रूपेरी वाळूत - १९

"हे.. मला वाटलं आजकाल लग्न झाल्यावर मुली रडत नाहीत." ड्राइव्ह करता करता समोरच्या बॉक्समधला टिश्यू तिच्याकडे धरत तो म्हणाला.

तिने काही न बोलता टिश्यू घेऊन डोळ्यातून ओघळलेले पाणी टिपले. "आय नो, राईट?!" ती किंचित हसली. "मेबी ह्या फेक वेडिंगच्या स्ट्रेसमुळे असेल. नशीब माझा मस्कारा वॉटरप्रूफ आहे."

"द वेडिंग इज रिअल! प्लीज डोन्ट फर्गेट." तो तिच्या डोळ्यात खोल कुठेतरी बघत म्हणाला.

तिने मान हलवली. "तुझी वहिनी खूप कूल आहे. आय नीडेड टू बी अलोन" कोर्टाबाहेर आल्यावर वहिनीने गाडीत गर्दी होईल म्हणून त्यांना दोघांना थारमधून जाण्यासाठी अप्पांना कंविन्स केलेले तिला आठवले.

"हम्म." तो हसला.

"सगळ्यांबरोबर जाताना मला खूप स्ट्रेस आला असता." गिल्टी वाटून पुन्हा तिचे डोळे भरायला लागले.

"नोरा, दिस मॅरेज इज ऍज रिअल ऍज इट गेट्स!  आपण जे ठरवलंय ते आपल्या दोघातच राहील. मी तुझ्या बरोबर आहे. प्लीज तुझ्या डोक्यातला गिल्ट काढून टाक. अम्म.. तुला चीअर अप करायला काहीतरी आहे. तो ग्लव्ह बॉक्स उघड."

तिने परत एकदा डोळे पुसून हात लांबवून ग्लव्ह बॉक्स उघडला. तो सोनेरी फाईव्ह स्टार्सने खचाखच भरलेला होता. तिने गपकन तोंडावर हात ठेवून हळूच त्याच्याकडे बघितले.

"आय हॅव टू लिव्ह अप्टू द नेम!" तो समोर उन्हात  चमकणाऱ्या रस्त्यावर नजर ठेवून तिरकस हसत म्हणाला.

तिने काही न बोलता हसू दाबत रॅपर फाडून पटकन अर्धी फाईव्ह स्टार तोंडात भरली. तेवढ्या वेळात त्याने म्युझिक प्लेयरवर 'लीव्ह द डोअर ओपन' सुरू केलं आणि गाण्याबरोबर स्वतः मान पुढे मागे हलवत गायला लागला. त्याने तिच्याकडे पाहून भुवया उंचावून ऍक्सेन्टमध्ये 'ओह, यू गॉट प्लॅन्स? डोन्ट से दॅट..' म्हटल्यावर नोरा चॉकलेट भरल्या तोंडाने शक्य तितकी खळखळून हसली.

---

त्याने उघड्या गेटमधून आत जाऊन अंगणात गाडी थांबवली. दरवाजाला एक भलेमोठे झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावले होते. नोरा पलाशच्या हातात हात देऊन गाऊन सावरत उतरली तेव्हा लगेच खणाचा घेरदार फ्रॉक घातलेली गार्गी पायऱ्यांवरून दुडदुडत येऊन तिच्या दुसऱ्या हाताला चिकटली. अंगणातून तीन पायऱ्या चढून ते दारात पोचल्यावर पलाशच्या आईने चपला काढायला सांगून दोघांच्याही पायावर दूध आणि कोमट पाणी घातले. औक्षण करून ओवाळले आणि नोराला उंबरठ्यावरचे माप ओलांडायला सांगितले.

"हळू... किक नको मारू" पलाश हसत तिच्या कानात कुजबुजला. तिने नाक फुगवून दाखवत पायाने हळूच माप ढकलले आणि खाली घातलेल्या गुलाब आणि झेंडूच्या पाकळ्यांच्या पायघड्यांवरून ती आत गेली. देव्हाऱ्यापाशी जाऊन दोघांनी नमस्कार केल्यावर सगळे माजघरात गप्पा मारत बसले. बराच वेळ गप्पा आणि खाणंपिणं झाल्यावर पलाशने तोंडावर हात धरून एक जांभई दिली.

"तुम्ही दोघं थकले असाल, आता आराम करा." म्हणून आई म्हणल्यावर नोराने पलाशकडे पाहिले. "ऊहुं, इतक्यात नाही. आज तुला आमच्या खोलीत रहायचं आहे, शिरीष जाईल पलाशच्या खोलीत झोपायला." तेवढ्यात शर्वरी मिश्किल हसत म्हणाली. नोरा डोक्यावरचं मणभर ओझं उतरल्यासारखी हसली.

सगळं घर फिरून दाखवून शेवटी त्या बेडरूममध्ये गेल्या. "मम्मा, ही एल्सा आहे का?" इतका वेळ नोराच्या गाऊनला हळूच हात लावून पळणारी गार्गी आता जरा धीटपणा करत होती. " ना गं गागूष्का, ही नोराकाकू आहे." शर्वरी तिचा गाल ओढत म्हणाली. "नाss ही एल्साच आहे."  नोराजवळ जाऊन गालाला हात लावत ती म्हणाली. हसता हसता नोराने तिचा वेल काढून गार्गीच्या डोक्यावरच्या कारंज्यात बसवला. "आं.. मी प्रिन्सेस! लेट इट गो... लेट इट गो ss " म्हणत ती इकडे तिकडे नाचत सुटली.

थोड्या वेळाने नोराने कपडे बदलून लूज पांढरी पटियाला सलवार आणि निळ्या इकतचा कुर्ता घातला. वर बारीक चंदेरी ठिपके असलेली एक पातळ सुती ओढणी घेतली. चेहऱ्यावरचा मेकअप पुसून, केस विंचरून नेहमीप्रमाणे उंच पोनिटेल घातली. घरी कॉल करून थोडावेळ बेडवर पडून राहिल्यावर तिला कंटाळा आला. तिने माजघरात जाऊन पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पलाश बहुतेक वर त्याच्या खोलीत असावा. स्वयंपाकघरातून आवाज येत होता म्हणून ती तिकडे वळली. आई आणि शर्वरी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. तिने त्यांच्याबरोबर गप्पा मारत, त्या नको नको म्हणताना कोशिंबिरीसाठी काकडी चोचवायला सुरुवात केली.

"आई ss वर पाणी नाही ठेवलेलं." म्हणत गार्गीला खांद्यावर बसवून तो स्वयंपाकघरात आला. आतल्या टेबलापाशी बसून बिरडे सोलणाऱ्या आई, वहिनी आणि त्याच्याकडे पाठ करून ओट्याजवळ काहीतरी करणाऱ्या नोराला तो बघतच राहिला. आई आणि वहिनी एकमेकींकडे बघून हसल्या. एकदम आपण इथे का आलो ते आठवून तो फ्रिजकडे गेला. बाटलीतून घटाघट पाणी पिऊन तो वळताच मागून नोराचा आवाज आला. "पलाश, प्लीज बॉटल भरून ठेवशील का?"

"या.. ओके, सॉरी" गडबडून म्हणत त्याने बाटली भरून फ्रीजमध्ये ठेवली आणि गार्गीला पटकन बाहेर खेळायला घेऊन गेला.

आतून तिघींच्या हसण्याचा आवाज त्याला बाहेरपर्यंत येत होता.

---

रात्री जेवायला बसल्यावर नोराला सहजपणे त्यांच्यातलीच एक असल्याप्रमाणे हसताना, बोलताना, हातवारे करताना बघून मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्याला खूप मऊ मऊ वाटत होतं. तो नेहमीप्रमाणे बोलताना, सगळ्यांना हसवताना नकळत तिच्या रिऍक्शन्सवर लक्ष ठेऊन होता. त्याच्या नेहमीच्या ऍटीट्यूड दाखवणाऱ्या, वैताग देणाऱ्या बाहेरच्या रुपाआड दडलेला हा घरगुती, शांत, मऊ पलाश तिला पहिल्यांदाच दिसत होता. नकळत त्याचं बोलणं ती कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पहिल्यांदाच नीट ऐकत होती.

रात्री जेवणं झाल्यावर मेहंदीशिवाय लग्नाला काही मजा नाही म्हणत शर्वरीने पटापट तिचे दोन्ही हातभर मेहंदी काढून दिली. हातांवर प्लास्टिक बॅग्स बांधून तिला कधी झोप लागली तेच कळलं नाही. पहाटे कधीतरी तिला जाग आली. घसा कोरडा पडल्याचे जाणवून तिने शेजारच्या टेबलवर पाहिले. तिथे रिकामी बाटली उभी होती. शेजारी शर्वरी गाढ झोपेत बारीक घोरत होती.आता उठावंच लागेल म्हणून जरा कंटाळून ती उठून बसली. शर्वरीला न उठवण्याची काळजी घेत हलक्या पावलांनी दार उघडून ती माजघरात आली.

खिडकीतून चंद्रप्रकाशाची तिरीप आत आली होती. तेवढ्या उजेडात तिला वावरायला दिसत होते. ती हळूहळू डायनिंग टेबलापाशी पोचली आणि समोर कोणाला तरी बघून तिने किंचाळायला तोंड उघडताच पलाशने हातातल्या थंड बॉटलसकट मागे वळून पाहिले. तिची किंकाळी आतल्या आतच विरून गेली. "थँक् गॉड!" ती धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवत म्हणाली. "हूं! पलॅश प्लीज प्यानी भरून ठ्येवशील कॅ? असं कोणीतरी सांगितलं होतं. आता काय झालं?" तो जवळ तोंड आणून तिची नक्कल करत कुजबुजला. "हम्म, तरीही मीच बॉटल खोलीत ठेवायला विसरले." ती खुसफुस करत म्हणाली. त्याने बाटली टेबलवर ठेवली आणि बाजूला झाला.

तिने हातावर रबर लावलेल्या पिशव्यांसकट बाटली उघडायचा प्रयत्न केला पण तिला काही केल्या ते जमत नव्हतं. "हे काय आहे सगळं?" तिच्या हातांकडे बघून त्याने विचारले. "मेहंदी! अपारंटली मेहंदी इज मँडेटरी फॉर अ ब्राईड!" तिने दात दाखवून पुन्हा खुसखुस केली. पाच मिनिटं तिचे बाटली उघडण्याचे उद्योग बघून कंटाळून त्याने मान हलवली आणि समोरचा ग्लास घेऊन त्यात पाणी ओतले.

हम्म.. तिच्या जवळ जात ग्लास तिच्या ओठांपाशी धरून तो उभा राहिला आणि दुसरा तळहात तिच्या डोक्यामागे धरून डोक्याला आधार दिला. तिच्या शॅम्पूचा हलका कोकोनटी, फ्रूटी गंध त्याच्या नाकाला जाणवला. ती ग्लासच्या काठावरून त्याच्या काळोखात न दिसणाऱ्या डोळ्यांत बघत पटापट पाणी पीत होती. मानेवर स्थिरावलेली त्याची ऊबदार लांबसडक बोटे हळूहळू मानेवरून तिच्या मोकळ्या रेशमी केसांमध्ये शिरली तेव्हा नकळत तिच्या अंगावर शहारा आला. तिच्या जराश्या हालचालीने हातातला ग्लास डचमळल्यावर भानावर येत त्याने पटकन केसांतला हात काढून घेतला. तिने घाईघाईने बस, थँक्स म्हणून पाऊल मागे घेतलं आणि गरम झालेल्या गालांवर हाताचे तळवे दाबत खोलीत पळून गेली.

क्रमशः

Bruno Mars, Anderson .Paak, Silk Sonic - Leave the Door Open

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle