मागील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4705
मागच्या भागात आपण 'ट्रेडमार्क म्हणजे काय?' हे बघितल्यावर 'त्यात बसत नाही ते सगळे ट्रेडमार्क नाहीत' असं एका वाक्यात हा लेख उरकता येईल. पण इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये हे इतकं सोपं प्रकरण नाही हे मला उमगलं आहे. एखादा ट्रेडमार्क / लोगो / टॅग लाईन हि आपल्या बिझनेस ची ओळख आहे असं तुम्हाला वाटत असलं तरी तो ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर होण्यास पात्र आहे कि नाही (विशेषतः भारतात) यासाठी त्याला अनेक क्रायटेरियातून जावं लागतं. भारतातील सद्य ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे ट्रेडमार्क कसा नसावा ते आपण बघुयात.
१. वेगळेपण नसलेला:
बौद्धिक संपदांचा बेसच युनिकनेस / हटकेपण/ वेगळेपण हे आहे. त्यामुळे ट्रेडमार्क म्हणून वापरले जाणारे नाव / चिन्ह / टॅग लाईन हे आपले वेगळेपण असलेले असावे. सफरचंद विकणाऱ्या माणसाला 'ऍपल' हा ब्रँड मिळणे तितकेच अवघड आहे जितके सेलफोन बनवणाऱ्या कंपनीला 'मोबाईल' हा शब्द ट्रेडमार्क म्हणून मिळणे. जर 'मोबाईल' हा शब्द एखाद्याला ट्रेडमार्क म्हणून दिला गेला तर पुढे सर्वच सेलफोन कंपन्यांना 'मोबाईल' हा शब्दच वापरता येणार नाही जे एकप्रकारे अन्यायकारक ठरेल. मागच्या वर्षी गुगलने त्यांच्या बहुचर्चित गुगल ग्लासचा ट्रेडमार्क नुस्त्या ‘ग्लास’ या नावाने नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला. यात ‘ग्लास’ हा शब्द मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण अक्षरामध्ये लिहिलेला होता; पण अर्थातच हा ट्रेडमार्क मंजूर केला तर दुसऱ्या कुठल्याही काचेच्या वस्तू उदा. चष्मे बनविणाऱ्या उत्पादकाला त्याच्या उत्पादनाची जाहिरात करताना ग्लास हा शब्द वापरताच येणार नाही. या कारणास्तव हा ट्रेडमार्क नाकारला गेला. 'सायकल' हा ट्रेडमार्क अगरबत्तीच्या ब्रँडसाठी अगदी सहज मिळाला पण सायकलच्या कंपनीला मुळीच मिळणार नाही. ट्रेडमार्क ज्या उत्पादन / सेवेसाठी वापरला गेला आहे त्याचेच नाव ट्रेडमार्क म्हणून घेता येत नाही. नुकताच एका फार्मा कंपनीला 'फार्मा ड्रग्स' हा ट्रेडमार्क नाकारला गेला तो याच कारणाने.
२. प्रोडक्टचे गुणधर्म / वजन / क्वालिटी / नैसर्गिक आकार सांगणारे मार्क:
तुमच्या घराजवळच्या नाक्यावरच्या 'ए-१ समोसे'वाल्याकडचे सामोसे बेस्ट असतात म्हणता? तरीही त्याला ट्रेडमार्क मिळणार नाही. स्टेशनजवळच्या 'सुंदर साडी भांडार' मध्ये कीतीही सुंदर साड्या मिळत असल्या तरीही 'सुंदर साड्या' हा ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येणार नाही. 'राउंड पिझ्झा', 'सुगंधी अगरबत्ती', 'फास्ट सायकल' 'फोल्डिंगची खुर्ची' 'रेडी टू मेक पावभाजी' अशी नावं केवळ आकार / गुणधर्म सांगणारे आहेत. निव्वळ वजन/ क्वालिटी / गुणधर्म / नैसर्गिक आकार सांगणारे शब्द ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.
३. प्रचलित चिन्हे/ खुणा/ रासायनिक किंवा गणिती सूत्रे:
प्रॉफिट वाढण्याचे निर्देशक असणारा अपवर्ड बाण, एखाद्या गोष्टीला नकार देणारी फुली ची खूण, वेगवेगळे दिशादर्शक बाण, बुल्स आय साठी आपण बरोब्बर मध्ये बाण लागलेला डार्ट बोर्ड वापरतो तो, whatsapp मधल्या विविध स्मायलीज ट्रेडमार्क म्हणून घेता येत नाहीत. तसेच वेगवेगळी रासायनिक आणि गणिती सूत्रे सुद्धा ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.
४. लोकांच्या मनात संभ्रम / गोंधळ निर्माण करणारे ट्रेडमार्क्स:
ऑलरेडी इतरांच्या प्रचलित, रजिस्टर्ड असलेल्या ट्रेडमार्क्सशी साधर्म्य दाखवणारे, प्रचलित/ रजिस्टर्ड ट्रेडमार्क्सची सरळ सरळ कॉपी करणारे आणि लोकांच्या मनात गोंधळ तयार करणारे मार्क्स/ नावं ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत. हा संभ्रम कधी तयार होतो? तर जेव्हा तुम्ही प्रचलित ट्रेडमार्क्सचे नाव फक्त थोडेफार स्पेलिंग बदलून वापरता (Reliance आणि Relianse) किंवा आपल्या लोगोत रजिस्टर्ड असलेल्या ट्रेडमार्कशी मिळती जुळती रंगसंगती वापरता (डेअरी मिल्क चा जांभळा रंग कॉपी करून छोट्या खेडेगावांमध्ये फेक चॉकलेट्स बेकायदेशीररीत्या विकली जातात), ट्रेडमार्क चे स्पेलिंग असे बनवता जे दिसताना पूर्ण वेगळे असेल पण उच्चार अगदीच सारखे असतील तरीही ते रजिस्टर करता येत नाहीत (कोडॅक आणि मोडॅक). एखाद्या प्रचलित ट्रेडमार्क चे नाव इंग्रजीत लिहिलेले असेल तर तुम्ही फक्त ते नाव देवनागरी किंवा अन्य लिपीत लिहून किंवा भाषांतर करून (व्हिक्टोरियाचे गुपित) रजिस्टर करू शकत नाही.
५. भारतातील कोणत्याही समूहाच्या धार्मिक किंवा अन्य भावना दुखावणारे ट्रेडमार्क्स:
साईबाबा, गणपतीबाप्पा, तिरुपती बालाजी या नावाने पूर्वी ट्रेडमार्क मिळत होते आता मिळत नाहीत. औरंगजेब, शिवाजी महाराज, महात्मा गांधी या नावाने ट्रेडमार्क्स भारतात मिळणे अशक्य आहे. 'ओम नमः शिवाय' किंवा कुराणातील किंवा बायबल मधील साहित्य ट्रेडमार्क करता येणार नाही.
६. अश्लील/बीभत्स/धक्कादायक/गैर असे शब्द/चित्र/लोगो/आवाज/वाक्य ऑब्व्हियस कारणाने ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.
७. नेम अँड एम्ब्लेम्स कायद्यात उल्लेख केलेली नावं आणि चिन्ह ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाही. उदाहरणार्थ भारताचा झेंडा, भारत हे नाव, भारताची राजमुद्रा, महात्मा गांधी हे नाव, पंडित नेहरू हे नाव, भारतरत्न किंवा पद्मश्री सारख्या सरकारने दिलेल्या पदव्या/उपाध्या इत्यादी इत्यादी.
८. अन्य प्रकारातली बौद्धिक संपदा:
एखादा फोटो ट्रेडमार्क मध्ये रजिस्टर करण्याऐवजी कॉपीराईट म्हणून रजिस्टर करणे अधिक सोपे आहे. ट्रेडमार्क मध्ये भौगोलिक निर्देश असल्यास (रत्नागिरी हापूस, कोल्हापुरी चपला वगैरे) जिऑग्राफिकल इंडिकेटर्सच्या अंतर्गत रजिस्टर होतात. त्याला ट्रेडमार्क अंतर्गत संरक्षण नाही.
तुम्हाला ट्रेडमार्क म्हणून हवं असलेलं नाव या सगळ्या क्रायटेरियात बसतंय ना आणि बसत नसेल तर कसं बसवता येईल यासाठी या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीची मदत घेणे केव्हाही उपयोगी पडते.
- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)
पुढील भागाची लींकः https://www.maitrin.com/node/4731