पार्कच्या वाटेवर एका फुड जॉइंटमध्ये जाऊन पॅक्ड सुशी घेतली. कमी मेसी आणि हेल्दी म्हणुन. शहराबाहेर पडायच्या आधी अशा बर्याच टिवल्याबावल्या केल्या. का? तर आज काही जास्त अंतर कापायचे नाहीए तर कशाला घाई. निवांत पेट्रोल भरत, स्टारबक्समध्ये कॉफी पीत अशी चालले होते. शहर सोडले आणि मी अपेक्षा केली नव्हती इतका मोठा घाट लागला. या वाटेवर मी कधी आलेले नव्हते त्यामुळे घाटात गाडी चालवायची आहे ही कल्पना नव्हती. पाठी लावलेली सायकल पडत तर नाही ना हे सारखे आरशात बघत होते. किती वळणे आली आणि गेली. प्रत्येक वळणावर दरीचे रम्य दृष्य होते. मध्ये मध्ये फलक दिसत होता पार्कचा, तो फॉलो करत राहिले आणि पोचले एकदाची.
या पार्कला प्रवेशद्वार असे नाही. विझीटर सेंटरही झाडांत लपलेले आहे त्यामुळे मला दिसलेच नाही. एका फाट्यावर यु टर्न घेऊन परत आले आणि मग मला दिसले ते. आत गेले. कॅम्पसाईट बुक केलेली त्याचा नोंदक्रमांक दिला. ती क्लर्क कुणी टीन कन्यका होती. तिला काही साईट नेमकी कुठे वगैरे माहीत नव्हते. तिने मला एक बॅककंट्री मॅप दिला आणि साधारणपणे कुठल्या कुठल्या ट्रेल्सने ती साईट येईल ते सांगितले. अर्थातच तिच्याकडे अनुभवाचे असे काहीही बोल नव्हते. तिने माझ्या स्पोर्ट्सवेअरवर कॉम्प्लिमेंट्स दिले मात्र. मग आम्ही कुठलया दुकानातुन घेतले, काय काय रंग आहेत, सेल, डिस्काउंट अशा महत्त्वाच्या गप्पा मारल्या. अगदी न्हाव्याच्या दुकानात बसुन माराव्यात तश्या.
विझीटर सेंटरचा परिसर सुंदर आहे. भोवताली एक तळे आहे आणि त्यात रंगीबेरंगी मासे आहेत. फुलझाडे आणि बर्ड फीडर्सही आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर पक्षी, पिटुकले प्राणीही आहेत. तिथल्या दगडावर बसुन सुशी फस्त केली आणि निघाले. निघण्यापुर्वी तेथे काढलेले काही फोटो पहा. चक्क उडणारा humming Bird पकडला मी फोटोत. फारच खुष झाले स्व्तःवर आणि फोनवर. ससुला आणि खारही आहे फोटोत.
कन्यकेने दाखवलेल्या ट्रेलच्या पार्किंग लॉटमध्ये पोचले. सवयीप्रमाणे आजुबाजुच्या गाड्यांची टेहळणी केली. दोन SUV ट्रक्स होते, पाठची बाजु ओपन असलेले. त्यात अगम्य असे सामान होते. लांबुन पाहुन काही कळत नव्हते की नेमके काय आहे. एक स्पोर्ट्स हॅट घातलेला इसम एका ट्रकच्या साईडने उगवला आणी त्याने माझ्याकडे पाहुन हसुन हात हलवला. अमेरिकेत तसे कुणीही कुणाकडेही पाहुन हसते. त्यात विशेष काही नाही. एरवी मीही शिष्टाचार पाळते पण आजुबाजुचा परिसर पाहुन मी जरा खडुसपणे मान हलवली. नो स्माइल. मनात म्हंटले हा शिकारी असावा, शिकार करुन परत चाललाय की आताच आलाय देव जाणे. मी सायकल काढुन घेतली, सामान बाहेर काढले. तोवर तो गायब झालेला. एक दोन पायी फिरणारे हायकर्सही दिसले म्हंटले चला कंपनी आहे. ट्रेलची वाट ओबडधोबड होती त्यामुळे लगेच सायकलवर बसले नाही. हाताने ओढत नेऊ लागले. जरा बरी वाट आल्यावर सायकलवर बसले पण शरीर आणी बॅकपॅक काही त्या सायकलवर नीट बॅलेंस होत नव्हती त्यामुळे जरा ब्रेक लावला की तोल गेल्यासारखे वाटत होते. खडकाळ वाट आली की सायकल ओढत आणी एरवी ती चालवुन एक दीडेक मैल अंतर कापले असावे. एव्हाना ते दोन हायकर्स कुठे गेले काही कळेना. जंगलात अनेक वाटा फुटतात आणि कुणी कुठल्याही ट्रेलवर जाते. एक फलक दिसला.
फलकानुसार कॅम्पसाईट आता जेमतेम २ मैलांवर होती. फारच खुष झाले. साइन्सनुसार येथे शिकारीही असणार होते. असेना बापडे, मला काय करायचेय म्हणत निघाले. परत सायकलवर बसले. या नवीन ट्रेलवर कुणी दिसेना आजुबाजुला. एका वळणावर काय झाले न कळे जरासा ब्रेक लावला आणि तोलच गेला. मी , बॅकपॅक, सायकल सगळेच आपटलो. डावे कोपर एका दगडावर आपटले आणी सण्णकन कळ गेली डोक्यात. बाकी तळहाताला आणि पोटाला खरचटले. जरासे रक्त आले. धडपडत उभी राहिले. बयेला उभे केले. इंपॅक्टमुळे बयेचे पुढचे चाक डावीकडे वळलेले. प्रयत्न करुनही ती काही माझ्याकडे सरळ पाहेना. आली का पंचाईत? वा़कड्या नाकाची बया आता काही कामाची नव्हती. फोनला नेटवर्क नव्हतेच. काय करावे? उलट्या दिशेने एक कपल येताना दिसले. आता मात्र मी तोंडभर हसुन त्यांना हात केला. मी पडले हे कळताच त्यांना वाईट वाटले. माझी विचारपुस केली. त्यातल्या बाप्याने ठोकुन दाबुन चाक सरळ करायचा प्रयत्न केला. फार तर फार मी ती ओढत नेऊ शकेन पण चालवणे अशक्य आहे या वरआमचे एकमत झाले. पण कॅम्पसाईट आता फारतर मैलभर लांब असेल त्यामुळे मी ओढत न्यायचे ठरवले. कपलही म्हणाले की हो आता तुझी साईट काही फार लांब नाही. सावकाश जा. टाटा बायबाय करुन ते उल्टया दिशेने गेले.
मी कशीबशी दुखर्या अंगाने निघाले. बयेला ढकलुन चांगलाच घाम निघालेला. अर्ध्याच्यावर पाणी संपले होते. पाण्याचा स्त्रोतही नव्हता जवळपास. साइटजवळ पाण्याचा ओढा आहे हे वाचले होते. पुढे हा फलक दिसला आणि येथेच माझा घात झाला
याआधीचा फलक परत पहाल तर कळेल का ते. कॅम्प्साईट आणि Quarry हे एकाच दिशेला आहेत असेच वाटते की नाही दोन्ही फलकांची सांगड घातल्यास? पण तसे नव्हते आणि मी Quarry चा टर्न घेतला. फलकानुसार ०.६ मैलाच्या आत कॅम्पसाईट यायला हवी होती पण मी पोचले ते या Dead End ला. तीनचा सुमार होता.
हे धुड चढुन जाणे शक्यच नव्हते. "कुछ तो गडबड है दया!" CID फेम डायलॉग आहे हा. आता एखाद्या शहाण्या डोक्याने परत फिरायचा निर्णय घेतला असता की नाही, पण नाही, मी ठाम होते की साईट इथेच असणार. जरा शोधु आजुबाजुला. ही एक वाट दिसली. हीला वाट तरी का म्हणावे? पायवाटेसारखी मुळीच नव्हती. कधी कधी प्राणी चालुन चालुन ओबडधोबड वाट निर्माण होते किंवा ओढ्याचे पाणी आटले कीही वाट तयार होते, तसलीच असावी. कळत होते पण वळत नव्हते.
अंतर्मनाच्या सुचनाही चुकतात कधीकधी. तेव्हा मला मुक्कामाला पोचायची इतकी घाई होती की मी स्वतःलाच समजावले की याच वाटेने साईट असणार. थ्रील म्हणुन मुद्दाम अशा आड ठिकाणी उभारलेली असणार वगैरे वगैरे. या वाटेन कुच करण्यापुर्वी बयेचे काय करावे हा विचार केला. दुष्काळात तेरावा महिना कशाला आणखी? Quarry पर्यंत आले त्या वाटेवर बयेला सोडायचा निर्णय घेतला. यापुढे तिला ढकलणे शक्य नव्हते. मी पार दमलेले. डावा हात दुखत होता आणि कंबरेची एक बाजुही दुखत होती. जरा मुका मार असावा. तंबु बांधुन जरा फ्रेश वगैरे झाले की बघु, परत येऊ हिला न्यायला असा विचार केला. तसेही या वाटेवर कुणीही नव्हते आणि आलेच तरी वाटेवरचा चोरही नेईल असे काही तिचे रुपडे राहिले नव्हते. निघण्यापुर्वी एक फोटो काढला तिचा , गरज पडल्यास असावा म्हणुन.
वाट चांगलीच गर्द झाडांतुन आणि काट्याकुट्यांतुन होती. पाठी फिरावेसे वाटु लागले. अर्ध्या मैलापर्यंत जर साईट दिसली नाही तर परत फिरायचे ठरवले. या वाटेवर अनेक ठिकाणी, अनेक प्रकारची विष्ठा होती. फोटो आहेत पण टाकत नाही येथे. कुणाला यक्क वाटु शकते. माझ्या animal poop study नुसार मी अंदाज बांधत होते. हे कोल्ह्याचे, हे एल्कचे, हे नक्की कुणाचे? जाउदे. अर्धा मैलभर पोचले आणि तरीही निवारा का दिसेना? वळावे आता, बास झाले. तोच दुरवर एक नारिंगी ठिपका दिसला.
आणि त्या नारिंगी ठिपक्यालाही हा गुलाबी ठिपका दिसला होता.