रूपेरी वाळूत - २६

जवळपास अक्खा आठवडा इतका बिझी गेला की घरात ते फक्त नाश्ता आणि रात्रीच्या जेवणापुरते एकमेकांना दिसत होते. शनिवारी सकाळी ती उठली तेव्हा पलाश त्याच्या बेडरूमचे निळे दार उघड बंद करत होता. ती विस्कटलेले केस एका स्पायरल हेअर टायमध्ये डोक्यावर अडकवत त्याच्याजवळ गेली. "दुपारी सुताराला घेऊन येतो. हे दार नीट लागत नाही." तो बिजागरांना हात लावून बघत म्हणाला. "नीट तर दिसतंय" ती दार हलवून म्हणाली.

"रात्री मी दार व्यवस्थित लावून झोपतो तरी सकाळपर्यंत ते सताड उघडलेलं असतं. स्टॉपर लावला तरी उघडतंय." तो कपाळावर आठ्या पाडून दाराकडे बघत होता.

ती ओशाळून किंचित हसली. "सॉरी ते माझ्यामुळे होतंय. दार व्यवस्थित आहे."

त्याने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले. "ऍक्चुली.. म्हणजे मला इथे एवढ्या शांततेत झोप लागत नाही. आणि पहिल्या दिवशी म्हणजे रात्री तू थोडासा घोरत होतास."  ती जरा अडखळत म्हणाली.

"हम्म, माझे टॉन्सिल्स मोठे आहेत त्यामुळे." मध्येच त्याने सांगितले.

"तू झोपल्यावर मी दोन्ही दरवाजे उघडून ठेवते मग तुझ्या आवाजामुळे मला झोप लागते." तो कदाचित थट्टा करेल म्हणून ती मान खाली घालून हळूच म्हणाली.

तो नुसतीच मान हलवून खाली गेला.

ती किचनमध्ये गेली तेव्हा तो कॉफी मेकर सुरू करत होता. तिला बघून तो हसला, तिनेही हसून ऑम्लेटची तयारी करायला घेतली. हल्ली रिसॉर्टच्या जेवणाला कंटाळून ती घरीच ब्रेकफास्ट आणि रात्रीचा स्वयंपाक करत होती आणि स्वतःबरोबर त्यालाही खायला लावत होती. एकमेकांबरोबर रहाणं आता दोघांच्याही थोडं अंगवळणी पडलं होतं. तिने कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर वगैरे सटासट बारीक चिरून त्यात चार अंडी फोडल्यावर मीठ, मसाला आणि थोडे निरसे दूध घालून फेटले आणि मोठ्या पॅनवर तूप घालून एकच जाड फ्लफी ऑम्लेट करून त्याचे दोन तुकडे केले. ती हात धुवेपर्यंत त्याने कॉफीबरोबर ऑम्लेट आणि ब्रेड ठेवलेल्या प्लेट्स डायनिंग टेबलवर नेऊन ठेवल्या. ती त्याच्या शेजारी खुर्चीत जाऊन बसली.

त्याला कडेने तिचा अर्धवट चेहरा दिसत होता. लूज पोनिटेल खाली ओघळून त्यातून निम्मे बाहेर येऊन तिच्या गालावर विसावलेले सिल्की केस, सरळ टोकदार नाक आणि हलणारे टपोरे ओठ. तिच्या केसांमधून ऑरेंज ब्लॉसम आणि वनिला असा काहीतरी गोड वास येत होता. त्याने डोळे मिटून नाक जरासं पुढे केलं. अचानक तिने वळून त्याच्याकडे पाहिले.

"हॅलो?? मी काहीतरी सांगतेय." ती काळेभोर डोळे मोठे करून त्याच्याकडे पहात म्हणाली. तो खडबडून मागे होत ऑम्लेटकडे बघू लागला.

"सॉरी, माझं लक्ष नव्हतं." काही फरक पडत नसल्यासारखा चेहरा करून त्याने ऑम्लेटचा मोठा तुकडा तोंडात भरला.

"मी विचारत होते की आपल्याला उद्या घरी जाता येईल का? गार्गीचा फोन आला होता, ती आपल्याला मिस करते आहे म्हणून." ती त्याच्या वागण्याला वैतागून म्हणाली.

"मेबी. मी बिझी असलो तर तू जा." तो तिच्याकडे अजूनही बघत नव्हता.

त्याला कॉफी पिताना बघून तिने तोंड वाकडे केले. खांदे उडवून तिने शांतपणे आपली प्लेट रिकामी केली आणि सिंकमध्ये ठेऊन वर निघून गेली. "हा काssय ऍटीट्यूड आहे! म्हणूनच हा माणूस मला आवडत नाही. डुक्कर, गाढव, माकड... नो! प्राणी खूप चांगले असतात हा त्यांच्याहून वर्स्ट आहे." बडबडत ती पटापट आवरून तयार झाली आणि घराबाहेर पडली.

---

दिवसभर गेस्टस् हँडल करून संध्याकाळी उशिरापर्यंत टॅलीमध्ये आठवड्याभराच्या एंट्रीज चेक करून सगळं अपडेट झाल्यावर त्याने लॅपटॉप मिटून सुटकेचा श्वास घेतला. मान आणि पाठ इकडेतिकडे वळवून कटाकट मोडताना त्याला सकाळी नोरा चिडून करत असलेल्या बडबडीची आठवण झाली. त्याच्या खोलीपर्यंत तिचा आवाज येत होता. तो किंचित हसला आणि निघताना स्टोअर रूममध्ये जाऊन लग्नासाठी आलेल्या फुलांमधून पाच सहा लांब देठाचे बेबी पिंक गुलाब उचलले. तिच्याबद्दल त्याच्या मनात तयार होऊ लागलेल्या सॉफ्ट कॉर्नरबद्दल त्याला अजूनही आश्चर्य वाटत असलं तरी ती गोष्ट खरीच होतं. त्याने गुलाब शेजारच्या सीटवर ठेवले आणि थार सुरू केली. म्युझिक प्लेयरवर लागलेल्या 'होल्ड ऑन' च्या बरोबरीने त्याच्या बोटांनी स्टीअरिंगवर ताल धरला आणि गाणं संपेपर्यंत तो घरासमोर गाडी पार्क करत होता. एव्हाना रात्र होऊन अंगणातला मोठा पांढरा दिवा सुरू होता. उजेडात त्याला पार्क केलेली काळी ऍक्टिवा दिसली.

एका हातात फुलं धरून त्याने डोअरबेल वाजवताच आतून पायांचे, जिन्यावरून पळापळीचे आवाज आले आणि धापा टाकत, लाल झालेल्या चेहऱ्याने नोराने दोन्ही दरवाजे उघडले. मागोमाग काss का म्हणून ओरडत नोराच्या हाताखालून येऊन गार्गीने त्याला मिठी मारली. गुलाब लांब धरत त्याने एका हाताने तिला पटकन उचलून घेतले. नोराने आश्चर्याने त्याच्या हातातून गुलाब घेतले. "स्स.." अचानक तो हात झटकून कळवळला. नोराने गुलाब खाली टाकून प्रतिक्षिप्त क्रियेने त्याचा हात दोन्ही हातात घेतला, त्याच्या रिंग फिंगरमधून रक्ताचा लालभडक थेंब मोठा मोठा होत होता. तिने पटकन त्याचं बोट तोंडात घालून चोखलं. 'ओह नो.' त्याला फक्त त्याचा हात घट्ट धरलेले तिचे ओलसर हात, त्याच्या वेडिंग बँडवर विसावलेली तिची बोटं, गरम श्वास, बोटाभोवतीचे तिचे ओठ, उबदार तोंड आणि काटा टोचलेल्या जागी हलकेच फिरणारी तिची जीभ जाणवत होती. क्षणभर बाकी सगळं जग बंद झालं होतं. लगेचच तिलाही आपण काय करतोय याची जाणीव झाली आणि पटकन त्याचा हात सोडून ती बाजूला झाली. तिने अलगद जमिनीवरची फ़ुलं उचलली. "दे आर फॉर यू." तो तिला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात म्हणाला. गार्गी त्याच्या कानाशी काहीतरी बडबड करत होती पण त्याचे डोळे फक्त त्याची नजर चुकवत, ओठ चावत उभ्या नोरावर स्थिरावले होते.

"पलाश आला का ग?" किचनमधून वहिनीची हाक आल्यावर हो हो म्हणत नोरा आत पळाली. गार्गीला सोफ्यावर बसवून त्याने छोटा भीम सुरू केलं आणि हातपाय धुवायला वर गेला. फॉर्मल्स बदलून टीशर्ट आणि शॉर्ट्स घालून खाली येऊन तो गार्गीबरोबर कार्टून बघत बसला. नंतर एकत्र टेबलावर बसून जेवताना त्याला आवडतात म्हणून वहिनीने आणलेल्या नागपंचमीच्या पुरणपोळ्यांकडेही त्याचे लक्ष नव्हते. जेवता जेवता वहिनी गार्गीच्या धडपड्या गोष्टी, दादाची कामं आणि अप्पा - आईच्या लुटूपुटूच्या भांडणांबद्दल सांगत होती ते फक्त नोराच मन लावून ऐकत होती आणि तो मन लावून नोराकडे बघत होता. तसं बघताना दोन तीन वेळा वहिनीने त्याला पकडल्यावर तो फक्त हसला आणि लक्षात येऊन नोरा जराशी लाजली. पुरणपोळी खाता खाताच गार्गी टेबलावर पेंगायला लागली.

"अरे झोपलीच.. मी हिला वर नेऊन झोपवते." शर्वरी हात धुवून गार्गीला उचलत म्हणाली.

"तुम्हीपण झोपा, आम्ही आवरू इथलं सगळं." नोरा उठत म्हणाली.

"हम्म मीपण झोपतेच, वीकेंड आहे. तुम्हाला जरा प्रायव्हसी मिळूदे." ती दोघांकडे बघत हसून म्हणाली.

"गुड नाईट वहिनी." तो हसून डोळ्यांनी आता अजून काही बोलू नको असं दटावत म्हणाला.

वहिनीने हसतच मान हलवली आणि गुड नाईट म्हणून बाहेर गेली.

ती बाहेर जाताच त्याने भुवया उंचावून नोराकडे पाहिले. त्याची सरबत्ती सुरू होण्याआधीच तिने तोंड उघडले. "वहिनीचा मला कॉल आला होता. दादा आज मुंबईला गेलेत. गार्गी पण आपल्याला भेटायचं म्हणत होती. मग मीच त्यांना इथे बोलावलं."

"पण तुझी रूम?"

"डोन्ट वरी, माझ्याकडे एक तास होता तेवढ्यात मी सगळं सामान तुझ्या रूममध्ये नेऊन ठेवलं."

"हुश्श!" त्याने सुटकेचा श्वास टाकला. काही न बोलता दोघांनी भांडी वगैरे आवरून डिशवॉशरला लावली. तो डायनिंग टेबल पुसत असताना नोरा मी वर थोडं आवरते म्हणून निघून गेली. तो खाली सगळं आवरून, दरवाज्याच्या कड्या वगैरे चेक करून दिवे मालवून वर गेला तेव्हा वहिनी आणि गार्गी बहुतेक झोपल्या होत्या, खोलीतला दिवा बंद होता. तो त्याच्या खोलीत शिरला, नोरा बाथरूममध्ये होती. त्याने वॉर्डरोब उघडून पाहिले. एका बाजूला तिचे कपडे बऱ्यापैकी कोंबून ठेवलेले होते. दारामागच्या हुकला दोन तीन स्लिंग बॅग, सॅक वगैरे अडकवल्या होत्या. बेडवर नवी बेडशीट घातलेली होती आणि तो बेडवर आडवा होताच शेजारच्या नाईट स्टँडवर ठेवलेल्या टॅन्कमधून मासा डोळे वटारून त्याच्याकडे बघत होता.

"शिट!" त्याच्या आवाजाने नोरा बाथरूममधून बाहेर आली.  तिने पोनीटेल सोडून केस मोकळे केले आणि काळं इलॅस्टिक मनगटात घातलं. "हा मासा मला डोळे उघडताच समोर नको असं मी आधीच सांगितलं होतं." तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.

"कान्ट हेल्प इट! तुझ्या बाजूचं टेबल मोठं आहे." ती खांदे झटकून म्हणाली. आज तिने मुद्दाम wwf चा भला मोठा पांडा असलेला ब्राउन टीशर्ट आणि ब्राउन चेक्सची लूज पाजामा बॉटम घातली होती. तिच्या मते डेफिनिटली नॉट सेक्सी. "तू बेडवर झोपलास तरी चालेल. आय ट्रस्ट यू." ती चष्मा लावता लावता म्हणाली.

"आय एम ऑनर्ड!" तो ब्लॅंकेट ओढत तिरकसपणे उद्गारला.

"फक्त प्लिज कपडे घालून झोप". ती बोट दाखवत म्हणाली.

त्याने टीशर्ट काढला नव्हताच. फक्त हाताने हे काय असं दाखवून तो आडवा झाला. तिने दिवे बंद केले. फॅन सुरू केला. दाराला कडी न लावता नुसतंच लोटून ठेवलं. तिचा आज त्याच्यावर तेवढाही भरवसा नव्हता. बेडवर येऊन तिने मध्ये एक ऊशी ठेवली आणि वरून वाकून हळूच त्याला दार लोटून ठेवल्याचे सांगितले. त्याने हम्म करून ब्लॅंकेट डोक्यावर ओढून घेतले. तिच्या कडेच्या टेबलवरचे किंडल उचलून तिने अर्ध राहिलेलं 'द गर्ल हू लव्हड टॉम गॉर्डन' उघडलं.

--

त्याला हातावर होणाऱ्या गुदगुल्यांमुळे जाग आली. खिडकीबाहेर अजूनही काळोख होता. फिशी, फिशी! आवाजाने त्याने दचकून शेजारी बघितले तर गार्गी बेडवर चढून त्याच्याशेजारी गुढगे टेकून माश्याच्या टॅन्कमध्ये बघत होती. तिच्या फ्रॉकची झुल त्याच्या डोक्याखाली घेतलेल्या हाताला लागत होती "गागु, तू काय करतेस इथे?" त्याने झोपेतच विचारले. "मी फिशला भेटायला आले. ममा झोपली आहे अजून, मग मी एकटीच आले." टॅन्कवरची नजर न हटवता तिने उत्तर दिले. काहीतरी जाणवून त्याने बाजूला बघितलं तर नोरा त्याच्या छातीवर डोकं ठेऊन, एक हात आणि एक पाय त्याच्या अंगावर टाकून झोपली होती आणि त्याचा दुसरा हात तिच्या अंगाखालून तिच्या कंबरेवर होता. त्याने मोकळ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले आणि त्याच्या ओठांवरचं हसू डोळ्यांपर्यंत पोचलं. 

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle