बंटीचे आईबाबा

बंटी :

"आई, मी खेळायला जातो गं." बंटीने ओरडून आईला सांगितले आणि आपला चेंडू घेऊन तो पायर्‍या उतरून समोरच्या अंगणात आला. एकटाच टप्पा टप्पा खेळताना बंटीला आपल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण यायला लागली. ते सगळे कित्ती धम्माल करत असतील! नाहीतर आपण, इथे एकटेच या जंगलात खेळत बसलोय. श्शी! अजून किती दिवस इथे रहायचय कोण जाणे. हा आठवलं आईबाबा दहा दिवस म्हणाले होते......... म्हणजे किती दिवस उरलेत बरं आता? ....आहा, फक्त दोनच. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. उद्याचा दिवस तर आईबाबा घरीच असतील ना? तेच म्हणत होते की. त्यांनी गोळा केलेली सगळी झाडं चांगली पॅक करायचीत त्यांना. चला म्हणजे उद्या दिवसभर मी एकटा नसणार तर!

तसं इथे काही वाईट नव्हतच. उलट पहिले पाच-सहा दिवस तर कित्ती कित्ती मजा आली. एकतर एकदम एकटं राहायचं. फार नाही पण सकाळी थोडावेळ आणि दुपारी थोडावेळ. पण आपण एकटं रहायचं आणि घरही सांभाळायचं म्हणजे कित्ती थ्रिलिंग! एकदम रीस्पॉन्सिबल झाल्यासारखं वाटतय.

आणि घराबाहेर पडलं की ..........

**************************

आईबाबा :

"महेश, चल माझी पण तयारी झाली. तु जीपमध्ये सामान लोड कर. मी बंटीला सूसू करायला लावते. की मग निघूच." बंटीची आई त्याच्या बाबाला म्हणाली.
"हो चला. आता निघायलाच हवं. नाहीतर पोचता पोचता अंधार व्हायचा. काय बंटी? एकदम खुश ना? आता लवकरच जंगलात रहायला मिळणार आहे तुला!"

बंटीचे आईबाबा दोघेही वनस्पतीसंशोधक. स्वतःच्या क्षेत्रात अत्यंत नावाजलेले. त्यांच्या संस्थेने नेमून दिलेल्या जागी पंधरा-वीस दिवस, महिनाभराकरता जायचे. फिरून वनस्पती गोळा करून त्यांची वर्गवारी करायची. आणि मग परत येऊन त्यांच्या संस्थेच्या लॅबमध्ये त्यावर अधिक संशोधन करायचे. दोघांनी मिळून कितीतरी नवनवीन वनस्पती शोधून काढून त्यांची माहिती जगापुढे मांडली होती. त्यामुळे त्यांचे काम मुख्यतः अशा जंगलात नाहीतर एखाद्या आडगावात आणि वर्षातून अशा एखाद-दोन ट्रिप्स तरी व्हायच्याच.

बंटी लहान असताना आईबाबांबरोबर कधी अशा ट्रीप्सना गेला नाही. आपल्या आजीआजोबांजवळ असायचा. पण यावेळी त्याने स्वतःनेच आग्रह धरला होता. आईबाबाही आनंदाने तयार झाले होते कारण आता बंटीही पुरेसा मोठा झाला होता. नऊ वर्षं म्हणजे मोठाच की. आणि यावेळची ही ट्रिपही केवळ दहा दिवसांची होती.

"बंटी राजा, तिथे किनई तुला घर सांभाळायचंय बरं का? मी आणि बाबा जेव्हा जंगलात जाऊ ना, तेव्हा एकटं नीट रहायचं. तुझी आवडती पुस्तकं आहेतच. नाहीतर आजुबाजुला अंगणात खेळ. भिती काही नाहीये तिथं. जवळच वस्तीपण आहेच. कोणी बाई मिळाली तर ती असेल तुझ्या सोबतीला. नाहीतर आपण तिघेच जणं. खुप मज्जा करू हं."

"आणि बरं का बंटी, आई आणि मी आमचं काम आटोपून तुझ्याकरता लवकर लवकर येत जाऊ. फक्त सकाळी आणि मग जेवण झाल्यावर दुपारी थोडावेळच बाहेर जाऊ. ओके?"

राहिल आपलं पिल्लु एकटं. वयाच्या मानानं त्याला किती समज आहे. आजीआजोबांबरोबर राहून त्यांची आणि स्वतःची काळजी घ्यायला छान शिकलाय तो... बंटीच्या आईबाबांनी विचार केला होता.

**************************

बंटी :

....... घराबाहेर पडलं की मज्जाच मज्जा. किती फुलपाखरं, पक्षी, त्यांचे ते आवाज. झाडं पण कशी पानांनी बोलत असतात नाही? आईनी सांगितलय तेवढ्या भागातच खेळलं की झालं. खरंतर इथे कार्टुन नाही, फोन नाही, पिझ्झा नाही आणि मित्रमैत्रिणी नाहीत. पण त्यांची गरज वाटतच नाहीये. म्हणजे त्यांची आठवण येतेय... त्यांना काय काय मज्जा सांगायच्यात. जंगलातल्या मजा.

पहिल्या दिवशी आईबाबांनी नेलंही होतच की आपल्याला. पण नंतर नाही म्हणाले. मला नेलं तर वेळ लागेल म्हणाले. पण त्यामुळेच तर एकटं रहायला मिळतय. खुप खुप मोठ्ठं झाल्यासारखं वाटतय. आईबाबाही कितीतरी वेळ भेटले नं. कित्ती मज्जा मज्जा केली आपण. संध्याकाळी आईबाबा आल्यावर गप्पा, बोर्डगेम्स, गाणी अन गोष्टी. काय त्यांचे ते जंगलातले अनुभव. किती धडपड करून ते सॅम्पल्स गोळा करतात. आपले आईबाबा ग्रेटच आहेत. आपणही त्यांच्यासारखंच व्हायचयं ....

आजचा दिवस स्पेशल आहे. जंगलातला शेवटचा दिवस. उद्या परत घरी. आज सगळ्या दोस्तांना भेटून घेऊया. सगळ्या झाडांना, फुलपाखरांना, पक्ष्यांना बाय बाय! आज काहीतरी स्पेशलच करू या ........ बंटी स्वतःच्या विचारातच चेंडू खेळत खेळत अंगणात फिरू लागला. क्षितिजावर काळे ढग जमायला लागलेले त्यानं पाहिलेच नाहीत.... गार वारा सुटला होता पण बंटीला त्याचं काय!

**************************

आईबाबा :

"बंटीच्या आई, तुम्ही किती वेळ लावता? हे काही शहर नव्हे की मेकअप करून तुला काही पार्टीलाही नाही जायचंय" बंटीचा बाबा बंटीच्या आईला चिडवत होता. "गप रे. बंटीकरता त्याचा आवडता शिरा करून ठेवत होते. चला निघूया. हा बंटी कुठे गेला? बंटी जातो रे आम्ही. नीट रहा. कदाचित जरा जास्त वेळ लागेल...." न दिसलेल्या बंटीला जोरदार हाक देऊन आईबाबा घाईघाईनं निघालेही.

आज जरा जास्तच वेळ लागणार होता. काही सॅंपल्स पुन्हा घ्यायला लागणार होती. घाई करायला हवी. हे काय आज नेमकी हवा बदलतेय. काळे ढग.. म्हणजे पाऊस हमखास पडणार! "महेश, पटकन आटपायला हवं रे. जाताना नाही पण येताना हा पाऊस आपल्याला गाठणारच बहुतेक. वाट तशी सरावाची आहे म्हणा. मला बंटीचीच काळजी लागलीये. राहिल ना रे तो एकटा पावसात? घाबरणार तर नाही ना?" बंटीच्या आईची घालमेल व्हायला लागली.

"काळजी करू नकोस ग. इतके दिवस नाही राहिला? आपण लवकर लवकर परत यायचा प्रयत्न करूयात. ओके?" बंटीच्या बाबानी जीप भरधाव सोडली......

**************************

बंटी :

'चला, आईबाबा यायच्या आत घरात आलो हे बरं झालं. पटकन कपडे बदलून बसतो. ओले कपडे पाहून आई चिडणारच आहे. तिला कळणार की मी पावसात बाहेर पडलो होतो ते. निदान पडलो ते नको कळायला. आई ग, अजून सगळं अंग दुखतंय.... आणि हे काय? मागोमाग आईबाबा आलेसुध्दा! आजतर उशीरा येणार म्हणून म्हणाले होते .....'

**************************

आईबाबा :

"बंटी, कुठे आहेस? अरे बघ आम्ही किती लवकर आलो ते. अरे, जाताजाताच हा जोरात वारा सुटला आणि मागोमाग मुसळधार पाऊसही सुरू झाला. पुढचं काही दिसेचना आणि सगळा रस्ता मातीचा त्यामुळे चिखलही झाला होता. कसेबशी जीप वळवली आणि अगदी हळूहळू आलोय आम्ही. तुला बघायला जीव नुसता कासाविस झाला होता रे राजा. केव्हा एकदा माझ्या बंटीला बघतेय असं झालं होतं. ये राजा माझ्या जवळ ये असा ..... "

**************************

बंटी :

आईच्या गच्च मिठीत बंटी आनंदला. 'आज आई एवढी हळवी का झाली? आणि हे काय बाबापण रडतोय? काय झालंय काय आज दोघांना. ही एवढी मोठी माणसं जरा उशीर झाला म्हणून रडतायत?'

"बाबा, आज मला जीपचा आवाजच नाही ऐकू आला. जीप कुठेय?"

**************************

आईबाबा :

आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं. बंटी एकदम असा काही प्रश्न विचारेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. "अरे बंटोबा, जीप किनई ... रस्त्यातच त्या कड्यापाशी बंद पडली. म्हणून...त्यामुळे तर आम्हाला आणखी जरा वेळ लागला. बरं ते जाऊ दे. आज किनई तु म्हणशील तस्सं सगळं करायचं, ओके? तू म्हणशील ते खेळायचं, तू म्हणशील ते जेवण करायचं ... उद्या आपण नसणार ....."

**************************

बंटी :

आणि तस्संच झालं. 'आईबाबा आज जास्तच काळजी घेतायत का? आज काय झालंय त्यांना. असे उदास का दिसतायत? आणि काहीसे घाबरलेले पण. बरं झालं त्यांना मी बाहेर होतो सांगितलं नाही. आणखी काळजी करत बसले असते उगाच.' बंटी अंग दुखतय हे विसरून खेळात रमून गेला.

झोपेत त्याला काहीबाही आठवत राहिलं........

**************************

आईबाबा :

"बंटी उठ राजा. किती वेळ झोपलायस. निघायचंय ना आपल्याला? बाबा दुसर्‍या जीपची व्यवस्था करायला केव्हाच गेलाय. आता येईलही. चल आटप पटकन. आंघोळ कर आणि ब्रेकफास्ट करून घे. अरे, तो बघ बाबा आला पण."

"काय बंटेश्वर, अजून तयार नाही तुम्ही? चला परत जायचंय आज आपल्याला"

**************************

बंटी :

"आई, बाबा. जायलाच हवं का? मला नाही यायचंय. मला इथेच रहायचंय..... रहायलाच लागेल. मला तुमच्यापासून दूर नाही जायचंय. पण काल तुम्ही माझ्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली ना? आपली जीप काही बंदबिंद पडली नाही तर ती त्या कड्यावरून खाली कोसळली ना?"

**************************

आईबाबा :

आईबाबा चांगलेच दचकले. "बंटी, राजा, तु घाबरून जाऊ नयेस म्हणून सांगितलं नाही तुला आम्ही. जीप कोसळतेय हे लक्षात येताच आम्ही दोघांनी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या मारल्या आणि कसातरी आमचा जीव वाचवलाय. नाहीतर काय झालं असतं ...बापरे! अजूनही आठवून शहारा येतोय. तुझ्याकरता रे बंटीबाबा, तुझ्याकरता आम्हाला देवानं जिवंत ठेवलं." आई बंटीला जवळ घेत म्हणाली.

**************************

बंटी :

"आईबाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले आईबाबा आहात. खरंच! पण मला इथून कुठेही दूर येता येणार नाही. मला इथेच रहावं लागेल. कारण .... कारण ..... काल तुमची गंमत करायला म्हणून मी जीपमध्ये मागे लपून बसलो होतो आणि झोपून गेलो ....... जीप वर काढली तर कळेल तुम्हाला!"

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle