वसंतानुभव - १

शुष्क, पर्णहीन आणि राखाडी, ब्राऊन रंगाची झाडं, ढगाळ हवामान, सूर्य उगवला तरी थंडीचंच साम्राज्य, हिमवर्षाव झाला तर नवलाईचे दोन दिवस असे हिवाळ्याचे महिने जातात आणि मार्च उजाडतो. नेहमी सारखी थंडी नव्हतीच असे आठवणींचे उमाळे असले तरी रोजच्या सूर्यदर्शनाने, निळ्या मोकळ्या आकाशाने आपोआप जास्त उत्साही वाटायला लागतं.

सृजनच्या शाळेत या दिवसात एक खूप छान गाणं म्हणतात. मागच्या वर्षी मला पहिल्यांदा हे गाणं समजलं, पण सगळे शब्द लक्षात आले नव्हते, आता यावर्षी सृजन सध्या अखंड हे गाणं छान चालीत म्हणत असतो आणि मी पण त्याच्या सोबत म्हणत असते. त्या ओळींचा अर्थ मराठीत साधारण असा होतो -

पुन्हा नव्याने येतो वसंत,
पुन्हा नव्याने येतो मार्च,
पुन्हा नव्याने उगवतात फुलं
आणि हृदयी नवा प्रकाश,
चला चला,
हिवाळा संपला
पुन्हा नव्याने वसंत आला.

खिडकीबाहेरच्या झाडांच्या पलीकडची इमारत, रस्ता हे दृश्य, जे सगळं हिवाळ्यात पानगळी नंतर सहज दृष्टीक्षेपात असतं, ते आता थोड्याच दिवसात झाडांना पालवी फुटली की अजिबात दिसणार नाही हे लक्षात येतं. त्याची सुरुवात म्हणून पक्षांची घरटी त्या झाडावर दिसायला लागतात. सूर्य उगवण्याची वेळ अलीकडे सरकत जाते. तशी मी अजिबात एवढ्या लवकर उठत नाही, पण पहाटे पासून पक्ष्यांचे आवाज यायला लागले की अर्धवट झोपेत सुद्धा छान वाटतं. नवीन वर्षापेक्षाही व्यायामाचे जास्त संकल्प मी तरी या दिवसात करते. कारण थंडी हळूहळू कमी होऊन पुढचे सहा महिने दिसणारी हिरवाई, फुलं हे सगळं अनुभवायला बाहेर जावंसं वाटतं.

दुकानांमध्ये ईस्टर म्हणून ससे आणि ईस्टर एग्स, त्यावरचे डेकोरेशन, चॉकलेट्स यांची तयारी चालू होते. अजून वेळ आहे की बराच ईस्टरला, इतक्या लवकर चालू झाली तयारी असं मला दर वर्षी वाटतं, म्हणजे हे मार्केटिंग किती लवकर चालू करतात अशा अर्थाने. झाडांची दुकानं, नर्सरीज, फ्लोरिस्ट अशी ठिकाणं विविधरंगी फुलांच्या लहान लहान रोपट्यानी भरभरून वाहायला लागतात. आम्ही पण उत्साहाने झाडांची खरेदी करतो. प्रत्येक गावातल्या सरकारी ऑफिसेस कडून मुख्य चौकात, काही रस्त्यांवर नवीन फुलांची रोपं लावली जातात. घराघरात बाल्कनीज, खिडक्या इथे पण फुलं दिसायला लागतात. 'रंगांचा उत्सव' अशा नावाखाली वसंत ऋतूतले कपड्यांचे सेल चालू होतात.

प्रत्येक झाड दर दिवशी वेगळं दिसतं. सगळ्यात सुरुवातीला फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुलं दिसायला लागतात. मूळ झाडाला लपवून आपलं अस्तित्व दिवसागणिक ठळक पणे जाणवून देतात. अगदी लहान कळ्या होत्या त्या झाडावर दोन दिवसात फुलं आणि मोठे मोठे गुच्छ दिसायला लागतात. दर वर्षीच्या वसंत ऋतूतल्या सगळ्या ट्रिप्स आठवतात, विशेषतः पायी फिरलेल्या सगळ्या पायवाटा. तरी दर वर्षी नवीन वाटा सापडतात आणि मग फोन मधले फोटो भरत जातात.

अक्खा रस्ता या फुलांच्या पांढऱ्या गुलाबी पाकळ्या रस्ताभर सांडलेल्या असतात आणि आपण चालताना वाऱ्यासोबत आपल्या सोबतीने चालत राहतात. हे अगदी बहारों फूल बरसाओ सारखं वाटलं तरी नेमकं व्हिडीओ मध्ये ते टिपता येत नाही.

आता तर कोणत्याही अशा रस्त्याने चालताना सृजन पण फुलं बघून सतत "ममा हे बघ इकडे किती फुलं आहेत, हे किती छान आहे" सांगत असतो. 'आई बाबाना ही सगळी स्पेशल फुलं मीच कसा शोधून देतो आहे' असं त्याला वाटत असतं. मग मधूनच एखादं रानफूल घेऊन येतो आणि माझ्या केसात कानाजवळ खेचून अगदी प्रेमाने हे बघ मी तुझ्या साठी आणलं असं सांगतो.

सूर्यास्ताची वेळ पुढे पुढे सरकत जाते. लहान तळी, ओढे अशा ठिकाणी बदकं, बगळे आणि इतरही पक्षी जास्त दिसतात. त्यांना कितीही निसर्गाची आणि बदलत्या हवामानाची सवय असेल, पण मला मनातल्या मनात त्यांना आता थंडी वाजत नसेल या विचाराने बरं वाटतं. मधमाश्या, फुलपाखरं आपलं काम चोखपणे पार पाडायला बाहेर पडतात. कुत्र्यांना फिरायला घेऊन जाणारी मंडळी, सायकल वर जाणारे लोक यांची गर्दी वाढते. तसे अगदी कडाडत्या थंडीत पण असतातच, पण गर्दी वाढते. तसा आपल्या दृष्टीने हिवाळाच असला, तरी आईस्क्रीमची दुकानं मार्च पासून उघडतात आणि थोडं ऊन पडलं की लोक पण आईसक्रीम खायला प्रचंड गर्दी करतात. आपणही त्या लाटेला बळी पडून एखादं आईसक्रीम खातोच. केवळ चेहऱ्याने आणि सवयीने ओळखीची झालेली मंडळी 'बऱ्याच दिवसांनी भेटलात' अशा अर्थाने हॅलो म्हणतात.

दरवर्षीचे सगळे अनुभव, तरी खरंच पुन्हा नव्याने तेवढेच अदभूत वाटतात, पुन्हा फोटो काढले जातात. आता एप्रिल महिन्यात अजून जास्त हिरवीगार बहरलेली झाडं आणि या पांढऱ्या गुलाबी रंगाच्या फुलांच्या सोबतीला अजूनही अनेक रंगांची फुलं अगदी जागोजागी दिसायला लागतील, कारंजी चालू होतील. त्या अनुभवांबद्दल पुढच्या लेखात

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

वसंतानुभव - २

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle