'ट' ट्रेडमार्कचा - भाग २ - ट्रेडमार्क म्हणजे काय?

मागील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4699

मागील भागात आपण वेगवेगळ्या बौद्धिक संपदांचे प्रकार बघितले. त्यातला एक महत्वाचा आणि सर्वाधिक प्रचलित प्रकार म्हणजे ट्रेडमार्क. आजकाल सारं काही 'ब्रँडेड' वापरण्याच्या युगात ट्रेडमार्क्स चे महत्व अनन्यसाधारण वाढले नसते तरच नवल होते.

'ट्रेडमार्क' च्या नावातच ट्रेड आहे. 'ट्रेड' म्हणजेच व्यापार/ खरेदी-विक्री / सेवा (Services) देणे-घेणे. 'मार्क' म्हणजे खूण. एखाद्या विशिष्ट व्यापारी/ विक्रेता, सेवादाता (Service Provider) याची वेगळी ओळख पटवणारी कोणतीही खूण म्हणजे 'ट्रेडमार्क'. अश्या खुणा वेगवगेळ्या प्रकारच्या असू शकतात.

'ऍपल', 'बाटा', 'क्रोसीन', 'डेअरी मिल्क' हि आपल्या उत्पादकांची ओळख पटवून देणारी नावं (ट्रेडनेम्स) आहेत.

स्टारबक्सची हिरवी राणी, ऍपलचे उष्टे सफरचंद, मर्सिडीझचा गोल आणि त्यातलया विशिष्ट रेखा, गुगलचा रंगीत G, ट्विटरची चिमणी, फेसबुकचा F, अँड्रॉइडचा हिरवा रोबोट, मॅकडॉनल्ड चा M हि सारी 'लोगो' ची उदाहरणे आहेत.

'जस्ट डू इट', 'आयेम लव्हिंग इट', 'जिंदगी के साथ भी.. जिंदगी के बाद भी', 'अटरली बटरली डिलिशीयस..'जी ललचाये.. रहा ना जाये', 'द टेस्ट ऑफ इंडिया', 'बजाते रहो', 'पेहले इस्तेमाल करें.. फिर विश्वास करें' या टॅग लाईन्स वाचून तुम्ही अगदी सहज त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे नाव सांगू शकता. म्हणूनच टॅग लाईन्स चा सुद्धा ट्रेडमार्क मध्ये समावेश होतो.

अनेक वर्षे जाहिरातीत वापरली जाणारी ऍनिमेटेड कॅरेक्टर्स सुद्धा प्रॉडक्ट/ सर्व्हिसेस ची ओळख बनली आहेत आणि म्हणूनच ट्रेडमार्क मध्ये त्यांचाही समावेश होतो. अमूल च्या जाहिरातीतली पोलका डॉट्स चा फ्रॉक घातलेली मुलगी, पिल्सबरी आटा च्या जाहिरातीतले कणकेचे गोंडस कार्टून, वोल्ट डीझने चा मिकी, चिटोझ चा चित्ता, एअर इंडिया चा महाराजा, व्होडाफोन चे क्युट झूझू हे सगळे मॅस्कॉट्स ट्रेडमार्कच्या अंतर्गत प्रोटेक्टड आहेत.

काही रंगसंगती पाहिल्यावर सुद्धा आपल्याला प्रॉडकट्स/सर्व्हिसेस ओळखता येतात. डेअरी मिल्क चा विशिष्ट जांभळा रंग, पेप्सीचे लाल-निळे कॉम्बिनेशन, मॅकडॉनल्ड्सचे लाल-पिवळे कॉम्बिनेशन, स्टारबक्सची हिरवी राणी/ परी, बिसलेरीचा विशिष्ट सी ग्रीन रंग, लेज चिप्स चे पिवळे-लाल कॉम्बिनेशन, रेड बुल चे लाल-निळे-मेटल कलर कॉम्बो, कोडॅकच्या लोगो मधले पिवळे-लाल कॉम्बिनेशन अशी अनेक उदाहरणे देता येतील. यांना देखील ट्रेडमार्क अंतर्गत प्रोटेक्शन आहे.

'टिंग टिंग टिडींग' वाचल्यावर (हेही तुम्ही चालीत वाचले असेल याची खात्री आहे) काय आठवतंय? एअरटेलसाठी ए आर रेहमान ने बनवलेली सिग्नेचर ट्यून आठवतेय? याहू ची 'याहूSSSSS' अशी मारलेली हाक आठवतेय? जुनी अतिफेमस नोकिया ट्यून, ऍपल, सॅमसंगच्या कॅची रिंगटोन्स सुद्धा ट्रेडमार्क मध्ये येतात.

हल्ली नव्याने काही विशिष्ट वासांवरही ट्रेडमार्क घ्यायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भारतात अजूनही कागदावर मांडता येणार नाही अश्या ट्रेडमार्क्सना प्रोटेक्शन नाहीये. तरीही पुण्यातील काही हॉटेल्सचे (विशेषतः मांसाहारी) याविषयी एकत्रित प्रयत्न सुरु आहेत. भारताबाहेर काही कंपन्यांनी त्यांच्या काही प्रोडक्टस च्या युनिक वासाचे ट्रेडमार्क्स घेतल्याची अगदी तुरळक उदाहरणे आहेत.

थोडक्यात.. तुमचे प्रोडक्ट/तुम्ही देत असलेली सर्व्हिस यांचे इतर प्रॉडक्ट वा सेवा देणार्यांपासून वेगळेपण दाखवणारी कोणतीही गोष्ट म्हणजे ट्रेडमार्क. एखादी गोष्ट ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर होण्यास / प्रचलित होण्यास कितपत लायक आहे याचे एकमेव परिमाण म्हणजे त्याचे वेगळेपण, हटकेपण, युनिकनेस !!!

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4717

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle