मायबोली २०१३ गणेशोत्सव पत्र सांगते गूज मनीचे स्पर्धेसाठी लिहीलेलं हे पत्र :
प्रिय गौरी, १/९/१३
माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल आणि ते अगदी सुखदायक ठरेल अशी माझी खात्री आहे. दिवसरात्र विचार करत होते तुझ्याशी संवाद कसा साधावा म्हणून! फोन करावा की थेट तुझ्या घरी येऊन तुला भेटावं की पत्र लिहावं? इतक्या वर्षानंतर थेट बोलण्यात कदाचित एक प्रकारचं अवघडलेपण, दडपण येईल की काय अशी शंका आली आणि हो तसंही मला पत्र खूप लिहायला आवडतं. कॉलेजमध्ये असताना माझ्या खूप 'पेन फ़्रेंड्स' होत्या. महिन्यातून एक तरी पत्र लिहायचोच. खूप वर्ष हा आमचा उपक्रम चालला. हळूहळू नोकरी,व्यवसायाच्या व्यस्त जीवनात मागे पडला. एकदा काय झालं माझ्या हातून एक चूक घडली . खूप अपराध्यासारखं वाटतं होतं, आईजवळ कबूल करायची हिंमत होत नव्हती शेवटी पत्र लिहून कबुली दिल्यानंतर एकदम हलकं वाटायला लागलं. असो! नमनालाच घडाभर झालं.
तुला माहितीच आहे पुढच्या आठवड्यात गौरी - गणपती आहेत. दरवर्षी प्रमाणेच यंदाही आपल्याकडे सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. दीड दिवसासाठी येणारा गणपतीबाप्पा सगळं वातावरण चैतन्यमय करून टाकतो. विसर्जनझाल्यावर एक दिवस नक्कीच हुरहुरीत जातो खरी पण पुढच्या वेळी लवकर येण्याचे वेध मागे ठेवून. माझ्या माहेरी गौरी गणपती बरोबर जातात. ते ५ - ६ दिवस उत्साहात धामधुमीत कधी जातात ते कळतच नाही. आज प्रत्यक्ष जाऊ शकत नसले तरी मनाने तिथेच असते. रोज एकदा फोन करून तयारी कशी काय चाललीये विचारल्याशिवाय चैनच पडत नाही. साड्या आणल्या का आंबिलसाठी कण्या दळून आणल्या की नाही एक ना दोन ... .. मला सख्खी आत्या नाही. दरवर्षी एक चुलत आत्याच सवाष्ण म्हणून असते. तिची परिस्थिती बेताचीच आहे पण खूप स्वाभिमानी आहे. आई तिच्यासाठी छान भारीपैकी साडी आणते व सढ्ळहाताने दक्षिणाही देते. मंगलआत्यापण आवर्जून आदल्यावर्षी दिलेली साडी नेसून येते. आई मंगलआत्यासाठी जसं करते अगदी तसंच कमीमावशींसाठीपण (आमच्याकडे कामकरणार्या मावशी). आईच्या मते दोघीही माहेरवाशिणीच मग भेदभाव कशासाठी ?मला आईच्या ह्या विचारांचा खरोख्रंरच खूप अभिमान वाटतो. ती म्हणते ह्या प्रतिमात्मक गौरीचं आत्मियतेने माहेरपण करण्यात मला जो आनंद मिळतो तेवढाच कदाचित काकणभर जास्तच ह्या जित्या जगत्या आपल्या माणसांचं करण्यात! (स्वगत :एकदा माहेर पुराण सुरु झालं ना..... लग्नाला पाच वर्षे झाली तरी 'माहेर' ह्या शब्दाने काहीतरी जादू होते अन अंगावरून मोरपिसं फिरल्यासारखं वाटतं) हं, तर पहा परत कशी भरकटत जाते....
मॉम - डॅड मजेत आहेत, निदान असं भासवतात तरी. कालच तुझी मैत्रीण राधा आली होती. खूप वेळ मॉम - डॅडच्या खोलीत होती. तुझ्याबद्दल साराबद्दल विचारत होते. साराशाळेत जाते का? कोणासारखी दिसते ? चालायला लागली का वै.... मॉम तश्या माझ्याशी छान मोकळेपणाने गप्पा मारतात पण तुझा विषय कटाक्षाने टाळून! डॅडच्या जीवावर बेतलेल्या दुखण्यापासून दोघंही खूप हळवे झालेयत ग. ते कितीही मला आपली मुलगी मानोत पण तुला थोडीच विसरू शकतील? अशी कोणी कोणाची जागा भरून नाही ग काढू शकत! मनातून त्यांना कितीही तुला भेटावंसं वाटत असलं तरी, ते कबूल करणं कठीण जातंय हे मला त्यांच्या कृतीतून जाणवतेय. जरी आपल्याकडे गौरी मांडत नसलो तरी मला आपल्या घरी घरची खरीखुरी गौर गौरीपूजनाच्या दिवशी जेवायला बोलवायची आहे. तू नक्की येशील मला विश्वास आहे.
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली तुझी
स्नेहा
पत्र २
प्रिय स्नेहा, १५/९/१३
खरंतर लगेच तुला पत्र पाठवायचे होते. पण लगेच लिहू शकले असते? ... नाही ...नाही कागदाचा ओला चिंब बोळा मिळाला असता आनंदाश्रूंचा ! आनंदाचा बहर ओसरून नॉर्मलला यायला ४ - ५ दिवस लागले. मला जर कोणी विचारलं ना , कोणी कशाला विचारायला पाहिजे मीच तुला सांगते ना माझ्या आयुष्यातला हा सुवर्ण दिन ... अविस्मरणीय ... ऐतिहासिक ....काय म्हणू समजतंच नाहीये ..... तो दिवस आहे. तुला कळतंय ना अगं मला अजूनही भावनावेग आवरतंच नाहीये.... पटापट शब्दच आठवतं नाहीये. सुखद विचारांची इतकी गर्दी झालीये की काही विचारूच नको...मी स्वप्नात असल्या सारखंच वाटतंय .... हे नक्की घडलंय ना ..... हा भास तर नाहीयेना .... आईने डब्यात दिलेल्या पुरणपोळ्या एकेक फ्रीजमधून काढून पुरवून पुरवून तासन तास रवंथ करतेय, तेव्हा कळतं हा भास नाहीये ... हे स्वप्न नाहीये, हे खरं घडलंय आपल्या बाबतीत जे मी स्वप्नात बघत होते. व्हिडियो टेप रिवाइंड करून पाहावी तशी तो अख्खा दिवस उठता बसता सारखा मनाने रिवाइंड करत बघत बसते. ही मनाची टेप रिवाइंड करून करून ती घासल्या जाण्याच्या ऐवजी जास्त स्पष्ट तर होतेच आहे अन दरवेळेला नवनवीन प्रसंगाची त्यात आणखी भरच पडत जातेय. आईने साश्रू नयनाने साडी खणा नारळाने भरलेली ओटीचा प्रसंग आठवला की डोळ्यांच्या धारा थोपवूच शकत नाही. आज तन्वीर काय म्हणाला माहिती आहे का एवढी खूश तर तू आपल्या लग्नानंतरही नव्हती आणि काय म्हणाला एकतर तुझ्या आईने आठवड्याभराचा डब्बा तरी द्यायला हवा होता किंवा डबातरी लावायला हवा होता. काही करावंसं वाटतंच नाहीये.तुझं पत्र मिळाल्यावरही थोडीफार काहीशी अशीच अवस्था होती पण त्यात हुरहुर, भिती, आशंकाही होती. साराही इतकी खूश आहे ना की विचारूच नको. भेटलेल्या प्रत्येकाला नाननानीने दिलेला फ्रॉक दाखवत असते. ती आता मोठी झालीये. शाळेत आजी आजोबा दिवस असतो तेव्हा मला तिची समजूत काढून,काहीतरी कारण सांगून, वेळ मारून न्यावी लागायची. ह्या आजी आजोबांचा राग गेला तसा एक दिवस त्याही आजीआजोबांचा जाईल, मला खात्री आहे. स्नेहा खरंच सांगू तुला मला अन तन्वीरला सगळ्यांच्याच आशीर्वादाने लग्न करायचे होते कुणाला दुखवून नाही पण मला वाटते आम्ही दोघंही हे पटवून देण्यात कुठेतरी कमी पडलो. जाऊ दे आता कशाला आठवत बसायचं. झालं गेलं गंगेला मिळालं. मी तर आता पुढची स्वप्न बघतेय एक दिवस ते जावयालाही बोलावतील आणि एक दिवस ते आपल्या लेकीकडच्या गणपतीच्या दर्शनालाही नक्की येतील. खू$$$प काही अजून सांगायचं ग ...... आजपासून मी तुझ्या 'पेन फ़्रेंड' ची सदस्य झालेय.... तेव्हा.... अरे हो, एक सांगायच राहिलंच ग तू जो 'आपल्याकडे' शब्द वापरलास ना त्या शब्दावर अपून तो भाई जाम खुश हो गयेला त्या शब्दांनीच मला 'आपल्या' घरापर्यंत आणलं आणि हो, नमनाला घडा भर ..... समजू शकते. शेवटी एवढंच म्हणेन ही आज तुमची घरची गौर तृप्त झाली .... त्या व्रताच्या कहाण्यांत शेवट असतो ना तसा "गौरी आणाव्या........बोळवण करावी.. घरधन्याला अक्षयसुख मिळेल.... सतत संपत्ती मिळेल... साठा उत्तराची कहाणी..... सुफळ संपूर्ण Happy
तुझी
गौरी