"किचन इमर्जन्सी.." त्रिशाने दार उघडल्या उघडल्या नकुल म्हणाला.
"काय झालं?"
"बटाटेवडे, काहीतरी फसलंय...चल तू आधी, दाखवतो"
नकुलच्या मागोमाग त्रिशा त्यांच्या स्वयंपाकघरात गेली.
"बघ"
त्रिशाने पाहीलं तर कढईतल्या तेलात बटाटेवडे उकलून आतली भाजी तेलात पसरली होती. कढईच्या तळाशी जळालेल्या भाजीचे काळे कण साठले होते. एका डिशमध्ये काळपट, तेल पिऊन मंद झालेले दोन-तीन बटाटेवडे अर्धवट तळून बाहेर काढलेले दिसत होते.
"काय करून ठेवलंएस हे नकुल"? त्रिशा तो सगळा पसारा बघत म्हणाली.
"माहीत नाही, रेसिपीनुसारच तर केलं सगळं, पण समहाऊ हे नीट तळले जात नाहीयेत"
"तू आयटीवाला आहेस ना? युनिट टेस्टिंग नावाचा प्रकार ऐकला असशीलंच.. आधी फक्त एक वडा टाकून पाहीलं असतं तर?" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
"ऑफकोर्स, मी नेहमी तळतो आणि परफेक्ट तळतो, हा वड्यातच काय लोच्या झाला कळत नाहीये"
"बघू दे मला, तोवर हे तेल गाळून ठेव तू"
त्रिशा एखाद्या कडक शिक्षकासारखी त्याला सूचना देताना पाहून त्याला हसू येत होतं. तो गुपचूप त्याला सांगितलेलं काम करायला लागला. त्रिशा त्याच्या मागून जाऊन सिंक मध्ये हात धुवून आली.
"ओके, तुझा बॅटर तर व्यवस्थित आहे" ती बॅटर हाताने चेक करत म्हणाली. मग भाजीकडे वळली. त्याने आधीच बरेच गोळे करून ठेवले होते, त्यातला एक हातात घेऊन तिने टॉस केला.
"इथे घोटाळा आहे.." युरेका! नकुल त्याचं काम करत करत ऐकू लागला.
"बटाटे जास्त उकडले गेलेत, त्यामुळे तेलात टाकले की फुटताहेत."
"आता?" नकुल ते ऐकून हाताची घडी घालून तिच्या शेजारी ओट्याला रेलून उभा रहात म्हणाला.
"काही नाही, हे बॅटर अजून घट्ट करू, पिठाचा डबा आण"
नकुलने फॉलो केलं. त्रिशाने बॅटरमध्ये थोडं पीठ मिसळून ते घट्ट केलं. चव वर खाली झाली असेल म्हणून मिठापासून बाकी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या पुन्हा घातल्या. गाळून स्वच्छ झालेल्या तेलाची कढई पुन्हा गॅसवर ठेवली. एकदोनदा बॅटर चेक करून झाल्यावर तिने भाजीचा गोळा त्यात बुडवून तेलात सोडला. यावेळी वड्याने तग धरला.
"ब्रिलीयंट त्रिशा उपाध्ये!" नकुल आवाज नसलेल्या टाळ्या वाजवत म्हणाला. "मला वाटलं होतं आता पोळ्या आणून पोळी भाजी खावी लागतेय"
"पोळ्या येत नाहीत म्हणजे"
"नोप, मी फक्त असे चमचमीत पदार्थ करतो" नकुल कढईत डोकावत म्हणाला.
"आईची ट्रिक बाय दे वे!" त्रिशा वडा खाली वर करत म्हणाली. "आम्ही असे घोटाळे केले की अशा ट्रिका तिच्या पोतडीतुन बाहेर येतात." त्रिशा तो वडा खाली काढून झाऱ्या त्याच्या हातात देत म्हणाली "आणि आता यु ओव मी समथींग!"
"काय? फक्त पीठ मिसळण्यावरून? आठाणे देतो!"
नकुल चेहरा सरळ ठेवून पुढे कंटीन्यू करत म्हणाला.
"झालं माझं काम, जा आता घरी"
त्रिशा भुवया उंचावून त्याच्याकडं पहात उभी राहीली.
"ठीक आहे! माझा वडा घेऊन जाते" तिने तळलेला वडा उचलून ती तिथून बाहेर पडली.
"दार लावून जा", आतून आवाज आला. लावून घेण्यासाठी धरलेलं हँडल उलटं लोटून दार सताड उघडं टाकत ती तिच्या घरात गेली.
अर्ध्या तासाने पुन्हा दार वाजलं. त्रिशाने उघडलं तर बाहेर नकुल हातात तीन वडापाव, तळलेल्या मिरच्या, चटणी असलेली डिश घेऊन उभा होता.
"माझं पोट दुखलं असतं.." म्हणत डिश तिच्याकडे देऊन निघून गेला. वडापाव बरोबर एक घडी केलेला कागद तिला दिसला. तिने उघडून पाहिला.
"त्या दिवशी तू मसाला पाव खाल्ला नव्हतास् म्हणून एक एक्स्ट्रा!"
समोर दाराकडे पहात स्माईल करून त्रिशाने दार लावून घेतलं.
जेवण उरकून रात्री नेहमीप्रमाणे त्रिशा बाहेर पडली. नकुलला कॉल करून बोलावण्याचा विचार तिच्या मनात आला पण परत कदाचित भेटेल खालीच म्हणत पुन्हा काढून टाकला. ती पायऱ्या उतरून बिल्डिंग बाहेर पडली तोच नकुल कोणा मुलीशी बोलत असताना तिला दिसला. तिने अजून थोडंसं पुढे जाऊन पाहिलं. ती पायल होती. गोल मोठ्या गळ्याचा व्हाइट शॉर्ट कुर्ता, व्हाइट पटियाला आणि वर गडद लाल लहरिया डिझाइनच्या ओढणीत गोड दिसत होती. अशा ड्रेसवर मस्ट असतात असे मोठे सिल्व्हर झुमकेही कानांत होते. त्यांना उगीचच बघून न बघितल्यासारखं करत ती त्यांच्या शेजारून जाऊ लागली. पण नकुल आणि पायल दोघांनीही पाहिलंच.
"हाय त्रिशा", नकुल तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत म्हणाला.
"हाय! ओह, हाय पायल!" तिने पायलला पाहिलंच नव्हतं, असं दाखवत म्हणाली.
"हाय" ती हात पुढे करत म्हणाली."तुला नाव लक्षात राहिलं माझं!"
त्रिशा हात मिळवत नुसतीच हसली.
"बरं झालं तू आलीस ते, हा मुलगा प्रचंड बोअर आहे" नकुलच्या खांद्यावर एक गुद्दा मारत म्हणाली. "नकुल, आता हिला घेऊन जाऊया आपण आपल्याबरोबर कॉफी प्यायला, तेवढंच मला बोलायला कंपनी होईल."
"पायल, तिला काम असेल, आपण जाऊ, चल..." नकुल पायलच्या हाताला निसटता स्पर्श करत म्हणाला.
"मी तिला विचारतेय नकुल, तू का उत्तर देतोयस? त्रिशा, काय म्हणतेस? चल आमच्याबरोबर, तेवढीच आपली अजून चांगली ओळख होईल."
त्रिशा आलटून पालटून दोघांकडे बघत होती.
"पायल..."
नकुल पुढे बोलणार तेवढ्यात त्रिशा म्हणाली.
"ओके, येते"
"कूल" पायल उत्साहात म्हणाली.
त्रिशाने नकुलकडे पाहिलं, त्याला आवडलेलं नाहीये हे तिच्या लक्षात येत होतं. तिघे सोसायटीच्या गेटच्या दिशेने निघाले. पायल चालता चालता मध्येच हॉस्पिटलमधली कुठलीतरी गंमत सांगायला लागली. ते ऐकून त्रिशाने मध्येच विचारलं.
"तू डॉक्टर आहेस?"
"हो. सॉरी, आपण आजच भेटलो ना तशा, मी माझ्याच नादात सांगत बसले"
"ग्रेट" त्रिशा म्हणाली.
"आणि तू काय करतेस?" पायलने विचारलं.
"स्टॅटिस्टिशियन"
"ओह वॉव, मॅथस् वगैरे, बाकी मेडिकलवाल्यांसारखा माझाही ऑप्शनलाच होता"
नकुल शांतच आहे, हे त्रिशाने नोटीस केलं.
असेच रँडम बोलत तिघे चालत होते. जास्त करून त्रिशा आणि पायल दोघीच बोलत होत्या, त्यातही पायल. चालताना सलग तिच्या पायांतल्यांच्या घुंगरांचा आवाज होतच होता. ती नकुलला काहीतरी उद्देशून सांगत असताना तो केवळ "हम्म" मध्ये प्रतिक्रिया देत होता.
"बघितलंस? बोअर आणि रुड!" त्रिशाकडे बघून असं म्हणत असताना तिने हाताने नकुलच्या दंडाभोवती वेढा घातला. नकुल जरासा गोंधळला. त्रिशा ते दोन्ही बघून सरळ बघत चालू लागली.
चालत चालत तिघे सोसायटी बाहेर आले. तिथल्याच एका लहानशा कॅफेत शिरले. नकुल कॉफी सांगायला जाणार तोच
"तू थांब इथं, ही कॉफी माझ्याकडून" म्हणत पायल काउंटर जवळ गेली पण. नकुल आणि त्रिशा रिकामा टेबल बघून समोरासमोर बसले. नकुल आधीच अवघडल्यासारखा झाला होता आता त्याला एकदम तोफेच्या तोंडासमोर बसल्याचं फिलिंग आलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, तोवर पायल फिल्टर कॉफीची ऑर्डर सांगून आली.
कॉफी घेत त्रिशा आणि पायल बोलत होत्या. पायल मधूनच बोलताना नकुलला हात लावत होती. त्रिशा ते नोटीस करत होती आणि नकुल अधूनमधून त्रिशाकडे नजर टाकत होता. नकुलने जेवढ्यास तेवढं बोलणं चालू ठेवलं होतं. कसेबसे पंधरा एक मिनिटे गेली.
"नकुल, माझं ठीक आहे, ती तुझी शेजारी आहे तिच्यासमोर तरी नीट वाग"
त्रिशाने नकुलकडं पाहिलं.
"पण त्याच्या या वागण्यावर जाऊ नकोस, तो खूप गोड आहे. आणि हुशार, आणि मेहनती, बघून वाटत नसेल, तरीही" पायल त्याच्याकडे कौतुकाने बघत म्हणाली.
नकुलला आता तिथे बसणं अशक्य झालं. तो घडाळ्यात बघत पायलला म्हणाला.
"पायल, काका काकू तुझी वाट बघत असशील, उशीर झालाय"
"हम्म ओके, ठिकेय निघते मी आता"
तिघे कॅफेतुन बाहेर पडले.
"ओके त्रिशा, नाईस टू मिट यु. पुन्हा आले इकडं की नक्की भेटून जाईन, बाय."
"नक्की आणि कॉफीबद्दल थँक्स! नीट जा घरी" त्रिशा तिला म्हणाली.
"येस! नकुल, सी यु सून" असं म्हणत तिने तिथेच त्याला मिठी मारली. नकुलने वरवर तिच्या पाठीवर थोपटत ती परत केली. पायल पुढे गेली तसा नकुल त्रिशाला म्हणाला,
"मी तिला रिक्षात बसवून येतो, तोपर्यंत इथेच थांब, बरोबर जाऊ आपण"
नकुल दोन मोठी पावलं टाकत मग पायलच्या बरोबरीने चालायला लागला.
क्रमशः