चांदणचुरा : वादी के उस पार - ३ - समाप्त

#16, Sea Rock Society, Yari Road, Versova, Mumbai 400061

हातात सेलफोनवरचा पत्ता आणि डफल बॅग घेऊन तो त्या लहानश्या काळ्या लोखंडी गेटकडे तोंड करून उभा होता. टॅक्सी त्याला सोडून जाऊन पाच मिनिटे तरी झाली होती. कंपाउंड वॉलवर लपेटलेल्या गणेशवेलीवर लालचुटूक फुले बहरली होती. दारासमोरच्या झाडाला फेअरी लाईट्स गुंडाळून सजवले होते. दुसरीत असतानाचा ख्रिसमस! आठवून नकळत तो हसलाच.

मुंबईत असूनही तिथे भरपूर शांतता होती. कोणी तुरळक दूधवाला, पेपरवाला सायकलवर जातायेता दिसत होता. त्याच्या मनात अजूनही डोअरबेल वाजवावी की निघून जावं हे ठरत नव्हतं. अचानक समोर दार उघडलं आणि दाराला अडकवलेल्या कापडी पिशवीतून आईने दुधाची पिशवी आणि पेपर बाहेर काढला. आईमध्ये काहीच बदल नव्हता. पायात सपाता, पांढरी सुती सलवार, वर नाजूक फुलांच्या चिकनकारीचा आकाशी कुर्ता, आता पूर्ण पांढरा झालेला सिल्की बॉयकट! फक्त चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण वाढले असले तरी डोळ्यांत पहिल्यासारखेच तेज होते.

आत वळणार तोच गेटपलिकडे उभा आदित्य त्यांच्या नजरेस पडला. सात वर्षांपूर्वी जसा होता तसाच फक्त आता दाढीऐवजी गाल स्वच्छ होते, हेअरकट केलेला वाटत होता आणि त्याचे बाबासारखेच वेध घेणारे तीक्ष्ण डोळे जरा सौम्य झालेले दिसत होते. जीन्स आणि गुबगुबीत विंटर जॅकेटमध्येसुद्धा थोडा वाळलेला वाटत होता.

"आदी?!" त्या आनंद आणि आश्चर्याने एकदम उद्गारल्या.

तो काय करावे न उमजून मान वरखाली हलवून हसला आणि लहानसे गेट उघडून आत शिरला.

आई बाहेर आली आणि ये ये म्हणत हात धरून त्याला आत घेऊन गेली. "बस, मी चहा ठेवलाय. बाथरूम डावीकडे कॉरिडॉरच्या शेवटी आहे."

बॅग सोफ्याच्या पायाशी ठेऊन तो बाथरूममध्ये गेला. हातपाय धुवून, ब्रश करून, तोंडावर पाणी मारल्यावर समोरच्या नक्षीदार पितळी फ्रेमच्या चकचकीत आरश्यात बघताना त्याला आपण खरंच आईच्या घरात उभे असल्याची जाणीव झाली. केसांवरून हात फिरवून तो बाहेर येईतो आई सेंटर टेबलवर दोन कप ठेऊन वाट बघत होती.

"आदी, तू चहा पितोस ना? मी माझ्या पद्धतीने केलाय. चहा आणि आलं जास्त, साखर आणि दूध अगदी कमी. तुला कसा आवडतो ते सांग, पुढच्या वेळी करू." आई मान वर करून त्याच्याकडे बघत म्हणाली.

"परफेक्ट!" तो कप उचलून आईसमोरच्या सिंगल सोफ्यावर बसत म्हणाला. कपाशेजारी एका बशीत कुकीज ठेवल्या होत्या. त्याने एक कुकी उचलली आणि भुवया उंचावून आईकडे बघितलं.

"यप! त्याच आहेत!" आई गालात हसत म्हणाली.

"डबल चॉकलेट पेपरमिंट..." जिभेवर एक तुकडा घोळवत तो हळूच म्हणाला. "हम्म पण हसनचाचाइतक्या कुरकुरीत नाहीत." तो चिडवत म्हणाला.

"हो बाबा, मला बिचारीला नाही जमत तश्या." तिने अनपेक्षितपणे कबूल केले.

एकदोन क्षण उगीच कपामध्ये पाहून त्याने नजर वर करून आईकडे बघितले. आई त्याच्याकडेच एकटक बघत होती. तिचं एकटेपण, त्याच्यावरचं तिचं प्रेम आणि इतक्या वर्षांची त्याला भेटण्याची ओढ सगळं त्याला त्या पाणावलेल्या डोळ्यामध्ये दिसत होतं. तो कसा रिऍक्ट करेल या भीतीने ती खूप काठावरून त्याच्याशी बोलतेय हेही जाणवत होते.

"अम्मा!" म्हणून तो सरळ आईजवळ जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिचे सुरकुतलेले, हिरव्या शिरा टचटचलेले दोन्ही हात हातात घेतले. "आय मिस्ड यू सो मच.."

"अँड आय मिस्ड बीइंग युअर 'अम्मा' सो मच." आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"आदी, मला माहिती आहे मी तुझ्याबाबतीत फार वाईट वागलेय. विश्वास ठेव मला तुला कधीच सोडून जायचं नव्हतं पण मी माझं सगळं विश्व, माझ्या करिअरबाबतीतल्या अँबिशन्स हे सगळं सोडू शकत नव्हते रे. तुझ्या बाबाला मी खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तो हे तेव्हा समजूच शकत नव्हता. तो त्याच्या कामात इतका गर्क होता की माझं काहीही ऐकायच्या मनःस्थितीत नव्हता. शेवटी माझ्यासमोर काही पर्यायच उरला नाही."

"I know. तू मला न्यायला तयार होतीस, पण मलाच बाबाबरोबर रहायचे होते. माझी शाळा, माझे मित्र, बडी माँ कुणालाच सोडून जायचे नव्हते." तो तिच्या हातांकडे बघत म्हणाला.

"This is all so emotionally draining.. तू आता थोडा आराम कर, आपण जेवताना बोलू. पण आत्ता तू माझ्याकडे आलास म्हणून खूप बरं वाटतंय. हे सगळं उर्वीमुळे! तिचे किती आभार मानू असं झालंय मला. गोड आहे तितकीच स्मार्ट आहे मुलगी! तुला इथे ओढून आणलं म्हणजे कणखरच म्हटलं पाहिजे तिला. काय?" आई हसत त्याच्याकडे बघत म्हणाली.

उत्तरादाखल तो फक्त ओठ चावून हसला.

----

प्रवासाचा शीण, आईच्या हातच्या भाजणीच्या दमदमीत थालिपीठांबरोबर लोण्याचा गोळा आणि खूप दिवसांनी शांत झालेलं मन हे सगळं जुळून आल्यामुळे तो जो झोपला तो सरळ दुपारी चार वाजताच उठला. त्याला उठून बाहेर आलेला बघून आईने हातातली क्रोशाची सुई आणि विणकाम बाजूला ठेवलं.

"अम्मा? तू आणि विणकाम?" त्याने आश्चर्याने विचारले.

"हाहा! हो. रिटायर्ड झाल्यावर लागला हा नाद. हे गणित सोडवल्यासारखं आहे, मेंदूत एकदा टाक्यांचा क्रम फिट बसला की न बघताही विणता येतं. तुझ्यासाठीच विणतेय... सीडरचे पॉ प्रिंट्सपण आहेत त्यात, बघ!" म्हणून त्यांनी अर्धवट विणलेला एका टोकाला देवदार वृक्षांचे बारीक पांढरे जॉमेट्रिक डिझाइन असलेला ग्रे मफलर उचलून दाखवला.

"कूल!" तो मफलर हातात घेऊन त्याच्यावरच्या पॉ प्रिंट्सची छिद्र न्याहाळत हसला.

"आदी, चार वाजले. कॉफी करू का?" आई उठता उठता म्हणाली.

"नाही, थांब थांब.." तिला परत खाली बसवत तो म्हणाला. "इथे डिसेंबरमध्ये सुद्धा इतकं गरम होतंय, कॉफी नकोच. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय."

त्याने किचनमध्ये जाऊन काहीतरी खुडबुड केली आणि बर्फाचे खडे घातलेल्या लालचुटूक सरबताचे दोन उंच ग्लास घेऊन आला.

"टा डा! पेश है ऱ्होडोडेंड्रॉन शरबत! लेटेस्ट सीझन. बाटली मी फ्रिजमध्ये ठेवलीय."

"बढीया! हम्म आता बोला. तू नक्की मला काहीतरी विचारायला, बोलायला आला आहेस, हो ना?" एक घोट घेऊन आई म्हणाली.

"अं.. अम्मा मला तुला हे विचारायचं होतं की तू आम्हाला सोडून इकडे येण्याच्या निर्णयापर्यंत कशी आलीस? खरं खरं सांग, मला आता राग नाही येणार." आदित्य तिच्याशेजारी बसत म्हणाला.

"हम्म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न!" चष्मा काढून बाजूला ठेवत त्या जराशा हसल्या. "विजय माझा सिनियर. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा कॉलेजमध्ये होतो. पुढच्या दिशा काही स्पष्ट झालेल्या नव्हत्या पण ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच त्याने यूपीएससी प्रिपरेशन सुरू केले.  तो पास होईपर्यंत माझे मास्टर्स संपले होते. मला मुंबईतच राहून पीएचडी करून रिसर्चमध्ये काम करायचे होते. त्याचे ट्रेनिंग संपून तो हिमाचल केडरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्या काळानुसार वडिलांनी लगेच लग्न झालेच पाहिजे म्हणून आग्रह केला आणि मीही वेड्यासारखी त्याच्या प्रेमात असल्यामुळे लग्नाला हो म्हणाले."  ग्लास उचलून एक घोट घेऊन त्या पुढे बोलायला लागल्या.

"सुरुवातीचे काही महिने स्वप्नवत होते, लगेच तुझा जन्म झाला. तुझ्या लहानपणात काही वर्षे निघून गेली. तोपर्यंत विजयचे काम खूप वाढले होते त्याच्याकडे ना माझ्यासाठी वेळ होता ना तुझ्यासाठी. महिन्यातले जेमतेम चार दिवस तो घरी असायचा. बाकी सोयी असल्या तरी फोनची सोय नव्हती, पत्रसुद्धा पोचायला महिनाभर लागायचा अशी दुर्गम जागा, थंडी पावसात वीज जायची, बाहेरच्या जगाशी काही संबंधच नसायचा आणि मला माणसांची, गोतावळ्यात राहायची सवय होती, हिमाचली लोकांशी मला धड बोलता यायचे नाही, त्यामुळे येणारा एकटेपणा ह्या सगळ्या गोष्टी एकदम अंगावर पडल्याने मी फार डिप्रेस झाले होते. मी बऱ्याचदा महाराष्ट्रात परतण्याबद्दल विषय काढला तरी विजयला त्यात काही इंटरेस्ट नसायचा. माझ्या पीएचडी करण्याबाबतही तो उदासीन होता. त्याच्या मते मला बाकी सगळा आराम आहे फक्त मुलाला तर वाढवायचं आहे मग इतका का त्रास होतोय. मला शिक्षणात पुढे करियर करण्यात इंटरेस्ट होता, फक्त संसार, स्वयंपाक, मुलेबाळे यात आयुष्य घालवायचे नव्हते. पण त्याला माझे म्हणणेही ऐकून घ्यायला वेळ नव्हता."

"तुझ्यावरची माया माझे पाय बांधून ठेवत होती पण शेवटी मी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला. युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतली आणि मुंबईला निघून आले, तुलाही माझ्याबरोबर घेऊन येणार होते पण विजयने तुला पाठवायला नकार दिला. मला वाटलं होतं काही काळाने तो शांत होईल आणि तुला माझ्याकडे पाठवेल पण माझ्याकडे आली ती डिवोर्स नोटीस! नंतरही मी त्याला बऱ्याच विनवण्या केल्या तरी तो बधला नाही. शेवटी काय जे झालं ते झालं."

"हम्म, इतकी वर्षे बाबाची बाजू ऐकत आलोय, मला तुझी बाजू पण समजून घ्यायची होती." तो आईकडे पाहात म्हणाला.

"उर्वीबद्दल तू काय ठरवलं आहेस?" आईने उत्सुकतेने विचारले.

"तुला कसं कळलं?" त्याने अवाक होऊन विचारले.

"माँ सब जानती है बच्चे!" त्या हसत म्हणाल्या.

" I am not so sure.. माझं प्रेम तर आहे तिच्यावर पण हिमाचलमध्ये माझ्या पहाडी लाईफस्टाईलशी ती मॅच करू शकणार नाही. आपण तिघांनी जे दुःख भोगलं ते तिच्या वाट्याला येऊ नये असं वाटतं."

"अरे! असा एकतर्फी निर्णय घेऊन मोकळा नको होऊ. प्रत्येक रिलेशनशिप वेगळी असते, प्रत्येकाची ध्येय, आयुष्याकडून अपेक्षा वेगळ्या असतात. तसाही आता काळ बदललाय, संपर्काची साधनं भरपूर आहेत. शहरातल्या सगळ्या सोयी आता सांगल्याला असतील. तू ठाम असशील तर तिचा निर्णय तिला घेऊदे. ती धाडसी मुलगी आहे, तिने जर तिकडे यायचं ठरवलं तर ती माझ्यासारखी कच नक्की खाणार नाही. तुमच्या दोघांच्या एका निर्णयावर पुढचं सगळं अवलंबून आहे. Life can make you bitter or better. Choose better!" त्याच्या खांद्यावर थोपटत त्या म्हणाल्या.

"डन! सकाळी जायचं का आपण तिला भेटायला?"
त्याने उत्साहात विचारले.

----

४ महिन्यांनंतर...

चहूकडे उमललेला सफरचंदाचा गोडगुलाबी फुलोरा, हिरवेगार सळसळते उंच देवदार, जमिनीवर खुरट्या गवतात डोलणारी निळी जांभळी रानफुले आणि मधूनच येणारी थंड वाऱ्याची झुळूक.. बागेतल्या लहानश्या मोकळ्या जागेत लाल बो बांधलेल्या तीसेक पांढऱ्या खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच उर्वीचे आईबाबा, आदित्यची आई, दोघांचे जवळचे नातेवाईक, खास मित्रमंडळी आणि सांगल्यामधले काही परिचित लोक बसले होते.

"उहूं, उहूं"  खोटं खोकून रजिस्ट्रारने बोलायला सुरुवात केली. "आज हम आदित्य और उर्वीकी शादीमे शरीक हुए है. यहां दोनोने साइन करना है और दो विटनेस साइन करेंगे. विटनेस आगे आ कर बैठ जाइये." त्याचं बोलणं संपल्यावर उर्वीचे बाबा आणि आदित्यची आई रजिस्ट्रारच्या शेजारी जाऊन बसले. तो पुढे आवाज कमी करून बोलू लागला.

"आदित्य का दोस्त हूँ इसलीए ऑफिस छोडकर यहां आया हूँ, कोई उपर मेरी शिकायत मत करना!" सगळ्यांचे जोरदार हसून झाल्यावर त्याने रजिस्टर आदित्यसमोर सरकवले.

आदित्यने एकदा उर्वीला निरखून बघितले. चेहऱ्याच्या दोन्हीबाजूने बारीक वेण्या मागे नेऊन बांधलेला भरगच्च अंबाडा, त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळावर लाल टिकली, अनाने केलेला हलकासा मेकअप आणि "कही मेरीही नजर ना लग जाए" म्हणून हनुवटीच्या कोपऱ्यात लावलेली छोटीशी काळी तीट, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात पाणीदार मोत्यांचा तन्मणी आणि हातात हिरव्या चुड्याबरोबर आदित्यच्या आईने दिलेले तोडे, सुबक चापून चोपून नेसलेली गडद हिरवी लाल काठांची पैठणी आणि चेहऱ्यावर त्याला प्रेमात पाडणारं तेच मिश्कील हसू! त्याने तिच्याकडे बघून मग? काय करू? अश्या अर्थी भुवया उंचावल्या, तिने बघ बाबा! म्हणून खांदे उडवले. त्याने हसून रजिस्टरवर सही केली. मागोमाग तिनेही लगेच सही करून टाकली.

टाळ्यांच्या गजरात एकमेकांना हार घालून झाल्यावर तिच्या गळयात नाजूक सोनेरी साखळीत गुंफलेले दोन काळे मणी आणि मध्ये सोन्याचा जाळीदार मोठा मणी असलेले मंगळसूत्र घालताना तो हळूच तिच्या कानात म्हणाला, "ह्या मंगळसूत्रात बाबांचे आशीर्वाद आहेत!" तिने आश्चर्याने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. "सीडूने ती रिंग शोधून काढली होती!" तो हसत म्हणाला. "येय!" म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ टेकले. नेमका तो क्षण फतेने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला आणि खाली बसलेल्या सीडरच्या पंजावर हाय फाईव्ह दिला.

समाप्त.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle