कोलोरॅडोत रहायला आल्याला आता बरीच वर्षे झाली. रॉकी माउंटन पर्वतरांगांनी घेरलेले, नजर जाईल तेथे स्वच्छ रंगीत आकाश दाखवणारे असे हे सुंदर राज्य. हाय अल्टिट्युड्मुळे (Altitude)सुर्य भारी प्रखर जाणवतो. दुरवरच्या पर्वतरांगांवर कायम बर्फ दिसतोच. मला स्नो पाहिला की चक्करल्यासारखे होते पण आता इतकी वर्षे राहुन सवय होतेयही.
सगळ्यांसारखेच मलाही फिरायला आवडते आणि कोलोरॅडोत तर दुरदुरच्या राज्यांतुन लोक फिरायला येतात. मुबलक निसर्गसौंदर्य, स्नो स्पोर्ट्सचे अनेक पर्याय, विशाल नॅशनल आणि स्टेट पार्क्स यामुळे पर्यटक न येते तरच नवल. कोलोरॅडोत फिरणे होतेच पण आमची भटकंती मुख्यतः कोलोरॅडोबाहेरच्या शहरांत असायची. प्रत्येक राज्यात एकदा तरी जावे असे वाटते आणि तश्या ट्रीप्स आखतो. मात्र कोविडकाळ येथे सुरु झाला साधारण फेब्रुवारी, मार्च २०२० च्या आसपास. आम्ही तेव्हा वेगासच्या रोड ट्रीपमध्ये होतो. वेगासला हॉटेलात चेकइन केले आणि तेवढ्यात बातमी आली की कसिनोज बंद होतायत एक दोन दिवसात. आमचे हॉटेलही दोन दिवसात आम्हास चेकआउट करायची जबरदस्ती करु लागले. तेथे आम्हाला गंभीर परिस्थीतीची पहिली जाणीव झाली आणि आम्ही निमुटपणे तिसरया दिवशी परतीला लागलो. आलो तर शाळा बंद, वर्क फ्रॉम होम हे सगळे पाठोपाठ झालेच. वर्षाला ३/४ दुरच्या ट्रीप्स करणारे आम्ही घरी पुरते अडकलो.
हे अडकणे घरच्या इतर सदस्यांना मानवले. मी मात्र प्रचंड कंटाळले. विमानप्रवास बंद, हॉटेल्स, लॉजेस, इन्डोअर आउटडोअर वॉटर पार्क्स, अॅम्युझमेंट पार्क्स, रेस्टॉरंट्स सगळे सगळे बंद. करनेका तो क्या करनेका? उठा, ऑफिसचे काम करा, स्वयंपाक करा, लेकाचा अभ्यास घ्या, बातम्या पहा, वाचा, फोनवर आप्तमित्रांच्या खुशाल्या घ्या असे बोअरिंग रुटीन चालु होते. समर चालु झाला. बाहेर प्रचंड सुंदर हवा पण सगळा शुकशुकाट. कुणाच्या घरी जायची चोरी, कुणाला बोलवायचे नाही, पोरं पार्कमध्ये खेळतही नाही असे सगळे निरस चालु होते.
नेमके कधी ते आठवत नाही पण एक दिवस सायकल गाडीला लावली आणि पडले घराबाहेर. दुरवर गाडी चालवत गेले आणि नेहमी येताजाता दिसणारा चॅटफिल्ड स्टेट पार्कचा बोर्ड नव्याने दिसला. स्टेट पार्क चक्क उघडे होते. मोजक्याच गाड्या आणि तुरळक मास्कधारी लोक दिसले. कधी स्टेट पार्कात न गेलेली मी, त्या दिवशी कोलोरॅडो स्टेट पार्क्सचा वार्षिक पासच विकत घेतला आणी आत शिरले. गाडी पार्क करुन सायकलवर बसले आणि जे काही मोकाटले ते आजतागायत. आता साधारण दोन वर्षे झाली. एवढ्यात १५ एक स्टेट पार्क्स आणि ५ नॅशनल पार्क्स झाल्येत फिरुन. कालच ग्रँड कॅनयनहुन परतले. विमानसेवा सुरु झाल्यापासुन अजुनच उत्साह वाढतोय. जमेल तितकी पार्क्स फिरायचे आहे आणि त्याबद्दल खुपखुप लिहायचे आहे.
स्टेट, नॅशनल पार्क्स फिरताना एक लक्षात आले की एक दोन दिवसांत काही बघुन होत नाही. तसेच खरया निरव निसर्गाचा, जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल, जंगली प्राणी त्यांच्या नैसर्गिक आवासात पहायचे असतील तर बॅककंट्री ओवरनाईट हायकिंगला पर्याय नाही. त्यामुळे हायकिंग, कँपिंग, विल्डरनेस सर्वायवलही शिकले. पार्कचे आखलेले रस्ते सोडुन खोल जंगलात शिरु लागले. त्यासाठी बॅककंट्री परमिट घ्यावे लागते, काही खास सामान, तयारीही दाखवावी लागते. ते सामान गोळा करणे हा एक सुंदर अनुभव होता, त्यावरही लिहेन.
कोविडकाळाने मला एक अनमोल खजिना दाखविला आणि माझ्यात सुप्त असलेली बाजु मला उलगडली. रात्री उठुन बाथरुमला जातानाही २/३ दिवे लावणारी मी एकटीने दाट जंगलात, मिट्ट काळोखात, जंगली प्राण्यांच्या सहवासात अनेक रात्री घालवल्या. पायातले त्राण जाईपर्यंत डोंगरदरया तुडवल्या, कैक वेळेस एकटेपणामुळे, अंधारामुळे किंवा प्राण्यांमुळे प्रचंड भिती वाटल्याने राम राम म्हणत वाटांवरुन पळत राहिले आणि घरी पोचल्यावर घरच्यांना ते सर्व सांगत प्रचंड हसुन घेतले, डावा गुडघा चांगलाच दुखावलाय एकदा पण आता थेरपीने तोही बरा आहे. हे नवीन वेड टिकेल तोवर टिकेल, पाहु. गेल्या दोन वर्षात मी जे जे पाहिले, अनुभवले ते ते लिहायला आवडेल. पुढील भागांपासुन विस्तॄत माहिती, फोटोंसकट लिहेन. शुद्द्लेखनावर काम करतेय, सांभाळुन घ्या.