शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, "आता हे काय नवीन? दुर्योधन कुठे? कपबशा कुठे? काय संबंध? लिहिणारीचं डोकं जागेवर आहे की नाही?" बरोब्बर ओळखले ना मनातले विचार? पण आहे, संबंध आहे. आणि बऱ्याच जणी लेख वाचल्यानंतर माझ्याशी कदाचित सहमतही होतील.
आटपाट नगर होतं. त्यात एक सपा नावाची बाई होती. तिला दोन गोंडस जुळी मुलं होती. त्यांना एकसारखे कपडे घालून फोटो काढायचे, एकसारखी खेळणी घेऊन देउन खेळवायचे हे त्या सपाचे आवडतं काम होतं. अगदी बाळं असल्यापासून सपा कटाक्षाने दोघांना सगळं काही सारखं आणायची. दोघं छान मोठी होत होती. त्यांना दूध पिण्यासाठी एकसारखे कप ती हौसेने घेऊन आली. एका महिन्याच्या आतच एक घटना घडली. दूध पिऊन झाल्यावर कप सिंकमधे ठेवण्याबद्दलची आईची सूचना पूर्णपणे दुर्लक्षित करून गोंडस मुलं हॉलमधे क्रिकेट खेळू लागली.. मग व्हायचं तेच झालं.. खळ्ळ खट्याक्क! त्यातला एक मग फुटला..सपानी भरपूर खरडपट्टी काढली. पण खरडपट्टी किंवा चिकटपट्टी कशानीच तुटलेला कप जोडला गेला नाही... शेवटी काय? कप एक आणि मुलं दोन! 'बहुत नाइन्साफी है।' मग तिनी तो न फुटलेला कप कपाटात ठेऊन दिला. आणि परत एकसारख्या मग्जची जोडी पूर्वीइतक्याच हौसेनी घेऊन आली.
यावेळी ती सजग नागरिक झाली होती. गोंडस मुलांना फक्त सांगून उपयोगाचं नाही, तर त्यांना पिऊन झाल्यावर मग सिंकमधे ठेवायला 'मागे लागणं' हा उपाय आवलंबायचं तिनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे केलंही! दरवेळी , 'आत न ठेवल्यामुळे कप कसा फुटला होता' याच्या कटू आठवणी गोड दुधात मिसळून ती त्यांना देऊ लागली. 'पेराल तसे उगवते' म्हणतात ते सत्यवचन आहे. उगवले की हो.. म्हणजे पाय उगवले... आपलं.. फुटले कपला आणि मग कपही फुटला! झालं असं की गोंडस मुलं शहाण्यासारखी कप आत नेउन ठेवत होती, पण कुठे?? सिंकच्या कठड्यावर. तिथून एका ... नीट ऐका हं, 'एकाच' कपने उडी मारून जीव दिला. दुसरा शाबूत.
मग सपानी कपाटातला जुना मग काढला. आणि दोन वेगवेगळ्या मग मधून दूध द्यायला लागली. गोंडस मुलंची काहीच तक्रार नव्हती. पण सपालाच ते तसं दोन वेगळ्या कपात दूध देणं सहन होत नव्हतं.. ओसीडी का काय म्हणतात ना.. हां तेच ते. तिला ते वेगळे मग इतके खटकायला लागले की तिची तीव्र इच्छा होऊ लागली की तेही फुटावे. ती मुद्दाम गोंडस मुलांना आठवणच करत नव्हती कप आत ठेवायला, एवढंच काय ती स्वतःसुद्धा क्रिकेट टीममधे दाखल झाली. पण एकही चौकार षटकार कपच्या दिशेने जाईना. शेवटी सपा कंटाळली.
दिवाळी तोंडावर आली होती.. त्या निमित्तानी एक छानसा सहाचा मग सेटच घ्यावा अशी युक्ती तिला सुचली. त्याप्रमाणे चार दुकानं फिरून तिला सर्वात पसंत पडलेला एक मस्त सेट घेऊन आली. मनात ठरवून आली की पुढच्या दिवाळीपर्यंत तरी हा टिकवायचाच. आणि सहाचे सहा टिकवायचे..
यावेळी मात्र सपा डोळ्यात तेल घालून दक्षता पाळत होती. 'सिंकमधे' याची व्याख्या तिने सविस्तरपणे, शांतपणे, ओरडून, अशा विविध प्रकारांनी गोंडस मुलांना समजाऊन सांगितली. कठडा हा कसा 'सिंकमधे' नसतो हे प्रात्यक्षिक तिने अनेकवेळा घेतलं. आणि तीन माणसं आणि सहा कप गुण्यागोविंदाने नांदू लागले. सपा ला गगन ठेंगणं वाटायला लागलं. पुढच्या दिवाळीला एकच महिना बाकी होता. सपाचा प्रण आता पूर्ण होणार म्हणून त्या कपात तिचा प्राण अडकला होता. तेवढ्यात... गोंडस मुलांचा एक मित्र घरी आला होता. घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य गोंडस मुलांना शिकवण्याची ही सुवर्णसंधी होती. एका गोंडस मुलाने सगळ्यांना कोल्ड कॉफी बनवली, दुसऱ्या गोंडस मुलाने ट्रे मधून ती सर्व्ह केली.. आणि पाहुण्यानी काय केलं? पीता पीता तो मग सोफ्याच्या हातावर ठेवला.. आणि हाय रे माझ्या (सपाच्या) दैवा.. हं.. तेच कान फुटला ओ त्याचा. आपलं नाक कापलं की अब्रू जाते तशी कपांच्या जमातीत कान फुटल्यावर इज्जत लुटते. या दुर्घटनेमुळे त्या सेटचं मानसिक खच्चीकरण झालं आणि त्या सेटचे आणखी दोन मेंमर एकामागोमाग एक असे गेले..
मग मात्र सपा वैतागली. आता तिनी ठरवलं की गोंडस मुलांना प्लास्टिकच्या मगचा सेट आणायचा. म्हणजे फुटायचा प्रश्नच नाही. आता ती जुने नवे आलटून पालटून सगळे वापरू लागली म्हणजे एकदाचे सगळे फुटतील. म्हणजे मग तिला नवीन कोरा सेट विकत घेता येईल. पण सहाच्या सेटमधले तीन आणि आधीच्या दोन सेटमधला एक एक असे पाच मग काही केल्या फुटेचनात. पण गोंडस मुलांना एकसारखा प्लास्टिकचा नवीन सेट वापरता येतोय, यावर सपा समाधानी होती. आता ती गोंडस मुलांना चहा करण्याचं प्रशिक्षण देत होती. गोंडस मुलांची प्रगती दुधावरून चहा वर आणि तोही स्वतः बनवलेला, अशी होत होती. सगळं छान चाललं होतं. पण चहा बनवताना प्लास्टिक मग गॅसच्या फार जवळ ठेऊ नये ही महत्वाची टिप सपाने गोंडस मुलांना दिलीच नाही. या घोर अपराधाची शिक्षा तिला मिळाल्यावाचून कशी राहील? एका प्लास्टिक कपचा खेकडा झाला..
त्याच फेटफुल संध्याकाळी सपा कडे पाहुणे आले. चारजणांना द्यायला एकसारखे चार कपही नव्हते.. या लाजिरवाण्या स्थितीचा सपाला फार राग आला.. तावातावाने त्याच रात्री तिनी ॲमेझॉनवरून मग शोधले. एक सेट तर इतका सुंदर होता की तिचं त्यावर प्रेमच बसलं तोच सेट हवा असा तिच्या मनानी हट्ट धरला. पण तिच्या आटपाट नगरित याची डिलीवरी होत नाही म्हणे. मग तिच्या माहेरच्या गावाचा पत्ता देऊन तिथून पुढच्या महिन्यात ती तो घेऊन आली. या 'प्रेमळ' मगमधे वाफाळती कॉफी पिण्याचं आणि ते पीत पीत तो 'परिपूर्ण' सेट बघण्याचं स्वर्गसुख सपा उपभोगत होती. जिवापाड ती या सेटला जपत होती. पण पण पण...एका महिन्याच्या आत मदतनीस ताईंच्या हातून मग धुता धुता निसटला. अरेरे..
त्याचं काय आहे की, सपाला कप फुटण्याचं दुःख नव्हतं असं नाही, ते तर होतंच. पण त्याहीपेक्षा तिचं हे दुःख मोठं होतं की सगळेच कप का नाही फुटत.. म्हणजे उरलेले प्रयत्न करूनही का नाही फुटत? या प्रश्नांनी तिला त्रस्त करून सोडलं. तिचं दुःख एका वेगळ्या लेव्हलवर पोचलं; इतकं की तिने 'आस्था' चॅनल बघायला सुरुवात केली! त्यात पुराणातल्या गोष्टी सांगून वर्तमानातले संदर्भ बाबा लोक लावत असायचे... त्यातून सपाला उपरती झाली. तिला आठवला पुराणातला दुर्योधन. गांधारीनी त्याला बोलावलं होतं की निर्वस्त्र स्थितीत तू ये. मी माझी डोळ्याची पट्टी काढून दिव्य दृष्टीने तुला बघितलं की तुझं शरीर अभेद्य होईल. दुर्योधन जेंव्हा निर्वस्त्र होऊन निघाला तेंव्हा श्रीकृष्णानी त्याला पूर्ण नग्नावस्थेवरून चिडवलं. म्हणून तो अंतर्वस्त्र घालून गेला आणि कमरेखालचा त्याचा भाग कमकुवत राहिला. सपाला दुर्योधनाच्या जागी तिचे कपचे सेट दिसायला लागले. चालत चालत गांधारीकडे निघालेले.. आणि मधेच एक नाही दोन दोन गोंडस श्रीकृष्ण त्या सेटला भेटलेले तिच्या मनोचक्षुंना दिसले.. अणि तिला भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. का एकाच सेटचे काही कप अभेद्य तर काही स्पर्श करताच तीन तेरा वाजणारे असतात.. दुर्योधनाच्या गोष्टीमुळे सपाचे डोळे उघडले, तिलापण गांधारीसारखी दिव्यदृष्टी आली. मेरा ओसीडी मेरी जिम्मेदारी हे ज्ञान पण आध्यत्मिक चॅनेलने तिच्या पदरी घातले. आता ती सगळे कप जातीने स्वतःच तेंव्हाच्या तेंव्हा धुवून ठेवते. आणि कुठलाही प्रश्न पडला की श्रीकृष्ण त्याच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोचवेल असा तिला विश्वास वाटतो.