{अश्वथामा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.
आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !
गेल्या काही दिवसात, काही घटनांनी हा संयमाचा दिव्य मणी असाच उपसून काढण्याचा प्रयत्न केला गेला. एक भळभळणारी जखम घेऊन आपण फिरतो आहोत. आपल्यातले हे दिव्यत्व पुन्हा प्राप्त करूयात. सर्व शहिद व्यक्तींची आठवण सतत जागती ठेऊयात आणि त्यांना आदरंजली वाहूयात. अन हा संयम पुन्हा मिळवून पुन्हा ताठ उभे राहूयात, अधिक संघटित होउन, अधिक ताकदवान होऊन !}
"अरे निचे बैठ, निचे बैठ...."असे तो म्हणाला,
अन प्रतिक्षिप्त क्रियेने, मी खाली बसलो.
अन डोक्यावरून एक गोळी सणसणत मागे गेली.
वळून पाहिले, मला सांगणाराच
त्या गोळीचा बळी ठरला होता !
खरं तर संध्याकाळी, दिवसभराचा ताप ताण
हलका करण्यासाठी रोजच जातो मी
गेट वे आँफ इंडियावर !
आज मात्र, आख्ख्या इंडियाचा ताण घेऊन
वणवण फिरतोय मी, या गेट वरून त्या गेट वर !
त्या अनामिकाचा, गोळीने छिन्न विछिन्न झालेल्या चेह-याचा
फक्त एक फोटो आहे हातात,अन त्याच्या हातातला डबा,
अन त्याच्या पाकिटातले काही पैसे,
अन हो..., त्याचे फुटके नशिब ...
ज्याच्या मुळे मी आज फिरतोय...जिवंत !
वणवण फिरतोय त्याचे, नाव- पत्ता शोधण्यासाठी
अन त्याच्या जिवलगांना आधार देण्यासाठी.
त्याच्या शेवटच्या दर्शनाने खचतील ते.
पण किमान पुढच्या आयुष्याची त्रोटक शिदोरी
एखाद वेळेस मिळेल एखाद्या राजकारण्याकडून !
किंवा होईल त्या फोटोची फ्रेम !
घरातल्यांना देईल आयुष्यभराचे दु:ख - वेदना !
किंवा एखाद्या भावी, चांगल्या नेत्याला
देईल तोच फोटो एक प्रेरणा !
लाखोंचा बिना नेत्यांचा समूह !
त्यातला मीही एक मिणमिणता प्रकाश.
शोधत फिरतोय त्या किरणाला.
नेता नाही तर नाही, किमान
माझ्यासारख्या जन्मभराची जखम घेऊन
फिरण्या-या इतर अश्वथाम्यांची ओळख तरी होतेय,
दूध नाही, ताक नाही, अन पीठ्-पाण्याचे दूधही नाही,
फक्त डोळ्यातल्या पाण्याने
तहान भागवण्याचा प्रयत्न करतोय.
प्रयत्न करतोय त्याची मुलं, माणसं, आई , बायको आणि
कितीतरी.... त्यांचा शोध घेण्याचा.
एका हातात
माथ्यावरची भळभळणारी जखम घेऊन
अन दुस-या हातात... त्याचा फोटो.......!
माझ्या सारखेच, कितीतरी
अगणित अश्वथामे !
(जुनी कविता देतेय, २६.११ ची आठवण म्हणून )