घरी जाऊन आईला, बहिणीला भेटून त्रिशाला रिचार्ज झाल्यासारखं वाटलं. दरवेळी ती गावी आली की नोकरी सोडून देऊन लहानपणी असायचो तसंच इथं कायमचं रहावं असं तिला वाटत असे. यावेळीही तसंच वाटलं. तिची खोली, घराच्या लहानशा बागेतला झोपाळा, फुलझाडं, लहानपणापासून पहात आलेली कपाटं-डबे-भांडी-खिडकीतून दिसणारं तेच दृश्य, डोकं टेकवायला आईची मांडी, ताईगिरी दाखवण्यासाठी बहीण, जुने शेजारी.. आपली जागा! हल्ली काही वर्षांपासून घरी आली की तिला बाबांची कमी जाणवत असे. यावेळीही झालीच पण नकुल म्हणाला तसं " बरोबर घेऊन जगायचं" चा प्रयोग करून बघण्याचा ती प्रयत्न करत होती.
दुसऱ्या दिवशीची रात्रीची जेवणं उरकली. त्या तिघी बाहेर अंगणात येऊन बसल्या. त्रिशा झोपाळ्यावर उशी ठेऊन, पडून गुढगे मुडपून घेत आकाशातल्या ढग आल्यामुळे अंधुक झालेल्या चांदण्या बघत पडली होती. आई, शलाका खुर्चीत बसल्या होत्या, शलाका मोबाईलवर मैत्रिणींशी चॅट करत होती.
मूड चांगला दिसतोय बघून आईने विषय काढला.
"त्रिशा"
"हम्म"
""बाबांच्या बरोबर असायचे ते करपे माहीत आहेत ना तुला?"
"हो, त्यांचं काय?"
"त्यांचा मुलगा सुमित, पुण्यातच असतो."
"हो माहितेय ना, CA, तोच ना"?
"तोच, ते त्याच्यासाठी विचारत होते तुला, म्हणजे थेट नाही म्हणाले पण मला विचारलं, तुम्ही स्थळ बघताहेत का म्हणून वगैरे? म्हणलं नाही अजून तरी" आई तिच्या कलानं घेत होती.
शलाका ते ऐकून मोबाईल मध्ये बघतच फिस्कन हसली. त्रिशाने तिच्याकडं मान वळवून पाहीलं, पुन्हा सरळ झाली.
"हम्म. बरं झालं तसं सांगितलंस ते" घरी आल्यापासून आता पहिल्यांदा तिला नकुलची आठवण झाली. काल आल्यापासून आपण त्याला एक मेसेजही केला नाहीये!
"पण बघायला काही हरकत नाही असं मला वाटतं"
"आई.. एवढ्यातच नाही हा, बघू नंतर" त्रिशा झोपाळ्यावर उठून बसली." "एक दिवस झाला मला येऊन आणि कटवायच्या गोष्टी काय करते गं?" त्रिशा वैतागत म्हणाली.
" बरं, बंद विषय" आई असं म्हणताच तिने पडून घेतलं.
मोबाईल उघडून पडल्या पडल्याच त्रिशाने नकुलला एक ब्लॅंक मेसेज केला.
त्याचा रिप्लाय आला.
"अच्छा आहेस होय, मला वाटलं गेली बिलीस की काय.."
"नोट मध्ये तुझं नाव ठेऊन जाईन, काळजी नको" तिने हसत हसत पुन्हा मेसेज केला.
शलाका मोबाईल मधूनच डोकं वर काढत तिरक्या नजरेने बघत होती.
"ओके, कोणतं कारण तयार आहे मग कालपासून एक ही मेसेज न करण्याचं" नकुल.
"तू करायचा ना मग एवढं होतं तर... "
"मी तुला टेस्ट करत होतो.."
"मी इकडे आले की मला जगाचा विसर पडतो. हे कारण नाही आणि फॅक्ट आहे.." त्रिशा हसतच होती.
" ओह, म्हणजे ते मिस यु वगैरे खोटं होतं तर.."
"नाही, आता येतेय मला तुझी आठवण..."
त्याचा काहीच रिप्लाय आला नाही.
इथे आल्यापासून तिचा सगळ्याच गोष्टींशी कसा संपर्क तुटतो ते पाहून तिलाच हसू येत होतं. आह, ट्रँकिल! म्हणत तिने डोळे मिटून घेतले. परत डोळे उघडून त्याला मेसेज केला.
"ओके, आता मी तुझा विचार करतेय.. आपला म्हणजे.. पावसात पायऱ्यांवर बसलेले आपण.. "
मोबाईल पोटावर ठेऊन डोळे मिटून ती त्यांचे कालचे पावसातले क्षण रिप्ले करायला लागली. अंगणातल्या बदामाची पानं सळसळत होती.
शलाका नजर ठेवूनच होती.
"आई.. , यावर्षी उरकूनच टाकू ताईचं आपण, झालंय वय आता तिचं"
त्रिशाने पडल्या पडल्या खाली पडलेला फांदीचा तुकडा उचलून तिच्याकडे फेकला.
दुसऱ्या दिवशी सकाळी नकुल आईला साखरआंब्यासाठी कैऱ्या किसून देत होता.
"पायल पण आलीये कालच इकडे, काल मी भाजी आणायला बाहेर पडले तेव्हा रस्त्यात भेटली." आई म्हणाली.
"पायल आली? अच्छा."
त्याने किसता किसता बराच उलट सुलट विचार करून पायलला भेटायचं ठरवलं. त्याचं काम झालं की आईला सांगून लगेच तो घराबाहेर पडला आणि पायलला फोन केला. ती डायनिंग टेबल वर बसल्या बसल्या आईशी बोलत सफरचंद खात होती. फोनवर नकुलचं नाव दिसलं की लगेच तिच्या रुम मध्ये आली.
"नकुल? तू कसाकाय फोन केलास आज मला"
"तू आलीस असं कळलं आईकडून. पायल, मला तुला भेटायचंय. कधी जमेल तुला?आत्ता जमेल?"
"का? काय झालं"?
"तुझ्याशी जरा बोलायचंय. आत्ता जमत असेल तर बघ."
"ओके, मी बाहेरच पडणार होते थोड्यावेळाने, निघते आता. कुठे भेटायचं"?
"कॉर्नरवरच्या कॅफेत?"
"चालेल"
"मी तिथंच जाऊन थांबतो मग ठिके? ये तू."
नकुल कॅफेत जाऊन पायल ची वाट पहात बसला. पायल ला सांगितल्यावर तिची काय रिऍक्शन असेल हे माहीत असून त्याला काळजी वाटत होती. पायल इथून पुढे आपल्याशी संबंध ठेवेल की नाही, याचीही त्याला खात्री वाटत नव्हती. पण हे तिला कळायलाच हवं असं त्याला वाटत होतं. त्रिशाला सांगण्यापूर्वीच पायलशी बोलण्याचा योग येईल असं त्याला वाटलं नव्हतं, पण तिला नंतर सांगावंच लागेल तर मग आताच का नाही असा त्याने विचार केला.
पंधरा मिनिटे झाल्यानंतर पायल आली.
"हाय नकुल..कसली इमर्जन्सी आहे इतकी?" पायल तिच्या उत्साही आवाजात म्हणाली.
तिचा चांगला मूड पाहून नकुलने बोलण्याचं रद्द करायचं जवळजवळ ठरवलंच होतं.
"तू ही इथं येणार आहेस हे माहीत नव्हतं, म्हणजे आशिष काही म्हणाला नाही तसं"
वेटरने पायल आलेली पाहून नकुलने सांगून ठेवलेली कॉफीची ऑर्डर आणून दिली.
"मलाच माहीत नव्हतं,खरं म्हणजे. माझे दोन ऑफ पेंडिंग होते, लास्ट मिनिट ला ठरवलं यायचं"
नकुल ने खाली वर मान हलवली.
"पायल, मला तुला दोन गोष्टी सांगायच्या आहेत."
"काय?आणि एवढा सिरीयस का दिसतोयस? सगळं ठीक आहे ना?
"हो" तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला. "तू त्रिशाला भेटलीयेस ना त्या दिवशी?"
"हो, तिचं काय?" आता पायल लक्ष देऊन ऐकायला लागली.
"आय ऍम इनव्हॉल्वड इन हर, म्हणजे आम्ही दोघे ही.."
पायलला आधी आश्चर्य वाटलं. नकुल तिला आता या वेळी असं काही सांगेल हे तिला अपेक्षितच नव्हतं. त्यात त्रिशाबद्दल तर मुळीच नाही. आता तिचा चेहरा पडला. काही क्षण तिने कसलीही रिऍक्शन दिली नाही. नकुल तिचं निरीक्षण करत राहीला. पुढची गोष्ट सांगावी की नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला.
"ओह, नाईस. सरप्राइजिंग होतं जरा. पण मला आनंद झाला ऐकून. चांगली मुलगी वाटते ती, शांत आहे ना पण जरा" पायल खोट्या उत्साही आवाजात म्हणाली.
नकुल त्यावर काहीच बोलला नाही. पायलला तिचा मूड ऑफ झालेला लपवताना पाहून त्याला वाईट वाटत होतं.
"आणि दुसरी गोष्ट?" तिला आता काहीच ऐकायची इच्छा नव्हती, तरी तिने विचारलं.
"जाउदे, ते नंतर बोलू आपण. विशेष काही नाही." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला. त्याला स्वतःला आता खूप ताण आला होता.
"नाही, बोल आताच, पुढे आता आपली भेट पुन्हा कधी होईल, सांगता येणार नाही" पायल त्याला बघत म्हणाली.
तेही खरंच होतं.
पायलचं हृदय अजून तोडायचं त्याला जीवावर आलं होतं. पण अखेर मनाशी ठरवत तो म्हणाला.
"तुला तुझी बर्थडे पार्टी आठवतेय? आपण कॉलेजमध्ये होतो, माझं लास्ट इयर होतं. तुझ्या फक्त इथल्या काही मैत्रिणी आणि त्यांच्या आया आल्या होत्या. माझ्याही आईला बोलवलेलं होतं"
पायलला त्या दिवशीचा प्रसंग आठवला.
"हो माझ्या चांगला लक्षात आहे."
"खरंतर" नकुल शब्द गोळा करत म्हणाला." त्या दिवसापासून त्रिशा नव्हती तोपर्यंत माझं पुढे जाऊन तुझ्याबरोबर सेटल व्हायचं जवळजवळ ठरलं होतं"
पुढे नकुलने पायलला पूर्ण गोष्ट सांगितली.
तो जसजसं बोलत होता, तसेतसे पायलच्या चेहऱ्याचे भाव बदलले. उदास झालेली पायल आता हर्ट झाली, चिडली.
"आय ऍम सॉरी, तूलाही हे माहीत असावं म्हणून सांगितलं" शेवट तो एवढंच म्हणाला.
"मला विश्वास बसत नाहीये, तुझ्या प्लॅन साठी तू फक्त माझा वापर करून घेणार होतास. आणि मी तुला प्रपोज करण्याचा विचार करत होते! "
"पायल.."
त्याचं बोलणं न ऐकता पायल खुर्चीतुन ताडकन उठून गेली.
नकुलला हे अपेक्षितच होतं.
दुपारी नकुलला त्रिशाचा कॉल आला.
"एवढा राग? कठीण आहे" त्रिशा म्हणाली.
"नाही, कामात होतो जरा" तो बळच हसत म्हणाला.
त्याचा आवाज ऐकून त्रिशाने त्याला विचारलं
"काय झालंय आवाज वेगळाच येतोय."
"कुठे काय.. मग तू क्लब च काय ठरवलंस्? "
"काहीच नाही! सिरियसली, तू का एवढा उतावीळ आहेस् मला तिकडं नेण्यासाठी?"
"तुझ्यासाठीच! मला माहित आहे, तुझ्यासाठी ग्रेट एक्सपिरियन्स असणार आहे तो, मला तुझ्यासाठी करायचंय हे"
"ठिके ठिके, ठरवलं की सांगते."
नकुल थोडावेळ थांबून म्हणाला,
"त्रिशा, मला हे फोनवर सांगायचं नव्हतं पण.. आय लव यु..
नो धिस ऑलवेज ओके?"
काही तरी झालंय, त्रिशाच्या मनात विचार आला, तो बाजूला सारत ती म्हणाली,
"हो, समोरच सांगायला हवं होतं तू, म्हणजे मला योग्य रिप्लाय देता आला असता." त्रिशा हसून म्हणाली.
क्रमशः