईल करत कागद घेऊन तो सोफ्यावर जाऊन बसला.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle