'ट' ट्रेडमार्कचा - भाग ५ - ट्रेडमार्क का रजिस्टर करावा?

मागील भागाची लिंक: https://www.maitrin.com/node/4731

ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन विषयी वेगवेगळे पैलू पुढील भागात आपण बघणार आहोतच. तत्पूर्वी या भागात आपण बघुयात कि मुळात ट्रेडमार्क रजिस्टर का करावा? भारतात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणे इतर देशांप्रमाणे अनिवार्य नाही ऐच्छिक आहे. ट्रेडमार्क रजिस्टर केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यातले काही खाली देत आहे.

१. कायदेशीर मालकी हक्क:

अर्थातच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्याचं सर्वात महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे प्रॉडक्ट/ सर्व्हिसेसच्या युनिक नावाचे कायदेशीर हक्क स्वतः कडे घेणे आणि ते नाव / लोगो / टॅग लाईन वगैरे वापरण्याचे सर्वाधिकार स्वतः कडे ठेवणे हे आहे. रजिस्टर झालेल्या ट्रेडमार्क च्या वर उजवीकडे बरेचदा वर्तुळात आर हे अक्षर लिहिलेलं आपण पाहिलं असेल. हा 'आर' "खबरदार या ट्रेडमार्कची कॉपी कराल तर.." असंच अप्रत्यक्षरीत्या सगळ्यांना सांगत असतो.

या मालकी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तुम्ही कायद्याची मदत घेऊन कॉपी करणाऱ्या माणसाला तुरुंगाची हवा दाखवू शकता, त्याच्या मालावर जप्ती आणू शकता, त्याच्या गोडाऊनला टाळं ठोकू शकता, कोर्टाकडे याचना करून त्याला घसघशीत दंड भरायला लावू शकता.. इतकंच कश्याला.. तुमचं नाव वापरून त्याने जो बिझनेस केला आहे किंवा प्रॉफिट कमावले आहे ते सगळेच्या सगळे (तुम्ही डायरेक्ट काहीही कष्ट केलेले नसतानाही) तुम्हाला मिळतील अशी व्यवस्था कोर्टाच्या मदतीने करू शकता.

२. युनिक नाव ब्लॉक करणे:

आपल्याशिवाय / आपल्याव्यतिरिक्त कोणालाही आपण निवडलेले, आपल्याला सुचलेले युनिक/ कॅची नाव वापरता येऊ नये यासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून ते ब्लॉक करता येते. यासाठी ट्रेडमार्क मध्ये प्रॉडक्ट लॉन्च होण्याआधीच नाव रजिस्ट्रेशन करून ठेवण्याची सोय देण्यात आली आहे. अश्या ट्रेडमार्क्सना 'प्रपोझ्ड टू बी युज्ड' असं म्हणतात.

३. इतरांना सारखे (सिमिलर) नाव / लोगो वापरण्यापासून अटकाव करणे:

जेव्हा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असतो तेव्हा त्याच्या आसपाससुद्धा जाणारा दुसरा ट्रेडमार्क रजिस्टर होऊ नये यासाठी भारताच्या बौद्धिक संपदा विभागाकडून अगदी नीट लक्ष दिले जाते. कारण तुमचं नाव काय आहे, लोगो कसा आहे हे त्यांना ठाऊक असते. तुम्ही तुमचं नाव ट्रेडमार्क अंतर्गत रजिस्टरच करत नाही तेव्हा त्यांना मुळातच तुमचे नाव/ लोगो याविषयी ठाऊकच नसते. त्यामुळे इतर कोणी साधारणपणे सारखे नाव घेऊन डिपार्टमेंटकडे गेल्यास अर्थातच ते सिमिलर/ सेम असूनही नंतरच्या माणसाला मिळण्याचे चान्सेस वाढतात.

एवढेच कश्याला? सिमिलर नाव घेऊनसुद्धा केवळ रजिस्ट्रेशन केलेले असल्याने नंतरच्या वापरकर्त्याने आधीच्या वापरकर्त्यावर केस केल्याची अनेक उदाहरणे आमच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.

४. मालकीहक्काचा कायदेशीर पुरावा:

भारतात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य नसले तरी ते न करण्याचा मनस्ताप इतका जास्त आहे ज्याची कल्पना असणारा कोणीही सुज्ञ माणूस ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ऑप्शनला टाकणार नाही. जिथे जिथे तुम्हाला लोगो / नावासंदर्भात कोणतीही कायदेशीर फाईट द्यायची वेळ येते तेव्हा एक ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे तुमच्या मनस्तापाचे किमान ३ महिने वाचवतात असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. अनरजिस्टर्ड युझर विरुद्ध रजिस्टर्ड युझर अशी केस कधी उभी राहिलीच तर अनरजिस्टर्ड युझरला आपल्याला हे नाव किंवा लोगो कधी/ कसा सुचला, त्याने तो सर्वप्रथम कधी-कुठे-कसा वापरला इथपासून सगळं प्रूव्ह करावं लागतं. आणि तसं करूनही त्याचे केस जिंकण्याचे चान्सेस रजिस्टर्ड युझरच्या तुलनेत अगदी नगण्य असतात.

५. नावाचे वेगळेपण जपणे:

वर आपण बघितलं तसं जेव्हा रजिस्टर्ड ट्रेडमार्कशी सिमिलर असणारे नाव इतरांना दिले जात नाही तेव्हा आपण निवडलेल्या नावाचे वेगळेपण जपता येते. आपल्या नावावर विसंबून प्रॉडक्ट घेणाऱ्या कस्टमर्सच्या मनात शंका कुशंका राहत नाहीत.

६. संपूर्ण प्रॉडक्ट रेंजसाठी प्रोटेक्शन:

शिवाय प्रोटेक्शन त्या क्लासमधील सर्वच्या सर्व प्रॉड्क्टससाठी दिले जात असल्याने कस्टमर्सना तुमची संपूर्ण प्रॉडक्ट रेंज ओळखता येते. जसं कि एखादी कॉस्मेटिक कंपनी आज फक्त लिप्स्टीक बनवत असेल तरी तिला ट्रेडमार्क रजिस्टर केल्यावर सर्वसाधारणपणे कॉस्मेटिक रेंज मध्ये येणाऱ्या मस्कारा पासून फाउंडेशन पर्यंत सगळ्याच प्रॉड्क्टससाठी ते नाव ब्लॉक करून मिळते. अनरजिस्टर्ड ट्रेडमार्कला हे फायदे मिळत नाहीत

७. ऍसेट बनवणे:

बिझनेस चे रेप्युटेशन/ गुडविल हे बिझनेसचे ऍसेट असते. ते विकता येते, त्याची फ्रॅंचाईजी देता येते, बॅलन्स शीट मध्ये लिहिलेले असते, अकाऊंटिंग नि इन्कम टॅक्स भरताना गुडविलला फार महत्व असते. रजिस्टर्ड ट्रेडमार्क हे सगळे फायदे एनकॅश करणे सोपे करते.

८. इंटरनॅशनल ओळख:

भारतात रजिस्टर केलेल्या ट्रेडमार्कला भारताबाहेर रजिस्टर करताना तेच सगळे फायदे मिळतात जे भारतात रजिस्टर केले त्याच दिवशी त्यांच्याच देशात सुद्धा रजिस्टर केल्यावर मिळाले असते. भारताने अनेक देशांसोबत केलेल्या माद्रीद कराराअंतर्गत हे फायदे मिळतात.

फेमस लॅकॉस्टे विरुद्ध क्रोकोडाईल ब्रँडच्या केसमध्ये पुन्हा नव्याने सिद्ध झाले कि ट्रेडमार्क रजिस्टर केला तर इंटरनॅशनल कोर्ट सुद्धा कोणत्याही देशाने दिलेल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चा अपमान करत नाही आणि होऊही देत नाही.

९. बिझनेसचा विस्तार:

बिझनेस आणि त्याचे नाव याविषयी जिथे जिथे निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा भारतात ट्रेडमार्क डिपार्टमेंट आणि त्यांचा निवाडा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मी व्यवसायाने सी एस सुद्धा आहे. आणि प्रत्येक नवीन कंपनी / एल एल पी सुरु करताना मला ट्रेडमार्कला वळसा घालून जाताच येत नाही.

थोडं सोपं करून सांगायचं तर जर तुम्ही प्रोप्रायटर असाल आणि तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर नसेल तर तुमच्या ब्रँडची कंपनी मी अगदी सहज सुरु करू शकते. इतकंच कश्याला? पुढे जाऊन तुम्हालाच तुम्ही प्रोप्रायटरी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरु करताना त्यात व्यवस्थित अडथळे निर्माण करू शकते. आमच्याकडे २०-२० वर्ष जुन्या प्रोपायटरी फर्म किंवा पार्टनरशिपचे कंपनीत कन्व्हर्जन करायला अनेकदा क्लाएंट्स येतात आणि आपल्या बिझनेसच्या नावाने आधीच ढीगभर कंपन्या आहेत हे बघून तोंडात बोटं घालून परत जातात.

हेच जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर असेल तर कोणालाच त्या नावाने प्रोप्रायटरशीप, पार्टनरशिप, ट्रस्ट, सोसायटी, कंपनी, एल एल पी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) यातलं काहीही सुरु करताना ते नाव घेता येणार नाही. कारण याबाबतीतले कायदे अगदी कडक आहेत.

सो भविष्यात बिझनेसचा विस्तार करायचा असेल (जो सगळ्यांनाच करायचाच असतो).. तर आपल्या बिझनेसचे नाव आत्ताच लॉक करून ठेवलेले फायद्याचे ठरते.

१०. कायमस्वरूपी प्रोटेक्शन:

रजिस्टर झालेला ट्रेडमार्क ज्या दिवशी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केले त्या दिवसापासून १० वर्षांसाठी वैध असतो. आणि पेटंट / कॉपीराईटसारखा तो एक्सपायर होत नाही. म्हणजेच १० वर्षांनंतर सुद्धा तो पुढील १० वर्षांसाठी रिन्यू करता येतो आणि त्यानंतरही असा १०-१०-१० वर्षांसाठी रिन्यू करता येतो. एका विशिष्ट कालावधीनंतर पेटंट आणि कॉपीराईट मध्ये असलेले एक्स्क्ल्युजीव हक्क संपतात आणि तो शोध किंवा ते साहित्य सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध होते. ट्रेडमार्क मात्र अनंतकाळासाठी फक्त आणि फक्त तुमचा.. तुमच्यानंतर तुमच्या वारसांचा आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांचा राहतो.

असे ट्रेडमार्क रजिस्टर करण्याचे ढोबळमानाने फायदे सांगता येतील. याव्यतिरिक्त रजिस्टर केलेल्या ट्रेडमार्कचे रेप्युटेशन मार्केट मध्ये वाढते (जसे प्रोपायटरशीपचे कंपनीत रूपांतर केल्याने बिझनेसचे रेप्युटेशन आपोआप वाढते) ज्याचे मोजमाप पैश्यात करता येत नाही.

एक चांगला ट्रेडमार्क तज्ञ तुम्हाला तुमच्या बिझनेसला यातील कोण(कोण)ते फायदे अप्लाय होतात हे शोधायला आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यायला मदत करतो.

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/5076

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle