टर्रर्र. टर्रर्र... टर्रर्रर्र... टर्रर्रर्रर्र....
डोक्याशी वाजणारा अलार्म स्नूझ करायला मोबाईल बराच चाचपूनही तिच्या हातात सापडत नव्हता. शेवटी उठून बसत तिनेच रात्री उशीखाली सरकवलेला मोबाईल बाहेर काढून अलार्म बंद केला. शिट!!! नऊ वाजले! तिने कपाळावर हात मारला. तिला तासाभरापूर्वी घराबाहेर पडायला हवे होते आणि ती अजून अंथरुणातच होती. घर शांत होते म्हणजे सगळे आपापल्या कामांना बाहेर पडून गेले होते. तिने पटकन ब्लॅंकेट बाजूला केले आणि पळापळ करत कामाला लागली.
आज चहाने चालणार नव्हते, कडक कॉफीच हवी. तिने गॅसवर दूध, पाणी गरम करत ठेवलं आणि ब्रश करायला गेली. मोठा मग घेऊन त्यात साखर, ब्रू आणि जरासं गरम पाणी घेऊन तिने चमच्याने मिनिटभर फेटले आणि वरून दूध ओतले. कॉफीच्या वासानेच ती टक्क जागी झाली आणि पटापट कॉफी प्यायली. आंघोळ आवरून तिने पटकन ड्रायरने केस वाळवून विंचरले, आता हेअरस्टाईल वगैरे काही करणे शक्यच नव्हते म्हणून तिने फक्त दोन्ही बाजूनी केसांच्या बटा पिनेत अडकवून केस मागे मोकळेच सोडले. नेहमीची जीन्स टीशर्ट चढवून तिने साडीसाठी उधार घेतलेले तिच्या दृष्टीने 'हाय' असणारे हील्स घातले. घराला कुलूप लावले. केसांवर स्कार्फ गुंडाळला, साडी आणि तयारीच्या इतर गोष्टी पिशवीत भरून तयार होत्या ती पिशवी टॉप बॉक्समध्ये टाकली आणि बुलेट वाऱ्याच्या वेगाने पळवली.
ती ब्लू लगूनपाशी पोहोचली तेव्हा दहा वाजले होते. एवढे दिवस पडलेल्या पावसाने आजूबाजूचा परिसर धुवून निघाला होता. वाळूत जमलेल्या लहान लहान डबक्यात वरचे निळे आकाश आणि पुंजक्यांनी पसरलेल्या पांढऱ्या ढगांचे प्रतिबिंब पडले होते. कुंपणाच्या झाडांनाही तरारून कोवळी पोपटी पालवी फुटली होती. गेटच्या कमानीवर बहरून पसरलेला नेहमीचा बोरिंग बोगनविलियासुध्दा नवा नवा वाटत होता.
लग्नाचा मुहूर्त अकराचा असला तरी विधी सकाळीच सूरू झाले होते. रिसेप्शनमधून आत गेल्यावर मध्ये हिरवंगार लॉन आणि कडेला दोन पांढऱ्या फुलांनी लदबदलेली देवचाफ्याची झाडे असलेला मोकळा चौक आणि चारी बाजूनी काचेची दारे असलेला पॅसेज होता. पॅसेजपलिकडे इनडोर गेम्स, स्पा आणि दुसऱ्या बाजूला किचन आणि पॅन्ट्री होती. वर दोन मजल्यांवर गेस्ट रूम्स होत्या. पॅसेजच्या डावीकडे बाहेर गेल्यावर समुद्राच्या दिशेला मोठया ओव्हल शेप स्विमिंग पूलशेजारी सन लॉंजर्स होते आणि दुसऱ्या बाजूला पूलसाईड रेस्टॉरंट.
आज मधल्या मोकळ्या चौकात पांढरे छत लावलेला मांडव उभा केला होता. छताच्या मधोमध काचेच्या लोलकांचे भलेमोठे चमकते झुंबर लटकले होते. मांडवाच्या लाकडी खांबांना झेंडूचे हार गुंडाळून मांडवाच्या प्रत्येक कोपऱ्यात आंब्याच्या डहाळ्या टांगल्या होत्या. चारी बाजूनी फिक्या गुलाबी ऑर्गन्झाचे पडदे वाऱ्याच्या झुळकांबरोबर उडत होते. मांडवात हिरवीगार जरीची नौवार नेसलेली वधू आणि जांभळा कद नेसलेला वर बसून लग्नविधी सुरू होते, मांडवाच्या चोहीकडे खुर्च्या भरून माणसे बसली होती.
गुलाबाची फुले, सरबताचे ग्लास, अक्षता वगैरे वाटायला स्टाफची लगबग सुरू होती. पलाश प्रत्येक सर्विसवर बारकाईने लक्ष ठेवून फिरत होता. एका बाजूला बुफे काउंटर मांडणे सुरू होते. होमातल्या धुराच्या वलयांबरोबरच रंगीबेरंगी सिल्कच्या साड्यांची सळसळ आणि त्या नेसलेल्या काकवांची कुजबुज आणि हास्याच्या लकेरी हवेत पसरल्या होते. फिकट गुलाबी फेटे बांधलेली मेल पॉप्युलेशन जुजबी बोलाचाल करत बुफे काउंटरवर लक्ष ठेवून होती. काही लग्नाळू लोक आजूबाजीची हिरवळ जरा बारकाईने न्याहाळत होते. दोन चार गुटगुटीत लहान मुलं खुर्च्यांमधून नेहमीसारखीच सुसाट सुटली होती.
वाऱ्याच्या झुळकीवर वेगवेगळी पर्फ्यूम्स आणि ताज्या फुलांचा एकत्र दरवळ वहात होता. ती दारातून आत शिरताच एका कडक कॉटन साडीधारी मुलीने तिच्या पालथ्या हातावर अत्तरदाणीतून केवडा अत्तर लावून तिचे स्वागत केले, हातात एक लाल गुलाब देऊन तिचा अवतार पाहता पहिल्या मजल्यावर लेडीज ड्रेसिंग रूम नं. 110 आहे म्हणून सांगीतले. पायल गर्दीत कुठे दिसत नव्हती. जिन्यात दोन दोन पायऱ्या चढताना तिने पायलला please come to 110 asap म्हणून मेसेज केला. वर सगळा कॉरिडॉर सुनसान होता. सगळे लोक खाली गेले वाटतं म्हणत उघड्या दारातून नोरा खोलीत शिरली.
लग्नविधी आणि सगळ्या सर्व्हिसेस सुरळीत सुरू असल्याचे पाहून, मुहूर्त जवळ येताच कोणी गेस्ट वरच राहिले असतील तर चेक करायला पलाश पायऱ्या चढून वर गेला. एकेक रूम चेक करत तो शेवटच्या ड्रेसिंग रूमकडे निघाला. कॉरिडॉरमधल्या काचेत त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसताच त्याने जरा थांबून डोक्यावरचा गुलाबी फेटा नीट केला. अंगातला फॅबचा बटनांशी बारीक सोनेरी वीण असलेला नी लेंथ चॉकलेटी बंदगळा कोट आणि पांढरा चुडीदार त्याची उंची आणि रूंद खांद्यांमुळे शोभून दिसत होता. पायात लेदरचे चकचकीत पॉलिश केलेले लोफर्स होते. आजूबाजूच्या लग्नी उत्साहाची चमक त्याच्याही चेहऱ्यावर आली होती.
कॉरिडॉरमधून पायांचा आवाज येताच वाकून एका हाताने पूर्ण काठाला फ्रिल आणि पदराला गोंडे लावलेल्या रस्ट ऑरेंज मल साडीच्या निऱ्या सारख्या करत नोरा पाठमोरी दारात आली. एका हाताने बारीक फ्रिल लावलेले शोल्डर स्ट्रॅप्स असलेल्या ग्रे स्लीवलेसच्या खोल पाठीवरची बटन पट्टी कशीबशी ताणून धरली होती. पायरव तिच्यामागे जाणवताच ती उभी राहिली.
"थँक गॉड, यू केम! बटन्स प्लीज!" ती हातातून पट्टी सोडून मोकळे रेशमी केस खांद्यावरून पुढे घेत म्हणाली. तिची निमुळती उंच मान, उजव्या खांद्याखाली असलेली बारीक हँडली फॉण्टमध्ये टॅटू केलेली वाक्य ,
'You could
rattle the stars.
You could do anything,
if only you dared.
And deep down,
you know it, too.'
पाठीची कमरेवरच्या साडीत गायब झालेली पन्हळ, तिच्या कमनीय कंबरेचे घाटदार वळण... ही नोराच आहे ना? त्याला थक्क होऊन दोन सेकंद काही समजेना झालं. शेवटी भानावर येत त्याने त्या अरुंद पट्टीवरची दोन बारीकशी लाकडी बटन्स लावायला सुरुवात केली.
"कितेम चेडू? ह्यो कसला कॅनव्हास पॅडस्! माका न्यूड फील होता हा.." ती डाव्या खांद्यावर पदर पिनअप करत वैतागून म्हणाली. त्याच्याकडे वळलेल्या तिच्या कानातला नाजूक पानांच्या डिझाईनचा इअर कफ चमकला.
त्याने ओठ चावत कसंबसं हसू दाबलं. तिच्या हातावरची मेंदी, केसांमधला मिंट शॅम्पू आणि आत्ता लावलेल्या केवडा अत्तराचा एकत्रित सुगंध नाकात शिरताच त्याने क्षणभर डोळे मिटले. आणि त्याच क्षणी बटण लावणाऱ्या बोटांचा तिच्या मुलायम पाठीला स्पर्श झाल्यावर त्याने करंट बसल्यासारखा हात मागे घेतला.
आतापर्यंत तिला ब्लॅक ओपियमचा सुगंध जाणवत होता पण प्लेस करता येत नव्हता. पाठीला वेगळा स्पर्श जाणवताच तिने ताडकन "पायल?" म्हणत वळून बघितलं.
पलाशने तिच्याकडे बघून हसत तळवे वर केले. "डन!"
तिने "फ्रीss क" म्हणून किंचाळून तोंडावर गपकन कोपरापर्यंत मेंदी रंगलेला लालीलाल हात ठेवला.
"थँक्स नाही म्हणणार?" त्याने तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात रोखून बघत विचारले.
ती लगेच पाठ फिरवून खोलीत शिरली आणि त्याच्या तोंडावर दार लावून टाकले. बंद दारावर दोन्ही हात ठेवून त्याने कपाळ टेकले आणि खोल श्वास घेतला. दाराला पाठ टेकून तिने भराभर श्वास घेतला आणि छातीवर हात ठेवून धडधडत्या हृदयाला जरा काबूत आणले.
तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली. तिने रागाने शेजारी ठेवलेली कुठल्यातरी म्हातारीची काठी उचलली आणि दार उघडले. समोर उभी पायल बघून तिने रोखून धरलेला श्वास सोडला. तिने बाहेर वाकून पाहिलं तर पलाशचं कुठे नामोनिशाण नव्हतं. तिच्या घाबरटपणावर जोक करीत पायलने पटकन तिचे केस एका रबर बँडवर गुंडाळून मेसी बन घालून दिला. कडेला खाली मिळालेले दोन गुलाबही खोचले. तिची साडी चापून चोपून नीट ऍडजस्ट केली. बेसिक मेकअप केला आणि दोघी खाली उतरल्या.
क्रमशः