पलाश सकाळी रिसॉर्टवर निघण्यासाठी खाली आला तेव्हा अप्पा आणि शिरीषदादा शेतावर निघून गेले होते.
"पलाss श, मी घावणे करतंय, नाष्टा करून जा.." तो जिना उतरून माजघरात येताच स्वयंपाकघरातून मिक्सरच्या घुर्र आवाजावर आईचा आवाज आला.
मागच्या दारात संगी शर्वरीपाशी काहीतरी खुसखुसत होती. "जा ग संगे, कपडे धुवायचे पडलेत अजून तसेच." म्हणून तिने संगीला पिटाळले. वहिनीला तो खाली आल्याचे दिसताच तिने हळूच त्याला हाक मारली.
"पलाश, संगीने हा तुझा धुण्यातला शर्ट दिलाय. म्हटलं काही नवी फॅशन बिशन आहे की काय.." हसू दाबत शर्ट पुढे करत वहिनी म्हणाली.
त्याने काही न कळून शर्ट हातात घेतला. शर्टच्या उजव्या खांद्यावर चेक्समधून पटकन दिसून न येणारं एक चांदीचं कानातलं अडकलं होतं.
"वहिनी!" म्हणत त्याने पटकन कानातलं काढून खिशात टाकलं आणि तिच्याबरोबर खळखळून हसत आत जाताजाता थँक्स म्हणाला.
तोपर्यंत डायनिंग टेबलवर ताटात पांढरेशुभ्र, जाळीदार घावन आणि नुकत्याच फोडलेल्या ताज्या नारळाची मऊसूत चटणी वाढून आई त्याची वाट बघत बसली होती. "आ..हा. बेस्ट आई इन द वर्ल्ड!" म्हणत त्याने खुर्चीमागे उभ्या उभ्या आईच्या गळ्यात हात टाकले आणि मग शेजारी खुर्ची ओढून बसला.
बसताक्षणी आईने कालच्या डिनरबद्दल विचारायला सुरुवात केली. त्याला अंदाज होताच, त्यामुळे ठराविक उत्तरं देऊन त्याने आईची उत्सुकता शांत करून टाकली. खाण्यापिण्यात उशीर झाला म्हणून घाईघाईने तो रिसॉर्टवर पोहोचला. आठ दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी आलेले लोक आधीच आपापल्या खोलीत सेटल झाले होते. रिसेप्शनिस्टच्या गुड मॉर्निंगला उत्तर देऊन तो लिफ्टने त्याच्या खोलीकडे गेला. टेरेसमधल्या झुल्यात बसून समोर भरतीच्या फेसाळत्या लाटांकडे बघताना काल रात्रीचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यांसोर कलायडोस्कोपसारखे सरकत होते. नोराचा उत्साही, हसरा, चिडलेला, कंटाळलेला, वेगवेगळ्या मुड्समधला चेहरा पुनःपुन्हा त्याच्या आठवणीत तरळून जात होता.
अचानक काहीतरी आठवून त्याने खिशात हात घातला आणि ते कानातलं बाहेर काढलं. चिमटीत धरून तो ते निरखून पहात होता. चांदीच्या फिशटेल हुकला खाली चांदीत जडवलेल्या गोल कोंदणामध्ये नितळ पाण्यात हळूहळू पसरणाऱ्या सी ग्रीन शाईच्या ठिपक्यासारखा मॉस ऍगट स्टोन होता. त्याला त्याच्या मिठीत खांद्यावर टेकलेला तिचा गाल आणि गळ्याशी जाणवलेला उष्ण श्वास आठवला. बराच वेळ गेल्यानंतर त्याने ते ड्रॉवरमध्ये ठेवले आणि कामाला सुरुवात केली.
---
नोरा जागी झाली तीच मोबाईलच्या खणखणाटाने. तालुक्याहून ऑडिटर व्हिजिटसाठी निघाले आहेत हे सांगायला त्यांच्या असिस्टंटचा फोन होता. नोरा पटापट आवरून बाथरूममधून बाहेर आली. आरश्या समोर बसून केस विंचरताना तिचे कानाकडे लक्ष गेले. शिट! तिचं सगळ्यात आवडतं कानातलं गायब होतं. नेमका शोधायला वेळ नाही म्हणून तिने उरलेला पीस काढून डबीत ठेवला आणि दुसऱ्या इअररिंग्स घातल्या. हळहळत ती पटापट तयार झाली आणि दवाखान्याकडे निघाली.
तिच्या सगळ्या रेकॉर्ड फाईल्स, औषधांची स्टॉक स्टेटमेंट्स आणि बाकी सगळी कागदपत्रे अप टू डेट होतीच ती तिने एकदा नजरेखाली घातली. औषधांचा स्टॉक पुन्हा एकदा मोजला. डिपार्टमेंट कडे पाठवलेल्या क्वेरीज वगैरेंच्या कॉपी हातासरशी टेबलावर ठेवल्या. ऑडिटर येऊन चार पाच तास ऑडिट, जेवणखाण, चहा वडापाव वगैरे उरकून निघाले तेव्हा सहा वाजले होते. त्यांची गाडी नजरेआड होताच दवाखान्याला कुलूप लावून सटकायचा तिचा विचार होता. तिने भराभर पीसी बंद केला. चार्जर आणि पाण्याची बाटली बॅगेत टाकली. केसांवर स्कार्फ गुंडाळला आणि कुलूप लावता लावता फोन वाजला.
कुलूप पूर्ण लावून तिने बॅगमधून फोन बाहेर काढला. फाईव्ह स्टार कॉलिंग बघून तिला किंचित हसू आलं. "पलाश." ती बॅग बुलेटच्या सीटवर ठेऊन सीटला टेकून उभी रहात म्हणाली.
"नोरा! मी विचार करत होतो.. मायाने जसे प्रश्न विचारले तसे बरेच प्रश्न पुढे आपल्यासमोर येतील. सो लेट्स बी प्रीपेअर्ड." तो पटापट म्हणाला.
"ओके.. मग?" ती विचार करत म्हणाली.
"म..ग आपल्याला भेटावं लागेल आणि एकमेकांना नीट समजून घ्यावं लागेल." तो बोटाने टेबलाच्या काचेवरची वाळू निपटत म्हणाला.
"हम्म सो बेसिकली यू आर आस्किंग फॉर अ डेट!" तिने डोळे बारीक करून विचारले.
"मे बी. तसं समज. कमॉन! लग्न करायची आयडिया तुझी होती. डोन्ट ब्लेम मी फॉर द आफ्टरइफेक्टस्." तो सरळच म्हणाला.
तिने मोठा निःश्वास टाकला. "हम्म डेट तर डेट, पण कुठे? रिसॉर्टवर नको आणि घरी त्याहून नको."
"मला एक सेफ जागा माहिती आहे. उद्या तू किती वाजता फ्री होशील?"
"काही इमर्जन्सी नसेल तर तीन वाजता."
"चालेल, मी साडेतीनपर्यंत येतो. तयार रहा."
"ओके." म्हणून तिने फोन ठेवला आणि बुलेटला किक मारली. आफ्टरइफेक्टस्.. आफ्टरइफेक्टस्.. शिट.. हे कसं नाही डोक्यात आलं माझ्या.. तिच्या डोक्यात एकाच वेळी बऱ्याच वॉर्निंग बेल्स वाजत होत्या. घरी पोचल्यावर हात पाय धुवून तिने भरपूर आलं घालून चहा केला. चहाचा मग घेऊन खिडकीत बसल्यावर बाहेर गुलमोहोराच्या कोवळया पोपटी पालवीवर थेंबांची रांगोळी घालणारा पाऊस बघत चहाचे घोट घेताना हळूहळू ती शांत झाली. तिने कपाट उघडून उद्याचे कपडे फायनल केले आणि इस्त्री करायला घेतली.
---
मरूनवर मरून रंगाची शिफली एम्ब्रॉयडरी आणि छोट्याश्या कॅप स्लीव्ज असणारा तिचा आवडता कुर्ता पांढऱ्या सिगारेट पँटवर घालून ती तयार झाली. वरून चेंज म्हणून सुती पांढरी ओढणी खांद्यावर टाकली. कानात लहानसे झुमके अडकवले. नेहमीची पोनीटेल न घालता केसांचा थोडासा पफ करून क्लिप लावली. त्यातून बरेचसे सिल्की बँग्स चेहऱ्याला महिरप करून बाहेरच घसरत होते. तयार होतानाही 'हे काही स्पेशल नाही, इट्स जस्ट फॉर फन' म्हणून ती स्वतःलाच सांगत होती. दवाखान्यात नेमकं आज सकाळपासून काहीच काम आलं नव्हतं म्हणून ती एक दोन दिवसांचा राहिलेला डेटा एक्सेल शीटमध्ये भरत बसली.
बरोबर साडेतीनच्या ठोक्याला रस्त्यातून हॉर्न वाजला तेव्हा तिने मान वर करून पाहिले. थारच्या खिडकीत ठेवलेला हात आणि त्याचा गॉगलधारी चेहरा दिसल्यावर तिने पीसी शट डाउन केला. चष्मा काढून केसमध्ये ठेवला आणि दोन चार फाईल्स ड्रॉवरमध्ये टाकून ती उठली. रंगाचे टवके उडालेले दोन्ही दरवाजे ओढून तिने कुलूप लावले. लहानश्या लेदर सॅकच्या पुढच्या खिशात किल्ली टाकून, सॅक खांद्याला अडकवत ती पायऱ्या उतरून अंगणातून पुढे रस्त्याकडे आली.
दार उघडून ती आत बसली. ती त्याच्याकडे बघून हसल्यावर तो जरासा हसला. पण गॉगलमुळे त्याच्या डोळ्यातले भाव कळत नव्हते.
"तुला चष्मा आहे?"
ती समोर रस्त्याकडे बघत असताना अचानक तो म्हणाला.
तिला जरा हसू आलं, "का? लग्नाला नकार देणार आहेस?"
त्याने फक्त गॉगलच्या आत डोळे फिरवत मान हलवली.
"पीजे अपार्ट, नंबर नाही. फक्त स्क्रीनसमोर वापरते." ती पुढे म्हणाली.
"कॉन्शस टाईप!" तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
"ऐकू येतंय मला." तिने त्याच्याकडे वळून बघितले.
तो शांतपणे ड्राइव्ह करत राहिला. रिसॉर्टचा टर्न मागे टाकून पुढचा रस्ता लागल्यावर तिने प्रश्नांकित नजरेने त्याच्याकडे बघितले.
"कुठे चाललो आहोत आपण?" न रहावून तिने विचारलेच.
"वेट अँड वॉच! अजून फक्त पाच किलोमीटर्स." त्याने रस्त्यावरची नजर न हटवता उत्तर दिले.
तिने खांदे उडवून खिडकीच्या काचेला कपाळ टेकून डोळे मिटले. तो तिरक्या नजरेने तिकडे बघून हसला.
तिला झोपलेली बघून त्याने बारीक आवाजात मॉन्सून प्लेलिस्ट सुरू केली. सावन बरसे, तरसे दिल.. च्या शेवटच्या ओळीला जोरदार पावसाची सर आली आणि तो गाडी रस्त्यावरून खाली उतरवून लाइट हाऊसपाशी नेऊन थांबला. समोर काचेवरून निथळणाऱ्या पाण्यावरून नजर वळवून त्याने तिच्या दंडाला हलकेच स्पर्श केला.
"नोरा.. नोरा.." त्याचा आवाज थोडा वाढला.
"हूह?" तिने एकदम दचकून डोळे उघडले.
"आपण पोचलो आहोत." तो हात मागे घेत म्हणाला.
क्रमशः