रूपेरी वाळूत - ३४

इनोव्हाच्या खिडकीतून वाकून, हसत हात हलवत दिसेनाशी होईपर्यंत तो नोराला डोळ्यात साठवून ठेवत होता. परत आल्यावर त्याने स्वतःला कामात बुडवून घेऊन तिची अजिबात आठवण येऊ दिली नाही. पणजीच्या हॉटेलमध्ये पोचल्यावर नोराच्या मोबाईलला रेंज नव्हती म्हणून तिने रिसेप्शनवरून कॉल करून त्याला सगळे अपडेट्स दिले होते, पण रात्रीच्या शांततेत रिकामं घर त्याला खायला उठलं. तो उठून तिच्या खोलीत ठेवलेल्या नव्या टॅन्कसमोर जाऊन बसला. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात पाण्यात भिरभिरणाऱ्या माश्याचे खवले चमकत होते. माश्याला खायला घालून बराच वेळ झाल्यावर तो उठला आणि तिच्या बेडवर ब्लॅंकेट घेऊन आडवा झाला. उशीत तोंड खुपसून व्हनिलाच्या मंद सुगंधात त्याला झोप लागली.

शनिवारी रिसॉर्ट भरून वाहत होते. बाहेर वाळूत माणसांचे थवेच्या थवे खारट, घामट गर्दी करून फिरत होते. त्याला आज सगळ्याचाच राग येत होता. स्टाफच्या बारीकसारीक चुकांनीही सारखा वैतागत होता. अख्खा दिवस स्वतःला कसाबसा बिझी ठेवून तो संध्याकाळी गावात गेला. त्याच्या घरात आजची रात्र नोराशिवाय संपता संपली नसती. अप्पांबरोबर खूप दिवसानंतर तो बुद्धिबळ खेळला. अर्थात नेहमीप्रमाणे तेच जिंकले. दादा आणि वहिनी गार्गीला घेऊन वहिनीच्या माहेरी गेले होते. जेवण झाल्यावर आईने नेहमीप्रमाणे " केस किती भुरभुरीत झाले पलाश! तेल लावायला नको, नुसते ते घाणेरडे जेल फील लावत रहा" म्हणत त्याला चंपी मालिश करून घ्यायला बसवले.

केसांमधून आईचा हात फिरल्यावर त्याचं डोकं हळूहळू शांत झालं. मालिश करता करता आईकडून नोराच्या कामाचे, तिच्या वागण्याचे कौतुक ऐकून त्याला आत कुठेतरी छान वाटत होतं.

"पलाश, तिच्याशी भांडू नको आणि उगाच जास्त चिडवत जाऊ नको. ती काही बोलली नाही तरी त्रास होतो माणसाला." आई त्याला हळूच टपली मारत म्हणाली.

"आई प्लीज! ती माझ्याशी डबल भांडते!" त्याने तोंड वाकडं केलं.

"तर तर! कायेक सांगू नको. फुडचा ढोर चाल्तला तसा पाटला!"

"आई!!" तो खो खो हसत सुटला.

"पण खरा सांग, घरी तिची आठवण येते म्हणून पळून आलास ना इथे?"

"हम्म थोडी.. पण मला तुझी जास्त आठवण आली म्हणून आलो." तो डोकं हलवत म्हणाला.

"होय तर, खोटरड्या!" आईने एक टपली मारली. "गजालीन खाल्ला घोव! टाईम बघ काय झाला, जा नोराला फोन कर जा.. जा."

"तिच्या मोबाईलला रेंज नाही तिथे. ती लँडलाईनवरून करते अधूनमधून, पण मला नाही करता येत."

हम्म म्हणून आईने सुस्कारा टाकला. थोड्या गप्पा झाल्यावर तो वर जाऊन झोपला. सकाळी जाग येताच रात्री टाईप करून ठेवलेला मेसेज उघडून त्याने सेंडवर बोट ठेवलं.

You are everywhere, except right here.
And it hurts.

--
पलाश स्टोअर रूममध्ये मॅनेजरबरोबर बसून स्टॉक स्टेटमेंट चेक करत होता. दोन तीन तास आकडेमोड केल्यावर त्याने डोक्यावर हात लांब करून आळस दिला. संध्याकाळ होत आली होती. तितक्यात रिसेप्शनवरून त्याला कॉल आला. "सर, नोरा मॅडम आल्यात. मी त्यांना केबिनमध्ये पाठवलं आहे."

त्याला काही समजेनाच, पटकन फोन ठेवून तो बाहेर आला. ग्राउंड फ्लोरवरच्या त्याच्या लहानश्या केबिनचे दार ढकलून आत शिरला. नोरा खांदे पाडून खुर्चीत बसली होती. तो येताच तिने वळून पाहिले. चेहऱ्यावर नेहमीच्या अवखळपणाचा मागमूसही नव्हता.

"नोरा??" तो भराभर तिच्यापाशी पोचला. "लवकर कशी काय आलीस? काय झालं?"

"पलाश!" उभी राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली. मग मागे होत ती बोलू लागली."काल रात्रीपासून डोकं फुटेल इतकं दुखत होतं आणि पहाटे जाग आल्यावर उभं राहता येत नव्हतं. व्हर्टिगोसारखं सगळं फिरत होतं. सर्दी तर थांबलीच नाहीये. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन इएनटी स्पेशालिस्टकडे चेकअप केलं. त्यांचं म्हणणं आहे की माझं CSF लीक असण्याची दाट शक्यता आहे. मग सरळ मी बॅग घेऊन घरी निघाले." तिचे किंचित थरथरणारे हात त्याने हातात घेतले.

"ओके.. आधी तू बस, पाणी पी." तिला खुर्चीत बसवून हातात पाण्याचा ग्लास देत तो म्हणाला.

तिने दोन घोट पिऊन ग्लास ठेवला.

"हम्म, आता सांग हे किती सिरीयस आहे? CSF काय आहे?"

"जर ते तेच असेल तर खूप सिरीयस आहे. CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लूईड. हे लिक्विड आपला मेंदू आणि स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूच्या मेंब्रेन्समध्ये असतं. जर त्या मेंब्रेनला काही इजा झाली तर ते फाटून, CSF आजूबाजूच्या अवयवांमध्ये लीक व्हायला लागतं." तिची त्याच्या हातावरची पकड घट्ट झाली.

त्याच्या डोळ्यात किंचित भीती तरळली. "इज इट लाईफ थ्रेटनिंग?" आवाज जरा हलला.

"मोस्टली नाही, पण सर्जरी अवघड आहे आणि भीती तर आहेच. सर्जरी म्हटल्यावर काहीही होऊ शकतं." ती म्हणाली.

"घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर." तो वाकून तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. "खर्चाची काळजी अजिबात करू नको."

"नाही नाही, ते माझ्या इन्शुरन्समध्ये कव्हर होईल. पण मला भीती वेगळ्या गोष्टीची आहे. तू हसशील.. मी इतकी स्ट्रॉंग आहे, स्वतःच कापाकापी करते तरीही मला स्कॅनची भिती वाटते. डॉक्टरांनी एम आर आय करायला सांगितला आहे, आणि मला बंद जागांची भीती वाटते. आय मिन अगदी लिफ्ट वगैरेमध्ये नाही पण जिथे मी एकटी अश्या काळोख्या बोगद्यात असेन तेव्हा मला नाही माहीत माझं काय होईल." तिच्या भरलेल्या डोळ्यांतून एक थेंब अलगद खाली ओघळला. "ममा.. ममा खूप हायपर होते. मला सर्जरी कन्फर्म झाल्याशिवाय घरी काही सांगायचं नाहीये."

"नोरा, मी आहे!" तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून अंगठ्याने पाणी पुसत तो म्हणाला. "आपण फक्त आत्तापुरता विचार करू, ओके? आधी csf असल्याचं कन्फर्म होऊ दे, मग ठरवू पुढे काय करायचं. घाबरू नको, मी तुझ्याबरोबर पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये थांबेन. आफ्टर ऑल, आयम अ गुड हजबंड!" त्याने हसत डोळा मारला.

"गुड हजबंड.." किंचित हसत ती पुटपुटली. नाकापाशी टिश्यू धरून तिने त्याच्या कपाळाला कपाळ टेकवले.

नोराचा घसा दाटून आला, त्याने स्वतःच सांगितले होते, ही वॉज नॉट गुड विथ इमोशन्स.. पण आत्ता तो तिला अगदी हवा तसा वागत होता. मेबी ती त्याच्याबद्दल जास्तच हावरटपणा करत होती.

त्याच्या केबिनच्या मधोमध ते तसेच किती वेळ बसले होते कुणास ठाऊक, दारावर झालेल्या टकटकीने ती मागे झाली आणि डोळे पुसले. अपेक्षेनुसार काजळ स्मज झालं होतं. तिथे टिश्यू अजून घासला. तो दारातल्या माणसाशी बोलत असताना तिने दुसरा टिशू उचलून पुन्हा नाक टिपले. प्लीज हे csf नसू दे.. म्हणत सगळे बोळे डस्टबीनमध्ये टाकून ती उठली.

"आता बरं वाटतंय?"  परत येऊन तिचा चेहरा न्याहाळत त्याने विचारले.

हम्म.. तिने बरी दिसण्याचा प्रयत्न केला.

"यू आर लूकिंग ऑफूल!" त्याने चिडवलं.

"थँक्स, आय ऑलवेज ट्राय माय बेस्ट." ती किंचित हसली.

त्याने हलकेच तिची हनुवटी उचलून ओल्या गालावर ओठ ठेवले. "सो तू घरी न जाता एवढंच सांगायला इथे आली होतीस? तू माझ्या टेक्स्टला रिप्लाय केला नाहीस.." त्याने हळूच विचारले.

हां टेक्स्ट.. राईट.. "मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते."

"आज रात्री फ्री आहेस ना? आपण डिनरला चाललोय."

"कुणाकडे?"

"कुणाकडे नाही, सन अँड सॅन्डमध्ये. आपण दोघेच." एव्हाना त्याचे ओठ डेंजरसली तिच्या जवळ आले होते.

"लाईक अ डेट?" तिने डोळे विस्फारून त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याने मान हलवली

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle