रूपेरी वाळूत - ४

रविवारी सकाळी शिल्लक एकुलत्या एक गेस्टने चेकआऊट केल्यावर पलाश कामाला लागला. लग्न जरी पुढच्या मंगळवारी असले तरी तयारीला दिवस खूप कमी होते. कोल्हापूरला नेहमीच्या दुकानात कॉल करून त्याने ग्रोसरीची ऑर्डर दिली. भटजींची तारीख बुक केली. गावात पक्याला झेंडूची फुले, आंब्याच्या डहाळ्या, केळीचे खांब आणि पाने, गुलाबाचे हार वगैरे लिस्ट दिली. संध्याकाळच्या कॉकटेल पार्टीसाठी ऑर्किड्स बूक करून ठेवली. ड्रिंक्सची लिस्ट दुकानात पाठवली. फेटेवाला आणि मेहंदीसाठी गावातली एक मुलगी सांगून ठेवली. आता फक्त पार्टीसाठी वेडिंग केक शिल्लक होता.

जांभूळवाडीच्या अत्यंत अरुंद, वेड्यावाकड्या रस्त्यांमधून त्याची भलीथोरली गाडी कशीबशी दामटत तो बाजारपेठेत पोहोचला आणि गंजलेल्या पिवळ्या बोर्डवर ठळक काळ्या अक्षरात लिहिलेल्या 'D'Cruz Bakery since 1983' समोर थांबला. गॉगल टीशर्टला अडकवत तो काउंटरपाशी गेला.

काउंटरवर मोठ्या काचेच्या बरण्यांमध्ये वेगवेगळी बिस्किटे, नानकटाया, वाटी केक्स, गुलाबी खोबरा केक्स, रवा केक, क्रीम रोल्स अशी सगळी व्हरायटी होती. खाली काचेच्या आत वेगवेगळी फरसाण, हॅपी बर्थडे सँडी लिहिलेला एक ब्लॅक फॉरेस्ट केक, बेबिन्का नि दोदोलचे ट्रे आणि शेजारी टिपिकल पायनॅपल, चॉकलेट, मार्बल पेस्ट्रीज. दुकान लहानसं असलं तरी इंच इंच लढवून जागा वापरली होती. भिंतीवर प्रत्येक रिकाम्या जागी काचेची शोकेस होती. त्यात पारंपरिक पावाचे प्रकार म्हणजे वरचा थर कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले मोठे गोल उंडो, थोडे चपटे मधोमध पिटा ब्रेडसारखा खड्डा असणारे पोई, गुबगुबीत लादी पाव, कडक जाड बांगडीसारखे भेगा पडलेले कांकोण, फुलपाखराच्या आकारात कापलेले कात्रो वगैरे बांबूच्या परड्यांमध्ये खाकी कागदांवर डिस्प्लेला ठेवले होते. 

Maria's Kitchen
Catering Services
Authentic Goan food
Veg & Non-veg

असा घरगुती प्रिंटेड कागद एका भिंतीवर चिकटवलेला होता. काऊंटरवरच एक मुठीएवढ्या आकाराची नक्षीदार चकचकीत पितळी घंटा लटकत होती. बेकरीत कोणी नाही बघून त्याने दोन तीन वेळा जोरात घंटा वाजवली. "येतां.. येतां" आतून बारीक आवाज आला आणि मागोमाग गळ्यात पीठ उडालेला निळा एप्रन घातलेली नोरा बाहेर आली. तिच्या केसांनीही एप्रनचंच काम केलं होतं. तिचा अवतार बघून एव्हाना खूप हसू येत होतं पण ते बाहेर न दिसू देता त्याने चेहरा रुक्षच ठेवला. तिनेही कूल नोरा बनत मान उंचावून "कितेम?" विचारलं. कितीही बेफिकिरी दाखवली तरी त्यांची नजर एकमेकांवरून हटत नव्हती. त्याने थ्री टायर वेडिंग केकची ऑर्डर दिली. केकचे डिटेल्स लिहून घेताना ती जरा भांबावली पण ममा काहीही मॅनेज करेल याची तिला खात्री होती.

"कॅन आय हॅव युअर नंबर?" त्याने अचानक विचारले.

"बेकरीचा मिळेल." तिने नाक उडवत उत्तर दिले.

"मी बेकरीचाच मागितलाय. माझ्याकडे लँडलाईनचा आहे, तो वादळात बंद पडलाय." तो रोखून बघत म्हणाला.

तिने जीभ चावत पटकन डायरीचा कागद टरकावून बेकरीचा मोबाईल नंबर लिहून दिला.

बराच वेळ काचेतल्या पदार्थांकडे दुर्लक्ष करून शेवटी निघताना अगदीच न राहवून त्याने स्वतःसाठी अर्धा किलो दोदोल आणि एक छोटा चीजकेक पॅक करायला सांगितला. "ओल्ड हॅबीट्स डाय हार्ड!" पेपरबॅग त्याच्याकडे सरकवून ती खालमानेने पुटपुटली. त्याने थंडपणे पिशवी उचलून पैसे जरा जास्तच जोरात काउंटरवर ठेवले आणि डोळ्यांवर गॉगल चढवून भराभर गाडीत जाऊन बसला. नोरा कानात सुरू नसलेल्या बीट्सवर नाचत आत जाऊन परत पावाच्या कणकेवर बुक्के मारायला लागली.

---

एक पिसाळलेला भटका कुत्रा गावातल्या बऱ्याच कुत्र्यांना, मांजरांना आणि काही वासरांना चावल्यामुळे रोज दोन चार इमर्जन्सी केसेस येत होत्या. सगळ्यांना बँडेज करून, इंजेक्शन्स देता देता आठवडाभर तिचा पिट्ट्या पडला. रोज दमून भागून घरी आल्यावर भरपेट जेऊन ती मेल्यासारखी झोपत होती. शेवटी शनिवारी तो कुत्रा राणूच्या कोंडावर मेलेला सापडला आणि अख्ख्या गावाचा जीव भांड्यात पडला. सगळा आठवडा याच उद्योगात गेल्यावर अचानक रविवारी सकाळी चर्चमध्ये तिला मिनूच्या लग्नाची आठवण झाली. चर्चमध्ये असल्याने तिने एफ वर्ड म्हटला नाही इतकंच!

लग्न पारंपरिक असल्यामुळे ड्रेस कोड साडी होता. नोराने तिच्या आयुष्यात अजून कधीही साडी नेसली नव्हती. ममा साडी नेसायची तरीही तिला कधीच साडीमध्ये इंटरेस्ट वाटला नाही. लहानपणापासून ती डेनिम्सच्या अखंड प्रेमात होती. कम्फर्ट ओव्हर फॅशन हे तिचं जगायचं सूत्रच होतं. इतक्या उशिरा साडी विकत घ्यायला शहरात जाणं शक्यच नव्हतं आणि ममाची साडी नेसायची तर ब्लाउज टक्स मारून निम्म्याहून कमी करावा लागला असता. तिला सगळी तयारी करून देऊ शकेल अशी एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली, गावाची एकुलती एक घरगुती ब्युटीशीयन कम मेहंदी आर्टिस्ट कम ड्रेस डिझायनर म्हणजे सोहन मारवाड्याची मुलगी पायल! यंदाच बारावीची परीक्षा दिली असली तरी तिचा नटण्या, नटवण्याचा अनुभव तगडा होता. खरंतर ती नोराच्या टाईपची अजिबात नव्हती पण कसं कोण जाणे त्यांचं चांगलं जमायचं.

घरी जाताच तिने तातडीने पायलला कॉल केला.
फोनवर समजलेल्या गोष्टी म्हणजे:
१. पायल सोमवारी ब्लू लगूनच्या लग्नात नवरी सोडून बाकी बायकांना मेहंदी काढायला जाणार आहे.
२. नवरी स्वतःची ब्युटीशीयन आणणार आहे.
३. बाकीच्यांचे मेकअप, साडी नेसवणे वगैरे गरज लागल्यास तिनेच करायचे आहे. आणि
४. नोराच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तीच आहे. साडी उधार देण्यापासून तिला नेसवून देण्यापर्यंत सगळं तीच करेल.

ग्रेट! नोराने हवेत एक पंच मारला.

दुपारी पायलच्या घरी गेल्यावर तिने गावभरच्या गप्पा मारत नोराचं एक मेकओव्हर सेशनच घेऊन टाकलं. बऱ्याच दिवसात थ्रेडिंग न केलेल्या भुवया शेपमध्ये आणणं, ऊनवाऱ्यापावसात फिरून रफ झालेल्या चेहऱ्याला डीटॅन फेशियल, मसाज, हेअर मास्क, शॅम्पू, बेसिक सारी ड्रेपींग हे सगळं झाल्यावर तिने फ्री मेहंदी ऑफर केल्यावर नोरा नाही म्हणूच शकली नाही.

सगळं झाल्यावर कंटाळलेली पण सुखावलेली नोरा घरी पोहोचली तेव्हा घरी सगळे आ वासून पाहतच राहिले. चक्क ममाने तिच्या जवळ येऊन चेहऱ्यावर बोटे मोडली आणि म्हणे "वायट नजर नको मांज्या सोना बेबीला!" नोरा खो खो हसत तिच्या खोलीत पळून गेली.

---

सोमवारचा दिवस उजाडला तोच वाईट बातमी घेऊन. खालच्या आळीतल्या परश्या मोटेची आदल्या दिवशी डोंगरात चरायला सोडलेली म्हैस परत घरी आली नव्हती. सकाळी बरेच लोक जाऊन जंगल पालथं घातल्यावर ती बेशुद्ध पडलेली सापडली. नोराने बऱ्याच तपासण्या केल्यावर रानात तिच्या पायाला साप चावल्याचे निदान झाले. विष शरीरात पसरत होते. तिने चावलेल्या जखमेच्या वरच्या पायाला आवळून फडकं बांधलं होतं पण नक्की कुठल्या जातीचा साप हे न कळल्यामुळे औषध ठरवायला वेळ लागत होता.

वेळ जाईल तसतसे विष म्हशीच्या शरीरात अजूनच पसरत होते. नोराच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये सापाच्या विषाची ही पहिलीच केस होती. अखेरीस दात चावल्याचे निशाण आणि म्हशीच्या त्वचेचा बदलणारा रंग बघून तिने आडाखा बांधला आणि हिंमत करून अँटी व्हेनम इंजेक्शन टोचले. संध्याकाळपर्यंत ऑब्झर्वेशनमध्ये राहिल्यावर रात्री नऊ वाजता म्हशीने तिचे कमलनयन उघडले आणि समोर ठेवलेल्या बादलीतल्या पाण्याला तोंड लावले तेव्हा नोराची ड्युटी संपली.

घरी जाऊन जेऊन आडवी झाल्यावर तिने फोन हातात घेतला. मिनूचे सात आठ मिस्ड कॉल आणि 'where are you' असा सात लाल दैत्यांबरोबरचा टेक्स्ट बघून तिने डोक्याला हात लावला. ती दमलेल्या अंगठ्याने पटापट टाईप करायला लागली.

Don't worry darling, have your beauty sleep. Whole day I was busy with a Buffalo! Yes, really!! Will definitely reach your wedding. Sweet dreams :)

Send दाबताच तिला डाराडूर झोप लागली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle