बदतमीज़ दिल - ३४

या वर्षी दिवाळी पार्टी हॉस्पिटलमध्येच नवीन बिल्डिंगच्या हॉलमध्ये होती. ती इमेल आली तेव्हा सगळेच हॉस्पिटलच्या कॉस्ट कटिंगवर वैतागले होते. संध्याकाळी सात वाजता सायरा नेहाबरोबर टॅक्सीतून उतरली तर पूर्ण बिल्डिंगला सोनेरी लायटिंग केलं होतं. दुसऱ्या मजल्यावर बँक्वेट हॉल आणि त्याच्यावरचे काही मजले हॉस्पिटलचं अजून उदघाटन न झालेलं गेस्ट हाऊस होतं.

"दीद, तू ते भेळेचे बिंज बार्स ठेवले ना बॅगमध्ये?" लिफ्टमध्ये अचानक नेहाला आठवलं.

"नेहा, आपण दुपारपासून फक्त आणि फक्त पॅकिंग केलंय, त्यातही तू मला फक्त कपड्यांच्या घड्या घालून ठेवायला मदत केलीस. आता आठव तूच." ती नेहाकडे रागाने बघत म्हणाली.

"आय एम सो एक्सायटेड! मी किती दिवसांनी ग्रुपबरोबर ट्रेकला चाललेय!" नेहा मान वाकडी करून हसत म्हणाली.

"हे तू दिवसभरात सतराशे साठवेळा म्हणाली आहेस!" सायरा हसली. नेहाचे सगळे फ्रेंड्स आठ दिवस युथ हॉस्टेलच्या निलगिरी हिल्स ट्रेकला चालले होते. नेहा स्वतःहून ट्रेकला जाते म्हणाली याचा तिला जास्त आनंद होता. कॉलेजची हवा लागल्यापासून नेहा फक्त सोशल मीडिया, वेबसिरीज आणि वाचन एवढ्यातच पडीक होती. तिने बैठी लाइफस्टाइल सोडावी म्हणून सायराचे सारखे प्रयत्न सुरू होते, पण नेहा काही दाद देत नव्हती. नेहाची उद्या दुपारची ट्रेन पनवेलहून होती. पनवेल ते कोइंबतूर. तिथून एका बसने उटी. त्यासाठी सगळे एका मिनीबसमधून बारा वाजता निघणार होते.

"आठ मधले पाच दिवस तरी मला किती सुकून मिळेल माहितीये! मी काहीही काम करणार नाही, फक्त रिमोट घेऊन लोळणार आणि स्वीगी ऑर्डर करून जेवणार!" सायरा तिला चिडवत म्हणाली.

नेहाने तोंड वाकडं केलं आणि मग खळखळून हसली. "यू रिअली नीड सम रेस्ट."

लिफ्टचं दार उघडताच समोर सगळीकडे पणत्यांच्या आकाराच्या फेरी लाईट्सची सजावट होती. मुख्य दरवाज्याला लहान लहान कंदिलांचं तोरण होतं आणि बाजूला मध्यभागी शुभ दीपावली लिहिलेली विविध रंगी जरबेरांची एक भलीमोठी रांगोळी होती. आतली लगबग, गडबड, आवाज बाहेर जाणवत होते. आत शिरताच माणसांची गर्दी, वर टांगलेल्या भल्यामोठ्या काचेच्या झुंबरांचा तीव्र प्रकाश, एकमेकांत मिसळलेली परफ्यूमस आणि सनई, सतार वगैरे भारतीय वाद्यांचे सूर कानावर आले. त्या दोघी आत जाऊन गर्दीत मिसळल्या. चंदा आणि पूर्वा त्यांच्या कुटुंबियांबरोबर होत्या. त्यांना भेटून गप्पा मारताना एकीकडे ती गर्दीत बघत होती. अजून तरी अनिश आलेला दिसत नव्हता.

बरेचसे लोक ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये होते. सायराने आज मुद्दाम जरा साधा वाटेल असा कोपरापर्यंत बाह्या आणि ओढणीवर बारीक चंदेरी गोटा पट्टीची कलाकुसर असणारा सुती ऑलिव्ह ग्रीन अनारकली घातला होता. नेमकी ऑनलाईन ऑर्डर करताना मागे मोठा गळा आणि त्याला बांधलेले लटकन तिने बघितले नव्हते. आता एक्स्चेंजलाही वेळ नाही म्हणून शेवटी तिला तोच ड्रेस घालावा लागला. कानात बारीक मोत्याच्या चांदबाली आणि फ्लॅट जूती. शॅम्पू केलेले सुळसुळीत केस उडू नयेत म्हणून एका पिटकू क्लचरमध्ये अडकवले होते. नेहा बेबी पिंक शरारा आणि त्यावर ती नको म्हणत असतानाही लेन्सऐवजी काळ्या फ्रेमचा चष्मा घालून आली होती. नेहाच्या टोट बॅगमध्येच तिने मोबाईल आणि हातातला चंदेरी सिल्कचा क्लच टाकून दिला होता.

सोना तिच्या बॉयफ्रेंडला सोडून सायराशेजारी येऊन उभी राहिली. "नो डेट टुनाईट? वो बाऊन्स वाले का क्या हुआ?"

ओह बॉय! ह्या सगळ्या किती मागे आहेत! "अरे, वो रिलेशनशिप के लिए रेडी नही था. तो बात आगे नही बढी.. एनीवे, नेहा है मेरे साथ. तुम जाओ, एन्जॉय करो." तिने सोनाला कसंतरी कटवलं.

तिने पुन्हा एकदा दरवाजाकडे नजर टाकली. तिथे हालचाल दिसल्यावर तिच्या हृदयात कालवाकालव झाली. पण तिथून डॉ. गांधी त्यांच्या बायको मुलीबरोबर मॅचिंग कलरफुल कपडे घालून आत येत होते.

"सायरा, फिर डॉ. पै के साथ काम कैसा चल रहा है?" पूर्वाने तिला निरागसपणे विचारलं. ऐकताच शेजारून चंदाने तिला डोळा मारला.

अर्र! यापेक्षा शर्विलचा विषय बरा होता. निदान मी यांच्या डोळ्यात बघून धडधडीत खोटी कारणं देऊ शकले असते. आताही काही विशेष नाही, हाहा. मला फक्त थोडं टफ व्हावं लागलं, आता काम नीट सुरू आहे वगैरे सांगून जमेल. सायरा विचार करत होती.

पण त्या खडूस सर्जनने माझं हृदय चोरलंय आणि आता तो कुठल्याही क्षणी इथे आत येईल आणि त्यासाठी मी अजिबात तयार नाहीये. त्या फोन कॉलपासून माझा रोम न रोम जळतोय. तो म्हणाला होता, मी ते अग्रीमेंट फाडतोय.

हाहा, टू बॅड! बिकॉझ आय मेड कॉपीज!

तिला त्याच्या आवाजातला निग्रह आठवत होता आणि काल त्याने कानात कुजबुजलेलं शेवटचं वाक्य! उफ!! मला लवकरात लवकर इथून पळालं पाहिजे.

ती विचार करत असतानाच तो दरवाजात येऊन उभा राहिला. एक मिनिटापूर्वी दारात कोणी नव्हतं आणि क्षणात तिथून अनिश एखाद्या महाराजासारखा रूबाबात आत येत होता. त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळताना तिचं अख्खं शरीर ताठ झालं. तो टेलर्ड ब्लॅक सुटमध्ये होता. क्रिस्प व्हाईट शर्टचं वरचं बटन उघडं आणि नो टाय! आता किंचित वळायला लागलेले काळेभोर दाट केस जेल लावून थोडे सेट केले होते. त्याला येताना बघताच लोक बोलणं थांबवून त्याच्याकडे माना वळवून बघत होते. जसं काही कुठल्या फिल्म स्टारने पार्टीत डेब्यू केलाय.

सोनलच्या सर्जरीआधीही तो पॉप्युलर होता पण सर्जरीनंतर! इट्स लार्जर दॅन लाईफ! बरेच लोक एकदम पुढे होऊन त्याच्याशी हात मिळवून बोलू पाहतायत. काहीजण त्याच्या खांद्यावर थाप मारून आपण किती जवळचे आहोत दाखवायच्या प्रयत्नात आहेत. तो ओठांवर हसू ठेवत सगळ्यांशी बोलतोय पण त्याचे डोळे गर्दी स्कॅन करतायत. तो मला शोधतोय.

तो मला शोधतोय!!

ती पॅनिक होत तिच्या ग्रुपकडे वळली. आता तिला शंभर टक्के इथून पळायचं होतं. आज इथे यायलाच नको होतं. मूर्ख! तूच स्वतः त्याला बोलावलंस, दुसरं मन ओरडत होतं. तिच्या सगळ्या अंगावर काटा फुलला. तिने वेटरला थांबवून एक थंडगार पाण्याचा ग्लास घटाघट संपवला. सोना तिच्याकडे डोळे बारीक करून बघत होती.

"मला बरं नाही वाटत." ती टिश्यूने चेहरा टिपत म्हणाली.

"क्या हुआ, कही दर्द हो रहा है?" सोनाने काळजीने विचारलं.

"सरदर्द!" एवढ्याने सोना कंविन्स झाली नाही. "अम्म और मेरा .. मेरा" तिला एक सिंगल बॉडी पार्ट आठवत नव्हता. "और मेरा हाथ! हां, हाथमे बहोत दर्द हो रहा है! हम निकलते है, हॅपी दिवाली एव्हरीवन!" तिने निघून जायला जागा शोधली पण एकच दरवाजा होता आणि तो सध्या डॉ. पै अँड फॅन्सनी व्यापला होता. नेहाला पकडून गर्दीच्या कडेने निसटता येऊ शकेल. तिने नेहाकडे बघितलं, ती कोपऱ्यातल्या खुर्चीत मोबाईलवर काहीतरी बघत आरामात मांडीवरच्या प्लेटमधून काट्याने मंचूरियन खात होती.

"नेहा!! आपल्याला निघायचंय. स्टॉप इट." तिने घाईघाईत नेहाचा मोबाईल काढून घेत डेटा ऑफ केला.

"आर यू किडींग मी?! आपण आत्ताच तर आलोय. मी अजून काही खाल्लंपण नाहीये." नेहा तोंड वाकडं करत म्हणाली.

"जाताना काहीतरी पार्सल घेऊ, चल ऊठ..

बोलणं संपायच्या आत तिच्या दंडाभोवती बोटांचा विळखा पडला आणि ती दचकली.

"सायरा. आय होप तू पळत नाहीयेस!" तो वाकून तिच्या कानात शांतपणे म्हणाला. नेहा तिच्या हातातून फोन घेऊन पुन्हा खुर्चीत बसली. त्याने तिला तसंच धरून हळूच आपल्याकडे फिरवलं. तिने वर न बघता नजर काळजीपूर्वक त्याच्या छातीवर ठेवली होती. तिचे गाल गरम झाले होते. त्याच्या मिश्किल आवाजावरून कळत होतं की त्याला त्या खोट्या अग्रीमेंटबद्दल माहिती होतं.

तिने आवंढा गिळत मान डोलावली. "हो, कारण माझा हात खूप दुखतोय."

ते तिच्या स्वतःच्या कानांनाही हास्यास्पद वाटलं. तो मोठ्याने हसला.

"नेहा, इफ यू विल एक्स्क्यूज अस, मला तुझ्या बहिणीशी थोडं बोलायचंय." तो वाकून नेहाला म्हणाला.

"नो, शी विल नॉट एक्स्क्यू.."

"येस, यू आर एक्स्क्यूज्ड." नेहा मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाली.

रक्ताच्या बहिणीपेक्षा तुला गेम ऑफ थ्रोन्स प्रिय आहे! हाऊ डेअर यू नेहा!!

त्याने तिचा दंड न सोडता तिला कोपऱ्यात तांब्याच्या पसरट उरली पॉटमध्ये तरंगत्या दिव्यांच्या डिस्प्लेजवळ नेलं. तिथे थोडी रिकामी जागा होती. तिने काहीतरी बोलायचं म्हणून त्याला डेकोरेशन कसं वाटलं म्हणून विचारलं. तो तिच्या डोळ्यात रोखून पहात राहिला.

ओह ओके. आता एकटे आहोत तर खोटंखोटं  बोलायची गरज नाही.

"तू मला आज इथे बोलावलं होतंस की नाही?" त्याने शांतपणे विचारलं.

तिने आवंढा गिळून शेजारी भिंतीकडे पाहिलं. "हो. मी बोलावलं होतं."

"मग निघून का जात होतीस?"

तिला खरं मान्य करवत नव्हतं पेक्षा मान्य करायला ती लाजत होती.

तिला गप्पच राहिलेली बघून त्याने घट्ट धरलेला तिचा हात सोडून दिला. एकदम तिच्या डोक्यावर निराशेचा ढग पसरला.

"मी आता थकलोय सायरा. मी तुझ्यामागे पळणार नाही. मी काल तुला सांगितलंय, ते अग्रीमेंट मी फाडतोय. त्यामुळे तुला भीती वाटत असेल तर मी तुझं ऐकेन अँड आय रिस्पेक्ट युअर डिसीजन. ओके? आय वोन्ट फोर्स माय वे इनटू युअर हार्ट."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle