रूपेरी वाळूत - १८

"नोराss हांगा यौ आणि तुझो ड्रेस पळय. कमॉन मॅन, ब्राईड तू आसली, मी ना!" इव्हा हातात टूल आणि लेसचे तुकडे हातात धरून मॅच करता करता ओरडली. समोर शिवण मशीनवरून नोराचा वेडिंग ड्रेस जमिनीवर ओघळून पसरला होता. जेमतेम रांगायला लागलेला सॅम हातातून कापडाचे तुकडे, चिंध्या उडवत कोपऱ्यातल्या कार्पेटवर खेळत होता.

"येतss य" म्हणून हातातला मोबाईल बाजूला ठेवून नोरा शेवटी त्या खोलीत आली.

"बघ" इव्हा अभिमानाने तिला आपलं क्रिएशन खांद्याला लावून दाखवत म्हणाली. ममाच्या पांढऱ्या सॅटीनच्या बेस ड्रेसवरचे खराब झालेले नेटचे फॅब्रिक काढून तिथे नाजूक फ्लोरल डिझाईनच्या लेसची घट्ट बॉडीस आणि तळाशी फ्लोरल लेस ऍप्लिक लावलेला ए लाईन स्कर्ट शिवला होता. मूळच्या स्वीटहार्ट नेकलाईनवर पातळ फ्लोरल लेसची व्ही नेक आणि लांब बाह्या शिवल्या होत्या.

"वॉव! यू आर अमेझिंग इव्हा!" नोराने पुढे होत तिला ड्रेससकट मिठी मारली.

"हळू गो म्याडा, ड्रेस खराब जातलो.." इव्हा हसत उद्गारली. "आत्ता सामको घालून दाखव.  मागीर झाल्या अल्टर करू."

"पाच मिनिटात आयलंय!" म्हणून ती ड्रेस घेऊन तिच्या खोलीत गेली. नाजूकपणे इकडे तिकडे खेचला न जाण्याची काळजी घेत तिने ड्रेस घातला. ड्रेस घालून आरशासमोर उभी राहिल्यावर तिला लग्न खरंच उद्यावर आल्याची जाणीव झाली. यू हॅव टू डू धिस.. म्हणत तिने दुखणारे कपाळ दाबत डोळे मिटले. पाच मिनिटात खांदे सरळ करत ताठ मानेने ती बाहेर आली.

तिला बघताच इव्हाने जोरात शिट्टी वाजवली, तिच्या कडेवरचा सॅमपण हसत अगम्य भाषेत काहीतरी बडबडू  लागला.

"बेब, यू लुक हॉट!!" तिला गोल फिरवून बघत इव्हा म्हणाली, "पलाश पळल्या फ्लॅट जातलो! तेचोय तोटको हाडलो हवें." तिने डोळा मारत टेबलाकडे बोट केलं.

नोराने टेबलावरचा गुलाबी बो लावलेला काळा बॉक्स उचलला. झाकण उघडताच आत शीअर ब्लॅक लेसच्या ब्रालेट, थॉन्ग, त्यावर तश्याच लेसचा नूडल स्ट्रॅप आणि खोल व्ही नेक असलेला अतीच लहानसा बेबीडॉल त्याच्यावर किमोनो बाह्यांचा तसाच गुळगुळीत पारदर्शक नी लेंथ काळा रोब असे विविध छोटेछोटे कपडे दिसले. डॅम!! हे घालून पलाशसमोर जायची कल्पना करून धडधडणाऱ्या हृदयाने तिने ओठ चावला. इव्हा तिच्याकडे भुवया उंचावून पहात हसत होती. "माय गिफ्ट!" ती हसता हसता म्हणाली.

"इव्हा, तु जाणा, हाव असले घालपाचे ना." ती जरा खोटं लाजत म्हणाली.

"ऱ्हाव गो! तसो मूड जाईतो घाल माज्ये बाय." म्हणून तिने अजून एक ब्लॅकवर बेबी पिंक फ्लोरल प्रिंटवाला सॅटिनचा कॅमी टॉप, शॉर्ट्स आणि पायघोळ पजामा दाखवला.

"गो यडचापा, दुकान लुटून हाडलं?" नोरा आश्चर्याने म्हणाली.

"किते करचे? टॉमबॉय कझीन निड्स इव्हा स्पेशल गर्लिश कोचिंग! डोन्ट वरी, हॉटी! ही सगळी ऑनलाइन सेलची ब्रँडेड लॉटरी! हाव फेव्हरिटात टाकले आणि आता ओन्ली साईज चेंज करून, प्लेस्ड द ऑर्डर, इझी." ती दात दाखवत म्हणाली.

नोराने थक्क होऊन फक्त मान हलवली. रात्री जागून त्यांनी पॅक केलेली तिची कपड्यांची बॅग तयार होती. बाकी नेहमीचे कपडे, चपला, पुस्तकं आणि इकडम तिकडम वस्तू भरलेल्या चार पाच बॅग्स नंतर माया आणून देणार होता.

तेवढ्यात ममा आत आली, नोराला बघून तिच्या डोळ्यातून पाणीच ओघळले, तिला मिठी मारून रडता रडता तिने डॅडींना हाक मारली. त्यांनी आत येऊन हसत नोराच्या कपाळाची पापी घेतल्यावर तिला आपण यांना किती फसवतोय याची जाणीव होऊन अजूनच रडायला आलं. जेवणं झाल्यावर सगळ्यांशी हसताना, गप्पा मारतानाही तिचं मन तिला खात होतं पण आता मागे फिरायचा रस्ता नव्हता. रात्रभर कूस बदलत पहाट होतहोता तिला कशीबशी झोप लागली.

----

सकाळी गडबड गोंधळ करत सगळे तयार झाले तरी नोराचा मेकअप सुरू होता. नॅचरल न्यूड मेकअप करून इव्हाने तिच्या ओठांवर डस्ट रोज लिपस्टिक लावली आणि नोराभोवती फिरून पाहिलं. वेडिंग गाऊन, मेकअप, रेशमी केस मागे घेऊन केलेला फ्रेंच ट्विस्ट त्यात एका बाजूने खोचलेला नाजूक मोत्याच्या फुलांचा हेअरपीस हे सगळं असूनही तिला काहीतरी कमी वाटत होतं.

"एक मिनीट! माझ्याकडे एक्झॅक्ट वस्तू आहे. तो मारिया आंटीचा लॉंग वेल खूप बोर आहे त्याबदली आपण हे वापरू.." म्हणत तिने बॅगमधून लहानश्या पीनेवर अडकवलेला जेमतेम चार इंची पातळ पांढऱ्या टूलवर बारीक मोती विखुरलेला वेल काढला. नोराच्या प्रश्नार्थक नजरेकडे लक्ष न देता तिने तो नोराच्या चेहऱ्यावर तिरका येईल असा केसांमध्ये खोचला. "हा आहे बर्डकेज वेल." नोराने मस्कारामुळे दाट दिसणाऱ्या पापण्या उचलत त्या जाळीतून समोर आरश्यात पाहिले. "माय परफेक्ट ब्लशिंग ब्राईड!" म्हणत इव्हाने तिच्याकडे एक फ्लाईंग किस फेकला.

खालून मायाने तिला हाक मारायला तोंड उघडेपर्यंत ती दारात पोहोचली होती. तिला बघून त्याचं तोंड उघडंच राहिलं. मग हळूच तिच्या जवळ येऊन तिच्या ड्रेसला काही होणार नाही अशी मिठी मारून त्याने पाठीवर थोपटले. ममा आणि डॅडी आधीच कारमध्ये बसले होते. दोन दिवस मेहनत घेऊन मायाने त्याची जुनी ब्लॅक स्विफ्ट चमकवली होती. बॉनेटवर मोठा गुलाबी जरबेरांचा बुके चिकटवला होता आणि हँडल बार्स खाली पिंक रिबनचे वाऱ्यावर उडणारे बो होते. चक्क मायाने तिच्यासाठी इतकी मेहनत घेतलेली बघून तिने थॅंक्यू म्हणून हाताने हार्ट साइन करून दाखवले. मोठं हसून त्याने तिच्यासाठी दार उघडलं.

---

पलाश अप्पा आणि दादा वहिनीबरोबर अर्धा तास आधीच रजिस्ट्रार ऑफिसला पोहोचला होता. आई घरातली तयारी करत थांबली होती. नोराच्या गाऊनला मॅचिंग म्हणून त्याने नेव्ही ब्लू ट्रावझर्स, स्लिम फिट सूट आणि आत पांढरा करकरीत शर्ट घातला होता. नोराची वाट बघत जरा टेन्स होऊन तो इमारतीबाहेरच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत येरझारा घालत होता. त्याचे चमकते ब्लॅक शूज लाल मातीत उठून दिसत होते. अचानक ब्रेकच्या आवाजाने त्याने चमकून गेटबाहेर पाहिले. मायाने पळत पलीकडे जाऊन कारचा दरवाजा उघडला. नोराने हाताने ड्रेस वर उचलत न्यूड हिल्स घातलेला पाय खाली ठेवला आणि दुसऱ्या हाताने मायाचा हात धरून जपून खाली उतरली. तो स्लो मोशनमध्ये खालपासून वरपर्यंत तिच्याकडे पहात राहिला. नोरा इतकी हृदयाचा चुराडा करणारी दिसेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. त्याने अचानक कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि डोळे मिटून रोखलेला श्वास सोडला.

धिस इज इट! देअर इज नो गोइंग बॅक म्हणून स्वतःला सांगत त्याने पाऊल पुढे टाकले. ती जवळ येताच त्याने हसून तिच्याकडे पाहिले. तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांत पाहून त्याला तिची घालमेल जाणवली. त्याने तिच्या थरथरणाऱ्या बोटांमध्ये स्वतःची लांब बोटे गुंतवली आणि हात घट्ट धरला. ती थोडी शांत होऊन त्याच्याकडे बघून हसली आणि सगळे आत गेले. आत सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर रजिस्ट्रारने त्यांचे नाव पुकारले.

त्यांच्या आणि साक्षीदारांच्या सह्या झाल्यावर पलाशने खिशातून लहानशी डबी काढून रिंग बाहेर काढली. बारीक फुला पानांचे दोन वेढे दिलेली सोन्याची नाजूक रिंग आणि त्यातल्या फुलांच्या मध्यावर जडवलेले छोटेसे हिरे बघून तिला धक्काच बसला. पलाश काहीतरी जेनेरीक साधी रिंग आणेल अशीच तिची कल्पना होती. तिचा हात हातात घेऊन त्याने रिंग बोटात सरकवली. किंचित लूज होती पण बोटात बसत होती. "इट्स ओके.." ती हळूच कुजबुजली. त्याने मान हलवली.  तोवर डॅडींनी हातातली प्लेन सोन्याची रिंग तिच्याकडे दिली. त्याच्या बोटात ती परफेक्ट बसली. त्याने तिच्या गळ्यात एक लहानसे मंगळसूत्र आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यावर टाळ्यांच्या आणि शुभेच्छांच्या गजरात शिरीषदादाने एक कन्फेटीचा फटाका फोडला.

"यू मे कि.." मायाने बोलायला तोंड उघडताच पलाशने डोळे मोठे करून नकारार्थी मान हलवत त्याला थांबवले. नोराने वेलआडून पापण्या उचलून कल्पनेनेच गडद झालेल्या पलाशच्या डोळ्यात पाहिले.

क्रमशः

The bride
images (8)_0.jpeg

The ring
2021-07-25-00-10-00-223.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle