तीन वाजले तरी नोराची सर्जरी सुरूच होती. पलाश दोन अडीच तासांपासून पिंजऱ्यात कोंडलेल्या प्राण्यासारखा कॉरिडॉरमधल्या खुर्चीत बसून होता. एव्हाना त्या जागेचा इंचन इंच त्याने येरझाऱ्या घालून संपवला होता. खिडकीत उभा राहूनही त्याच्या डोळ्यांना बाहेरचं काही दिसत नव्हतं. ममाला ऐकू येऊ नये म्हणून माया मधून मधून व्हॉट्सऍपवर त्याला अपडेट विचारत होता. त्याला उत्तर देऊन शेवटी तो पुन्हा त्या खुर्चीत तळहातांत चेहरा बुडवून बसला.
एकदा दार उघडल्यावर त्याने आशेने पाहिले तर एक नर्स घाई घाईने बाहेर निघून गेली. तेवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. दादाचा कॉल. त्याच्या प्रश्नांना उदासवाणी उत्तरं देता देता आईने फोन घेतला. "पलाश, तू काळजी करू नको. सगळं नीट होईल. वेळ लागला तर लागू दे पण ऑपरेशन नीट होईल. घरातले गणपती बसले, मी आरतीच्या वेळेसच देवाला गाऱ्हाणा घातलाय, माझ्या बायला सुखरूप ठेव म्हणून. तिला कायेक होणार नाय बघ."
पलाश किंचित हसला.
"माका म्हाइत हाय, तुला काय हा सगळा पटत नाय पण आमची म्हाताऱ्यांची आपली श्रद्धा!" आई जरा रागावलीच.
"हम्म, मला तेवढंच हवंय. ती सुखरूप बाहेर येऊदे." तो दबल्या आवाजात म्हणाला.
"बघ, ती बाहेर आली की तिला सावरायला तू घट्ट रहायला पाहिजे."
"आई! मी बरोबर घट्ट आहे ."
"तर तर, कळतो मला बारीक झालेला आवाज."
त्याने काहीतरी विषय बदलून फोन ठेवला. फोन खिशात टाकताना त्याने समोर पाहिले तोच दारात त्याला शोधत येणारा रॉब दिसला. "पलाश!" म्हणून हात करून तो शेजारी येऊन बसला.
"अजून बाहेर नाही आली?" त्याने विचारताच पलाशने नकारार्थी मान हलवली. "काळजी नको करू." त्याने पलाशच्या पाठीवर थाप मारली. "इव्हाच्या बुटीकची एक डिलिव्हरी द्यायला आलो होतो. मारिया आंटीने हे नोरासाठी सूप आणि तुला सँडविच पाठवली आहेत." त्याने पिशवीतली थर्मास बॉटल आणि एक काचेचा चौकोनी डबा दाखवून पिशवी शेजारच्या खुर्चीत ठेवली. थँक्स! पलाश ओठ दुमडून हसला. पंधरा वीस मिनिटे बसून शेवटी रॉब उठला. "सॉरी तुला अजून त्रास नाही देत, ऑपरेशन झालं की मला मेसेज टाक. मी जायच्या आधी नोराला बघून जाईन." पलाशने पुन्हा मान वर खाली हलवली.
रात्री नोराबरोबर तिला कंपनी म्हणून तोही फक्त मिश्र भाज्यांचं सूप प्यायला होता तरीही त्याला भूकेची अजिबात जाणीव नव्हती. तिची वेडिंग रिंग खिशातून काढून त्याने मुठीत घट्ट धरून ठेवली. सर्जरीबद्दल डॉक्टरांशी बोलताना त्यांनी दिलेल्या उत्तराने त्याच्या डोक्यात फेर धरला. सर्जरी किती वेळ चालेल म्हटल्यावर ते म्हणाले होते साधारण एक ते तीन तास. आणि आता तीन तास संपले होते. काहीतरी चुकतंय. ती एव्हाना बाहेर यायला हवी होती. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला.
ती सुखरूप बाहेर यावी एवढीच इच्छा मनात धरून तो रिंग बोटात गोलगोल फिरवत होता. असाच अर्धा पाऊण तास गेल्यावर शेवटी एक नर्स त्याच्या दिशेने आली.
पलाश ताडकन उठून उभा राहिला. "इज शी ओके?"
"सगळं छान आहे, सर्जरीनंतर पेशंटला अंडर ऑब्झरवेशन ठेवलंय."
"मी बघू शकतो का?" तो घाईत म्हणाला.
"थोडं थांबा. तिला जाग आली की आम्ही रूममध्ये आणू तेव्हा भेटा."
"ती बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना?" त्याला अजूनही भीती वाटत होती.
"एकदम ओके. डॉक्टर राउंडला आल्यावर बाकी सगळं सांगतील. रूममध्ये बसा, आम्ही थोड्या वेळाने पेशंटला घेऊन येतो."
मान डोलवून त्याने खुर्चीतली पिशवी उचलली आणि खोलीत जाऊन पुन्हा येरझाऱ्या घालू लागला. रूममध्ये काही बदल नव्हता, फक्त बेडवरची बेडशीट बदलली होती. दारातून आत येताच डावीकडे बाथरूमचे दार, भिंतीला चिकटून एक बेड, समोरच्या खिडकीखाली एक खुर्ची आणि दुसऱ्या भिंतीवर टीव्ही. वाट बघून बघून शेवटी तो खुर्चीत बसला. अर्धा तास! अर्ध्या तासाने तिला आत घेऊन आले. स्ट्रेचरवरून तिला बेडवर ठेवेपर्यंतही त्याला दूर राहवत नव्हतं. तो पटकन बेडशेजारी उभा राहिला. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. एका नाकपुडीत टॅम्पॉनसारखं पॅकिंग घालून नाकावर आडव्या बँडेज आणि चिकटपट्ट्या होत्या. एका डोळ्याखाली सूज आणि खरचटलेलं दिसत होतं. खूप थकवा दिसत असला तरी चेहरा सोडता ती बाकी व्यवस्थित होती. तिला आत आणणारी माणसं खोलीबाहेर पडताच तो खुर्ची पुढे ओढून तिच्याशेजारी बसला.
"कसं वाटतंय?" त्याने चेहरा थोडा जवळ नेत विचारलं. तिने पटकन त्याच्या बोटात आपली बोटं गुंफली आणि त्याच्या फितूर हृदयाचा एक ठोका चुकला. त्याने दोन्ही हातात तिचा हात घट्ट धरून ठेवला. तिचे डोळे ओलावले. "डोकं खूप ठणकतंय, पोटात दुखतंय आणि खूप दमायला झालं. आय होप बाकी ठीक आहे. किती वाजले?" ती बारीक आवाजात बोलत राहिली. त्याने तिचे विस्कटलेले केस कपाळावरून बाजूला केले आणि हलकेच ओठ टेकवले.
"तू माझ्या आयुष्यातली पाच वर्ष कमी केलीस!"
"म्हणजे?" ती गोंधळली.
"तू किती वेळ सर्जरीमध्ये होतीस माहिती आहे? ऑलमोस्ट पाच ते सहा तास. मी वाट बघत घाबरून मेलो असतो!" तो श्वास सोडत उद्गारला.
"ओह.. एवढा वेळ.." तिने आयव्ही ड्रीप लावलेला दुसरा हात उचलून हळूच नाक चाचपून पाहिले. त्याने लगेच मायाला कॉल केला. सर्जरी व्यवस्थित झाल्याचे सांगून त्याने फोन नोराकडे दिला. सगळ्यांशी भरपूर बोलून होईपर्यंत तिचे डोळे मिटायला लागले. निरोपाचं बोलून ती झोपल्यावर त्याने आईला आणि नंतर रॉबला कॉल करून अपडेट दिला आणि फोन बाजूला ठेवला.
काही वेळातच दार वाजवून नर्स आत आली. बीपी बघायला हात उचलल्यावर नोराने डोळे उघडले.
"कसं वाटतंय आता? ऑल ओके?" नर्सने हसून विचारले.
"आय थिंक सो!" नोरा हसली.
"हम्म बीपी नॉर्मल आहे आता ताप बघूया."
"डॉक्टर येतील का आता?" पलाशने मध्येच विचारले.
"हो, डॉक्टर येतील आता. मी सलाईन बॅग बदलते.
तुम्ही फक्त आराम करा" तिने लक्ष पुन्हा नोराकडे वळवले."जर दुखत असेल तर जेवणानंतर पेनकिलर घ्या."
"हम्म"
"ताप नाहीये. गुड! मी दर तासाला चेक करायला येईन. काही त्रास झाला तर बेल वाजवा."
"ओके."
नर्सने बाहेर जाण्यापूर्वी तिच्या पाठीमागे दोन उश्या लावून तिला बसतं केलं. तो बेडशेजारी खुर्चीतच बसून होता. "पलाश!" ती उशीवर मान टेकून त्याच्याकडे बघून हसली. "हे!" त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.
"हे किती वाईट दिसतंय? खोटं नको बोलू."
"हम्म, खूपच वाईट." तो तोंड वाकडं करत म्हणाला.
"दॅटस् मोर लाईक यू!" ती हसली.
"अरे हो, ममाने सूप पाठवलंय. रॉब आला होता, मेबी परत येईल तुला भेटायला." तो उठून सूप बोलमध्ये घेऊन आला.
"ममा बिचारी.. तिला अजून माहितीच नाही हे किती सिरीयस ऑपरेशन होतं. मी तिला आणि डॅडींना फक्त छोटीशी प्रोसिजर आहे असं सांगितलं होतं. तरी बीपी वाढवून घेतलं तिने. फक्त मायाला माहिती होतं, तेही तूच सांगितल्यामुळे!"
"हम्म.. घे. क्रीम ऑफ व्हेज सूप! तुला सगळं मऊ खायचंय आता." त्याने चमचा पुढे केला. एक चमचा पिऊन ती हसायला लागली.
"असा फोटो काढला पाहिजे. पलाश! आणि मला सूप भरवतोय! आधी आपण कल्पना तरी केली असती का?" काही उत्तर न देता तो फक्त हसला.
सूप संपेपर्यंत डॉक्टर आले. "काय म्हणतेय पेशंट?"
"ठीक आहे. पोटात थोडं टोचल्यासारखं दुखतंय, नाकाने श्वास घेता येत नाही." नोरा वर सरकून बसत म्हणाली.
"हो, मी मागच्या वेळी सांगितलं होतं. लीक पॅच अप करायला जे कार्टीलेज आणि टिशू लागतात ते आपण नाक, पोट आणि कानामागचे वापरतो. आपण..
"पण आय थिंक आपण फक्त नाकाचे वापरणार होतो" पलाश मधेच म्हणाला.
"हो प्लॅन तसाच होता, पण मेंब्रेनमधली फट आम्हाला वाटली त्यापेक्षा जास्त होती. ती बुजवायला नाकाचे पुरेसे नव्हते म्हणून पोटाचे वापरले."
"ओह, म्हणून एवढा वेळ लागला.." पलाशची धाकधूक पुन्हा वाढली.
"येस. जास्त फाटलेलं होतं प्लस जास्त आतल्या बाजूला होतं. त्यामुळे एंडोस्कोपी असली तरीही पॅचअप ला खूप जास्त वेळ लागला. आय थिंक नोराला ही कंडिशन आधी होतीच आणि नंतर डोकं कुठेतरी आपटलं असणार, त्याने ती वाढली."
ओह! नोरा आणि पलाश एकदम मीनूच्या कॉकटेल पार्टीची रात्र आठवून एकमेकांकडे बघून उद्गारले.
क्रमशः