हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली
आज चौथा दिवस, आम्ही जास्तच उत्साहात होतो करण आज फुकरिया अर्थात बेस कॅम्पला पोचणार होतो. साधारण पाचच किमी चा रस्ता आणि जायला साधारण ३-३:३० तास लागणार होते. गरम चहा आणि नाश्ता करून आम्ही फुकरियाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस आमच्या ट्रेकमधील सर्वात नयनरम्य भागांपैकी एक होता.
हवा चांगली असल्यामुळे आम्हाला समोर नंदा देवी आणि नंदा खाट पर्वत दिसत सतत दिसत होते. ते इतके अफलातून दिसतात की फोटो काढू तितके कमीच! त्यांच्या ओढीने जातानाचा थकवाही थोडा कमी जाणवतो. जातानाच्या रस्त्यात दोन छोटे ओढे ओलांडले आणि त्यानंतर सुंदर पायवाट लागली.
ही पायवाट संपूच नये असं वाटत रहातं. ही पायवाट आम्हाला खोल पिंडार व्हॅलीमधे घेउन गेली. तिथुन पुढे हीच वाट जंगलाच्या दिशेने गेली आणि आम्ही सुंदर ओक आणि रोडोडेंड्रॉन (बुरांश) च्या दाट जंगलात प्रवेश केला. जंगलात चालायला लागलो आणि हळुहळु चढ जाणवू लागला. अर्थात फक्त चढ किंवा फक्त उतार असे नव्हतेच. जसजसे आम्ही चढावर गेलो. पिंडार नदी आम्हाला खाली वहाताना दिसायला लागली होती. तिची खळखळ अजुनही आमच्या बरोबर होतीच. चढ चढून गेल्यावर आम्ही एका सुंदर जागी पोहोचलो. लांबवर हिरवेगार कुरण होते. हा फ्रेश हिरवा रंग डोळ्यांना सुखावणारा होता. कुरणाजवळच्या पायवाटेवरून जवळपास ३० मिनिटे चालत गेलो.
जाताना लांबवर Siberian Ibex चरताना दिसली. ही भारतातली सगळ्यांत मोठी शेळी! ह्या कुरणातून वरच्या बाजूला बघितलं तर रोडोडेंड्रॉनचे मोठं जंगल दिसतं. तसंच जंगलातून जाताना काही ठिकाणचे अवघड पॅचेस भूस्खलन झाल्यामुळे अजुन अवघड बनले आहेत. शेवटचे दोन छोटे पाण्याचे प्रवाह ओलांडले आणि फुकरियाला पोचलो. फुकरिया १०५०० फूट उंचावर आहे. कॅम्प साइट अप्रतिम होती.
साइटवरून मागेच एक छोटासा ग्लेशियरचा तुकडा होता. जवळच एक मोठा खडक होता. टेहेळणी करण्यासाठी हा खडक उत्तम होता. समोरच्या डोंगरावर Ibex इथुन बघायला फार छान वाटत होतं. अजुन एक म्हणजे पक्षी निरिक्षण करायला ही अतिशय उत्तम जागा होती. सामान कमीत कमी नेण्याच्या नादात मी दुर्बिण न आणल्याचा मला पश्चात्ताप झाला. लांबवर हिमालयन मोनाल दिसत होता. आमच्या २६ जणांत एकानेच दुर्बिण आणली होती. आळीपाळीने ती घेऊन आम्ही मोनालला डोळ्यांत साठवून घेतले.
आजची साइटवर थोडं फोटो सेशन केलं
आज आम्ही दगडावर बसून भरपूर गप्पा, फोटो, गाणी म्हणून साइट यादगार बनवली.
इतकी मस्त साइट, पण उतारावर होती. उद्याचा महत्वाचा दिवस, समिट गाठायचं होतं म्हणून लवकर झोपायचं ठरवलं पण हाय! मला झोपच लागेना. स्लीपिंग बॅग मधून सारखं घसरायला होत होतं. कुस बदलून, हात आत बाहेर करून सगळं करुन बघितलं. अजुन एक रात्र इथेच काढायची आहे या आठवणीने पोटात गोळा आला. शेवटी रात्री १२ वाजता झोप लागली.
झिरो पोइंटच्या आठवणीने लवकर जाग आलीच. आणि त्या वाट पहात असलेल्या सुंदर दिवसाची सुरुवात झाली.