गोल्डन स्टेट पार्कमध्येच मी जेथे शेल्टर बुक केले होते त्या भागाचे नाव आहे 'Forgotten Valley'. नाव कसे पडले ठाऊक नाही पण त्या परिसरात आजुबाजुच्या ट्रेल्स केल्यावर मी जे अवशेष पाहिले त्यावरुन वाटते की पुर्वी म्हणजे साधारण १०० वर्षांपुर्वी येथे कुणीतरी वास्तव्यास होते. त्यांनी एक Homestead बांधलेले आहे तळ्याकाठी. मी जवळ जाऊन पाहिले तेव्हा जरा पडझड झालेले दिसले. तरीही सुंदरच दिसते. तळ्याकाठी असे १०० वर्षांपुर्वी राहण्यास त्या लोकांना किती मजा आली असेल! तेव्हा प्राणीही जास्तच असतील.
वॅली चांगलीच उंचावर आहे, जवळजवळ आकाशाला भिडलेली. नुकताच पाऊसही पडुन गेलेली त्यामुळे असे धुंद फोटो आलेत. अशा वातावरणाची नशा चढतेच. अमेरिका नाही तर एखाद्या युरोपमधल्या गावात आहोत असे वाटले मला. पाय निघता निघेना.
शेल्टरची वाट पार्किंगपासुन साधारण १.५ मैल आहे. अवघड मुळीच नाही पण ठिकठिकाणी माउंटन लायनच्या अस्तित्त्वाच्या खुणा दिसत राहतात आणि सगळीकडे त्याचाच भास होतो. म्हणजे मला तरी झाला. गुहा, पाण्याचे प्रवाह इतके आहेत की हे ठिकाण जंगली प्राण्यांचे आवडते नसेल तरच नवल. पाऊस पडुन गेल्यामुळे ओढे जास्तच खळाळत होते. कुठुनही पाण्याचा आवाज आला की बडी धावतोच पाण्याच्या शोधात. काय वेड आहे पाण्याचे कोण जाणे पण पुर्ण भिजवुनच घेतो स्वतःला. कुत्रा कितीही स्वच्छ असला तरी तो भिजल्यावर त्याला एक विशिष्ट वास येतो आणि हा वास जंगली प्राण्यापासुन लपुच शकत नाही त्यामुळे मला सततचे टेन्शन.
एका ओढ्यातुन मोठी १ गॅलनची पाण्याची बाटली भरुन घेतली. शेल्टर नजरेच्या टप्प्यात आले तेव्हा एक ससा फॅमिली तेथे पहुडलेली दिसली. आमची चाहुल लागल्यावर शेल्टरखालच्या खाचेत ती गायब झाली. चला काहीतरी सोबत आहे आपल्याला! बरे वाटले.
शेल्टरची पहिलीच वेळ असल्यामुळे संसार कसा मांडावा काही कळेना. आधी प्रत्येक कानाकोपर्याचे, छताचे निरिक्षण केले, कुठे पिटुकला पक्षी, प्राणी वास्तव्यास नाही ना याची खात्री केली. हो, रात्री झोपेत काही अंगावर पडायला नको. बडीने त्या कामात मदत केली मला. त्याला मुंगी, चिलट असले प्रकारही दिसतात आणि त्यांचा तो लगेच चट्टामट्टा करतो.
शेल्टरच्या छ्ताला काही खिळे ठोकलेले दिसले. मी त्यावर प्लास्टीक ठोकुन आडोसा तयार केला. आजुबाजुला फिरुन सुकलेली खोडे गोळा करुन आणली आणि प्लास्टीक उडुन जाऊ नये म्हणुन मांडुन ठेवली. एका खिळ्याला कंदील टांगला. एका खिळ्याला जॅकेट. मज्जा आली घर मांडताना. एकुणच शेल्टरमध्ये आपल्यापुरता तात्पुरता निवारा कसा आणि कितपत करायचा हे प्रत्येकाच्या आवडीवर, कुवतीवर आहे. काहीही आडोसा न करता, तंबु न मांडता नुसतेच झोपलात तरी जंगलात कोण विचारणार आहे!. पण मला चौथी बाजु सताड उघडी असताना झोप लागली नसती त्यामुळे मी तंबु आत मांडुन कवर केला.
कॉफी पिऊन भटकायला निघालो. एक राउंड ट्रीप ३ मैलांची ट्रेल होती. अर्धाअधिक रस्ता गेल्यावर माणसांचा आवाज आला. बडी भुंकु लागला. दोन हायकर्स पास झाले. काही शब्दांची देवाणघेवाण झाली. त्यांच्या अंगाखांद्यावर बरेच सामान होते. त्यावरुन तेही रात्री जंगलातच राहणार असावेत असा माझा कयास. मी आपले सांगुन टाकले, शेल्टर आम्ही बुक केलेय. बाकीचा ग्रुप येतोय थोड्याच वेळात. अमक्या रेंजरचे नातेवाईक. अशा थापा मारते मी एकटी फिरताना. भित्रेपणा, सावधपणा जे काही असेल ते पण डोक्यात उगीच काळजीचा भुंगा राहत नाही.
जंगलात काही ठिकाणी 'Natural Springs' आहेत. Natural Springs म्हणजे जमिनीखालचे पाणी जे जमिनीतील काही दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे जमिनीखाली साठत राहते आणि एखादा उगमस्त्रोत निर्माण होऊन ते पाणी जमिनीवर येऊन वाहु लागते. नैसर्गीक स्त्रोत. शेल्टरमध्ये पाण्याचा गॅलन होताच पण फॅनी पॅकमधली छोटी बाटली त्या पाण्याने भरुन घेतलीच चव पहायला. दुसर्या फोटोत बारका झारा आहे दिसेल न दिसेलसा. बरोबरचे सोंग लांब ठेवले त्या पाण्यापासुन. एक दणकट लीश घेतलेय मी. ती वापरुन त्याला झाडाला बांधता येते.
ट्रेलवर फिरताना मी गाणी गाते म्हणुन बडी मध्येच एखादी तान घेतो. काहीतरी भुंकण्याचा किंवा विव्हळण्याचा सुर लावतो. बारीक लक्ष असते त्याचे आजुबाजुला. जे मला ऐकु येत नाही तेही त्याला ऐकु येते. तो थांबुन जर एखाद्या दिशेला एकटक बघत राहिला, किंवा नाक वर करुन हुंगत राहिला की मलाही साधारण कुठल्या दिशेला विशेष लक्ष ठेवायचे याचा अंदाज येतो. असे म्हणतात की जंगलात कुत्रा जर एखाद्या वाटेवर पुढे जाण्यास कांकूं करु लागला तर त्याचे ऐकावे. आपल्यापेक्षा त्याचे इंस्टिंक्ट्स जास्त पक्के असतात. वाईटाची चाहुल लागते प्राण्यांना. यांत तथ्य कितपत आहे हे ठावुक नाही पण मला पटते. ट्रेल काही विघ्ने न येता पार पडली आणि शेल्टरला परतलो.
रात्रीचे जेवण काय शिजवलेले ते आठवत नाही पण काहीतरी रेडीमेड सुपच असेल. पावसाळी हवा होती त्यामुळे सुप्स, चहा, कॉफी हेच जास्त घेतले असावे. मी खाणेपिणे करेपर्यंत बडीने इकडेतिकडे पहात गुरगुरण्याचे काम केले. अलर्ट शिपाई. माझ्याकडेही बरेचदा संशयाने पाहिले त्याने. कुठे आणलेय हिने! कभी कभी तो मुझे इसपेभी शक होता है टाइप्स (आठवा, जॉनी लिवर - बाझीगर)
विडिओज टाकलेत दोनः
https://youtube.com/shorts/jo-fd73evHg?feature=share
https://youtube.com/shorts/enc9owL42Xk?feature=share
झोपायच्या आधीची एक गंमत. एका कोपर्यात एका पेटीत नोटपॅड आणि पेन होते. शेल्टरमध्ये राहुन गेलेल्या पुर्वीच्या काही हायकर्सच्या नोंदी होत्या त्यात. लेटेस्ट नोंद ३ महिन्यांपुर्वीची होती. अर्ध्याहुन अधिक पाने भरलेली होती. वाचु लागले. काही गिचमीड अक्षरे कळेनात, काही चित्रेही काढलेली होती. कुठले प्राणी पाहिले शेल्टरमधुन, रात्री कसे आवाज येतात ते काहींनी लिहिले होते. काहींनी नुसताच चावटपणा केलेला. कुणा वात्रट माणसाने तर रात्री बिगफुट येऊन गेल्याचे लिहिले होते. त्याला मनात दोन शिव्या घातल्या. एकुणातच सगळ्या प्रकारचा मसाला तेथे वाचावयास उपलब्ध आहे. दोन नोंदी मात्र थेट काळजाला भिडल्या:
१. दोन मैत्रिणी येथे राहुन गेल्या होत्या. ती त्यांची दुसरी वेळ होती. पहिल्या वेळी त्या आल्या तेव्हा कॉलेजकन्यका होत्या आणि दुसर्या वेळेस मात्र वेगवेगळ्या शहरात कामानिमित्त राहत असुनही एक ट्रीप आखुन येथे आलेल्या. रियुनियन टाइप्स.
२. एक इमिग्रंट वर्कर, ज्याचा विसा संपत आलेला काहीतरी ८/१० दिवसांत. पुन्हा कधी अमेरिकेत यायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे या पार्कमध्ये निवांत काही घटका घालवायला आलेला तो. बरेच काही लिहिलेले त्याने. आता ओळी आठवत नाहीत पण सगळा आशय फार उदासवाणा होता. त्याच्या निराश मनाची कल्पना येत होती. आशा आहे की येथुन जाताना तो काहीतरी नवीन उमेद घेऊन गेला असावा.
रात्री पाऊस पडला. डोंबिवलीच्या सवयीप्रमाणे एक रिकामे स्वच्छ भांडे भरत ठेवले पावसात. उगीचच वापरायला लागले तर म्हणुन. पावसामुळे कुणी प्राणी आश्रयाला यायची शक्यता होतीच, त्यामुळे सगळी आयुधे तंबुत हाताशी घेऊन झोपले. एरवी शेल्टर रिकामे असताना मोठे प्राणी येथे राहत असतील का, कोण जाणे! पण एखादा रोज रात्री येत असेल तर सवयीने फिरकायचाही.
बडीची सोबत होते पण जबाबदारीही जास्त वाटते. असे आपले मी आता लिहितेय पण त्या रात्री मात्र काहीही आले तरी बडी मला सावध करेल या खात्रीने मस्त ताणुन दिली होती. एकदोनदाच उठले (एकदा नं १) आणि जरा कानोसा घेउन परत झोपले. बडीही मध्येच एकदा जाऊन सु करुन आला. झोपेतही त्याला लीश लावुन ते तंबुच्या आत सिक्युअर केलेले असते. त्याने सु चा सिग्नल दिला की मी त्याला तंबुची चेन उघडुन देते मग तो झाडाझुडपांत जातो. फ्लॅशलाइट मारुन लक्ष ठेवावे लागते. सकाळी त्याला बिलकुल उठायची इच्छा नव्हती. मग मी बसल्या बसल्या माझीही नोंद केली नोटपॅडमध्ये.
बाकी नेहमीचेच. उठुन चहापाणी, एक ट्रेल आणि मग घरी. 'Step back in routine'.