नमस्कार !!
गेली १४ वर्षे बौद्धिक संपदा या क्षेत्रात काम केल्यानंतर आणि १००० हुन अधिक ट्रेडमार्क एकहाती रजिस्टर केल्यानंतर याबाबतीत थोडी माहिती सर्वांना द्यावी असं वाटलं म्हणून एक छोटोशी लेखमालिका सुरु करते आहे. आवडली तर नक्की कळवा. तुमच्या शंका, सूचना, प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे.
ट्रेडमार्क विषयी बोलण्याआधी आपल्याला भारतात आणि भारताबाहेर ओळख असलेल्या विविध बौद्धिक संपदा (Intellectual Properties)आणि त्यांच्या अधिकारांविषयी (Rights) समजून घेणे अनिवार्य आहे.
बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय?
जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेंव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी! त्या निर्मितीच्या प्रकारावरून बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
१. पेटंट्स:
एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला त्या उत्पादनावर किंवा त्या प्रक्रियेवर स्वामित्व हक्क मिळतात (Ownership Right) त्यांना पेटंट्स किंवा शुद्ध मराठीत एकस्व असं म्हणतात. याची उदाहरणे म्हणजे विविध औषधांचे फॉर्म्युले, नवीन टेक्नॉलॉजीज (ऍपल विरुद्ध सॅमसंग हि या बाबतीतली अगदी ताजी केस आहे), अगदी खास धान्ये/ बियाणे (बासमती आणि हळद यांच्यासाठी भारताने दिलेली फाईट बऱ्यापैकी गाजलेली आहे).
२. कॉपीराईट्स:
कलाक्षेत्रातील कोणत्याही नवनिर्मितीवर उदाहरणार्थ लेख, कविता, साहित्य, चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, ऑडिओ, व्हिडीओ इत्यादीवर त्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला जे हक्क मिळतात त्याला म्हणतात कॉपीराईट्स. (इलियाराजा आणि एस पी बालसुब्रमनियम यांची केस या बाबतीत बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे). याव्यतिरिक्त विविध वाङ्मयचौर्य आणि संबंधित गोष्टींविषयी फेसबुक आणि अन्य संस्थळांवर नेहेमी चर्चा होतच असते.
३. डिझाईन्स/ इंडस्ट्रिअल डिझाईन्स:
एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, वेगळ्या/ हटके आकारावर जे स्वामित्व हक्क घेता येतात त्याला डिझाइन रजिस्ट्रेशन असे म्हणतात. कोकच्या बाटलीचे डिझाईन हे अश्या प्रकारे प्रोटेक्ट केलेलं आहे. तसेच Air Wick नावाच्या कंपनीचे एअर फ्रेशनर आपण वापरतो, त्याच्या बाटलीचे वैशिष्टयपूर्ण डिझाइन सुद्धा प्रोटेक्ट केलेले आहे.
४. जिओग्राफिकल इंडीकेशन / भौगोलिक निर्देशक:
कोल्हापुरी चप्पल, येवल्याची पैठणी, बिकानेर भुजिया, रत्नागिरी हापूस इत्यादी उदाहरणे भौगोलिक निर्देशकांशी जोडलेली आहेत. अश्या ठिकाणी बनलेल्या सर्व उत्पादकांना(च) आपल्या उत्पादनावर त्या त्या स्थानाचा उल्लेख करण्याची परवानगी असते.
५. ट्रेडमार्क:
हा आपल्या लेखमालेचाच विषय असल्याने 'ट्रेडमार्क म्हणजे काय?' इथपासून 'काय म्हणजे ट्रेडमार्क नाही?' इथपर्यंत सगळंच पुढील लेखात येत जाईल.
यातल्या प्रत्येक बौद्धिक संपदेचा विषय, हक्क, त्या हक्कांना दिले जाणारे संरक्षण आणि त्या संरक्षणाचे प्रकार / नियम हे वेगवेगळे आहेत. जसे कॉपीराईट हे कलाकाराला त्याच्या कलेसाठी योग्य तो मानसन्मान (आणि काही आर्थिक मोबदला असला तर तोही) मिळावा यासाठी असते तर ट्रेडमार्क हे ग्राहकांना त्यांच्या उत्पादकाची खात्री पटावी यासाठी केले जाते. पेटंट हे शास्त्रज्ञाने केलेल्या इन्व्हेंशनच्या वापराचे सर्व अधिकार त्याच्याकडेच राहावेत म्हणून केले जाते तर भौगोलिक निर्देशक हे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी उपयोगी ठरते.
आपल्याकडून कोणत्याही प्रकारची निर्मिती झाल्यावर ती नक्की कोणत्या प्रकारात मोडते आणि तिला कश्याप्रकारे संरक्षित करता येईल हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची मदत घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.
- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)
तळटीपा:
१. तुम्हाला ट्रेडमार्क विषयी काय काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा. मी या लेखमालेत त्या सर्व पैलूंचा समावेश करायचा नक्की प्रयत्न करेन.
२. मोठ्ठे आणि पाल्हाळिक लिखाण करण्याऐवजी छोटे छोटे भाग प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. तुम्हाला हि पद्धत आवडेल अशी आशा आहे.
३. हि सर्व लेखमाला लिहिताना अनेक ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर अनिवार्य आहे. तसेच मनात येईल तसे लिहीत गेल्याने अनेक ठिकाणी सोपे इंग्रजी प्रतिशब्द वापरले गेले आहेत त्याबद्दल आधीच क्षमा मागते. कोणालाही वेळ / इच्छा असल्यास मुद्रितशोधन करून दिल्यास मूळ लेखात नक्की कॉपी पेस्ट करेन.
पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4705