घरी पोहोचताच रोजच्याप्रमाणे शॉवर घेऊन ती ताजीतवानी झाली. जुना वापरून पातळ झालेला ब्लॅक टॅंक आणि पांढरी पेझली प्रिंट असणाऱ्या पिंक शॉर्ट्स घातल्या. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ती किचनकडे गेली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फोनवर हळू आवाजात 'दिल का दरीया, बह ही गया..' सुरू झालं. वरण भाताचा कुकर लावून एकीकडे तिने संध्याकाळी ताजे मिळालेले दोन फडफडीत पापलेट साफ करून वर तिरके कट दिले आणि त्यांना हळद, मीठ, मसाला मॅरीनेट करून बाजूला ठेवले. सकाळचं बिरडं गरम करत ठेवलं आणि पटापट चपात्या करून टाकल्या. उरली सुरली भांडी आवरून तिने हातावर लिंबू पिळून हात धुतले.
मागच्या अंगणात जाऊन केसांचा टॉवेल दोरीवर वाळत टाकेपर्यंत पलाश आला, तिने दार उघडताच "हाय, मला थोडं काम आहे" म्हणून तो घाईत सोफ्यावर लॅपटॉप उघडून बसला. ती पुन्हा किचनमध्ये आली आणि डायनिंग टेबलापाशी जाऊन गाणं रिपीट मोडवर टाकलं. तव्यात तेल चुरचुरल्यावर तिने रव्यात घोळवलेला एक पापलेट चिमट्याने अलगद तव्यावर सोडला.
ती अजून काही विचार करेपर्यंत तिला पलाश तिच्या जवळ आल्याची जाणीव झाली. त्याचा पायरव आला नाही पण तो जवळ आल्यामुळे तिच्या उघड्या मान आणि दंडावरची बारीक लव उठून उभी राहिली. "हेय!" तिने खांद्यावरून मान अर्धवट मागे वळवली.
"गुड इव्हनिंग!" तो तिच्या खांद्यावर किंचित वाकून म्हणाला. सरप्रायझिंगली आज त्याचा चेहरा मोकळा वाटत होता. हा चेंज इतका सटल होता की ती सोडता कुणाच्या लक्षातही आला नसता. त्याचे डोळे मऊ झाले होते आणि ओठांच्या कोपऱ्यात किंचित हसू दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावर इतके भाव उघडपणे दिसणं हे इतकं दुर्लभ होतं की काही वेळ ती बोलायचंच विसरून गेली.
"पापलेट फ्राय?" तिने त्याच्याकडे वळून विचारलं.
"थँक्स! मला बाहेर वास आला." त्याचं हसू किंचित वाढलं होतं. त्याने शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या.
"ओह सो पाप्लेटाने तुला खेचून आणला इथे!" त्याच्या मनगटाकडे बघत ती म्हणाली.
"व्हेरी टेम्पटिंग!" टेम्पटिंग म्हणताना त्याची नजर तिच्यावरून खालपर्यंत फिरल्यामुळे तिच्या कण्यातून झिणझिण्या आल्या. 'ग्रेट! नोरा जास्त इमॅजिन करू नको, तो फक्त पाप्लेटच्या वासाने इथे आलाय. त्याच्या नजरेत अजून स्पेशल काही नाही.' तिने स्वतःलाच पुन्हा सांगितले.
तिने पटकन पापण्या झुकवून त्याच्याकडे पाठ केली आणि तळलेला पापलेट ताटलीत पसरलेल्या टिश्यूवर ठेवला. तिच्या पाठीवर अजून काटा आला. त्याने एक पाऊल अजून जवळ टाकलं की काय.. डोक्यातले विचार काढून तिने घाईने दुसरा पापलेट तव्यात ठेवला आणि सिंककडे जाऊन हात धुतले. तिला मागे बघायची जवळपास भीतीच वाटत होती. तिची धडधड वाढली होती आणि तिला मागे वळून त्याला पटकन किस करायची प्रचंड इच्छा होत होती.
फोकस. नोरा. पापलेट फ्राय.
पण स्वयंपाकाचा वास पसरलेल्या किचनमध्ये एकत्र उभं रहाणं खूप पर्सनल, खूप इंटिमेट काहीतरी होतं. नॉट इन सेक्शुअल वे, इन अ रिलेशनशिपी वे.. आणि हे जास्त वाईट होतं. हे खूप नॅचरल वाटत होतं. जसं ती आत्ता ओट्याला टेकून त्याच्याशी दिवसभरातल्या कामाबद्दल बोलेल किंवा कदाचित तो तिच्या जवळ येऊन खांद्यावर हनुवटी टेकेल आणि तिच्या उघड्या खांद्यावर किस करेल. ती गुदगुल्या झाल्यासारखी हसेल आणि त्याला 'श्श, फिश करपेल' म्हणत मागे ढकलेल..
तिचे हात अजूनही ओले होते आणि पलाश तिच्या आणि नॅपकीनच्या मध्ये उभा होता. तिच्या इमोशन्स आता आउट ऑफ कंट्रोल होत होत्या आणि त्यांना आत्ताच काबूत आणणे गरजेचे होते.
ती मागे वळली. पलाशकडे पहात ती ओट्याला टेकली. ओह नो, इतक्या वेळात तो तिच्या अजूनच जवळ आला होता. त्याचा चेहरा तिच्या समोर होता. त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यावरून ओठांकडे वळले आणि तो फक्त बघत राहिला.
ओह गॉड, इट्स हॅपनिंग.. सगळ्या जगाचा वेग कमी झाला. तव्यावरची चुरचुर ऐकू येणं थांबलं. 'बात दिल की, नजरों ने की.. सच कह रहा तेरी कसम..' कुठूनतरी झुबिनचे मंद स्वर ऐकू आले. तिने चुकून कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली. त्याच्या भुवया जवळ आल्या. ती आत्ताच आतून वितळत होती आणि अजून त्याने तिला स्पर्शही केला नव्हता.
तिचे ओठ वाट बघत होते. छातीतली धडधड अजूनच वाढली आणि तिने हनुवटी उंचावली. बॅड आयडिया! एकीकडून डोक्यात विचार येत होता पण त्याच्या इंटेन्स नजरेने सगळे विचार दाबून टाकले.
प्लीज. डू इट. आय नीड यू.
अचानक त्याचे डोळे विस्फारले. शिट! जोरात ओरडून त्याने तिच्या कंबरेला विळखा घालून तिला उचलून गर्रकन फिरवून खाली ठेवले. तिला काय झालं काही कळलंच नाही. तिने कपाळावर हात ठेवून डोळे उघडून पाहिले. पॅनमधल्या तेलाने पेट घेतला होता. पलाशने पटकन पॅन वर उचलला. गॅस बंद करून चिमणी सुरू केली. ज्वाळा थांबल्यावर तो मागे वळला. "आर यू ओके? तुला कुठे भाजलं नाही ना?"
तिने केस, मान, पाठ सगळीकडे चाचपून मान हलवली. "डोन्ट थिंक सो."
"बघू?" त्याने तिला फिरवून पाहिले. "ठीक आहे सगळं." तिच्या पाठीवर अजूनही फुललेला काटा होता, तो हात फिरवून बघेल, तिचा टॉप नीट करेल, तिला जाळ न लागल्याची खात्री करेल वगैरे.. पण त्याने तसं काहीच केलं नाही.
"ओह नोss करपला वाटतं." तिने वळून धुरात हात हलवून पापलेट चेक केला. पण त्याला विशेष काही झालं नव्हतं. 'अजूनही धूर गेला नाही' म्हणत त्याने वाकून खिडकी उघडली. दॅट्स इट.. आत्ता पुढे होऊन त्याच्या छातीवर हात ठेवायला हवे होते. मग हळूच हात मानेमागे सरकवून त्याच्या जवळ जात वाचवल्याबद्दल थॅंक्स म्हणून चवडे उंचावून त्याला पटकन किस करायला हवे होते.
पण ती जागची हलली नाही. तिच्या डोक्यात शंभर विचार गर्दी करून गेले. हे लग्न खोटं आहे, 'आपण' खोटे आहोत. हा सगळा फार्स फक्त रिसॉर्ट त्याच्या नावावर होण्यापुरता आहे. त्याला माझ्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. ह्या एका किसने ते सगळंच बदलून गेलं असतं.. तुला नक्की काय हवंय नोरा...
त्याच्या चेहऱ्यावरचा सगळा मोकळेपणा पुन्हा नाहीसा झाला होता. त्याने शांतपणे तिला ओटा स्वच्छ करायला मदत केली. 'नशीब जास्त आग लागून मी त्याचं सगळं किचन खराब नाही केलं. सगळंच डॅमेज नाही झालं' तिच्या डोक्यात विचार आला. किचनमधल्या आगीने किचन तर डॅमेज झालं नाही पण त्या ऑलमोस्ट किसने बाकी बरंच काही डॅमेज झालं होतं.
---
सकाळपासून पलाश जवळच्या हॉटेलमध्ये इन्व्हेस्टर मीटिंग आणि नंतर अप्पांच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये फिरत होता. तो अजूनही काही जवळच्या क्लायंट्ससाठी फ्रीलान्स काम करून फंडस् मॅनेज करत होता. दिवसभर त्यापैकी काही कॉल्स शेड्युल केलेले होते. त्याच्या डोक्यात ह्या शेकडो गोष्टी सुरू असायला हव्या होत्या. रिसॉर्टबद्दल. त्याच्या कामाबद्दल. पण त्याच्या डोक्यात एकच गोष्ट घोळत होती ती म्हणजे काल तो नोराला किस करण्यापासून फक्त काही सेकंद दूर होता.
आगीने काही नुकसान झाले नव्हते पण तो पुन्हा सिरीयस होऊन जेवून, लॅपटॉप घेऊन स्टडीत जाताना तिचा पडलेला चेहरा त्याला आठवला. जे काही घडलं त्याबद्दल ती काही बोलली नव्हती, तोही गप्पच राहिला होता. मेबी त्याने काहीतरी बोलायला हवं होतं.. रात्री उशिरापर्यंत काम करून तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला. तिने आधीच तिचं सामान परत तिच्या खोलीत हलवलं होतं. पण तिच्या खोलीतला बंद दिवा बघून त्याच्या आत कुठेतरी दुखलं होतं.
फीलिंग्जबद्दल त्याला सिरीयस इश्यूज होते. कधीही त्याला खोलवर काही फील व्हायला लागलं की तो आपल्या कवचात जात असे. टोटली शट डाउन. तो असं का करायचा त्याला माहित नव्हतं. कदाचित अप्पांची कडक शिस्त आणि त्यांचा स्वभाव त्याच्यात आले होते. आई आणि दादा असे नव्हते. ते नेहमी मोकळेपणी त्यांना काय वाटतंय ते अनुभवू, सांगू शकत.
पण पलाश नाही. कुठल्याही फिलिंग्ज त्याला त्याचा वीकनेस वाटायच्या आणि त्या आपोआप मनात दडपल्या जायच्या. मेबी म्हणूनच त्याने कायम उथळ मुलींना स्वीकारले होते. त्या सेफ होत्या. फक्त त्याचा पैसा किंवा शरीर, त्यांना तेवढंच हवं होतं. म्हणूनच त्या कायम कॅज्युअल राहिल्या होत्या. कुणीच त्याच्या मनापर्यंत पोचून त्याचा तळ ढवळून काढला नव्हता.
त्याने कॉल करायला फोन बाहेर काढून हा सगळा विचारांचा गुंता बाहेर ढकलून दिला. दुपारी अजून एक मीटिंग होती आणि त्याला शार्प रहायला हवं होतं. स्क्रीन अनलॉक होताच वहिनीने पाठवलेले रविवारचे फोटो धडाधड डाउनलोड झाले. पहिल्याच फोटोत नोरा गार्गीला मासा दाखवत होती आणि तो नखं चावत नोराकडे बघत होता. त्याच्या ओठांचे कोपरे किंचित वर गेले. त्याने काहीतरी बोलायला हवं होतं, आफ्टर ऑल ती स्वयंपाक करताना तो तिच्या जवळ गेला होता, तो तिला ऑलमोस्ट किस करणार होता. तो जितका वेळ तिच्या ओठांकडे बघत होता त्यातून तिने नोटीस केलेच असणार. पण त्याच्यासमोर पुन्हा नेहमीची भिंत उभी होती. त्याला मनातल्या गोष्टी शब्दात व्यक्त करता येत नव्हत्या, काय सांगायचंय तेही कळत नव्हतं. सो.. त्याने काहीच सांगितलं नाही. लांब श्वास टाकून त्याने फोटो बंद केला आणि कामाला सुरुवात केली.
क्रमशः
ह्याच तां पापलेट! (सौजन्य: rakshaskitchen.com)