तर मी सध्या करियर चेंजच्या विचारात आहे. मला काहीतरी वेगळे करायचे आहे, हटके करायचे आहे, कूल करायचे आहे, माझ्यातल्या अंगभूत कलागुणांना, कौशल्याला बाहेर आणायचे आहे, मला माझ्या टर्म्सवर कामाचे तास हवे आहेत, मला स्वतःसाठी काम करायचे आहे. पण काय बाई करू, काय करू बरे, कायच बाई करू बरे? अशी माझी भुणभुणभुण ऐकून माझ्यासाठी करियर ऑप्शन्स शोधण्याचे आव्हान माझ्या ३ जणांच्या मार्केट रिसर्च टीमने स्विकारले. ही टीम म्हणजे माझी मुलगी चिन्मयी, भाची सानिया आणि भाचा आकाश. मी परत पूर्ववत अमेरिकी भांडवलशाही बळकट करणारे काम करू नये असे आमच्या त्रिकूटाचे ठाम मत होते. मी मोबदल्यात तडजोड करणार नाही हे माझे ठाम मत होते. तर आता मागणी जास्त, पुरवठा कमी असलेल्या आणि माझ्या कौशल्याची गरज असलेल्या करियर ऑप्शन्सचा रिसर्च सुरू झाला.
अनेक टिकटॉक विडिओ, इंस्टा फीड, बझफीड आणि अशाच आणखी मान्यवर स्त्रोतांकडून मिळालेला विदा (data) आणि त्यांचे विश्लेषण (म्हणजे शुद्ध मराठीत डाटा ऍनॅलिसिस) करून आमच्या मार्केट रिसर्च टीमने एका आठवड्यात माझ्यासमोर त्यांचा अहवाल सादर केला.
त्यात माझ्यासाठी खालील करियर ऑप्शन्स प्रस्ताव देण्यात आले होते.
१. बाई वाचकांसाठी इरॉटिका रायटर - ह्याचं मराठीत भाषांतर करत नाही, हे इंग्रजीतच बरं वाटते म्हणायला.
***आता संविधानिक इशारा, तुम्हाला इरॉटिका म्हणजे काय हे माहित नसेल तर ( थू तुमच्या जिंदगानीवर) लगेच बाजूला कोण असेल त्याला विचारू नका. कोणाला विचारलेत त्याप्रमाणे विविध प्रकारचे कटाक्ष मिळण्याची शक्यता आहे. थोडा धीर धरा, हा लेख शेवटपर्यंत वाचा. मी उदाहरणे देऊन स्पष्ट करणार आहे इरॉटिका म्हणजे काय ते. ( इथे जाणकार जणींनी मनात मिटक्या मारलेल्या मला कळले आहे)
रिपोर्ट पुढे चालू...
तर बाई वाचकांसाठी इरॉटिका लेखनाची खूप मागणी आणि अत्यल्प पुरवठा आहे. आमच्या टीमच्या मते हा माझ्यासाठी नंबर १ पर्याय होता. इथे लक्षात घेण्यासारखी बाब ही की त्यांचे विदा विश्लेषण आणि माझ्यातील कौशल्य यांची जोडी जमवून त्यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. इथे माझे लिहिण्याचे कौशल्य त्यांना अभिप्रेत असावे. आमच्या यंग टीमला मी इरॉटिका लिहू शकेन असे वाटले म्हणजे नवल कूलच की!
इश्श खरंच, मी फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे पण रात्री सर्व झोपल्यावर लॅपटॉपवर हेडफोन्स लावून पाहिला होता. (शिक्रेट सांगू का तर जांभया देत पळवत पळवत पाहिला होता.) चांगल्या विशुद्ध इरॉटिका बाई प्रेक्षकांसाठी असण्याची गरज तेव्हाच माझ्या मनाने टिपली होती. फार पूर्वी अमेरिकेन लोकांनी विचारल्यावर भारतीय संस्कृती माहिती होण्याच्या उद्देशाने कामसूत्र हा अमेरिकेत बनलेला सिनेमा पाहिला होता, पण तो महाभयंकर बोरिंग आणि बावळट वाटला होता.
चांगल्या चाणाक्ष आणि स्मार्ट इरॉटिका बाई प्रेक्षकांसाठी असण्याची गरज तेव्हाच माझ्या मनाने टिपली होती. एकूणच माझ्या चौफेर वाचनातून मूळातच उच्च अभिरुची असलेल्या बायांसाठी या क्षेत्रात शून्य प्रगती झाली आहे हे मला पटले होतेच.
दुसरा करियर ऑप्शन :
२. लाइफ कोच - म्हणजे ज्यांना आयुष्यात काय करावे कळत नाही त्या भरकटलेल्या किंवा गोंधळलेल्या जीवांना मार्गदर्शन करायचे. यात सर्व वयोगटातील ग्राहक वर्ग आहे. अगदी टिनेजर ते सिनियर सिटीझन via मध्यमवयीन क्रायसिसग्रस्त. कोणत्या विषयात पदवी घेऊ, घेऊ का नको, ते करियर चेंज काय आणि कसे करू, आयुष्याला असला तर अर्थ काय?
ऑं, अरे मीच त्या गोंधळात आहे ना बाळांनो! त्यावर त्यांनी मला ५ मिनीटे इंग्रजीतून डाटा, विश्लेषण दाखले देऊन समजावून सांगितले. त्याचे सार होते "ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि ज्याला कळतं तोच कोच". हल्ली टिकटॉकवर करियर चेंज म्हणून लाइफ कोच झालेल्यांची चलती आहे. परत या सगळ्या विश्लेषणाशी माझ्या कौशल्याची जोडी जमवली होतीच. मी म्हणे या तिघांच्याही गळी नंतर चांगल्या सिद्ध झालेल्या कल्पना उतरवल्या होत्या. माझ्या मुलीने शेवटी एका वाक्यात समारोप केला, रेटून बोलायचे गं आई as if you know it all, तू परफेक्ट आहेस.
किती कॉन्फिडन्स आपल्या आईवर. ओळखून आहेत कार्टी.
तिसरा करियर ऑप्शन:
३. सायकिक हिलर - आता मराठीत याला काय म्हणावे माहित नाही. (बहुधा मांत्रिक पण त्याला काही ऑरा नाही!) पण प्रचंड मागणी आहे म्हणे. टॅरोट कार्ड, क्रिस्टल बॉल, ऑरा स्कॅनिंग, ऑरा क्लिनींग, ऑटो रायटिंग असे बरेच दैवी शब्द त्यांनी तोंडावर फेकले. बरेच लोक आता ह्या गोष्टी शिकतात, सर्टिफिकेशन ते पीएचडी सर्व असतेय म्हणे. सध्या लोक या अतिवेगवान, गुंतागुंतीच्या, स्पर्धेच्या आणि पॅंडेमिकच्या युगात इतके भंजाळले आहेत की त्यांना सायकिक हिलिंगचा आधार वाटतो. इतके लोक या क्षेत्रात जात असूनही पुरवठा कमीच आहे, मागणी वाढतेच आहे. या सर्व विदा, विश्लेषणाशी अर्थातच माझ्या कौशल्याची जोडी जमवली होती! मी आता केस रंगवत नाही, कपडे जिप्सी सारखेच सुती/हलके/ढगळे घालते. थोड्या प्रयत्नात प्रेमळ गोड विश्वासार्ह म्हातारी दिसू शकते! आणि बाकी काय रेटून बोलायचे! फक्त इथे गूढ अन् गोड बोलायचे. पण त्यातल्या ऑरा क्लिनींग या शब्दाने माझा विरस झाला. किती दिवस लोकांच्या मागे क्लिनींग करत बसायचे. आता नाही जा!
त्यांनी या सगळ्यांबरोबर प्रत्येक पर्यायासाठी सुरवातीची गुंतवणूक, कामाचे तास, कमाई, महिन्याचा खर्च असा सगळा अहवाल सादर केला होता.
नंबर २ आणि ३ साठी रोजच लोकांशी संपर्क येणार, कस्टमर सर्व्हिसची कटकट, परत सुरवातीची गुंतवणूक आणि रोज नीट तयार होऊन बसावे लागणार. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी मराठी मध्यमवर्गीय बाण्याला जागून सगळ्यात सोप्या सुटसुटीत करियर ऑप्शनची निवड केली.
म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. :ड
मी इरॉटिका रायटर होणार!
एकदा हे ठरल्यावर मी सुरूवातीची गुंतवणूक केली. एक नवीन कोरे गुळगुळीत पानांचे, मस्त रूंद रेघा आखलेले हार्ड बाउंड जर्नल आणले. एक मस्त नवीन झरझर चालणारे पेन आणले. टेबलावर मांडून ठेवले. एक धुंद वासाचा फुलगुच्छ फुलदाणीत ठेवला. रात्री नवर्याला दम दिला आज मला अजिबात डिस्टर्ब करू नको. आणि मनात इरॉटिक लेखनाचे मांडे खात लवकर झोपायला गेले. नवीन करियरचा श्रीगणेशा करायचा या एक्साईटमेंटमधे सकाळी नेहमीपेक्षा लवकरच जाग आली.
पटपट आन्हिकं उरकून चटचट देवपूजा केली. आलं घालून केलेल्या चहाचा मग भरून घेतला. एक मस्त घोट घेतला. वही उघडली, पहिल्या पानावर पहिल्या ओळीत सुंदर अक्षरात लिहिले,
||श्री||
दुसर्या ओळीच्या सुरवातीला पेनचे टोक टेकवले. काय बरं लिहू? हम्म्म. डाव्या हाताच्या ओंजळीत हनुवटी हलकेच विसावली. काय बरं लिहू? मग सवयीप्रमाणे लिहून टाकले,
|| श्री गणेशाय नमः ||
पेनचे टोक तिसर्या ओळीच्या सुरवातीला टेकवले.
काय बरं लिहू? हनुवटी खालचा डावा हात आता आणखी वर जात कपाळावर विसावला. कपाळावरची चुकार करड्या केसांची बट कानामागे सारताना कानाच्या पाळीला हलकासा स्पर्श झाला. काय बरं लिहू? हम्म्म. काय बरं लिहू? ओठांचा चंबू करून मी विचारमग्न झाले.
त्या विचारात असताना पापण्या जड होऊ लागल्या. आणि अचानक हातावर ओलसर स्पर्श जाणवून धुंदावलेले डोळे उघडले तेव्हा हात कपाळावरून घसरून ओठांशेजारी आला होता. I was drooling. रात्री एक्साईटमेंटमुळे झोप अपुरी झाली होती, सकाळी सवयीपेक्षा लवकर उठले होते त्यामुळे डुलकी लागली.
पेनचे टोक तिसऱ्या ओळीवर टेकलेलेच होते. वरून श्री आणि श्रीगणेश वाकून बघत होते. मी वैतागून तिसऱ्या ओळीवर
||श्री कुलस्वामिनी प्रसन्न||
लिहिणारच होते तितक्यात वरच्या एका बाथरूममधून शॉवरचा आवाज सुरू झाला, दुसऱ्या बाथरूम मधून फ्लशचा आवाज आला, तिसऱ्या बेडरूमचे दार धाडकन उघडल्याचा आवाज आला. घरातली चारही टाळकी उठली होती. माझा चहाही थंड झाला होता. आणि कुलस्वामिनी माझ्या तावडीतून सुटली.
छे, हे प्रकरण वाटले तेवढे सोपे नाही. आज रात्री प्रयत्न करेन! so stay tuned. नाहीतर बाकी दोन पर्याय आहेतच आजमावयाला.
सो. वंदना व्यास कुलकर्णी
( सो. च सौ. नाही. ही टायपिंग मिश्टेक नाही)
( सो. फॉर सोज्वळ. चांगले पेननेम आहे ना इरॉटिका लिहिण्यासाठी )