सोमवारपासुन रहाटगाडे चालु झाले. पहिल्या ट्रीपच्या विरहानंतरची घरातल्या आम्हा चौघांची 'तुझ्या गळा, माझ्या गळा' फेज लगेच संपली आणि मला ट्रीपचे वेध लागले. परत सुरु झाले, कशाला ग जंगलात जातेस, थोडी कळ काढ मग सगळेच फिरु मस्त. कोविडकाळात सगळीकडे निर्बंधच निर्बंध होते एक निसर्ग सोडुन आणि मला “तसं फिरायला जायचं नव्हत, असं फिरायला जायचं होतं”. सगळं काही बंद असताना फक्त पार्क्सचेच दरवाजे माझ्यासाठी हात पसरुन उभे होते. मग काय, माझे पुढच्या शनिवारी Golden Gate Canyon State Park ला रहायला जायचे नक्की झाले.
या पार्कमध्ये कधीच गेले नव्हते मी. एवढेच काय, कधी नावही ऐकले नव्हते. गोल्डन गेट म्हंटले की सॅन फ्रॅन्सिस्कोच आठवते. अशा नावाचे पार्क आपल्या कोलोरॅडोत आहे हे वाचुन नवल वाटले. त्यांच्या वेबसाईटवर लगेचच बॅककंट्री कँपिंगची माहिती काढायला सुरुवात केली. हे पार्क साधारणपणे १२००० एकरांचे आहे. Aspen झाडांची विशाल झाडी आहे. वर फोटो दिलाय तेथलाच. ॠतुंप्रमाणे या झाडाचे रंग फार सुंदर बदलतात. पाइन्सही आहेत.
बॅककंट्रीमध्ये शिरायला अनेक ट्रेल्सवरुन वाटा आहेत आणि बॅककंट्री साईट्सचे बुकिंगही ऑनलाईन करता येते. एकुण २० पैकी मला एकुलती एक बॅककंट्री साईट उपलब्ध दिसत होती. मागचा पुढचा कसलाही विचार न करता घाईघाईत ती साईट मी शनिवार रात्रीसाठी बुक केली. हो, हातची जायला नको. मॅपवर ती साईट धड दिसत नव्हती पण लोकेशन साधारण मार्क केले. त्या साईटपर्यंत पोचायला किती माइल चालावे लागेल हा अंदाज बांधला. फक्त साडेतीन मैल वन वे? वॉव, हे तर काहीच नाही असं म्हणुन भारी खुष झाले. पर बाबु, ये तो उडते पंछी के पर गिनने बराबर हुआ. खासकरुन पार्क कधीच पाहिले नसेल तर.
कुणीतरी नक्कीच खो खो हसले असेल तेव्हा.
दुसरी चुक, साईटवर वाचले की काही ट्रेल्सवर सायकल नेता येते. त्यामुळे ही बया बरोबर घ्यायचे ठरवले. हा पहा एका हताश क्षणी बयेचा काढलेला फोटो,
फोटो का काढला याचे उत्तर येईलच पुढे त्या भागात.
विचार होता की सायकलवरुन जास्त अंतर कापता येईल. इतर एकदोन ट्रेल्सही करु जमल्यास. इमर्जन्सीला पळही काढता येईल. झालेच तर सामानही सायकलवरुन वाहता येईल आणि फोटोतही छान दिसेल. हो, फोटोत छान दिसायचे काम व्यवस्थित केले तिने.
या पार्कच्या काही काही भागांत शिकारीस परवानगी आहे. परवानाधारी शिकारी बॅककंट्रीत शिकार करु शकतात. अनेक नियम आहेत त्यांच्यासाठी. मला ठाऊक होते की शिकारी लोक हे फ्ल्युरोसंट नारिंगी रंगाचे जॅकेट, कपडे वगैरे घालतात. म्हणजे तसा नियमच आहे. मला हे ठाऊक नव्हते की कोलोरॅडोत एक असाही ठराव पास झालाय की शिकारी फ्ल्युरोसंट गुलाबी रंगाचेही कपडे घालु शकतात. मला कशाला माहीत असेल. मी कशाला शिकार्यांसाठीचे ठराव, कायदे वाचु? मी त्या ट्रीपला मस्तपैकी 'ए गुलबदन' क[पडे घालुन गेले नेमकी. ही चुक नंबर ३.
खाली फोटो आहे. या फोटोत मी बरीच निवांत आहे, छान पोझही दिलेय. अज्ञानातले सुख! फोटोच्या पाठी जे बांबु दिसतायत ना ते कुणा शिकारी किंवा ट्रेकरने कधीतरी मुक्काम केला असावा तेव्हा उभारलेले असावेत. या अशा बांबुंवर प्लॅस्टीक टार्प घातले आणि सिक्युअर केले की झाले शेल्टर तयार. मस्त जागा आहे ना! अर्थात मला नक्की हे तेव्हा कळाले नव्हते. तेव्हा मी विचार करत होते की हे बिगफुटचे तर काम नसेल?
साइटचे बुकींग झाल्यावर 'Cabela' तुन थोडी खरेदी केली. स्टोअरची अॅन्युअल मेंबरशीपच घेतली ज्यायोगे डिस्काउंट्स मिळतात. विकेंड्सना काही फ्री अवेअरनेस इवेंट्सही असतात मेंबर्ससाठी. कोविडमुळे इवेंट्स बंद होते पण खरेदीला गेल्यावर विक्रेते छान गप्पा मारायचे. नवीन नवीन गॅजेट्सची ओळख करुन द्यायचे. खिशाला कात्री लावली आणि हेड्लँप, फॅनी पॅक, इमर्जन्सी फ्लेअर लाइट्स, काही पिटुकले कुकवेअर, सिलिंडर्स अशी खरेदी केली. कँपिंग आणि हायकिंगचे इतके सुंदर सामान दुकानांत मिळते की मुलांना खेळण्यांच्या दुकानात जसे हे हवे , तेही हवे असे होते त्याचा प्रत्यय येतो.
हेडलँप डोक्यावर घट्ट बसतो. हात रिकामे राहतात आणि काळोखातही कामे करता येतात. फॅनी पॅक फार उपयोगी पडतो. कधी जर सर्व सामान टाकुन पळायची वेळ आली तर फॅनी पॅक मात्र कंबरेभोवती असल्याने आपसुकच आपल्याबरोबर येतो. त्यात बहुमुल्य सामान जसे की एक कप पाणी का होईना पण मावेल अशी प्लास्टीकची बाटली, लायटर, एखादा प्रोटीन बार, झिपलॉकमध्ये आयकार्ड, मॅप, कंपास, लिप बाम, कागद, पेन, वीसेक डॉलर्स वगैरे ठेवते. एमर्जन्सी फ्लेअर लाईट्स हे काळोखात हरवल्यास कुणी आपल्याला शोधत आलेच तर सिग्नल द्यायला उपयोगी पडतात.
आतुरतेने शनिवारची वाट पाहु लागले. मागच्या वेळसारखी बाकबुक नव्हती यावेळेस. सायकल्ची ट्युब, चाके, ब्रेक्स, लाइट्स नीट तपासले. झटाक गुलाबी स्पोर्ट्सवेअर विकत घेतले यावेळेस जरा फक्कड कुकिंग करु असे म्हणुन एक अंडे, मीठ मसाला, कच्चा तांदुळ भरला बॅगेत. सुपची पाकीटे, चहा, कॉफी होतीच. बारकासा कॉफी फिल्टरही घेतला. खायेंगे, पियेंगे, ऐश करेंगे. नवरा आणि लेक चक्क जेलस दिसत होते यावेळेस. काळजीबिळजी दुरच. तरी नवरयाने एक पॉवरबँक आणि 7 in 1 toolkit दिला निघताना तेव्हा बरे वाटले. लेक म्हणाला पुढच्यावेळेस येईन मी बरोबर (ये चिंग्ज और मॅगी के पॅकेट्स बोल रहे थे). आपली मॉम जंगलात मज्जाच करायला जाते असे त्याला एव्हाना वाटु लागले होते. नवर्याने नाही म्हणुन लांबलचक मान हलवली. और हम चल पडे!
उद्या ट्रीपला जातेय त्यामुळे पुढील भाग दोन दिवसांनी. हे Golden Gate Park चे काही फोटो देतेयः पार्क बरेच उंचावर आहे. काहीकाही ट्रेल्स १०,००० फुट एलेवेशनवर आहेत. त्यामुळे पाईन ट्रीज असे आभाळाला भिडतात. पाण्याचे साठे अप्रतिम ठिकाणी आहेत. याला गोल्डन गेट नाव का आहे ठाऊक नाही पण येथुन स्वर्गाचे दार नक्की असेल असे वाटत राहते फिरताना.
/>