एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही.