'स' रे ... स्ट्रीट आर्टचा

‘स’ रे … स्ट्रीट आर्टचा

‘इन्स्टा’ आणि एकूणच सोशल मिडीयामुळे स्ट्रीट आर्ट ह्या कलाप्रकाराला चांगले दिवस आले आहेत. प्रवासवर्णन लिहीणारे ब्लॉगर, व्हलॉगर, किंवा ख्यातनाम मंडळी (उर्फ सेलेब्रिटी) हल्ली विविध स्ट्रीटआर्टची चित्रे पोस्ट करतांना दिसतात. आणि तरीही स्ट्रीट आर्ट तसे उपेक्षितच. विचार करा - शेजारची चार-पाच वर्षाची इशिता “मी मोठ्ठी झाले की स्ट्रीट आर्टिस्ट होणार” म्हणाली तर काकूना किती गोरंमोरं व्हायला होईल.

काकूंची ह्यात चूक फारशी नाही. स्ट्रीट आर्टबद्दलचे गैरसमज मुबलक प्रमाणात आहेत. स्ट्रीट आर्टबद्दल गैरसमज कमी व्हावे, थोडीफार रुची वाढावी यासाठी इथे प्राथमिक माहिती संकलित केली आहे. स्ट्रीट आर्ट कशाला म्हणायचं, त्याचे प्रकार, स्ट्रीट आर्टचा थोडा इतिहास, आर्थिक परिणाम, आणि काही स्ट्रीट आर्टस् यांचा समावेश आहे.

(खरं तर स्ट्रीट आर्ट मध्ये सर्व प्रकारच्या कलाकृती समाविष्ट होतात जसे न्यूयॉर्क मधील इन्फ्लेटेबल्स - खालून सब-वे गेली की फुगवता येईल असे शिल्प. पण विस्तारभयास्तव इथे फक्त भित्तिचित्रांची उदाहरणे आणि ऊहापोह आहे).

स्ट्रीट आर्ट कशाला म्हणायचं?
रस्त्यावर दिसलं की म्हणा स्ट्रीट आर्ट इतका ढोबळ उल्लेख कलाकार मंडळी करत नाहीत. उलट विविध प्रकारांसाठी विशिष्ट शब्द प्रचलित झाले आहेत जसे स्ट्रीट आर्ट, पब्लिक आर्ट, ग्रॅफिटी, अर्बन आर्ट, किंवा थेट अगदी “डीफेसमेंट” असे वेगवेगळे शब्द वापरलेले आढळतात. मात्र त्यातील छटांत फरक आहे.

“डीफेसमेंट” शब्द हा सहसा गुन्हा संदर्भाने वापरला जातो. बऱ्याच शहरात सार्वजनिक स्थळांचे स्वरूप कसे असावे याबद्दल नियमावली नि कायदे असतात. यात बरेच वेळा घरांचे रस्त्यावरील दर्शनी भागही येतात (कर्ब अपील!!). अशा सार्वजनिक जागी अशोभनीय काहीबाही चिरखडणे, स्प्रे पेंटींग करणे इ गुन्हा ठरतो आणि त्या संदर्भाने डीफेसमेंट शब्द वापरला जातो.

पब्लिक आर्ट किंवा अर्बन आर्ट सहसा एखाद्या सार्वजनिक किंवा सरकारी संस्थेने कलाकाराला मानधन/मोबदला देऊन (कमिशन्ड) करून घेतलेले असते. यामध्ये जाहिरातींचा समावेश नाही. ह्यात कलाकारांना अर्ज करणे, संकल्पना सांगणे, वेळेवर काम करणे इ चौकटीत काम करावे लागते पण बहुतेक वेळा कलाकारांची याला तयारी असते कारण अशी चित्रे महापालिका काढून टाकत नाही तर उलट ती दीर्घकाळ टिकावी म्हणून प्रयत्न करते. उदा: कोलोरॅडो येथील पब्लिक आर्ट.
MosaicPathstoMusic.jpeg

स्ट्रीट आर्टमध्ये रस्ता किंवा सार्वजनिक स्थान हे कलाकृतीचा एक भाग असते. जर कलाकृती रस्त्यावरून काढली तर ती निरर्थक वाटली पाहिजे. अर्थात याबद्दल एकमत नाही कारण रस्ता अविभाज्य घटक नसला तरी रस्त्यावर आहे त्याला स्ट्रीट आर्ट म्हणावे हा मतप्रवाह जोर धरतो आहे. स्ट्रीट आर्टला मोबदला बरेचदा नसतो. कलाकार स्वान्तसुखाय म्हणून अशी भित्तिचित्रे काढतात. तसेच स्ट्रीट आर्ट लपून छपून केले जाते तर पब्लिक आर्ट राजरोसपणे करता येते. स्ट्रीट आर्ट मध्ये डीफेसमेन्ट सारखे ‘चिरखडणे’ नसते तर उलट कला म्हणता येईल अशी चित्रे-अक्षरे असतात. उदा:

Parking.jpeg

स्ट्रीट आर्टचे प्रकार

  • भित्तिचित्रे उर्फ ग्रॅफिटी हा स्ट्रीट आर्टचा प्रकार. ग्रॅफिटी मध्ये अक्षरे ते चित्रे सर्वांचा समावेश होतो. ह्याचे अनेक उप प्रकार आहेत -
  • टॅग/ थ्रो -अप/ ब्लॉक-बस्टर - ह्या तिन्ही प्रकारात अक्षरे किंवा शब्द रेखाटलेले असतात. विशेषतः स्वतः चे नाव किंवा एखाद्या विशिष्ट चळवळीचे घोषवाक्य इ लिहिले जाते. टॅग जरा सोपा असतो तर ब्लॉक-बस्टर अधिक रंगीबेरंगी आणि क्लिष्ट असतो.
  • ‘हेवन’ - उंच इमारतीवर स्ट्रीट आर्ट करणे. स्ट्रीट आर्ट सहसा लपून छपून केले जाते. त्यामुळे उंचावर जाऊन झटपट चित्र काढणे याला स्ट्रीट आर्ट जगात जास्त मान.
  • स्टेन्सिल - स्टेन्सिल आधी तयार करून मग भिंतीवर चित्र तयार करणे. बॅंकसीने हा प्रकार लोकप्रिय केला.
  • Piece - तीन किंवा अधिक रंगांचे चित्र रंगवणे. स्ट्रीट आर्ट झटपट

उरकायचे असताना असे मोठे चित्र काढणे विशेष कौशल्याचे मानले जाते.

या व्यतिरिक्त ही पोस्टर, स्टिकर इ प्रकार आहेत. स्ट्रीट आर्टचे इतर यार्न बॉम्बिंग, शिल्पकला इ प्रकार ही आहेत.

स्ट्रीट आर्टचा थोडा इतिहास

६०-७० च्या दशकात ग्रॅफिटीची सुरुवात न्यूयॉर्क मध्ये झाली पण लवकरच ते लोण लॉस एंजेलिस, फिलाडेल्फिया इ शहरात पसरले. सार्वजनिक मालमत्तेवर स्प्रे पेंटने स्वतःचे नाव लिहीणे हे विद्रोहाचे प्रतीक होते. एका कलाकाराने ‘टॅग’ केले की त्यावर दुसऱ्या कुणी टॅग करायचे नाही असे अनेक अलिखित संकेत त्याकाळात रुळले. अर्थातच पोलीस अशा टॅग्जची दखल घेत आणि अँटी-टॅग स्क्वाडस कलाकारांना पकडून नेत. मात्र हळूहळू वाईल्डस्टाईल-ब्लॉकबस्टर शैलीच्या सुरेख ग्रॅफिटी येऊ लागल्या.

८०-९०च्या दशकात स्टेन्सिल, स्टिकर, म्युरल अशा विविध प्रकारचे आर्ट अस्तित्वात आले. ह्यातले काही कलाकार “मेनस्ट्रीम” चित्रकारांचे मित्र होते जसे कीथ हेरिंग हा कलाकार अँडी वॉरहोल ह्या प्रसिद्ध चित्रकाराचा मित्र होता. त्याने एच.आय.व्ही बद्दल असलेल्या समाजातील मौनाबद्दल म्युरल्स काढले.

२००० च्या दशकात बॅन्क्सीचा उदय झाला आणि पठ्ठ्याने एकहाती ‘कहानी में ट्वीस्ट’ आणला. त्याची चित्र इतकी लोकप्रिय झाली की आता पोलिसांनी, शहरातील नगरसेवकांनी ग्रॅफिटी पुढे शरणागती पत्करली. उलट वाटाघाटीची बोलणी सुरु झाली. शहरातील मुख्य रस्ते सोडून द्या नि गल्ली-बोळात वाट्टेल तितकी ग्रॅफिटी करा अशा पद्धतीचे तह झाले. गंमत म्हणजे बॅन्क्सीमुळे इतकं घडलं पण जसा बिटकॉइनचा निर्माता कोण ते गोपनीय आहे तसाच हा बॅन्क्सीपण कोण ते माहिती नाही.

भारतात भित्तिचित्रांची परंपरा असली तरी आधुनिक शैलीचे स्ट्रीट आर्ट आता जोर धरत आहे. दिल्ली, मुंबई इ महानगरात चांगले स्ट्रीट आर्ट बघायला मिळाले तरी जागतिक स्तरावर कोचीनच्या ‘गेस हू’ या कलाकाराने आघाडी मारली आहे. एक रोचक भाग म्हणजे जरी स्ट्रीट आर्ट तसे ‘रिस्की’ असले तरी ह्या क्षेत्रात अनेक महिला आहेत. “फिमेल बॅन्क्सी” म्हणून जिचा उल्लेख होतो ती ‘बॅम्बी’, वेक्सता, ऐको अशा अनेकजणी चित्रे काढतात.

आर्थिक परिणाम

स्ट्रीट आर्टच्या आर्थिक परिणामांविषयी प्रतिक्रिया संमिश्र आहेत. स्ट्रीट आर्ट सहसा दुर्लक्षित, काना-कोपऱ्यात, गरीब वसाहतीत केले जाते. पण चांगली ग्रॅफिटी असेल तर बघायला लोक येतात आणि तो भाग सुधारू लागतो (जेण्ट्रीफिकेशन). हे जेण्ट्रीफिकेशन अनेकांना पटत नाही. त्यात हल्ली सोशल मिडीयामुळे हा बदल फार झटपट घडतो आणि तेथील निवासी लोकांना तिथे राहणे परवडेनासे होते. स्ट्रीट आर्टमुळे त्या परिसरातील घरांच्या किंमती साधारण ५% ते १५% सहज वाढतात. मात्र त्यात एखादा बॅंकसी किंवा एडवरडो कोब्रा सारखा कलाकार आला तर भाव अस्मानाला भिडतात. ($८८०,००० चे एक घर कोब्राचे चित्र घराजवळ आल्यावर $२,०७५,००० ला विकले गेलं !!!)

स्ट्रीट आर्ट मुळे परिसरात आर्थिक उलाढाल वाढते जसे कॉफीची फुलांची दुकाने, सुपर मार्केट इ. फिलाडेल्फिया सारख्या शहरात केवळ स्ट्रीट आर्टमुळे $२.७ मिलियन ची उलाढाल होते. जवळ जवळ २५० कलाकारांना रोजगार मिळतो. आकडेवारी उपलब्ध नसली तरी न्यूयॉर्क, लंडन, लिस्बन, आणि मेलबर्न ही शहरे आघाडीवर आहेत.

स्ट्रीट आर्ट उत्पन्नाचे साधन होऊ शकत असले तरी त्याला विद्यापीठात/आर्ट स्कूल्स मध्ये मान्यता नाही. स्ट्रीट आर्ट मूळातच विद्रोही आणि काहीसे उत्सफूर्त असल्याने त्याचे “शिक्षण” विद्यापीठात देणे अवघड. याशिवाय बहुतेक स्ट्रीट आर्टिस्ट हे कामातच रमणारे असल्याने विद्यापीठात विषय शिकवायला आवश्यक प्रोफेसर्स, क्रमिक पुस्तके इ सगळ्याचा अभाव आहेच. अमेरिका, युरोप, इजिप्त, भारत इ सर्व जागी स्ट्रीट आर्ट आढळत असले तरी त्याचा जागतिक स्तरावर संशोधनात्मक अभ्यास अद्याप फारसा झालेला नाही.

सध्या उपेक्षित असले असलं तरी नाविन्यामुळे, वैविध्यामुळे स्ट्रीट आर्ट बद्दल लोकांत रूची वाढते आहे आणि नवीन नवीन स्ट्रीट आर्टिस्ट लोकांसमोर येत आहेत.

मंडळी, कुणी म्हणाल “लंकेत सोन्याच्या विटा! आपण कुठे कोईमतूर किंवा न्यूयॉर्कला स्ट्रीटआर्ट पहायला जाणार”. खरं तर आपल्या घराजवळच एखादे चांगले स्ट्रीट आर्ट असण्याची शक्यता आहे. आणि नसलं तरी काळजी करू नका. बॉलिवूडने काही चांगली स्ट्रीट आर्टस् बघायची सोय घरबसल्या केली आहे:

‘दिवाना दिल दिवाना’ - ह्यात ७०-८० च्या दशकातील ग्राफिटी बघू शकता.
‘ओ गुजारिया’ - हे ‘पीस’ पद्धतीचे चित्र आहे.
‘सखियां ने मेरे’ - ह्यात ग्लासगो म्युरल ट्रेल मधील बरीच चित्रे आहेत.
‘दिल सरसों दा खेत है जमीदार तू’ आणि ‘आंख मारे’ - इंटरॅक्टिव्ह आर्ट म्हणून “एंजल विंग्स” काढायची सुरुवात लॉस एंजलिस मध्ये झाली पण लवकरच इतर जागीही ते लोण पसरले.
‘संग तेरे पानियोंसे बहता रहू’ - स्ट्रीट आर्ट काढणारा आणि लाजणारा जॉन… !!!

अजून कुठलं आठवतं आहे?

_______________
संदर्भ:
https://academic.oup.com/bjaesthetics/article/55/4/481/2195110?login=true
https://ojed.org/index.php/jise/article/view/1419
https://graffitocanberra.wordpress.com/styles-of-graffiti/
https://www.bbc.com/news/blogs-trending-30447979
https://www.mdpi.com/2071-1050/11/3/580/htm
https://www.theartstory.org/movement/street-art/

Attachmentमाप
Image icon mukhyachitra.jpg519.95 KB

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle