पलाश त्याची कामे करताना मधून मधून गर्दीत नोराला शोधत होता. अचानक ती दिसेनाशी झाली होती. पायल तर आधीच तिच्या वडिलांबरोबर निघून गेली होती. मिनूने त्याला गाठून नोराची चौकशी केल्यावर तो अगदीच गोंधळून गेला. मिनूलाही न सांगता ही गेली कुठे... त्याने बेकरीच्या मोबाईलवर कॉल केला. मारिया आंटीने फोन उचलला.
"मिया तुकाच फोन करत होता, माया येत होता पन पुलावरना पानी गेला. त्याला फोनपण लागत नाही. पाऊस थांबला की नोराला सकाळी धाडून देशील काय?" त्या म्हणाल्या.
पलाशला आता काळजी वाटायला लागली. पण जाणवू न देता "चालेल चालेल, सकाळी गाडीतून आणून सोडतो तिला. तुम्ही काळजी करू नका" म्हणून त्याने फोन ठेवला. बाहेर पार्टीत ती कुठेच दिसली नाही तेव्हा त्याला शंका आली. तो तीरासारखा गेटकडे धावला. गेटवरचे दोन्ही दिवे बंद होते. तो बाहेर पडला. काळोखात दिसत तर नव्हतेच पण मुसळधार पावसाच्या आवाजापुढे बाकी कसलाच आवाज येत नव्हता. तो हाका मारत काही पावलं आजूबाजूला फिरला तेव्हा कोपऱ्यात त्याला हालचाल जाणवली. भिंतीपाशी कोणीतरी माणूस झटापट करत होता.
शिट! त्याने हातातली छत्री बाजूला फेकून दिली आणि पळत तिथे पोचला. त्याने त्या माणसाची कॉलर धरून नाकावर एक मजबूत बुक्का मारला. तेवढ्यानेच तो झिंगलेला माणूस आडवा झाला. त्याच्या अंगावर वाकून त्याने चेहरा पाहिला. "केतन? तुला बघतो नंतर" म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर भिंतीला चिकटून ओलीचिंब नोरा थरथरत उभी होती. तिचा खांद्यावर फाटलेला ड्रेस कसाबसा तिच्या अंगावर टिकून होता. तिच्या चेहऱ्यावर ओघळणारे पाणी आणि विस्कटून चिकटलेल्या ओल्या बटांमधून तिचा चेहरा दिसत नव्हता.
"नोरा? नोरा?? तू ठीक आहेस ना?" त्याने तिचे खांदे धरून चेहऱ्यावरचे केस बाजूला करत विचारले.
तिने अस्फुट "हो. थँक गॉड तू आलास.." म्हणत तिने त्याच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. कोसळणाऱ्या नोराभोवती हात वेढल्यावर आपणही पूर्णपणे भिजल्याची त्याला जाणीव झाली.
एव्हाना वॉचमन पळत तिथे येऊन पोचला होता. "सॉरी साब, गेट की लाईट बंद हो गयी ना, वो प्लग चेक करने गया था." पलाशने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. "इसे एकसो बीसमे लेके जाओ और वही रखो. मै बादमें आ कर देखता हूँ." त्याने वॉचमनला घाईत सांगितले आणि त्याचे जी साब न ऐकता नोराला उचलून भराभर मागच्या दाराने आत घेऊन गेला. दुसऱ्या मजल्यावरच्या त्याच्या खोलीसमोर लिफ्टचे दार उघडले. ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती. त्याने घाईघाईने दार उघडले आणि तिला आत घेऊन गेला.
बाथरूममध्ये गीझर सुरू करून त्याने तिच्या तोंडावर गरम पाणी मारले तेव्हा कुठे तिला थोडी शुद्ध आली. तिला गरम पाण्याच्या टबमध्ये बसवून तो बाहेर आला. दहा पंधरा मिनिटांनीही ती बाहेर आली नाही म्हणून तो पुन्हा आत गेला. ती अजूनही गुंगीतच होती. शेवटी त्याने तिला ओले कपडे काढायला लावून आपला जाडजूड बाथ रोब घालायला दिला. तिला बेडवर टेकून बसवून ड्रायरने केस वाळवले. अंगावर सगळीकडे चेक करून प्रत्येक खरचटलेल्या जागी मलम लावले. त्याने दिलेली कॉम्बिफ्लाम तिने कशीबशी गिळली आणि ब्लॅंकेटच्या उबदार घोळात घुसून डोळे मिटले.
---
डोके बुडून जाणारी मऊ परांची उशी आणि त्याहून मऊ मऊ ब्लॅंकेटच्या गराड्यात तिने डोळे उघडले. डोकं बाहेर काढताच उन्हात न्हालेल्या आजूबाजूच्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि समोरची निम्मी भिंत व्यापलेले हिरव्या निळ्या रंगाच्या विविध शेड्समधले भलेमोठे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग. भल्यामोठ्या पांढऱ्या बेडच्या डाव्या बाजूची अख्खी काचेची भिंत आणि त्यातून दिसणारा उन्हात चमकणारा निळाभोर समुद्र. किनाऱ्यापाशी अलगद येऊन विरून जाणाऱ्या भरतीच्या उंच फेसळत्या लाटा. पूर्ण आयुष्य किनाऱ्याच्या गावात काढूनही तिने समुद्राचं इतकं सुंदर रुपडं कधी पाहिलं नव्हतं. उजव्या बाजूच्या साईड टेबलवर आकाशी काचेच्या फुलदाणीत असलेल्या तीन बहरलेल्या निशिगंधाच्या दांड्या, दाराशेजारच्या कोपऱ्यात मोठ्या लाल टेराकोटाच्या कुंडीत सळसळणारा हिरवागार अरेका पाम. सगळ्या काचेच्या आणि पांढऱ्या फर्निचरला बारीक निळे ऍक्सेन्ट्स.
तिला ती कुठे आहे हेच उमजत नव्हते पण पूर्ण जागी झाल्यावर हळूहळू तिला एकेक गोष्ट क्लिक व्हायला लागली. किर्र काळोखी रात्र, बाहेरचा महामूर पाऊस, भिजत मायाची वाट बघणारी ती, अचानक येऊन तिला पकडून किस करू पाहणारा झिंगलेला माणूस, तिचा फुटलेला मोबाईल, तिने त्याच्या पोटात गुढघा खुपसल्यावर त्वेषाने तो अजूनच तिच्या अंगावर आला होता, ती झगडून दमल्यावर नेमका तिथे आलेला पलाश! ओह गॉड! पटकन ब्लॅंकेट फेकत ती खाली उतरली. तिच्या अंगावर फक्त एक मोठा बाथ रोब होता. तिचे डोळे विस्फारले. तिचे कपडेही कुठे दिसत नव्हते. ती चक्कर येऊन पलाशच्या अंगावर पडल्यानंतरचा सगळा वेळ ब्लॅंक होता. घरी कशी जाणार, ममाच्या चौकश्याना काय उत्तरं देणार हे काहीच तिला समजत नव्हतं. तिने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर अकरा वाजले होते. तिला अश्या अवतारात बाहेरही पडता येत नव्हते. तिने शेजारी ठेवलेल्या बाटलीतून ग्लासभर पाणी प्यायले. बाथरूममध्ये जाऊन आली.
कंटाळा आल्यावर बेडशेजारचे दार उघडून तिने बाहेर पाहिले तर बांबू ब्लाइंडस् ने बंद केलेली टेरेस होती. भिंतीवर मोठी टीव्हीस्क्रीन आणि समोर गुबगुबीत निळा एल शेप सोफा होता. एका बाजूच्या कठड्यामागे गुलाबी अडेनियमच्या फुलांनी लदबदलेल्या कुंड्या होत्या आणि तिथेच एक कुशन घातलेला झुला लटकला होता. झुल्याशेजारी स्टूलवर 'सेपियन्स' ठेवलेलं होतं, तिने उचलून पाहिलं तर तीनशे तीन पानावर एक फॅन्सी बुकमार्क होता. इथेही फाईव्ह स्टार! तिने स्वतःची बुकमार्क म्हणून पेन्सिल, चमचा, कागदी कपटे वगैरे हाताला लागेल ते ठेवलेली पुस्तकं आठवून मान हलवली. तिने पुढे जाऊन दोरी खेचून एक ब्लाइंड थोडा वर केला आणि खाली डोकावली. खाली बरेचसे रिकामे झालेले पार्किंग आणि समोर समुद्र दिसत होता. दार लावून ती पुन्हा आत जाऊन बसली. रात्रीचे विचार अजूनही तिच्या डोक्यात येत होते पण ती त्यांना दूर ठेवायचा प्रयत्न करत होती.
लॅच फिरवल्याचा आवाज आला तशी ती पटकन पाय वर घेऊन ब्लॅंकेट अंगावर ओढून बसली. हातात ट्रे घेऊन पलाश आत आला आणि त्याने हळूच दार लावले. ग्रे जॉगर्सवर लूज पांढरा टी घालूनसुद्धा हा इतका हॉट कसाकाय दिसू शकतो! तिने ओठ चावला. त्याने तेवढ्यात वळून तिच्याकडे बघितले, गडबडून पटकन तिच्या तोंडून हाय! निसटले.
'अरे तू उठलीस! गुड, बरी आसा मां?" त्याने बेडशेजारी टेबलावर ट्रे ठेवत विचारले. ट्रेमध्ये चहाची कपबशी, बॉर्बन बिस्किटं आणि भरपूर कोथिंबीर खोबरं घातलेल्या उपम्याची प्लेट होती. ते बघूनच भुकेने तिच्या पोटातून आवाज येऊ लागले. तिने कशीबशी नजर ट्रेवरून हटवून त्याच्याकडे नेली.
"हम्म." तिला बोलायला नक्की कशी सुरुवात करावी कळेना.
त्यानेच बोलायला सुरुवात केली. "पहिली गोष्ट म्हणजे मी ब्लू लगूनच्या वतीने तुझी माफी मागतो. इथे कुठल्याही गेस्टची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे. काल जे झालं तो आमचा सिक्युरिटी लॅप्स होता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तो माणूस माझ्या ओळखीचा होता. तुला इथे आणल्यानंतर परत जाऊन मी त्याला सरळ केला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने तुला दुसरी कोणी मुलगी समजून नशेत हे केलं. पण काहीही असेल तरी त्याची व्यवस्थित शिक्षा त्याला मिळाली. सगळे वऱ्हाडी लोक चेकआऊट करून दहा वाजता निघाले. त्याला मुंबईत पोचल्यावर त्याच्या नाकासाठी एखादा प्लास्टिक सर्जन शोधावा लागेल." तो जरासं हसून म्हणाला.
नोराने हसायचा प्रयत्न केला.
"मी रात्री तुझ्या घरी कॉल केला होता, रात्री पुलावर पाणी भरल्यामुळे मायकलला येता आलं नाही. आंटीना बाकी काही सांगितलं नाही, मी तुला सकाळी घरी नेऊन सोडेन एवढंच बोलणं झालं."
तो पुढे म्हणाला.
हुश्श! तिने रोखून धरलेला श्वास सोडला. तिने ट्रेमधून पटकन एक बिस्कीट चहात बुडवून खाल्ले. पोटात काहीतरी गेल्यावर अचानक तिचा करंट पेटला.
"आणि माझे कपडे?" तिने कपाळाला हात लावून विचारले..
क्रमशः