ऐल पैल 17 - रस्टिक फर्निचर, ऍबस्ट्रॅक्ट ड्रॉईंगस्

नकुल ऑफिसमधून आला. समोरच्या बंद दाराजवळ येऊन त्याने बेल वाजवली. दार मीनाक्षीने उघडलं. ती काही बोलणार तोच त्याने मीनाक्षीला इशाऱ्यानेच "त्रिशा कुठेय?" विचारलं. त्रिशा घरून थेट ऑफिस करून, साल्सा ला दांडी मारून नुकतीच फ्रेश होऊन आईने बरोबर दिलेला चिवडा, लोणचं, पापड बॅगेतून काढून ठेवत होती. मीनाक्षीने नकुल कडे बघत आतल्या दिशेला अंगठ्याचा इशारा केला.
"कोण आहे मीने?" त्रिशाने आतूनच आवाज देऊन विचारलं.
"कोणी नाही, सेल्समन होता, गेला." मीनाक्षीने उत्तर दिलं.
पाठीवरची बॅग हॉलमध्येच टाकत नकुल मांजरीच्या पावलांनी आत गेला. त्रिशा पाठमोरी उभा राहून कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत होती. नकुल सावकाश चालत गेला आणि त्रिशाला मागून मिठी मारली. तिच्याच नादात असलेली त्रिशा जोरात दचकली, मग हसून मागे वळाली.
"ओह, मिस्टर सेल्समन.. काय विकायला आणलंय तुम्ही?" ती त्याच्या भोवती हातांचा विळखा घालत म्हणाली.
"हृदय! सिंगल पीस आहे, घेऊन टाका." हृदयावर हात ठेवून नकुल चीजी स्टाईल मध्ये म्हणाला
"सॉरी.. एक आहे आधीच, सध्या गरज नाही, नंतर या!" चेहऱ्यावर खत्रुड भाव आणून म्हणत ती त्याच्यापासून लांब जायला लागली. ती मागे जायला लागली तसं त्याने तिला धरून ओढलं, ती जवळजवळ त्याच्यावर आदळलीच.
"मॅम, मार्केटिंग स्किल्स दाखवण्याची संधी तरी द्या.." म्हणत त्याने तिला जोरदार किस केलं. काही सेकंद तसेच गेले. नंतर त्यातून सावरून त्रिशा हसत म्हणाली.
"ओके, आय ऍम सोल्ड, फुकट तेही!"
दोघे खाली पाय सोडून तिच्या बेड वर बसले.
"मग, कशी झाली होम ट्रिप? घरी जाऊन चांगलंच तूप साखर खाऊन आली दिसतेयस दोन तीन दिवस.." नकुल तिचे गाल ओढत म्हणाला. तिने त्याच्या हातावर चापट मारली.
"मग खाणारच.. " म्हणत त्रिशा तसेच खाली पाय सोडून दोन्ही हात आडवे लांब पसरून बेडवर पडली. "काय छान वाटतं घरी जाऊन आलं की!"
तिला तसं पाहून त्यानेही तसंच पडून तिच्या पसरलेल्या एका हातावर डोकं ठेवलं. तिच्या उंचीला ऍडजस्ट करता करता त्याला अवघडल्यासारखं झालं. ती त्याच्याकडे बघून त्याच्या केसांतून बोटं फिरवू लागली.
"बाय द वे, ते फोनवर काय म्हणालास? लव यु वगैरे? एवढ्या पटकन म्हणशील असं अजिबात वाटलं नव्हतं" ती हसत म्हणाली. "म्हणजे एवढे दिवस थांबू थांबू म्हणत थेट उडी?"
नकुलला पायलची झालेली भेट आणि नंतरची तिची रिऍक्शन आठवली. त्या भेटीपासून नकुलला अस्वस्थ वाटत होतं. त्रिशाला हे कळेल तेव्हा त्रिशाही अशीच वागू शकते असं त्याला नंतर वाटत राहिलं. त्यामुळे त्याने त्याला तिला जी कबुली राईट मोमेंट निवडून द्यायची होती ती न राहवून फोनवर देऊन टाकली होती.
"आता न सांगण्यात मला तरी काही पॉइंट दिसत नाही. पण मी तुला घाई करत नाहीये. मला माझं सांगायचं होतं ते सांगितलं." नकुल हातांची घडी घालत वर सिलिंग कडे पहात म्हणाला. त्रिशा हसली.
" पाच मिनिटं होऊन गेली आणि चक्क तू एकदाही क्लब चा विषय काढला नाहीस, कमाल झाली." ती त्याला टोमणा मारत पुढे म्हणाली.
"तू ठरवलं नाहीयेस असं गृहीत धरून आहे मी."
" हम्म, घरी असताना ठरवलं नाही खरं, पण येताना बस मध्ये ठरवून टाकलं."
"काय?" तो वरच बघत म्हणाला.
"मला वाटतं मी येऊ शकते. कम्फर्ट झोन च्या बाहेर जावं कधीकधी असं कोणीतरी म्हणालं होतं मला मागे." त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
"काय? खरंच?" त्याची एकदम कळी खुलली.
"काय आनंद झालाय! ..सिरियसली नकुल, काय आहे काय तिथे एवढं"
"तुला जे सांगितलं तेच, बाकी अनुभव तू तुझा घेशीलच."
" ओके ओके, मग कधी जायचं आपण..?
"उद्याच.."
" उद्याच? मला वाटलं विकेंड ला वगैरे म्हणशील?
"नोप, उद्याच. आता तू हो म्हणाली आहेस, अजून कारणं सांगायची नाहीत." तो अवघडल्या स्थितीतून जरासा उठत स्वतःच्या हाताने डोक्याला आधार देत तिच्याकडे वळला.
"आय कान्ट वेट.." तिच्याकडे टक लावून पहात म्हणाला.
"काय, क्लबमध्ये जाण्यासाठी?" त्रिशाने मुद्दामच विचारलं.
"कशासाठीच.." म्हणून तो तिच्या जवळ गेला तोच बाहेरून मीनाक्षीने आवाज दिला. आवाज आल्याबरोबर डोळे गच्च मिटून निराश होऊन तो तसाच त्रिशाच्या खांद्यावर डोकं ठेऊन पडला. त्रिशाला हसू आलं.
"गाईज, तुमचं चालू द्या, मी फक्त निरोप सांगायला आलेय की ,नकुल.. तुझा रुममेट तुला शोधतोय."
नकुल उठून बसला.
"ओके, उद्या साडे आठ वाजता.. तयार रहा."
" ठीके, एका अटीवर, मला जर तिथे आत जाताना थोड्या जरी निगेटीव्ह वाईब्ज आल्या तर तिथूनच मागे फिरायचं, ठिके?"
"बरं, सायकीक माते" तो 'काही खरं नाही हिचं' भाव देत उठत म्हणाला.
त्रिशा आता मघाशी नकुल जसा एका हातावर रेलून झोपला होता तशा स्थितीत आली. त्याला जाताना पहात म्हणाली,
"यु लूक सो हॉट इन फॉर्मल्स."
ते ऐकून तो चालता चालता थांबला आणि मागे वळाला.
"वेल, आय नो दॅट! पण हेच जर मी आल्या आल्या म्हणाली असतीस तर? एनिवेज, बाय"
तो निघून गेल्यावर त्रिशा थोडावेळ तशीच पडून राहीली.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत त्रिशा आवरून तयार होती. ब्लु जीन्स आणि ब्लॅक टॅंक टॉप वर तिने ब्लॅक नेट टॉप घातलेला होता. बाहेर वर जाणाऱ्या जिन्याच्या पायरीवर एकेक पाय ठेऊन व्हाईट कॅनव्हास शूज च्या लेस बांधत होती.
" साल्सा करणारेस् म्हणजे मी सेनोरीता सारखा लाल फ्रॉक, कानावर लाल फुल बिल एक्स्पेक्ट करत होतो"
डल व्हाईट टी शर्ट, नेव्ही ब्लु जॅकेट आणि आकाशी जीन्स घातलेला नकुल समोरच्या दारातून बाहेर येत म्हणाला.
"फ्रॉक?" त्रिशा सरळ उभा राहत हसायला लागली.
ड्रेस म्हणतात त्याला, ड्रेस"
"ड्रेस हा कॉमन असतो, लाईक सेट. शर्ट, पॅन्ट, टी शर्ट हे सबसेट्स! मॅथस् वाली असून माहीत नाही तुला?" नकुल भूतकाळातला वार परतून लावत म्हणाला. त्रिशाला मागचा संदर्भ आठवून हसू आलं.
"शत्रूसुद्धा एवढं लक्षात ठेवत नाहीत नकुल."
"मी ठेवतो"
दोघे खाली पार्किंग लॉट मध्ये आले. नकुलने त्याची युनिकॉर्न बाहेर काढली.
"माझी अट लक्षात आहे ना?" त्रिशा तिचं स्वेट जॅकेट घालत बाईकवर मागे बसत म्हणाली.
"आधी जावं लागेल पण त्यासाठी तिथे.. " म्हणत नकुलने बाईक स्टार्ट केली.
वाटेत एका मॅकडॉनल्ड मध्ये अर्धा तास घालवत त्यांनी डबल डेकर बर्गर आणि मिल वर ताव मारला. तिथून पुढे अर्धा तास राईड झाल्यानंतर ते गल्लीबोळातून जात एका अंधाऱ्या एरियात आले. ढग आल्यामुळे तिथे अजूनच अंधार वाटत होता. एका बिल्डिंग समोर बऱ्याच बाईक्स, कार्स आणि सायकल सुद्धा पार्क केलेल्या होत्या, तिथेच जागा पाहून त्यांनी त्यांची बाईक पार्क केली. त्या तीन मजली जुनाट बिल्डिंग मध्ये कोणी राहात असावं असं अजिबातच वाटत नव्हतं. तिथल्या रिकाम्या पार्किंग लॉट मध्ये येउन एका स्लोप ने दोघे खाली खाली आले. त्रिशाला ती जागा जरा क्रीपी वाटायला लागली होती. कुठून इथे येण्यासाठी तयार झाले असा विचार करत नकुलचा हात घट्ट धरून ती एकदम अलर्ट अवस्थेत चालत होती.
जशी क्लब ची जागा जवळ येऊ लागली तसा दबक्या म्युजिकचा आणि त्याच्या बेस चा आवाज कानावर येऊ लागला. सकाळच्या वेळी अंधाऱ्या कालव्यातून जात पुन्हा उजेडात खुल्या रस्त्यावर यावं तसा पुढे पुढे गेल्यावर फिकट उजेड दिसायला लागला होता. दोघे अजून पुढे आले तसं जाळीच्या एका उंच भक्कम गेट समोर तेवढाच भक्कम मानव उभा असलेला दिसला.
"काय म्हणतेय तुझी सायकीक पॉवर, जायचंय मागे की आत जायचंय?"
त्रिशा त्या अंधाऱ्या वातावरणाशी जुळवून घेत होती.
"नाही जाऊया आत, आत जाऊन मग ठरवते" नकुल तिच्याकडे बघत मान हलवत हसला.
मोबाईल काढून त्याने त्या भक्कम माणसाला मेसेजमधला एक कोड दाखवला. ते बघून त्याने गेट उघडत आत जाण्याचा मार्ग मोकळा केला. एंटरन्स मध्ये आता म्युजिक चा आवाज वाढला होता. दोघे क्लब च्या मुख्य जागेत आले. तिथल्या भिंती अगदी जुनाट, रंग उडालेल्या होत्या. ठिकठिकाणी ग्लिटरी स्प्रे ने वेगवेगळे जोमेट्रिकल आकार, स्लोगन्स, अगम्य ऍबस्ट्रॅक्ट चित्रे काढलेली होती. पण ती ही कुठेही अस्ताव्यस्त न काढता विशिष्ट अंतराने काढली होती. छताला पिवळट रंग फेकणारे स्ट्रीट लाईट वाटावेत असे जाड पांढऱ्या दोऱ्या अडकवलेले लॅम्प लटकत होते. तसेच काही भिंतीवर पण होते. एरिया रेग्युलर पब्ज पेक्षा लहान होता पण एसी मुळे कोंदट वाटत नव्हता.जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास लोक असावेत. आत गेल्यावर समोरच बार एरिया होता. क्लब मध्ये जेवढं फर्निचर होतं सगळं रस्टिक आणि वुडन होतं. बाकी सगळीकडे लाईट्स पिवळे, डीम होते, फक्त मधल्या चौकोनी डान्स फ्लोर वर जरा ब्राईट लाईट्स होते, तिथेच एका टोकाला डीजे मन लावून काम करत होता. थोडक्यात एखाद्या आधुनिक आणि मोठ्या फॉरेन ढाब्यावर आल्यासारखं वाटत होतं. नकुल म्हणाला होता तसं जागेला खरोखरच कॅरेक्टर होतं. आत आल्यापासून नकुल अधून मधून त्रिशाचे एक्सप्रेशन्स बघत होता.
"सो, काय मत आहे?" त्याने विचारलं
"इंटरेस्टिंग.. तू म्हणालास तसं वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं."
नकुलने यावर हसून प्रतिक्रिया दिली.
दोघे बार काउंटर समोरच्या स्टूल वर जाऊन बसले. काळ्या चकचकीत ड्रेस मधल्या, डोळे भरून काजळ आणि नोज रिंग घातलेल्या बारटेंडर मुलीने नकुलला ओळखीची स्माईल दिली. त्रिशा काउंटर वर कोपर टेकवून दोघांकडे आलटून पालटून बघत होती. त्यांचं 'जिव्हाळ्याचं' बोलून झाल्यावर त्रिशाने भुवया उंचावून नकुलकडे पाहीलं. बिअर आणि लो अल्कोहोल कॉकटेल चे ग्लासेस समोर आल्यानंतर नकुलने बसल्या बसल्या त्याचा स्टूल त्रिशाकडे सरकवला. ती काही म्हणण्याआधी तो म्हणाला.
"आम्ही इथे पूर्वी बऱ्याचदा आलोयत सांगितलंय मी तुला, दीपिका इथली जुनी एम्प्लॉयी आहे."
"हम्म" त्रिशा तिच्याकडे बघत म्हणाली. तिचं नाव नाव दीपिका असेल असं त्रिशाला अजिबात वाटलं नव्हतं.
शब्द नसलेलं म्युजिक चालूच होतं. त्या सगळ्या वातावरणाशी मॅच झालेलं होतं आणि चक्क कर्कश्य ही वाटत नव्हतं. त्रिशाचा मूड आता खुलत चालला होता.
"गोंगाटाबद्दल तू जे सांगितलं होतं तेही एकदम खरं. परफेक्ट आहे उलट, पब्ज सारखं लाऊड नाही आणि रेस्टोरंट सारखं सायलेंट पण नाही. " त्रिशा कॉकटेल सिप करत मागे, इकडे तिकडे बघून म्हणाली.
"आय नो. सो जागा आवडतेय तुला"
"आय थिंक सो!" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
पंधरा वीस मिनिटे त्यांनी एकमेकांशी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूच्या गर्दीचं निरीक्षण करण्यात घालवली. एकेकटे येऊन अंधारात आपल्याच नादात ड्रिंक करत बसलेले, मित्र मैत्रिणींच्या ग्रुप सोबत आलेले, कोणी फक्त कपल्स- त्यातही नुकतेच प्रेमात पडलेले असल्यासारखे एकमेकांशिवाय दुसरीकडे कुठेही न बघणारे, काही हातात हात घालून बसलेले मुरलेले, काही प्रमाणापेक्षा जास्त कोझी होत चाललेले, काही चालू आहे त्या म्युजिक वर डान्सफ्लोर वर जाऊन नाचत असलेले असे सगळे प्रकार उपलब्ध होते.
तिकडे पाहून त्रिशा नकुल ला म्हणाली,
"तू डान्सर्स बद्दल म्हणाला होता, इथं तर सगळा दम मारो दम क्राऊड दिसतोय."
"अजून दहा मिनिट थांब." नकुल घड्याळात बघत म्हणाला,
त्यांच्या गप्पा पुढे चालू राहिल्या. अचानक म्युजिक मध्ये बदल झाला आणि गर्दीने चिअरफुल आवाज केला तसं दोघांनी एकदम मागे पाहीलं.
"इट्स टाईम, लेट्स गो" नकुल त्रिशाचा हात धरत म्हणाला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle