रूपेरी वाळूत - ३७

सीएसएफ लीकचे निदान झाल्यावर न्यूरो सर्जन, स्पेशल इएनटी सर्जन वगैरे लोकांच्या तारखा जुळून आठवड्याने सर्जरीची तारीख मिळाली ती नेमकी गणेश चतुर्थीची. जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोय नसल्यामुळे, पणजीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करायची ठरली. नोराच्या आजाराबद्दल घरी सगळ्यांना सांगितल्यावर लोक फारच तणावात आले. ममाने सर्जरी शब्दानेच बीपी वाढवून घेतलं. शेवटी नोरानेच निर्णय घेतला. पलाश एकटाच तिच्याबरोबर जाईल आणि माया डॅडींबरोबर ममावर लक्ष ठेवेल. पलाशच्या घरी गणपतीची गडबड असणार होती.

सर्जरीच्या विचारानेच नोरा कोशात गेली होती. व्हॉट इफ इट फेल्स.. सगळे धागे हातातून सुटून चालल्यासारखे वाटत होते. पलाश सतत तिच्या जवळ असण्याचा प्रयत्न करत होता पण तिला त्याला कुठल्याही कमिटमेंट शिवाय आपल्यात अजून गुंतू द्यायचं नव्हतं. ती सतत दार लावून तिच्या खोलीतच होती. शेवटी सर्जरीचा दिवस उजाडला. पहाटेच्या काळोखात निघतानाही दोघे गप्प गप्प होते. डोळ्यात जमलेले किंचित पाणी पुसून तिने मन घट्ट केले. तिच्या चेहऱ्यावर उगवतीचं कोवळं ऊन पडेपर्यंत ती मागे डोकं टेकून झोपून गेली. रात्रीच्या पावसाने भिजलेला जांभळा रस्ता मागे टाकत, ड्राइव्ह करता करता मध्येच पलाश तिचा कोमेजलेला चेहरा डोळ्यात भरून घेत होता. वाटेत एक चहा-कॉफी ब्रेक घेऊन दहा वाजता ते हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहोचले.

त्याने दोघांच्या दोन बॅग उचलल्या आणि तिच्याबरोबर लिफ्टमध्ये शिरला. तिने हळूच मान वळवून त्याच्याकडे पाहिले पण त्याचा चेहरा कोराच होता. तो कसाबसा जरासा हसला. वॉर्ड बॉयने उघडून दिलेल्या खोलीत जाऊन त्याने बॅग्ज कोपऱ्यात ठेवल्या. तो बिसलेरीचा टॅंक ठेवलेल्या टेबलापाशी टेकून, खिशात हात घालून गप्प उभा होता. एव्हाना तिला त्याचा अर्थ समजू लागला होता. तो कशाबद्दल तरी नर्व्हस होता. ती काही बोलणार इतक्यात नर्स आली. सर्जरी साडेबाराला सुरू होणार म्हणून तयारीसाठी नर्स तिला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. बीपी, वजन चेक करून खुर्चीत बसवून नर्सने तिचा ब्लड ग्रुप, ऍलर्जीज, आधी झालेल्या शस्त्रक्रिया, जुने आजार वगैरे शंभर गोष्टी पुन्हा विचारून कन्फर्म केल्या. पुढची सगळी प्रोसिजर स्टेप बाय स्टेप सांगून तिने नोराला पुन्हा तिच्या खोलीत आणून सोडले. नोराने बाथरूममध्ये जाऊन हॉस्पिटलचा फिक्या पिस्त्यावर बारीक निळे ठिपके असलेला टाय अप गाऊन घातला.

ती बाहेर आली तेव्हा पलाश बेडवर बसून पाणी पीत होता. "टा डा! कशी दिसतेय मी?" बुजगावण्या सारखे आडवे हात करून तिने विचारले. त्याने काही न बोलता काही सेकंद तिच्या डोळ्यात बघून श्वास सोडला. तिने त्याच्याकडे अजून एक पाऊल टाकलं. "मला तुला काही सांगायचंय.." बोलायला सुरुवात तर केली पण त्याच्यासमोर तिला जास्त आजारी आणि एकटं वाटायला लागलं. कदाचित हॉस्पिटलचे आवाज, हवेत पसरलेला लायझॉलचा वास, तिने घातलेला पातळ गाऊन सगळं एकदम चाल करून येत होतं. कदाचित तो तिला पुन्हा कधीच दिसणार नाही ही भीतीही मनात लुकलुकत होती. तिने थंड पडलेले तळहात एकमेकांवर चोळले. तो कडू औषध गिळल्यासारख्या चेहऱ्याने तिची हालचाल पहात होता. तिचा चेहरा मनात साठवून घेत होता.

"ओके.." तो बारीक आवाजात म्हणाला.

"पलाश, आपण " ती पुढे बोलायच्या आत मघाचीच नर्स दारातून डोकावली. "गाऊन घातला का? ओह, रेडी! गुड. मी व्हीलचेअर पाठवते."

डॅम इट.. वेळ संपला. अवर टाईम इज अप.. भीतीच्या टाचण्या आता हळूहळू शरीरभर पसरू लागल्या. तिने पिळवटलेल्या नजरेने पलाशकडे पाहिले. "प्लीज पाच मिनिटं थांबा." पलाश उठून नर्सला म्हणाला. "पण, ऑलरेडी लेट.." "मला माझ्या बायकोबरोबर थोडासा वेळ हवाय. प्लीज." तिचं बोलणं तोडत पलाश ठामपणे म्हणाला. त्याच्या तोंडून 'माझी बायको' ऐकून नोरा जरा थरारली. नर्स वैतागून मान हलवत बाहेर गेली.

नोरा बेडवर बसून त्याच्याकडे बघत होती. सगळा धीर एकवटून आता बोललंच पाहिजे. तो कसा रिऍक्ट होईल याचा विचार तिने बंद करून टाकला. "पलाश, आपण हे खोटं वागणं बंद करूया." तो दार लावून वळला आणि तिच्यासमोर गुडघे टेकून बसला. तिचे हात हातात घेऊन त्याने बोलायला तोंड उघडले तेव्हाच ती त्याच्याकडे झुकून पुन्हा बोलू लागली. "लेट्स स्टॉप प्रिटेंडिंग. सर्जरी नंतर मला जाग येईल तेव्हा आपण हे खोटं वागणं बंद करूया." ती त्याच्या तळ न दिसणाऱ्या करड्या घाऱ्या डोळ्यात हरवत होती.

"मी तुला आवडते. तू कबूल करणार नाहीस, बट इट्स ट्रू." तो बराच वेळ तिच्याकडे पहात राहिला. तिच्या मनात नको ते विचार यायला लागले.

"कश्यावरून?" त्याचा चेहरा जरा मऊ झाला होता.

"कारण आपण जी खोटी केमिस्ट्री वाढवत होतो ना ती मला खरी वाटते. तू माझ्यासाठी आणलेली फुलं, माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर रहाणं, माझी काळजी करणं.. ती डेट नाईट, ते सगळे किसेस हे खोटं नाहीये. मागच्या दोन तीन महिन्यात मी कधीतरी तुला आवडायला लागले. मी मूर्ख नाहीये, मला कळतंय. रोज जसजसा वेळ जातोय, मला तू जास्त जास्त आवडायला लागला आहेस." तिने एका दमात बोलून टाकले.

" तू मूर्ख नक्कीच नाहीस. सो! मी तुला आवडतो?"  त्याने तिच्या हातांवर हलकेच ओठ टेकत विचारले.

तिने मान वर खाली हलवली. "श्श, स्टेडी!" त्याने पटकन कपाळाला हात लावून तिला थांबवले. "सो, नो प्रिटेंडिंग?" तिने डोळे मोठे करून विचारले.

ओके! तो किंचित हसून म्हणाला.

"अम्म, काय? ओके? फक्त ओके?" तिच्या गोधळलेल्या चेहऱ्याकडे बघून तो पुन्हा हसला.

"एवढं सरप्राईज व्हायला काय झालं? मी ऑलरेडी आपली डेट प्लॅन केली होती."

"पण तू मला आपणहून तुझ्या फीलिंग्स काही सांगितल्या नव्हत्या. सो मी डायरेक्ट सांगते आहे. मला वाटलं होतं तू नाही म्हणशील किंवा माझी चेष्टा करशील."

"असं का करेन मी? मलाही हे नाटक थांबवायचं आहे. आय वॉन्ट यू!" त्याच्या चेहरा आता मोकळा झाला होता.

"टाईम टू लीव्ह." तेवढ्यात दार उघडून आत येत नर्स कडकपणे म्हणाली. पलाशच्या चेहऱ्यावरचं हसू विरून गेलं.

"इट्स ओके." नोरा त्याच्या हातावर थोपटत म्हणाली. वाकून तिने त्याच्या गालावर ओठ टेकले आणि खोल श्वास घेत त्याचा सुगंध मनात दडवून ठेवला. ती बसल्यावर नर्सने व्हीलचेअर ढकलली. पलाश तिच्याबरोबर लिफ्टपर्यंत आला. "मी बाहेर येईन तेव्हा तू थांबशील ना?" लिफ्टची वाट बघताना तिने वर त्याच्याकडे बघितले.

"वेडी आहेस का तू? मी फक्त तुझ्यासाठी इथे आहे."

"हुंह! मी फक्त टेस्ट करत होते." ती हसून म्हणाली. "पण मला खरंच डोळे उघडताच तू समोर हवा आहेस." तिच्या आवाजातील कंप जाणवून तो खाली वाकला. हॉस्पिटलच्या रुक्ष वातावरणात तो त्याच्या लाईट ब्लू जीन्स आणि ब्लॅक रिब्जवाल्या स्वेटरमध्ये उठून दिसत होता. तिचे डोळे भरून हळूहळू तो ब्लर व्हायला लागला तेव्हा त्याने हलक्या हाताने तिचे डोळे पुसले. "पलाश, मला थोडी भीती वाटतेय.." ती हळूच म्हणाली.

" मी काय बोलतोय ते मला कळत नाही पण मी तुझ्याहून जास्त घाबरलोय. तू स्ट्रॉंग आहेस आणि तू व्यवस्थित बाहेर येशील. मी तुझी वाट बघतोय. ओके?" त्याने हळूच तिच्या केसांवरून हात फिरवला.

तिने खोल श्वास घेऊन बोटातली वेडिंग रिंग काढून त्याच्या हातात दिली. तेवढ्यात लिफ्ट आली. त्याने न रहावून तिच्या ओठांवर ओठ टेकले. नर्सने मान वळवून चक चक केल्यावर नोरा किंचित हसली.

व्हीलचेअर आत नेताना तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. हसायचा प्रयत्न केला पण डोळ्यात जमणाऱ्या पाण्यापुढे काही शक्य नव्हतं.

"मी इथेच आहे, ओके? मी तुझी वाट बघतोय. मेक शुअर यू कम बॅक टू मी."  दार बंद होता होता तो ओरडला.

हे कितीही बालिश असलं तरी तिच्यासाठी पुरेसं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle