रूपेरी वाळूत - १५

त्याने अलगद तिचे खांदे धरून तिला स्वतःपासून दूर केले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले पण तिला नेहमीचीच बेफिकिरी दिसली.

"व्हॉट द हेल पलाश!" ती भानावर येत ओरडली.

"तूच म्हणाली होतीस परफेक्ट मॅरेज 'शो' झालं पाहिजे." तो शांतपणे म्हणाला.

"मगे?" तिने कंबरेवर हात ठेवून विचारले.

"मगे.. तुझ्या बहिणीला तसं वाटलं असेल. आपण भांडताना ती इकडे येत होती. मेबी तिने काही ऐकलं असेल तरी आपल्याला एकत्र बघून ती ते विसरेल."

तिने फक्त नाक फुगवलं. तो सरळ बाल्कनीत जाऊन समोर बघत उभा राहिला. ती तशीच दाराला टेकून बाल्कनीच्या रेलिंगला हात टेकून पलीकडच्या हिरव्यागार गुलमोहोराच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणाऱ्या त्याच्या आकृतीकडे पहात राहिली.

थोड्या वेळात माया तिथे आला. तिने त्याच्याकडे आता काय? अश्या अर्थाने भुवया उंचावून पाहिल्यावर तो बोलायला लागला. "तू आत जा, मला पलाशजवळ थोडं बोलायचं आहे."

"भांडू नको आणि आवाज कमी." कुजबुजून ती आत गेली.

तो पलाशशेजारी जाऊन उभा राहिला आणि हातातली बडीशेप ऑफर केली. पलाशने थँक्स म्हणत हात पुढे केला.

"सो.. ते फोटो कुणी व्हायरल केले हे समजलं का? नोराला गावात खूप रिस्पेक्ट आहे, मी सगळ्या रिकामटेकड्या, टवाळ, गुंड पोरांना ओळखतो. त्यातला कोणीच नोराच्या वाटेला जाणार नाही हे मी पैजेवर सांगेन. हे कोणीतरी बाहेरच्याचे काम आहे. त्याला लवकर शोधून काढ. मी माझ्या साईडने प्रयत्न करतोच आहे पण साला पकडीत येत नाहीये." तो रागाने पलाशकडे बघत म्हणाला.

"हम्म, गेले काही दिवस रिसॉर्टवर खूप गर्दी होती त्यामुळे जास्त काही करता आलं नाही. आता फर्स्ट प्रायॉरिटी त्या माणसाला शोधायची आहे. मीपण त्याला सोडणार नाही." पलाश समोर बघत म्हणाला.

"इट्स गुड दॅट यू आर गेटिंग मॅरीड. पण ह्याच्या नंतर नोराला काहीही त्रास झाला तर मी कुणालाच स्पेअर करणार नाही हे लक्षात ठेव." तो पलाशकडे रोखून बघत म्हणाला.

पलाशने काही सेकंद त्याच्याकडे रोखून बघितले मग स्वतःला जरा कंट्रोल करून बोलू लागला. "ऑफ कोर्स, मी तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही. डोन्ट वरी!"

मायाने जरा हसून मान हलवली आणि पलाशच्या पाठीवर थाप मारून निघून गेला.

थोडा वेळ तो समोर वाकड्यातिकड्या पसरलेल्या गुलमोहोरावर पेटत पेटत उड्या मारणारे काजवे शांतपणे निरखत राहिला. जरा वेळाने घड्याळात बघितले तर साडेनऊ वाजत आले होते. तो परत आत हॉलमध्ये गेला तेव्हा बरेचसे नातेवाईक निघायच्या बेतात होते. थोड्या वेळात त्याचा निरोप घेऊन सगळे घर रिकामे झाले. तो सोफ्यावर नोरा शेजारी बसला होता. ममाच्या कुकिंगचं भरपूर कौतुक करून झाल्यावर बोलायला काही सुचत नाही म्हणून तो गप्प झाला आणि डॅडी बोलायला लागले.

"पलाश, नोरा.. पोरांनो तुम्ही ठरवलं म्हणून मी लग्नाला हो म्हणालो आहे. पण ही जबाबदारी कायमची असते, विचार करून ठरवलं आहे ना?" ते गंभीर होऊन म्हणाले.

पलाशने गडबडून नोराकडे पाहिले. तिने डोळे मोठे करून पाहिले. "ऑफ कोर्स डॅडी, तुमी कायेक काळजी करू नका." ताठ मानेने समोर बघत ती म्हणाली.

"डॅडी, त्यांका आत्ताच टेन्शन देऊ नका. पलाश लेट्स सी तुम्ही दोघे एकमेकांना किती ओळखता. इट्स अ फन गेम." माया डोळे बारीक करून हसत म्हणाला.

आता दोघांना खरंच टेन्शन आलं. मायाने दोघांना कागद पेन देऊन सोफ्याच्या दोन टोकांना बसवले.

"हम्म आता मी क्वेश्चन करेन. दोघांनी त्याचं आन्सर लिहून कागद आम्हाला दाखवायचा. नो चीटिंग" माया दोघांकडे बघता बघता शेवटी नोराकडे बघत म्हणाला.

"माया, तू कसले सडू प्रोग्रॅम बघतो रे टीव्हीवर!" तिने त्याला तोंड वाकडं करून दाखवलं.

"हम्म स्टार्ट. नोराला कुठला कलर आवडतो?"

पलाशने नोराच्या ड्रेसकडे बघून निळा लिहून टाकला. कागद दाखवून माया करेक्ट म्हणल्यावर तो उडालाच.

"पलाशकडे कुठला पेट आहे? कॅट ऑर डॉग?"

नोरा विचारात पडली, त्याच्याकडे कोणी पेट दिसला तर नाही. उलट नेहमी प्राण्यांवरून तो तिची खेचत असतो. "एकपण नाही, त्याला पेट्स आवडत नाहीत." तिने पेन रेटून लिहिले.

"ग्रेट! नो पेट्स. करेक्ट आन्सर" माया बारीक आवाजात म्हणाला.

नोराने पलाशकडे बघून नसलेली कॉलर ताठ केली.

"ओके, नोराला स्पोर्ट्समध्ये काय आवडतं?"

फुटबॉल मॅच आणि भिजून निथळणारी नोरा आठवून त्याने पटकन आवंढा गिळला आणि फुटबॉल लिहून टाकलं.

"करेक्ट अगेन. फुटबॉल." इम्प्रेस होत माया म्हणाला.

पलाशने नोराकडे बघून हलकेच डोळा मारला. त्याला काय आठवलं असेल ते जाणवून तिने लगेच त्याच्यावरून नजर हटवली.

"पलाशच्या हॉबीज काय आहेत?"

रीडींग. (टेबलावरचे सेपियन्स)
पेंटिंग. (भिंतीवरचे वॉटरकलर्स)

तिने पूर्ण अंदाजपंचे लिहून टाकलं.

"अमेझिंग!" आश्चर्याने माया ओरडला.

"माया, आता बस कर. किती त्रास देशील त्यांना?" डॅडीच कंटाळून म्हणाले.

हुश्श म्हणून नोराने पलाशकडे पाहिले. त्याने मान हलवली.

"चला मलाही निघायला हवं. बराच उशीर झाला. आज घरीच रहावं लागेल." म्हणत पलाश उठला.

" येत जा, हे तुझंही घर आहे आता.." म्हणत ममाने त्याच्या पाठीवर थोपटले. डॅडीना गुडबाय म्हणत त्याने त्यांचा हात हातात घेऊन थोपटला. तो दाराकडे निघाल्यावर त्याच्याकडे बघून मायाने हात उंचावला. तो दाराबाहेर पडून गेटकडे जाताना किर्रर्र अंधार होता. रस्त्यावरचा दिवाही अगदी मंद झाला होता. ओल्या जमिनीवरून न घसरण्याची काळजी घेत तो हळूहळू गाडीपर्यंत पोहोचला. रिमोटने अनलॉक झाल्याचा आवाज येतो तोच मागून नोराची हाक आली. अंगणातून येताना वाऱ्यावर लहरणारा तिचा पांढरा ड्रेस अंधारात उठून दिसत होता.

ती घाईघाईने त्याच्याजवळ आली. त्याने वळून आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.

"वॉव, गुडबाय किस! इज इट?" त्याने भुवया उंचावून विचारले.

"पीजे मारू नको. ममा बेबींका द्यायला विसरली." ती स्टीलचा गोल डबा पुढे करत म्हणाली.

"ओह!" गप्प होत त्याने डबा घेतला.

"मायाने तो क्विझ घेतला कारण नक्की त्याच्या डोक्यात आपल्याबद्दल संशय असणार आहे. थँकफुली वी वन." ती म्हणाली.

"ह्या रोमँटिक क्विझ वगैरेमध्ये थोडंसं डोकं चालवणारा कोणीही जिंकेल. देअर्स नथिंग रोमँटिक इन इट.." तो खांदे उडवत म्हणाला.

"हम्म, म्हणूनच मला तुझा डाउट होता." ती मिश्कीलपणे म्हणाली.

त्याने तिच्या डोळ्यात रागाने रोखून बघितले. तिला काही उत्तर देण्यापूर्वी वाऱ्याने गुलमोहोराच्या फांदीवरून त्यांच्यावर सरसरून थेंब ओघळले. त्याने त्रासिक चेहऱ्याने केसांमधून हात फिरवत वर पाहिले. पटकन तिला स्वतःकडे ओढत तो बाजूला सरकला आणि वरून कडकडत तीच फांदी नोराच्या पायाजवळ कोसळली. नोरा काही वेळ त्याचा हात घट्ट धरून स्तब्ध उभी राहिली.

"हूं! दॅट वॉज क्लोज! तुला लागलं नाही ना?" तो तिच्याकडे वरपासून खालपर्यंत निरखून बघत म्हणाला.

तिने नकारार्थी मान हलवली आणि खांद्यावरून ओघळलेला स्ट्रॅप पटकन वर सरकवला. "थँक्स.." ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

"काय? ऐकू नाही आलं." तो तिच्याकडे कान करून मोठ्याने म्हणाला.

"थँक्स! मला वाचवल्याबद्दल!"  नाक फुगवून तिने आवाज वाढवला.

"एनी टाईम. आय एम विथ यू" त्याने डोळे मिचकावले.

"ओके देन... सी यू.." ती खोटं हसत म्हणाली.

एकदम पुढे होत त्याने तिच्या गालाला गाल टेकवला. कानाजवळ हळुवार श्वास सोडत त्याने कुजबुजलेलं गुड नाईट तिला ऐकूच आलं नाही. तिच्या हृदयाची धडधड त्याला ऐकू जाऊ नये म्हणून प्रार्थना करत तिने छातीवर हात ठेवला आणि पापण्या मिटल्या. त्याचवेळी पलाशला वरच्या खिडकीतला माया, दारातून डोकावून बघणारी मारिया आंटी आणि तिला टपली मारून आत घेऊन जाणारे अंतू अंकल दिसत होते.

तिच्या जवळून तो लांब होताच "बाय" म्हणून मागे न बघता ती भराभर घरात निघून गेली. तो गाडीचे दार उघडून आत शिरला. स्टेअरिंग घट्ट पकडून त्याने डोळे मिटून खोल श्वास घेतला आणि गाडी सुरू केली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle