पलाश तिला उचलून आत शिरताच, ती शिंकता शिंकता शक्य तितके ओरडत "पलाश, माका सोड, खाली ठेव" म्हणून हातपाय झाडत सुटायचा प्रयत्न करायला लागली. "काम डाउन, सगळीकडे पाणी व्हायला नको म्हणून तुला बाथरूममध्ये नेतोय. " तो पटापट जिना चढताना म्हणाला. गप्प होऊन तिने त्याच्या छातीवर डोकं टेकलं. तिने डोकं टेकलेल्या जागी त्याचा शर्ट भिजत होता. तिने मान वर करून त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला पण तो ओठ घट्ट मिटून समोर बघत होता. त्याने लक्ष दिले नाही तरी छातीला टेकलेल्या कानात त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. शेवटच्या पायरीपाशी त्याने तिचं वजन थोडं शिफ्ट करायला हात हलवताच ओला टॉप गोळा होत वर सरकला आणि तिच्या उघड्या पाठीवर त्याचा हात स्थिरावला. तिच्या शरीराचे तापमान अचानक वाढले. त्याने आत जाऊन बाथरूममध्ये तिला उतरवून पटकन बेडरूम बाहेर पडून दार लावून घेतले.
दाराबाहेर थांबून त्याने डोळे मिटून खोल श्वास घेतला. आजवर त्याला कुठल्याही मुलीच्या जवळ येण्याने इतके अफेक्ट केले नव्हते. तिच्या विचारांमधून बाहेर पडायला तो किचनमध्ये गेला. दीड स्कूप कॉफी आणि पाणी घालून त्याने कॉफी मेकर ऑन केला. शेजारच्या फिश टॅन्ककडे पाहिले तर तो घाणेरडा मासा टॅन्कच्या तळाशी रेतीचे कण उडवत तोंडाने खोदत होता. तोंड वाकडं करून त्याने टॅंकमध्ये फिश स्टिक्स टाकल्या. माश्याने पटकन वर येऊन बकाबक खायला सुरुवात केली. पाच सहा मिनिटं त्याला सहन केल्यावर कॉफी तयार झाली.
दोन पांढरे सिरॅमिक मग्ज भरून तो बाहेर आला तेव्हा जिन्यातून सांडलेले पाणी मॉपने पुसत नोरा खाली येत होती. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळले होते, कपडे बदलून स्नूपीचे चित्र असलेला फेडेड पिवळट टीशर्ट आणि ढगळ पांढरा प्रिंटेड पाजामा घातला होता. थँक् गॉड! सोफ्यावर बसून तिच्याकडे बघताना ती शेवटच्या पायरीवर पोचली आणि तिने त्याच्याकडे पाहिले. त्याने मग उंचावून दाखवल्यावर ती मॉप कोपऱ्यात ठेऊन आली. थँक्स! दोन्ही हातात मग धरून ती त्याच्या शेजारी टेकली. तो शांतपणे कॉफी पित खिडकीच्या काचेतून बाहेरच्या गुलाबी पांढऱ्या बोगनविलियाकडे बघत होता.
"सो, हाऊ वॉज युअर डे?" तिने एक पाय सोफ्यावर ठेऊन त्याच्याकडे वळत विचारले.
"बिझी! विपश्यना शिबीराचा अजून एक दिवस शिल्लक आहे आणि आज एक मोठा वेडिंगवाला ग्रुप आलाय. एकांची इनर पीस आणि एकाचा डीजे मॅनेज करता करता दमलोय" तो बोलत असतानाच तिने हात शेकत कॉफीचा घोट घेतला आणि तोंड पिळवटून मग टेबलवर ठेवला. "तू रोज 'अशी' कॉफी पितोस?" तोंड वाकडं करत तिने विचारलं.
"ती कोलंबिअन ब्रू वापरून केलेली बेस्ट ब्लॅक कॉफी आहे." तो कॉफीचा खोलवर वास घेत म्हणाला.
"असेल, हा कडू काढा पिण्यापेक्षा मला आलं आणि म्हशीचं दूध घातलेला चहा आवडेल. एनी टाईम!" ती कसाबसा अजून एक घोट गिळत म्हणाली.
"गाढवाला गुळाची चव काय.." तो पुटपुटला.
"हेय!! माझे कान शार्प आहेत."
"गुड फॉर यू." त्याने खांदे उडवले. "तू ग्रोसरीज का घेऊन आलीस? मला लिस्ट दे, रिसॉर्टची ग्रोसरी येईल तेव्हा घरीपण डिलिव्हर करतील." तो तिच्याकडे वळून बसत म्हणाला.
"ओह, सॉरी हे माझ्या डोक्यात नाही आलं. फाईव्ह स्टार नवरा, फाईव्ह स्टार डिलिव्हरी!" तीने टोमणा मारला. तो हसत असतानाच दोन्ही मग उचलून ती किचनमध्ये गेली. दोन मिनिटात आतून "शिट! पलाssश" म्हणून ओरडण्याचा आवाज आला. तो पळत आत गेला तेव्हा ती सिंकपाशी मग धुता धुता थांबून मागे वळून पहात होती.. "मासा मासा.. प्लीज त्याला आत टाक. माझ्या हाताला साबण आहे."
"व्हॉट?" त्याने बघितले तेव्हा मासा कॅबिनेटवर तडाम तुडूम ऊडत होता. त्याच्या आजूबाजूला पाणी उडून थेंबांची छोटी छोटी तळी साचली होती. त्याने जवळ जाऊन यssक म्हणत तो बुळबुळीत, घसरडा मासा कसातरी दोन्ही हाताच्या ओंजळीत धरून पुन्हा पाण्यात टाकला. तो गपकन तळाशी जाऊन लपला. "शिट, तू काय केलंस त्याला? वैतागून जीव देत होता बिचारा." तो तिच्याकडे बघून म्हणाला.
"टॅंकचं झाकण लाव." ती मागे न बघता म्हणाली.
मग्ज विसळून उलटे वाळत ठेऊन ती त्याच्या जवळ आली. "हा टायगर ऑस्कर आहे. खूप स्ट्रॉंग असतात हे. खाणं शोधत पाण्याच्या वर येतात आणि बाहेर उडी मारतात. झाकण कोणी उघडं ठेवलं?"
"मीच." तिच्याकडे न बघता उत्तर आले. त्याने पटकन झाकण सरकवले.
"गार्गीला डेंटिस्टकडे नेलं होतं तेव्हा बाहेरच्या दुकानातून हा घ्यायला लावला तिने. तिला गोल्डफिश द्यायचा होता पण ते संपले म्हणून मग जो मिळाला तो त्यांनी आणला. तिला माहिती आहे मला घरातली मांजर आवडत नाही म्हणून मुद्दाम दिलाय तिने." तो माश्याकडे वैतागून बघत म्हणाला.
"हम्म. नाव काय आहे याचं?" तिने माश्याकडे प्रेमाने बघत विचारले.
"मासा."
"काय??"
"मा सा."
"यू आर क्रेझी." ती हसत म्हणाली. "ओके तू नाव ठेवलंच आहेस तर तेच म्हणू त्याला."
"हेय मासा!" तिने काचेतून त्याच्याकडे बघून हात हलवला. मासाही खालून काचेत तिच्या जवळ येऊन तरंगला.
तोंड वाकडं करून पलाश बाहेर जाऊन सोफ्यावर आडवा झाला. मागोमाग ती गोल टॅंक दोन्ही हातात धरून बाहेर आली. "मासा बेडरूममध्ये ठेवते. त्याला सारखं खायला लागतं आणि कंपनी पण लागते. तो एकटा कंटाळून जाईल."
"तुझ्या बेडरूममध्ये. मला सकाळी उठल्यावर रोज त्याचं तोंड नाही बघायचं." तो वैतागलाच.
"हॅलो! तो 'आपल्याला' दिलाय तिने. माझ्या खोलीत ठेवते, बट यू हॅव टू फीड इट अँड शेअर रिस्पॉन्सीबिलिटी." ती ठाम होती. "आणि अजून एक. हा दर महिन्याला इंचभर वाढतो. पुढच्या दोन तीन महिन्यात त्याला मोठा टॅंक लागेल."
"मासा आहे की मॉंस्टर! नुसता खातो आणि डोळे फाडून रोखून बघत असतो. पापणीपण मिटत नाही" बोलता बोलता उठून तिच्या मागोमाग जिना चढून तो वर पोचला होता. तिने गेस्ट बेडरूममधल्या टेबलवर फिशटॅन्क ठेवला.
"कारण माश्यांना पापण्या नसतात." ती हसत म्हणाली.
"ओह!" तो जरासा हसला. "सो तू इथे रहाणार आहेस?"
"हम्म. थोडे कपडे कपाटात आहेत ते आणते इकडे की झालं. बाकी बॅग्ज मी आधीच आणून ठेवल्यात." ती नजरेला नजर न देता म्हणाली.
"गुड." छातीत एक बारीकशी कळ चमकून गेली. "ऊश्या, बेडशीट्स वगैरे सगळं बेडच्या ड्रॉवरमध्ये आहे." तो उगीच म्हणाला. ती तिच्या वस्तू खोलीत ठेवायला लागल्यावर त्याने खाली जाऊन पॅक करून आणलेला डिनर गरम करून ठेवला. नोराss जिन्याखालून त्याने हाक मारली. ती लगोलग खाली आली. ताटात पोळी, मुगाची उसळ, गाजराची कोशिंबीर आणि वरण भात होता.
"दोन दिवस खूप हेवी जेवलो म्हणून आज विपश्यना वाल्यांचा मेन्यू आणला." तो गालात हसत म्हणाला.
"नो प्रॉब्लेम. मला आवडतं साधं जेवण. स्पेशली वरणभात. आणि तूप! आणि लिंबू!" ती हसत म्हणाली.
"नोरा डीक्रूझ आणि वरणभात! चीअर्स टू दॅट." म्हणून तिला फीस्ट बम्प देऊन त्याने जेवायला सुरुवात केली.
बोलता बोलता जेवण झाल्यानंतर त्याने तिला ओट्याखालचा डिशवॉशर दाखवून कसा वापरायचा ते दाखवलं. सगळं आवरून झाल्यावर शुगर कोटेड बडीशेप खात ते सोफ्यावर येऊन बसले. "नोरा, तुला काहीतरी सांगायचं आहे." तो तिच्याकडे वळत म्हणाला. ती त्याच्याकडे वळल्यावर त्याने तिचे हात हातात घेतले. तिच्या भुवया आपोआप उंचावल्या. "तो माणूस सापडला."
"कोण?" तिने एकदम त्याचे हात घट्ट धरत विचारले.
"पार्टीच्या वेळी नेहमीचा वॉचमन गावी गेला होता. जो टेम्पररी होता तो नंतर दोन दिवसात गायब झाला होता. मी त्याला माझे कॉन्टॅक्टस वापरून शोधून काढला. त्या दिवशी मी तुला उचलून नेल्यावर तो केतनबरोबर गेला. केतनने त्याला पैसे दिले आणि मी तुला उचलून नेताना फोटो काढायला सांगितले. तो माझ्या मागे आला. तुला चक्कर आली होती, खूप ठिकाणी लागलं होतं त्यामुळे घाईत मी दार जस्ट लोटलं होतं. त्याचा फायदा घेतला त्याने. मग त्याने ते फोटो गावातल्या त्याच्या ओळखीच्या लोकांना पाठवले आणि तिथून व्हायरल झाले. इव्हन त्याचं कॅप्शनसुद्धा केतनने लिहून दिलं होतं. बास्टर्ड!" तो रागाने लाल होत म्हणाला. "मी आजच FIR फाईल करून आलोय."
तिचे डोळे विस्फारले गेले. ओठ रागाने थरथरायला लागले आणि त्याच्या हातावरची पकड अजूनच घट्ट झाली.
"यू ओके?" त्याने काळजीने तिच्या डोळ्यात पहात विचारले.
"केतन रॉड्रिग्ज! दॅट बास्टर्ड!!" ती पुटपुटली.
पलाशला काही कळेनाच. "तू ओळखतेस त्याला?" त्याने डोळे बारीक करत विचारले.
"ही इज माय एक्स. वॉज. व्हॉटेव्हर. लाँग टाईम." ती ओठ घट्ट आवळून म्हणाली.
पलाशचा चेहऱ्याचा रंग उडाला आणि तो तिच्याकडे बघतच राहिला.
क्रमशः