ऐल पैल 14 - सेफ्टी पिन

दहा मिनिटे होत आली होती. त्रिशा कॅफेसमोर रस्त्यावरच्या रहदारीचं निरीक्षण करत उभी असताना असताना समोरून नकुल परत येताना दिसला. कुठल्याशा पांढरट की तसाच नक्की शेड सांगता येणार नाही अशा अगदी साध्या, डल राउंड नेक टी शर्टमध्ये आणि ग्रे जीन्समध्ये तो प्रचंड हॅन्डसम दिसत होता. त्याच्या क्रू कटमुळे तर हा एखादा फुटबॉल प्लेअर वगैरे म्हणून नक्कीच शोभला असता, त्रिशाला वाटलं. या मुलाच्या आयुष्यात पूर्वी किती मुली येऊन गेल्या असतील, कमीत कमी प्रपोजल्स तरी, याला माहीत नाही अशा मुलींचा क्रश तर जरूर असेल हा! आज अचानक पायल येऊन गेल्यानंतर हा आपल्याला जास्त हँडसम वाटायला लागलाय, असं त्रिशाला वाटलं. एव्हाना नकुल जवळ आलेला होता.
"सॉरी, रिक्षाच मिळत नव्हती, त्यात जवळ कुठं जायचं म्हणलं की ही माणसं अजून कटकट करतात." दोघं चालायला लागली.
"आज अचानक पायल कशी आली?" त्रिशाने थेट मुद्द्याला हात घातला.
"अचानक नाही, येते ती अशी महिन्या दीड महिन्यातून एकदा. ती ज्या हॉस्पिटलमध्ये आहे ते जरा शहराबाहेर आहे, त्यामुळे ती राहते पण तिकडंच."
त्रिशा ऐकत होती.
"इथून जवळ तिची एक मावशी राहते. आशिषचे आई-बाबा, आशिष कालपासून त्यांच्याकडंच आहेत. आज त्यांची कसली पूजा होती म्हणून ही पण सुट्टी घेऊन आली होती, प्लस त्या सगळ्यांना त्यांचा म्हणजे आम्ही राहतो तो फ्लॅटही पहायचा होता. त्यामुळे सगळे काल आमच्याकडे आले होते."
"तिला आवडतोस तू." त्रिशा नकुलकडं पहात म्हणाली.
"माहितीये."
"फक्त आवडतो नाही, मला वाटतं त्याहून जास्त.."
"तेही माहितीये.. तेही आज नाही, आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच, मेबी त्याच्याही आधीपासून."
"मग"?
"काय मग?"
"तुला माहितीये काय मग, उगीच वेड पांघरु नकोस." त्रिशा शांततेत म्हणाली.
नकुल मोठा श्वास घेऊन सोडत म्हणाला.
"आशिष जसा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, तशीच ती ही आहे. पायल चांगली मुलगी आहे, मलाही आवडते, पण मैत्रीण म्हणून, दॅटस् ऑल."
"हे तिला माहित आहे?"
"हा काय प्रश्न आहे? तिने दरवेळी तिच्या फिलिंग्ज दाखवल्या तर मी सांगत बसू का, नो, यु आर जस्ट फ्रेंड म्हणून? हे तिला कळत नसेल असं नाहीचेय पण समहाऊ तिला अजूनही माझ्याकडून होप्स असाव्यात. आणि ती दर भेटीत मला प्रपोज करत नाही की मी ते रिजेक्ट करायला आणि विषय संपायला. खरं म्हणजे तिने अजून ऑफिशियली प्रपोज केलंच नाहीये मला" नकुल वैतागला होता. पायल आणि त्रिशाची अशी भेट होणं त्याला आत्तातरी नको होतं.
"एवढं चिडायला काय झालं? मला जे वाटलं ते विचारलं फक्त"
नकुल काही सेकंद थांबून शांत होत म्हणाला.
"तिच्या घरच्यांसमोर तिला माझ्याशी जरा फॉर्मल वागावं लागतं, म्हणून कधीतरी एकटी येऊन भेटून जाते."
"हम्म"
एव्हाना ते त्यांच्या बिल्डिंगपाशी आले होते.
त्रिशाचं अजूनही समाधान झालं नाहीये असं वाटून तो तिच्याकडे बघत म्हणाला.
"हे सगळं तिच्याकडून आहे, मी आजवर माझ्याकडून कधीही तिला एनकरेज केलेलं नाही. मी, पायल, आशिष आमचे संबंध फार जुने आहेत, शाळेपासूनचे, त्यामुळे तिला कायमचं दूरही करता येत नाही. तिला सतत असं इग्नोर करणं मला आवडत नाही. आय होप एक दिवस तीच ट्राय करायचं सोडून देईल. मुळात तिची आणि माझी भेटच कधीतरी होते, त्यामुळे त्याच्यावर फार विचार करावा असं मला कधीच वाटत नाही."
नकुलने हे सगळं संगितल्यावर त्रिशाला आता अजून पायल हा विषय नको होता. दुसरं काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली, "या विकेंडला मी घरी जाऊन येण्याचा विचार करतेय."
ती अचानक विषय बदलेल तेही हे सांगायला, असं त्याला वाटलं नव्हतं.
"ओह..चांगलंय", काहीतरी म्हणायचं म्हणून तो म्हणाला.
"वर जाऊयात", त्रिशा म्हणाली.
कोणीही काहीच न बोलता दोघे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. त्रिशाचं बिनसलंय हे त्याला कळत होतं.
ती दार उघडून तिच्या घरात जाणार तोच नकुल न राहवून तिला म्हणाला, "त्रिशा"
त्याचा आवाज येताच तिने मागे बघितलं.
"हे जे काही घडलं त्यामुळे तू चिडलीएस का.?"
बिल्डींगच्या खाली पायल भेटल्यापासून ते नकुलने सगळी कथा सांगेपर्यंत तिने जो 'प्लेयिंग इट कूल'चा आव आणला होता, तो या प्रश्नामुळे एकदम गळून पडला.
"ओह अजिबात नाही मि. नकुल ठाकूर, आपल्यात असं काहीच नाहीये ज्याच्या बेसिस वर दुसऱ्या मुलीला तुझ्यात इंटरेस्ट आहे हे पाहून मला राग येईल. पण मानलं पाहिजे, तुझ्यात कॉन्फिडन्स प्रचंड आहे."
ती एकदम चिडलेली पाहून तो चमकला. तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
"मला असं म्हणायचं नव्हतं.. "
तिला राग येण्याचं कारण सर्वस्वी पायलच होती, हे तिला मनातून माहित होतं. त्याचाही तिला राग आला होता.
"मग कसं? " त्रिशा त्याच्याकडे पहात म्हणाली.
चुकीचा प्रश्न होता नकुल! तो स्वतःशीच म्हणाला.
आता त्यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाहीये हे त्याला समजलं होतं. तो गप्प बसला.
तो काहीच बोलत नाहीये हे पाहून त्रिशा जरा वितळली. पण आता तसं दाखवायचंही नाही असं ठरवून ती मागे वळत सरळ घरात निघून गेली.

त्रिशा त्याला जे काही म्हणाली त्यात मात्र तथ्य आहे हे नकुलला कळत होतं. त्यालाही आता या अधांतरी नात्याचा कंटाळा आला होता. पायल विषय अजून पूर्ण संपलेला नव्हता, त्याचा पुढे या दोघांवर त्याचा कसा परिणाम होईल याची त्याला अजिबात खात्री नव्हती, त्यामुळे होता होईल तितका तो वेळकाढूपणा करत होता. त्यापेक्षा तो ते सांगण्यासाठी शब्द गोळा करत होता.
रात्रीचे दीड दोन झाले. त्याने वेब सिरीज कंटीन्यू करण्याचा प्रयत्न केला, गेम खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचं कशातच मन लागेना, झोपही येत नव्हती. त्याने त्याचा मोबाईल उघडला, त्रिशाला पाठवण्यासाठी 'हाय' असा मेसेज टाईप केला, पुन्हा खोडला, 'आर यु देअर?' असं टाईप केलं पुन्हा खोडलं. शेवटी विचार करून त्याने तिला एक ब्लॅंक मेसेज पाठवला. पुढच्या अर्ध्या मिनिटात त्याला त्रिशाकडून ब्लॅंक रिप्लाय आला. त्याला एकदम हुश्श झालं, डोक्यावरचं ओझं बरंचसं उतरलं. मोबाईल ठेऊन तो डोळे मिटून पडला. पुढच्या काही सेकंदात त्याची मेसेज टोन पुन्हा वाजली, त्याने उघडला तर पुन्हा ब्लॅंक मेसेज! त्याने हसून 'इनफ!' असा रिप्लाय केला. इकडे त्रिशाला तो मेसेज त्याच्या आवाजात ऐकू आला. कॉनवरसेशनची एक सायकल पूर्ण झाली म्हणून तिला बरं वाटलं.

"बाय मीने.."
"बाय.."
मीनाक्षी आणि ओमचा आज सकाळीच टेकडीवर फिरायला जाणे आणि मग ब्रेकफास्ट असा कार्यक्रम ठरला होता. सकाळी साडे सहालाच ती बाहेर पडली.
त्रिशा ऑफिसला निघण्याच्या तयारीला लागली. तिच्या ऑफिसचा आज वर्धापन दिन असल्यामुळे आदल्या दिवशीच त्यांना ट्रॅडिशनल ड्रेसकोड देऊन ठेवलेला होता. सगळ्या मुलींनी सिल्कच्या साड्या नेसायचं ठरवलं होतं. त्रिशाकडची मस्टर्ड कलर आणि त्यावर गोल्डन सिल्क थ्रेडचं भरगच्च काम असलेली साडी तिने बाहेर काढून ठेवली. केसांचं विशेष काही करण्यासारखं नव्हतंच, ते मोकळेच ठेवले. वेळ घेत चापून चोपून साडी नेसली. पदराच्या घड्या घालून खांद्यावर टाकला. फॉलिंग पदर तिला अनकम्फर्टेबल वाटायचा, त्यात बसमध्ये चढणं उतरणं, ऑफिसमध्ये दिवसभर काम म्हणल्यावर आपला गुड ओल्ड, सुटसुटीत पूर्ण पिनअपच केलेला बरा असा विचार करत तिने सेफ्टी पिन लावायला घेतली. दोनदा तीनदा प्रयत्न केला, तिन्ही वेळा पिना वाकड्या झाल्या. आधीच साडीचा पोत जाडसर, त्यात पदराच्या एकावर एक घड्यांमुळे पिन आत शिरतच नव्हती. तेवढ्यात कचरा गोळा करणाऱ्या मावशींनी बेल वाजवून आवाज दिला.
"ओह, आज डस्ट बिन बाहेर ठेवलीच नाही गडबडीत.." म्हणत ती बिन घेऊन बाहेर गेली. मावशी तोवर दुसऱ्यांच्या घरापुढे थांबून आवाज देत होत्या. तिने बिन ठेवली आणि आत येणार तोच समोरून नकुल बाहेर आला. तिला वरपासून खालपर्यंत बघत म्हणाला.
"वोह, मिस लग्नाळू कॉम्पिटिशन दिसतेय आज!"
"राखून ठेव तुझं सगळं, आता मी प्रचंड घाईत आहे."
तिने असं एकदम शस्त्र टाकून दिलेलं त्याला काही पचलं नाही.
"कसली गडबड आहे एवढी?"
"दिसतंय ना? ऑफिसला जाण्यासाठी आवरतेय"
म्हणत तिने दार लावून घेतलं.
घड्याळ पुढे सरकत होतं, तिला तिचा पीक अप गाठायचा असेल तर अजून पंधरा वीस मिनिटांत निघणं गरजेचं होतं. पीनेचं काही जमेना.
"मिनी नेमकी गरजेच्या वेळेला नसते." वैतागून ती स्वतःशीच म्हणाली
साडी रद्द करून आता कुठलातरी पंजाबी सूट किंवा अनारकली घालायचा विचार तिच्या डोक्यात येत होता. ती आत गेली, कपाटात ड्रेस शोधू लागली तशी तिला नकुलची आठवण झाली. त्याला विचारावं का? काय हरकत आहे, पिन तर लावायचीये! हो-नाही करत तिने त्याला कॉल केला.
"काय झालं?" तिचा कॉल पाहून त्याला उगीचच शंका आली.
"काही नाही, मला जरा मदत हवीये."
"ओके.."
आपण त्याला सांगायला नको होतं, असं तिला वाटायला लागलं. तोवर दारावर नॉक झालंच. तिने बाहेर येऊन दार उघडलं.
"हे बघ, नेमकी मिनी नाहीये आणि मला आता घाई आहे म्हणून तुला बोलावलं."
"रिलॅक्स.. काय काम आहे."?
त्रिशा चौथी पिन हातात घेत म्हणाली,
"ही पिन पदराला लावता येत नाहीये."
नकुलला हे काम अजिबातच अपेक्षित नव्हतं.
"तुला कमीतकमी आयडिया आहे का कसं लावतात?" त्रिशाने विचारलं.
"नाही.." तो मान डोलवत म्हणाला.
"मग जाउ दे, जा तू" त्रिशा वैतागत म्हणाली.
"थांब जरा, वैतागण्यापेक्षा ती एनर्जी मला एक्स्प्लेन करायला वापर, ते काय रॉकेट सायन्स नाहीये"
त्याच्याकडं बघत तिने जरा विचार केला. पटकन जाऊन तिने आतून रुमाल आणला.
"हे बघ"
म्हणत तिने रुमालावर पीनेचा डेमो दिला.
"कळलं?"
"अर्थात! सोपं आहे"
"थांब मग इथेच"
ती पटकन आत गेली, पुन्हा पदर लावून घेतला आणि त्याला हाक मारली. तो आत आला तेव्हा ती आरशासमोर उभी होती. तो तिच्या मागून येऊन उभा राहीला.
"कुठे लावायचीये?"
तिने आरशात बघत त्याला जागा दाखवून खांद्यावरचे केस एका बाजूला घेतले.
भुवया गोळा करत,एखादं किचकट टास्क दिल्यासारखं तो पिन घेऊन लावायला लागला. त्याच्या बोटांचा तिच्या खांद्याला स्पर्श झाला तसं तिने अंग चोरून घेतलं. तिच्या एकदम तशा रिऍक्शनमुळे त्याची तंद्री मोडली. त्याने आरशातच तिच्याकडं डोळे वटारून पाहिलं.
त्याने पुन्हा सुरुवात केली, ती परत जराशी हलली.
"स्टँड.. स्टील! बोचकारत नाहीये मी तुला.." एकतर जरा अवघडल्यासारखं झालं होतं.
तो बोलला तसं ती श्वास घेऊन सावधान अवस्थेत उभा राहीली. त्याने बॉम्ब डिफ्यूज करतानाच्या आवेशात पुन्हा सुरुवात केली. आरशात आता त्याच्या चेहऱ्याकडं बघून त्रिशाला हसू येत होतं. पिन त्यालाही साथ देत नव्हती, तरी त्याने हलक्या हाताने एकेक घडीतून पिन पास करत अखेर काम फत्ते केलं. लावून झालं की आरशात बघून ते चेक करत म्हणाला,
"झालं बरोबर"?
"परफेक्ट" ती त्याच्याकडे वळाली. "थँक्स"
त्याने हसून फक्त मान खालीवर हलवली.
"बाय द वे, ऍम ग्लॅड..! तुला माझी आठवण झाली"
ती यावर काही म्हणणार त्याआधी तोच म्हणाला.
"आपल्यात काहीही होवो, तुला कधीही, कसलीही मदत लागली तर तू असंच आधी माझ्याकडे यावंस अशी माझी इच्छा आहे.."
हा असं का म्हणाला, असं त्रिशाला वाटलं. पण तिची निघण्याची वेळ झाली होती, तात्पुरता तिने तो विचार बाजूला टाकला.
"असं म्हणतोस? मग आजच्या दिवस मला स्टॉपपर्यंत ड्रॉप कर, नाहीतर माझी बस जाईल." ती हसत म्हणाली.
"मी फक्त म्हणालो काय, तुझ्या डिमांडच चालू झाल्या!" तो नकुल मोडमध्ये येत म्हणाला. "ओह, पण हे करण्यापेक्षा" त्याने पिनेकडं बोट दाखवलं " मी तुला दहा वेळा पिक अँड ड्रॉप करेन. घाम फुटला मला तर.." तो डोळा मारत म्हणाला.
"आवरा.. निघू आता" त्याला बाजूला करत ती तिथून बाहेर पडली.

त्यांच्या बाईकचा आणि बसचा लँड होण्याचा टाईम एकच झाला. ती उतरून त्याला बाय करून बसमध्ये चढायला लागली.
"धडपडू नको कुठं" तो मागून मोठ्याने म्हणाला. ते ऐकत ती हसत हसतच वर चढली. बसमध्ये चढून खिडकीतून तिने त्याला परत एकदा बाय केलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle