Mueller State Park चांगले ९६०० फुट उंचीवर आहे आणि मी गेले होते नोव्हेंबर महिन्यात, त्यामुळे बर्फच होता काही काही भागांत. या पार्कमधुन उत्तर अमेरिकेतील Continental Divide दिसते. Continental Divide म्हणजे पर्वतरांगा, ज्या उत्तर अमेरिकेतील नद्यांचे दोन भागांत विभाजन करतात. पॅसिफीक सागराला जाऊन मिळणार्या नद्या आणि अटलांटिक सागराला मिळणार्या नद्या येथे वेगळ्या होतात असे कायसे. ही पर्वतरांग अलास्कापासुन चालु होऊन थेट मेक्सिकोपर्यंत जाते. या पार्कमधुन Continental Divide चा जो हिस्सा दिसतो, तो म्हणजे ' Rocky Mountain National Park' च्या पर्वतरांगांचा. हा एक फोटो काढला मी. दुरवर दिसतायत ती शिखरे म्हणजेच Divide :
या पार्कमध्ये साधारण ५५ मैल अंतराच्या ट्रेल्स आहेत. मी काही १० मैलांच्या वर चालणार नव्हते. भर थंडीत जात होते त्यामुळे इलेक्ट्रीक साइटचे बुकींग केले आणि एक छोटासा इलेक्ट्रीक हीटर घेतला. हा खास कॅम्पिंग हीटर असतो. तंबुत चालु असताना चुकुन पडला किंवा आडवा झाला की बंदच पडतो. सेफ्टी फीचर्स चांगले असतात. लावुन बिनधास्त झोपावे.
शनिवारी निघणार होते. शुक्रवारचे शिजवलेले मटण एका स्टीलच्या तांब्यात भरुन डीप फ्रीझमध्ये ठेवले होते, कँपिंगला बरोबर न्यावे म्हणुन. तांब्यात मटण ठेवायचा पहिलाच प्रसंग. तांब्यात अशासाठी की तो न गडगडता माझ्या छोट्या स्टोव्हवर बसतो. ते बरोबर घेऊन निघाले. फ्रीझ झालेले त्यामुळे सांडलवंडीचा प्रश्न नव्हता. नवर्याने तरीही ताशेरे ओढलेच. तांब्यात मटण घेऊन कुणी केंपिंगला गेलेय का कधी? नसेलही नेत कुणी. पण मला दमल्यावर चमचमीत खावेसे वाटते त्याला मी काय करु?
२.३० तासांची ड्राइव्ह आहे. पार्कच्या पायाशी छोटे गाव आहे 'Divide' नावाचे. अगदी एखाद दोन रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, एक पोलीस स्टेशन दिसले जाताना. कॅम्प्साइटजवळच हा नजारा होता:
झाडांच्या मधोमध असलेले तळे गोठले आहे पहा. पटापट तंबु ठोकुन ट्रेलवर निघाले. नोव्हेंबर असल्याने काळोख संध्याकाळी ६ च्या आत पडत होता. रेंजरकाका जीपमधुन फिरत होते. मी हात केल्यावर ते थांबले. चांगलेच गप्पीष्ट होते ते. त्यांचे सासरे पण रेंजर होते म्हणे. इथे रिटायर झालेली बरीच मंडळी स्टेट, नॅशनल पार्कमध्ये जॉब करताना दिसतात. थोडाफार पगार, कधीकधी रहायला क्वार्टृस, कॅबीन्स, फेर्या मारायला जीप, गॉल्फ कार्ट्स वगैरे मिळतात त्यांना. बरेचदा मी रेंजर्सकडे बंदुकही पाहिलेली आहे. तर त्यांच्या सल्ल्याने मी एक कमी बर्फ असलेली ट्रेल निवडली. २.७ मैल वन वे म्हणजे राउंड ट्रीप साधारण साडेपाच मैलांच्या जवळपास. अर्थात चढ उतार होतेच वाटेत. जमेलसे वाटले. स्नो जॅकेट, ग्लोव्ह्ज, कानटोपी घालुन निघाले
डोंगराच्या रस्त्याला लागले. एक डोंगर चढल्यावर काहीतरी scenic view आहे असे कळले होते रेंजरकडुन. चढ असल्यामुळे घाम येत होता भर थंडीतही. जॅकेट काढुन कंबरेला बांधले. वाटेवर हे टर्की धावताना दिसले. भुकच लागली एकदम. मटण आठवले. फक्त परतल्यावर थोडा भात शिजवायचा होता. सुंदर जेवणाची स्वप्ने पहात पहात उरलेला टप्पा संपवला. टर्कीने मला बराच रस्ता सोबत केली. मी Overlook पहायला चाललेले. हा कुठे चाललेला काय माहीत. भटक्या! पण खरेच Overlook सुंदर होता. अप्रतिम असा सुर्यास्त पाहिला त्या संध्याकाळी:
सुर्यास्त पुर्ण होतो न होतो तोच लगेच उलट पावली निघाले आणि ठार मिट्ट काळोख पडण्याआधी व्यवस्थित तंबुत परतले. नवलच झाले! रेंजरकाकांनी चांगली सुरक्षीत वाट दाखवलेली. त्यांच्या शब्दांवर भरवसा ठेवुन सुखरुप प्रवास झाला त्याबद्दल मनात त्यांचे आभार मानले. उद्या सकाळी लांबची ट्रेल करु असे ठरवले.
कंदिलाच्या प्रकाशात खुडबुडत मटण चांगले रटारटा उकळुन घेतले. या पार्कमध्येही सुसज्ज वॉशरुम्स आहेत. त्यांचा उजेडही जरासा येत होता माझ्या कॅम्पसाइटपर्यंत. एकीकडे भात शिजवला राइस कुकरमध्ये. कांदालिंबु होतेच. जेवल्यावर भांडी वॉशरुममध्ये जाऊन धुतली. तेथे भांडी धुवायला वेगळे सिंक होते. आंघोळीसाठी कॉइन शॉवर्स होते. दीड डॉलरमध्ये चार मिनिटांची आंघोळ. मी काही आंघोळ केली नाही तेथे. थंडी खुप होती. उद्याची ट्रेल झाल्यावर पाहु म्हंटले. चार मिनिटांत काय आंघोळ करणार, कप्पाळ!
कपडे बेअर बॉक्समध्ये लॉक केले. ज्या कपड्यांमध्ये अन्न शिजवतो ते बदलुन झोपायचे हा एक महत्त्वाचा कँपिंगचा नियम आहे. आपल्या आजुबाजुला, तंबुत खाद्यपदार्थांचा वास राहता कामा नये. सकाळी लवकर उठायचे होते. उद्याच्या ट्रेलची स्वप्ने पहात झोपी गेले पण घडायचे वेगळेच होते.
उठले तीच क्रॅम्प्स जाणवल्यामुळे. पिरिअडची डेट २/३ दिवस लांब होती पण यावेळेस काहीतरी गडबडलेले. पहिल्या दिवशी चांगलेच दुखते ओटीपोटात. पेन किलर घ्यावीच लागते. ती फर्स्ट एड बॉक्समध्ये होती पण आता काही ट्रेलवर चालणे शक्य नव्हते. चांगलीच खट्टु झाले. नाश्तापाणी करुन, गोळी घेऊन सरळ घरी जायचे ठरवले, येऊ परत कधीतरी निवांत आणि फिरु पार्क म्हंटले. सगळा संसार बॅगेत भरायला घेतला आणि निघाले घरी.
खालच्या ‘Divide' गावात पोचले आणि पोलिस स्टेशनजवळुन जाताना एक पाटी दिसली. अनाथ कुत्र्यांचे शेल्टर होते ते. गाडी पुढे जात होती पण ती पाटी मनातुन जाईना. बरेच दिवस लेक कुत्रा पाळायचा म्हणुन मागे लागलेलाच. पुढे जाऊन पहिला यु टर्न येताच वळाले आणि शेल्टरच्या पाटीकडे वळले.
आत गेले तेव्हाही दोलायमान स्थितीत होते की आता घरी जायचे सोडुन हे काय मध्येच. आत ८/१० कुत्रे होते. घ्यायचा तर अनाथ कुत्राच घ्यायचा हे आधीपासुन ठरवलेले होतेच. लेकालाही तसेच समजावलेले. फारसा विचार न करता एक पिल्लू फायनल केले आणि त्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज पुर्ण करुन गाडीत बसले. अर्थातच पिल्लु घरी न्यायची काहीही तयारी नसल्यामुळे त्याला मागच्या सीटखाली माझ्या पायजम्यावर झोपवले. आणि हा आमच्या आयुष्यात समाविष्ट झाला. आताच्या घडीला दीड वर्षाचा आहे तो आणि आता माझा कँपिंग बडीही झालाय.
Mueller ची ट्रीप अर्धवट राहिली कारण त्यादिवशी हा आमच्याकडे येणार होता. पुढच्या वर्षी परत गेले मी त्या पार्कला आणि उरलेल्या काही वाटा फिरले. पण त्यादिवशी जर ट्रेलवर गेले असते तर संध्याकाळी परतीचा रस्ता धरेपर्यंत शेल्टर बंद झालेले असते. सो, हे सर्व नियतीने घडवुन आणले हे नक्की.
बडीला पहिलावहीला जंगलाचा अनुभव देण्यासाटी तो जेमतेम वर्षभराचा झाल्यावर मी त्याच्याबरोबर 'Golden Gate Canyon State Park' ला गेले. त्याच्यासाठी एक डॉगी बॅकपॅक घेतली, ज्यात तो स्वतःचे खाणे, पाणी, पूप बॅग्स वाहुन नेऊ शकेल अशी. म्हणजे बडीचे मला काहीच जादा ओझे होणार नाही. बॅककंट्रीत कुत्रा सांभाळणे म्हणजे मोठी जबाबदारी आहे. मोठ्या जंगली प्राण्यांना त्याचा वास सहज येऊ शकतो आणि कुत्रा आकाराने लहान असल्याने त्याच्यावर हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे यावेळेस मी जंगलातील एका शेल्टरचे बुकींग केले.
गोल्डनच्या जंगलात अशी एकुण ४ शेल्टर्स आहेत आणि ती एकमेकांपासुन १० ते १५ मैलांच्या अंतरावर आहेत. शेल्टरच्या तीन बाजु बंद असतात आणि वर छप्पर असते. चौथी बाजु मात्र सताड उघडी असते. बडी जेमेतेम वर्षभराचा असल्याने फार टिवल्याबावल्या करायचा ट्रेल्सवर, त्याला हरणांशी खेळायचे असे, खारी पकडायच्या असत. कधीच न मिळाल्यासारखे ओढ्यांचे पाणीच पित बसायचे असे. एक ना दोन. प्रत्येक ट्रेलला जवळजवळ दीडपट वेळ वाढायचा त्याच्यामुळे.
क्रमशः